इतिहास, इतिहासाची पुरोगामी वैज्ञानिक संकल्पना, फिनामिनॉलॉजी, उत्तर आधुनिकता आणि शैव : श्रीधर तिळवे नाईक
सर्वसाधारणपणे आपण इतिहासाची आधुनिक आणि उत्तर आधुनिक संकल्पना तपासत आहोत आणि त्याचबरोबर या दोन्ही संकल्पना ज्या इतिहासाच्या संकल्पनेच्या विरोधात ठाकल्या त्या इतिहासाची वैज्ञानिक संकल्पना आणि पौराणिक इतिहासाची संकल्पना त्यांचाही आपण मागोवा घेत आहोत
वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्यक्ष प्रमाण मानणारे विचारवंत प्राचीन काळात सुद्धा होऊन गेलेले दिसतात यामध्ये सर्वात अग्रेसर नाव हे गौतम बुद्धाचे असले तरी त्याची सुरुवात फार प्राचीन आहे
प्राचीन भारतात भूतकाळ लिहिण्याचे दोन प्रकार प्रत्यक्ष प्रमाणाच्या आधारे उभे राहिले ते म्हणजे वृत्तांत आणि चरित्र ! यातील वृत्तांतामध्ये साधारणपणे ज्याला आज आपण न्यूज रायटिंग म्हणतो त्या पद्धतीचे लिखाण होते ते वृत्त म्हणून दिले जात होते आणि ते सर्वसाधारणपणे राजाला सादर केले जात असे किंवा गणनायकाला सादर केले जात असे भारता मधले वृत्तांत कथन हे नेहमीच मौखिक परंपरेमध्ये होते ते लिहून ठेवावे असे काही कोणाला वाटलेले दिसत नाही अपवाद फक्त अशोकच असेल याबाबतीत बौद्ध वाङ्मय हे फार सुरक्षित रित्या वाढलेले दिसते बुद्ध चरित आणि हर्षचरित हे भारतातील महत्त्वाचे चरित्र लेखन आहे सर्वसाधारणपणे चरित्र लेखन हे व्यक्तीच्या अवतीभोवती फिरते तर वृत्तांत हा नेहमी ऑब्जेक्टिव्ह असतो त्यात व्यक्तिगततेला महत्त्व नसते
अर्थात याला छेद द्यायचा म्हणूनच ब्राह्मण धर्माने पौराणिक चरित्र उभे करायला सुरुवात केली आणि काही काल्पनिक चरित्रे निर्माण करत संपूर्ण समाजावर प्रचंड प्रभाव आणि नियंत्रण मिळवले रामायण आणि महाभारत हे सुरुवातीला वृत्तांत असतीलही परंतु प्रत्यक्षामध्ये हळूहळू रामाचे आणि कृष्णाचे चरित्र त्यातून उभे करण्यात आले आणि त्याचाच प्रचार आणि प्रसार करण्यात आला ती अधिकाधिक पौराणिक बनवत नेण्यात आले
याची सुरुवात बुद्ध चरित्रापासून होते बुद्ध चरित्र खरोखर किती रिलायबल आहे हा प्रश्नच आहे मुळात गौतम बुद्ध यांच्या आयुष्यात हे सर्व काही घडले का की हे सर्व अरेंज केले गेलेले होते असा प्रश्न नेहमीच पडतो कारण यातल्या अनेक घटना काल्पनिक असाव्यात असे आता स्पष्ट दिसते आहे मग पौराणिक चरित्र निर्माण करण्याचे श्रेय बुद्ध चरित्राला द्यावे का ? जर सर्व पुराने व महाकाव्य बुद्धानंतर लिहिली गेली असतील तर मग या पापाचे श्रेयही बौद्ध वाङ्मयाने घ्यावे जैन वाङ्मयाने घ्यावे ते हे घ्यायला तयार आहेत का ? चांगले श्रेय वाटत असेल तर ते आमचे आणि वाईट आमच्या वाट्याला येत असेल तर ते आमचे नव्हे असा आपपरभाव करून कसे चालेल ?
भारताचा पहिला वास्तविक इतिहास या क्षणी तरी मेगास्थिनिसचा इंडिका हा ग्रंथ आहे पण हा सुद्धा अनेक अद्भुत गोष्टींनीच भरलेला आहे मग याचा अर्थ प्रत्यक्ष प्रमाणावर आधारलेले चरित्र भारतात किंवा भारतावर उपलब्ध नाही का ? सध्या तरी त्याचे उत्तर "हो! उपलब्ध नाहीच आहे "असेच आहे अपवाद कदाचित असला तर कलहन असेल
प्रत्यक्ष प्रमाणावर आधारित इतिहासाचे लिखाण हे युरोपमध्ये सुरू झाले हे आपणाला मान्य करावे लागेल सिस्टिमॅटिक स्टडी ऑफ द पास्ट ही वैज्ञानिक इतिहासाची संकल्पना युरोपमध्येच निर्माण झाली इतिहास म्हणजे घटनांची शिस्तबद्ध प्रगतीकडे नेणारी साखळी अशी या लोकांची धारणा होती त्यामुळे प्रत्येक घटनेबाबतीत
१काय घडले २ कोणात घडले ३ कसे घडले ४ का घडले ५ केव्हा घडले ६ कोणामुळे घडले
हे सहा प्रश्न महत्त्वाचे ठरत गेले
हे घडलेले निवेदना मार्फत सांगणे आणि हे सांगताना योग्य ते प्रत्यक्ष प्रमाणाच्या आधारे पुरावे देणे ही वैज्ञानिक इतिहासाची संकल्पना आहे
इतिहास सिद्धांत आहे की केवळ परिकल्पना आहे हा आजही प्रश्न आहे आणि तो अद्यापही सुटलेला नाही दुसरी गोष्ट भूतकाळापासून मनुष्य खरोखर काही शिकू शकतो का? शिकतो का? हा एक फार मोठा प्रश्न अलीकडे जास्तच उपस्थित झालेला आहे मुख्य म्हणजे मनुष्य स्वतःच्या मेंदूमध्ये स्वतःचा भूतकाळ तयार करत असतो आणि हे करत असताना तो नेमके काय करतो याविषयीचे अनेक उत्तरआधुनिक आणि चौथ्या नवतेचे संशोधन आता पुढे येते आहे साहजिकच या नव्या संशोधनाच्या प्रकाशामध्ये मेंदू हा अनेकदा सर्वांयवलसाठी स्वतःचा भूतकाळ बदलतो असे सिद्ध झालेले आहे आता जर मनुष्यच स्मृतीच्या बाबतीत टिकण्याच्या आणि टिकवण्याच्या आणि उत्क्रांत होण्याच्या प्रोसेस मध्ये स्वतःला रचत असेल तर मग तो इतिहास ऑब्जेक्टिव्हली खरोखर असू शकतो का असा आता प्रश्न निर्माण झालेला आहे मनुष्याची स्मृती आणि समाजाची स्मृती यांच्यामध्ये खरोखर काही संबंध असतो का ते एकमेका सारखे असतात का हा एक कळीचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे कारण इतिहास म्हणजे समाजाची स्मृती अशी ही एक इतिहासाची वैज्ञानिक व्याख्या आहे प्रश्न असा आहे की स्मृति संदर्भात माणसाचा मेंदू जे काही खेळ खेळतो ते सर्व खेळ तो इतिहासासंदर्भात खेळतो का ?
एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे ज्याप्रमाणे पदार्थ विज्ञान ,रसायन विज्ञान किंवा जीव विज्ञान वैज्ञानिक असू शकतात त्याप्रमाणे इतिहास वैज्ञानिक असू शकत नाही याचे कारण उघड आहे यामध्ये मनुष्य इनव्हॉल्व गुंतलेला असतो आणि मनुष्याची जिथे जिथे गुंतवणूक होते तिथे तिथे मनुष्य स्वतःचे सगळे बायस घेऊन येतो असा इतिहास आहे साहजिकच अलीकडे सर्व मानव्य शाखांना विज्ञान मानायला उत्तराधुनिकतेने नकार दिला त्यामध्ये इतिहास सुद्धा येतो त्यामुळेच वैज्ञानिक इतिहास असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण नेमके काय म्हणतो हे आता तपासून पाहण्याची वेळ आलेली आहे
इतिहासाच्या नीट कन्स्ट्रक्शन साठी इतिहासाला नेहमीच प्रायमरी आणि सेकंडरी सोर्सेस ठरवावे लागतात यात दिक्कत अशी येते की की जे जे प्रायमरी सोर्सेस प्रायमरी सोसायटीचे होते ते सगळे मौखिक होते विशेषतः आदिवासी संस्कृतीमध्ये हे खूप वेळा घडते अशा वेळेला आदिवासी संस्कृतींचा इतिहास नाकारायचा का असा एक फार मोठा प्रश्न निर्माण होतो हीच गोष्ट पोटी लोकांच्या बाबतीत आहे म्हणजेच लिखाणाला आपण जर का महत्व दिले तर सगळा इतिहास मग मार्गी आणि देशी यांच्यामध्येच रंगायला लागतो आणि मौखिक परंपरा नाकारत मौखिक परंपरांना सेकंडरी सौर्सेसचा दर्जा देत मार्गी आणि देशी आपापल्या पद्धतीने सर्व इतिहास लिहायला लागतात त्यामुळेच भारतामध्ये अनेकदा इतिहास फक्त मार्गी किंवा देशी पद्धतीने लिहिला जातो अशावेळी पोटी आणि जमाती असलेल्या समाजांनी आपल्या इतिहासाचे काय करायचे असा एक उत्तर आधुनिक प्रश्न अलीकडे निर्माण झालेला होता आणि मग मौखिक सौरसेसना सुद्धा प्रचंड महत्व देण्याची परंपरा उत्तराधुनिक इतिहासात सुरू झाली त्यातूनच मग इतिहास कायम प्रगती करत असतो किंवा इतिहास सतत उत्क्रांत होत असतो या संकल्पनेला हादरे बसायला लागले त्यातूनच मग काही देशीवादी मंडळींनी आदिवासी असणे हेच प्रगतीचे लक्षण मानले हे दुसरे टोक होते वैज्ञानिक इतिहासाने दिलेली प्रगतीची संकल्पना नाकारणे हे अनेक उत्तर आधुनिक आणि देशीवादी इतिहासकारांना आवश्यक वाटायला लागले कारण खरोखरच विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने प्रगतीच्या नावाखाली जी प्रचंड नासाडी केली त्या नासाडीला अधिकृत मान्यता द्यावी का असा प्रश्न इतिहासाच्या अंगाने सुद्धा निर्माण झाला अलीकडे त्याला इको फ्रेंडली वातावरणाने मदतच केलेली आहे ही प्रगती जर अंतिमत: संपूर्ण पृथ्वीचा सत्यानाश करणारी असेल तर मग ती प्रगती काय चाटायची आहे असा प्रश्न वारंवार इको फ्रेंडली लोक निर्माण करत असतात त्यामुळेच वैज्ञानिक इतिहासाची प्रगतीची संकल्पना ही खरोखर कितपत स्वीकारणे योग्य आहे असा प्रश्न या लोकांनी निर्माण केलेला आहे
पुरावे बघताना नेहमीच १ अस्सलता २ विश्वासार्हता ३ खरे खोटेपणा ४ प्रामाण्यता ५ सत्यता या पाच कसोटी लावून पुराव्यांना तपासावे लागते अनेकदा बनावट कागदपत्रे सादर केली जाऊ शकतात अनेकदा पुरावा समकालीन असतो परंतु त्याला विश्वासार्हता नसते कधीकधी खूप खरे बोलून हळूच खोटे बोलले जाते त्यामुळे खरे खोटेपणा नीट तपासावा लागतो मुख्य म्हणजे जी विधाने येतात ती खरी असतात किंवा खोटे असतात कुठल्याही इतिहासामध्ये सर्वात प्रथम पुराव्या मधली विधाने खरी आहेत की खोटी आहेत हे तपासावे लागते आणि अर्थातच सर्वात शेवटी त्या सगळ्यातून जो काही प्रमाणीकरणाचा मुद्दा येतो तो तपासावा लागतो प्रमाणित नेमके कोणत्या गोष्टीने होते हेही तपासावे लागते अनेकदा प्रमाणित करण्याची जी साधने असतात ती वैज्ञानिक पातळीवर मागासलेली असू शकतात आणि मग या सगळ्या पातळीवर सत्य नेमके काय आहे ते इतिहासकाराला मांडावे लागते इतिहासाचे सत्य हे ह्या पाच कसोटींच्या मधून जावे लागते वैज्ञानिक इतिहासाने या पाचही गोष्टी वारंवार पुढे आणल्या आणि इतिहास लेखनावर याचा आजही प्रचंड मोठा प्रभाव आहे आणि तो असलाच पाहिजे प्रश्न असा असतो की फक्त पुरावे असतात का आणि इथेच वैयक्तिक मुद्दे यायला लागतात पहिला मुद्दा व्यक्तीचे तत्कालीन समाजाशी आणि सरकारशी असलेले व्यवहारिक संबंध आणि दुसरा मुद्दा व्यक्तीची आसक्तीग्रस्तता आणि श्रद्धा
या गोष्टी अनेकदा त्याला पुरावे निवडताना बायस करत पूर्वग्रह दूषित करत जातात आणि इतिहासाचा वैज्ञानिकपणा हरवत जातो
इतिहास सर्वात प्रथम दोन गोष्टींना महत्त्व देतो अवकाश आणि काळ आणि त्यामुळेच सर्वसाधारणपणे अवकाश भौगोलिक होत जातो तर काळ हा अमुक अमुक काळ असा होत जातो उदाहरणार्थ भारताचा इतिहास असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा भारत हा भूगोल होतो आणि हा भूगोल नेमका काय आहे त्याची व्याख्या इतिहास लिहिताना करावी लागते त्याचबरोबर प्राचीन भारताचा इतिहास किंवा अर्वाचीन भारताचा इतिहास किंवा आधुनिक भारताचा इतिहास किंवा उत्तर आधुनिक भारताचा इतिहास अशा तऱ्हेने आपण इतिहास लिहू शकतो हे सर्व काळाशी निगडित आहे म्हणजेच अवकाश आणि काळ हे इतिहासाच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरत जातात कधी कधी व्यापक भूगोल घेण्यापेक्षा त्या भूगोलामधले एखादे क्षेत्र निवडले जाते. उदाहरणार्थ भारताची केवळ मिलिटरी असा आपण जर का कार्यक्षेत्रीय इतिहास घेतला तर फक्त त्यामध्ये भारताच्या मिलिटरीचा इतिहास लिहिला जातो इथेच कार्यक्षेत्राचा मुद्दा येतो कधी कधी फक्त भौगोलिक क्षेत्राचा मुद्दा येतो उदाहरणार्थ महाराष्ट्राचा इतिहास आता हा इतिहास भारताच्या इतिहासाचा भाग असला तरी प्रत्यक्षामध्ये तिथे फोकस भारतातल्या एका राज्यावर आहे अनेकदा इतिहास राजकीयच असतो जो आता हळूहळू उत्तराधुनिकतेमुळे दुय्यम बनत चाललाय राजकीय लोकांचे फारसे योगदान संस्कृतीमध्ये नसते हे आता स्पष्ट होत चालले आहे संस्कृती ही अनेकदा ज्ञान केंद्रित किंवा अनुभव केंद्रित असते पूर्वी मात्र राजकारण किंवा राज्यकारण्याचा इतिहास म्हणजेच इतिहास असा काहीतरी गैरसमज लोकांचा झाला होता तो आता दूर होत चाललेला आहे लोकप्रियतेच्या बाबतीत मात्र आजही शरीर महत्त्वाचे ठरते आणि हे शरीर वैयक्तिक असते ज्याला पूर्वी चरित्र असे म्हटले जाईल चरित्र म्हणजे दुसरे तिसरे काही नसून त्या त्या व्यक्तीचा इतिहास असतो यापुढेही जाऊन काही लोक तुकारामाच्या कविता म्हणजे तुकारामाचे चरित्र असे म्हणतात ते पुढे ताणले तर आपण तुकारामाच्या कविता म्हणजे तुकारामाचा इतिहास असे म्हणू शकतो उत्तर आधुनिकतेने आणखी एक इतिहास केंद्रस्थानी आणला तो म्हणजे संकल्पनांचा इतिहास ! हा कळत नकळत बौद्धिक इतिहास आहे आणि राजकारणामध्ये कोणत्या कोणत्या बौद्धिक संकल्पना कशाकशा विकसित होत गेल्या हे अभ्यासणे गरजेचे बनल्याने साहजिकच बौद्धिक संकल्पनांचा विशेषत: राजकीय बौद्धिक संकल्पनांचा इतिहास प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लिहिला जाऊ लागला उदाहरणार्थ लोकशाहीचा इतिहास यामध्ये लोकशाही संकल्पना आणि तिचा इतिहास येतो भारतामध्ये बौद्धिक संकल्पनांचा इतिहास अजूनही नीटपणे लिहिला जात नाही आणि भारतीय इतिहासातील ही एक फार मोठी शोकांतिका आहे कलेचा इतिहास म्हणजे एका अर्थाने माणसाच्या भावनांचा इतिहास असतो भावनिक अंगाचा इतिहास असतो म्हणूनच कला महत्त्वाची ठरत जाते कारण प्रत्यक्ष इतिहास लेखनामध्ये आपणाला भावनांना वाव देऊन चालत नाही परंतु कला हे असे क्षेत्र आहे की जिथे कलेचा इतिहास म्हणून भावनांचाच इतिहास लिहायला लागतो विशेषतः आधुनिक कालखंडामध्ये हे झालेले दिसते उदाहरणार्थ परात्मता ही भावना तर त्या भावनेचा इतिहास कलेच्या क्षेत्रामध्ये फार महत्त्वाचा ठरत जातो याशिवाय मानवी समाजाच्या एखाद्या क्षेत्राभोवती लक्ष देता येते उदाहरणार्थ मार्क्सवादी इतिहास हा मानवी संस्कृतीच्या आणि मानवी समाजाच्या फक्त आर्थिक अंगावर सर्वाधिक भर देतो आणि आर्थिक अंगामुळे इतर सर्व अंगे विकसित होतात असे गृहीत धरून संपूर्ण भारतीय किंवा जागतिक इतिहास म्हणून अर्थशास्त्राचाच इतिहास मांडत असतो.
या पुरोगामी इतिहासाने दिलेले सर्वात मोठे योगदान म्हणजे त्याने माणसाचा इतिहास दंतकथांच्या इतिहासातून बाहेर काढला काल्पनिक गोष्टींच्या मधून बाहेर काढला याबद्दल इतिहास नेहमीच वैज्ञानिक इतिहासाचा पुरोगामी इतिहासाचा ऋणी राहील अर्थात पुरोगामी इतिहास नंतरच्या कालखंडामध्ये केवळ वैज्ञानिक राहिला नाही तर उत्तर वैज्ञानिक बनला त्याचे नेमके काय परिणाम झाले हे अजूनही स्पष्ट झालेले नाही मुख्य म्हणजे आयडिया लॉजी आली आणि या आयडिया लॉजिंनी इतिहास ही वैज्ञानिक गोष्ट ठेवण्याऐवजी आपल्या आयडियालॉजी भूतकाळावर लादायला सुरुवात केली त्यातून इतिहास विपरीत होत गेला
दुसरा मुद्दा अर्थातच मेथडचा असतो कुठलाही पुरावा तपासण्याची म्हणून एक पद्धत असते या पद्धतीची विश्वासार्हता किती असा प्रश्न नेहमी निर्माण होत असतो प्रमाणीकरणाच्या विविध मेथड निर्माण होत असतात आणि त्यातून आपल्याला अधिकाधिक सत्य कळत जाते
प्रत्यक्षामध्ये प्रमाणीकरणांमध्ये आयडिया लॉजिक कसे घुसत गेले आणि त्यामुळे इतिहास कसे कसे विपरीत लिहिले गेले हे कळत गेले आणि म्हणूनच मग इतिहासाची वैज्ञानिक संकल्पना मागे पडत गेली आणि त्या जागी आधुनिक आणि उत्तराधुनिक इतिहासाची संकल्पना फिनामीना आणि इव्हेंट केंद्रस्थानी येत गेले
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment