बहुजन लोकांचा गेलेला आत्मविश्वास श्रीधर तिळवे नाईक 


कुठल्याही समुदायाचा आत्मविश्वास घालवायचा असेल तर त्याचे श्रद्धांतर घडवून आणा एकदा का त्याच्या श्रद्धा हलल्या की आपोआपच सर्व आत्मविश्वास देणाऱ्या गोष्टी हालायला लागतात धर्म हा यासाठी जन्माला आलेला असतो ती एक राजकीय सत्ताप्रणाली असते जी संपूर्ण युग त्या युगातील सत्ता ताब्यात घेते .


वास्तविक ब्रम्हांड किंवा निसर्ग आणि मनुष्य यांच्या मधले नाते हे एक अत्यंत स्वाभाविक नाते असते. मनुष्य सहजरित्या नैसर्गिक असतो आणि या नैसर्गिक नात्यासाठी त्याला कुठल्याही दलालाची गरज नसते. तो स्वतःच त्याच्या आसपासच्या पर्यावरणाशी पर्यावरणनिष्ठ असतो त्यातूनच त्याची प्रथम श्रद्धा प्रणाली आणि नंतर मोक्ष प्रणाली तयार होत जाते त्याचे स्वातंत्र्य अधिकाधिक वाढत जाते कारण तो आपल्या आसक्तींच्यावर हळूहळू यमनियम पाळत विजय मिळवायला लागतो याचा एक परिणाम असा होतो की जे मांत्रिक असतात त्यांचा धंदा धोक्यात येतो आणि या लोकांना स्वतःचा धंदा करायचा असेल तर हे नाते परवडणारे नसते साहजिकच मग माणसाचे निसर्गाशी असलेले नैसर्गिक नाते तोडून त्याला अस्तित्वात नसलेल्या परलोकांशी म्हणजे स्वर्ग आणि नरकाशी जोडून त्याचे दलालाना आवश्यक असलेले नवीन नाते निर्माण करणे आवश्यक बनते आणि हे निसर्गाशी असलेले आर्टिफिशियल नाते म्हणजे धर्म होय अन्यथा तो आणि निसर्ग किंवा भक्तीच्या भाषेत सांगायचे तर तो आणि देव हे डायरेक्ट एकमेकाला सहज भेटू शकतात पण असे डायरेक्ट भेटले तर सत्ताधारी डळमळायला लागतात कारण स्वतंत्र झालेला मनुष्य सत्तेचे अत्याचार सहन करत नाही आणि इथूनच सत्ताधारी आणि मांत्रिक यांची युती बनत जाते कुठल्याही गणामध्ये सत्तेला मान्यता मिळवण्यासाठी निसर्ग मान्यता आवश्यक असते ब्रम्हांड मान्यता आवश्यक असते आणि ही मान्यता लोकांनी मान्य करावी म्हणून मग एक व्यवस्था उभी करावी लागते ही व्यवस्था म्हणजे धर्म व्यवस्था आणि ही सत्ता प्रणाली असते त्यातून देवांची मान्यता मिळवणारा कृत्रिम राज्याभिषेक नावाचा विधी निर्माण होतो ज्याच्यातून धर्मालाही पैसे मिळतात आणि राज सत्तेला मिळणारी सत्ता अधिकृत होऊन तिलाही पैसे मिळतात शेवटी राज्याभिषेकाला लागणारा सर्व पैसा क्षत्रिय लोक सत्ताधारी लोक जनतेकडूनच कर रूपाने नंतर वसूल करतात त्यामुळे अंतिमत: हे पैसे जनताच देत असते(कधी कधी पर राज्यातील जनता) दुर्दैवाची गोष्ट एवढीच असते की जनतेच्या हे लक्षात येत नाही. 


निसर्गाशी नाते ठेवणे किंवा निसर्गाचा भाग बनणे ही एक अत्यंत नैसर्गिक प्रवृत्ती आहे दुर्दैवाची गोष्ट अशी की भारतातले किंवा जगातले पुरोगामी आणि आधुनिक लोक अनेकदा हे लक्षात घेत नाहीत. त्यामुळे धर्म या गोष्टीकडे ते राजकीय प्रणाली म्हणून बघतच नाहीत ते धर्म या गोष्टीकडे घरात ठेवायची श्रद्धा या नजरेने बघतात आणि ह्यामध्येच सगळा गोंधळ असतो कारण धर्म आणि श्रद्धा यांच्यातला फरक हाच असतो की श्रद्धा घरात ठेवता येते परंतु धर्म हा स्पष्ट पणाने समाजाचे नियंत्रण करतो पुन्हा पुन्हा सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो हे नियंत्रण करण्यासाठी म्हणून तो संस्काराद्वारे कुटुंब व्यवस्था पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतो आणि पितृधर्म मातृधर्म पुत्र धर्म कुलधर्म कन्या धर्म अशा प्रकारच्या अनेक गोष्टी निर्माण करत जातो जेणेकरून कुटुंब व्यवस्थेद्वारे धर्म ही राजकीय विचारप्रणाली स्पॉन्सर व्हावी . ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचे वर्चस्ववादी सिद्धांत प्रस्थापित व्हावेत . जनता अज्ञानात बुडून कायमचीच रसातळाला पाताळात काम करत राहो अशी ही योजना असते ही अत्यंत अनैसर्गिक योजना हळूहळू नैसर्गिक बनत जाते शेवटी शेवटी तर ती इतकी टोकाला पोहोचते की शूद्र दास लोकांना गुलाम म्हणण्याइतपत तिची मजल जाते . अतिशूद्रांना अस्पृश्य बनवण्यापर्यंत तिची मजल जाते आणि पुढे आदिवासी लोकांच्या जमिनी लाटण्यापासून त्यांचे सर्व जंगल लाटण्यापर्यंत ती पोहोचते .


धर्माचा हा भीषण अवतार सहजासहजी लक्षात येत नाही . उत्सव हे मुळातच श्रद्धेतून वा मोक्षातून जन्मलेले असतात पण धर्म ते आपल्या ताब्यात घेऊन त्यांना आपले धार्मिक स्वरूप बहाल करतो . याबाबतीत दीपावली हे उत्तम उदाहरण आहे . मुळात कार्तिक महिन्यातील कार्तिकेय या शिवपुत्राचा मोक्ष सोहळा असलेला हा दिवस! क्रिया तंत्राचा मोक्षाला पोहोचलेला पहिला सिद्ध! साहजिकच त्याची पूजा ही सिद्ध पूजा आहे आणि ही पूजा करताना नैसर्गिक रित्या त्याच्याबरोबर असणाऱ्या सर्व वीरांचाही सन्मान केला जातो . हे वीर म्हणजे कुबेर , बळी , नरक आणि यम होय. यातील कुबेर व्यापार आणि अर्थ सांभाळायचा तर बळी शेती व पशुपालन! यम हा न्यायव्यवस्था यमनियम सांभाळायचा तर नरक हा विधिनियम युक्त अंतर्गत संरक्षण व्यवस्था. साहजिकच या वीरांची पूजा हे आद्यवीर असल्याने केली जाते याचे कारण या सर्वांचा प्रमुख कार्तिकेय स्कंद खंडोबा होता आणि हे त्याच्या हाताखाली काम करत होते त्याला स्वतःत सामावून घेण्यासाठी वैदिक व्यवस्थेने त्याला देवांचा सेनापती केला . प्रत्यक्षात त्याने फक्त आपल्या हिमालय नावाच्या मातुल आजोबांना इराण मधून इराक मधून झालेले तत्कालीन टोळ्यांचे आक्रमण परतवून लावण्यासाठी मदत केली होती त्यासाठी त्यांच्या सेनेचे नेतृत्व केले होते नातू म्हणून त्याचे हे कर्तव्य होते आणि ते त्याने पार पाडले. त्याच्या आठवणीसाठीच म्हणून या महिन्याचे नावच मुळात कार्तिक ठेवली गेलेले आहे .


शैवधर्मी लोकांना पराभूत करायचे असेल तर त्यांचे सर्व उत्सव आपल्या ताब्यात घेतले पाहिजेत हे नीट कळलेले जे युरेशियन लोक होते त्यांनी हळूहळू आपले सर्व लोक उत्सवांच्या मध्ये घुसवायला सुरुवात केली . त्यातूनच मग कुबेराच्या जागी महालक्ष्मी आली. तर नरकासुराची कथा पूर्णपणे बदलून टाकण्यात आली . वास्तविक हा पूर्वेकडच्या असुरांचा प्रमुख आणि पार्वतीने त्याला युद्धात पराभूत करून एका अर्थाने शैव श्रुती स्वीकारायला लावली त्याच्या आधी तो फक्त श्रद्धेच्या आधारेच चाललेला होता आणि त्यानेच पार्वतीकडून पराभूत झाल्यानंतर मोक्ष स्वीकारला आणि मग सर्व असुर लोकांनी त्याच्या पाठोपाठ मोक्ष स्वीकारला आणि ही एक फार मोठी क्रांती होती. कारण या क्रांतीनंतरच सर्व असुर हे शैव झाले . त्यानंतर ते भगवती पार्वती आणि भगवान शंकरांच्यासाठी काम करायला लागले. हे हृदय परिवर्तन होते आणि त्याने भारताचा इतिहास बदलत तो जवळजवळ युद्धविरहित केला. अर्थात त्यानंतर युरेशियन लोकांचे आक्रमण झाले आणि पुन्हा एकदा मग युद्धे सुरू झाली.


कुबेर ही आद्य खजिनदार व्यक्ती वीर होती पण तिच्यानंतरही हे पद कायम राहिले आणि ते तिच्या नावाने राहीले त्यामुळेच कुबेराची पूजा सुद्धा महत्त्वाची ठरत गेली. 


आद्य बळीने संपूर्ण शेती व्यवस्था नीट केली राज्य आणि शेतकरी यांच्यात किती कुणाचा वाटा याची न्याय्य व्यवस्था निर्माण केली आणि हे श्रेय त्याला कायमच दिले गेले पाहिजे त्यानंतर पुन्हा एकदा दुसरा महत्त्वाचा बळी जाने या व्यवस्थेचे पुन्हा निर्माण केले हा हिरण्य वंशात निर्माण झाला वामनाने त्याचे काय केले त्याची कथा येते पण ही कथा खरी की खोटी हे ठरवणे फार अवघड आहे बळी ही सुद्धा प्रथम व्यक्ती होती मग संस्था झाली. 


हीच गोष्ट यमाबाबत आहे हे पद आहे आणि ते यमनियम विधी नियम तयार करणारे दंडनीती ठरवणारे आणि त्यानुसार दंड देणारे पद आहे म्हणून ते फार महत्त्वाचे म्हणूनच त्याचा मान ठेवला जातो. यमाची भीती वाटते कारण तो दंडनितीचा आधार आणि त्यानुसार शिक्षा देणारा आहे . नंतर शैव लोकांच्या मध्ये सुद्धा स्वर्ग नरकाच्या कल्पना घुसवण्यात आल्या किंवा घुसल्या आणि मग हा कर्माचा हिशेब ठेवणारा परलोक प्रमुख झाला .


त्यामुळे निदान शैव लोकांनी तरी आपले उत्सव आपण कशासाठी साजरी करतो हे नीट समजून घ्यावे . दीपावली हा उत्सव प्रामुख्याने वीर समाजाचा उत्सव आहे . आद्य पंचवीरांचा तो सन्मान आहे . वैष्णव लोकांनी तो जास्तीत जास्त उखडून फेकण्याचा प्रयत्न केला परंतु तो यशस्वी होईना म्हणून मग तडजोड करत गोष्टी आणलेल्या असतात परंतु एकविसाव्या शतकामध्ये पुन्हा एकदा शैव लोकांचे सर्व उत्सव आपल्या ताब्यात घेण्याचा आणि त्यांना वैष्णव रूप देण्याचा ब्राह्मण रूप देण्याचा प्रयत्न चाललेला आहे. गेली काही वर्षे कुबेर आणि महालक्ष्मी एकत्र येत होते आता यावर्षी मात्र फक्त महालक्ष्मीच आणली गेलेली आहे आणि ब्राह्मण स्ट्रॅटेजीला हे धरून आहे . या गोष्टी अत्यंत हळूहळू सूक्ष्म रूपाने आवाज न करता करणे यामध्ये ब्राह्मण उत्कृष्ट आहेत आणि नेमके हेच चाललेले आहे . अर्थात पुरोगामी लोकांना या गोष्टी लक्षात येत नाहीत त्यांना अजूनही समाज आर्थिक गोष्टीवर चालतो असे वाटते प्रत्यक्षात आर्थिक गोष्ट नंतर येते प्रथम माणसाचे संस्कार येतात आणि या संस्कारांच्या मध्येच मूलभूत बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट पावले वैष्णव धर्म टाकत आहे. पुरोगामी लोकांच्या आयुष्यात कधीही लक्षात येणे शक्य नाही . पुरोगामी लोक त्यामुळेच कायम हारत आहेत . आपण भारत देशात जन्मलेलो आहोत युरोप खंडामध्ये नाही याची त्यांना जाणीव नाही.


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे