निर्वाणानंतरच्या कविता
आरशाने आरशाला पहावे
पहावी आरसबंदी
झेलावी
वाकणाऱ्या बिंबांना चेहरा समजावे
नाहीसे होताना निमूट पहावे
निघण्याचा भास सोसावा
दुःखी व्हावे काल्पनिक
दाखल करत रहावे
दखलपात्र होण्याचे गुन्हे करावे
आरशात स्वतःला उमटवावे उमटत नाही म्हणून शोक करावा
उमजावे
फुटताना काल्पनिकता
कल्पना जोखावी
जोखणे हेही आरसबंदी
आरशात आरसा म्हणून पहावयाला शिकावे
आंधळ्या डोळ्यांनी होणारी टकमक पहावी
चकमक पहावी
तिच्या सौंदर्यावर फिदा होऊन
मरून जावे
मेल्यानंतर आरसे दिसेनासे होईपर्यंत
जगावे
आरशाचे उपकार उप आकार
नाहीसे व्हावे
कैलास आणि वैकुंठ डिस्कशन साठी सोडून
श्रीधर तिळवे नाईक
(निर्वाण सिरीज मधील निर्वाणानंतरच्या कविता या काव्यफायलीतून)
देव गुंडाळून ठेवण्यात माणसे एक्सपर्ट आहेत
त्यांना वाटतं
देव त्यांच्या सोयीनुसार चालतो
देवाला प्रत्यक्षात माहीत पण नाही
की पृथ्वी नावाचा ग्रह आहे
आणि त्याच्यावर उत्क्रांत होत माणूस तयार झालाय
देवाच्या दृष्टीने एक पेशी हालचाल करतीये
त्याने त्याला काहीच फरक पडत नाही
रिक्तता भरत जाणे
हा त्याच्या स्वभाव धर्माचा भाग आहे
तो मोक्ष देत नाही
तुम्ही मेंदू खाली करता
आणि तो रिक्तता स्वभाव धर्माप्रमाणे भरून टाकतो
त्याला कदाचित तुम्हाला मोक्ष मिळालाय
हेही ठाऊक नसते
श्रीधर तिळवे नाईक
(निर्वाण सिरीज मधील निर्वाणानंतरच्या कविता या काव्यफायलीतून)
Comments
Post a Comment