निर्वाणा पूर्वीच्या कविता 25

 इतकीही परीक्षा घेऊ नकोस कि 

परीक्षार्थीचा जीव जाईल 


ताणांचे तण झेलत तन माजोरी टिकवली 

तर आता एकेक अवयव गंजल्याचा फील 


दर्शन नाही आणि डोळे आंधळे 

उघडीपीला फक्त अंधाराचे बोट मधासारखे 

श्रवण नाही आणि सुरांचा श्रावण 

उन्हाचे आकडे मोजत गहाळ 


आयुष्य कुणी लांबवले 

कळण्याच्या आत 

आयुष्य ताबडवून संपले 


एक उदासी आहे मोक्षच्या अभावाची 


मी कुठे पंतप्रधानपद मागितले होते तुझ्याकडे 

मी मागितला फक्त मोक्ष 

जो फक्त तुझ्या कुशीत खेळण्याचा हक्क होता 


आता बापाची मांडी मागणे हा गुन्हा आहे काय ?


बाजाराचे आजार होऊ नयेत म्हणून एकटा जगतोय तर 

इथे शारीरिक तू धाडलेले 

आयुष्याचा पिक्चर रिलीज होण्याआधीच फ्लॉप ?


आता तर तुझ्या अस्तित्वाबद्दलही शंका 

मी एका अफवेत आयुष्य वाया घालवले कि काय ?


सगळं हिसकावून घेतलं गेलंय 

माझी कंगालीही काव्यात्मक राहिली नाही 


एक खडबडीत कातळ 

आणि त्यावर मी आंधळा होऊन बसलेलो 


आत्महत्येशिवाय कोणता पर्याय शिल्लक असतो अगतिक अंधारात ?


मला तिसरा डोळा हवा होता 

आणि तू तर माझे दोन्ही डोळे ठेचलेले 


महादेवा 

तू असूनही नसलेले हे जग 

मला जगू देत नाही 

आणि स्वतःला जगवायला जावं तर 

आपल्याला एका साडीत चोपून चोपून चेपलेलं 


कुठवर हा अंधार बघत 

सूर्याच्या फक्त कथा ऐकू ?


कानही काढून घे झालं 


इंद्रियाविना शरीरात वाकून बघण्याला जगणे म्हणणार असतील 

तर मला जगण्यात रस नाही 


तेव्हा तूच उचल हा निकम्मा देह 

आणि चुरगाळून दे फेकून मृत्यूच्या विवरात 


कागदाइतकीच तर होती माझी लायकी                            


श्रीधर तिळवे नाईक 

(निर्वाण सिरींजमधील निर्वाण सिरीजमधील निर्वाणापूर्वीच्या कविता ह्या काव्यफाईलीतून )

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे