राजकारण 25
माझी विश्लेषणपद्धत , शिंदे ,फडणवीस आणि आडवातिडवा शेवट श्रीधर तिळवे नाईक
जगाच्या इतिहासात सर्व ज्ञानाची एकात्मता कशी साधायची हा कायमच एक प्रश्न आहे आणि विधिनियम म्हणजे कायदे हे ह्या एकात्मीकरणामुळे बनत असल्याने तो राष्ट्राच्या व राज्याच्या संदर्भातला एक मूलभूत प्रश्न आहे ह्या प्रश्नाचे पहिले निसर्गयुगातले उत्तर आन्वीक्षिकी उर्फ तत्वज्ञान हे होते मोक्षयुगात हे दर्शन होते धर्मयुगात ह्याचे उत्तर धर्म असे होते प्रबोधनाच्या युगात मात्र वाद सुरु झाला आणि हा वाद सोडवण्यासाठी ऑगस्ट कोम्ट व इतरांनी समाजशास्त्र मांडायला सुरवात केली व ज्ञान एकात्म करण्याची जबाबदारी उचलली हे समाजशास्त्र तत्वज्ञान ,विज्ञान व शास्त्र ह्यांचा समन्वय करून काय दिशेने कायदे करायला पाहिजे ह्या दिशेने एका बाजूला सामाजिक आंदोलने उभारत तर दुसऱ्या बाजूला कायदे करत वावरायला लागले ह्या समाजशास्त्राने भारतात वर्ण व जात ही केंद्र मानत एका नव्या विश्लेषणात्मक संश्लेषणाची चौकट स्वीकारली जी ब्रिटिश राजवटीत अंधाधुंद बोकाळली आंबेडकरांनी वर्ण , जात ह्यांच्यात प्रवर्ग ही भर टाकली आणि त्यातूनच स्वातंत्र्योत्तर काळात ओपन , ओबीसी , बीसी , भटके आणि आदीवासी हे पाच प्रवर्ग जन्माला आले आधुनिक समाजशास्त्रतेने ही पुरोगामी चौकट नाकारत वर्ण व जात ह्यांना नाकारत वर्ग व गट ही संकल्पना स्वीकारली व कम्युनिस्टांनी ती रुजवण्याचा खूप प्रयत्न केला पण उत्तराधुनिकतेने वर्ग ह्या संकल्पनेची मर्यादा दाखवत वर्ग , धर्म , वर्ण , जात , गट आणि जमात ह्या सहाही गोष्टींचा स्वीकार केला आणि ह्या सगळ्यांना एक समाजशास्त्रीय व्हॅलिडिटी मिळाली ह्याचा परिणाम म्हणून समाजशास्त्रीय विश्लेषण हे ह्या सहाही अंगाने होऊ लागले मी ही व्होकॅबलरी वापरतो म्हणून अनेकांना मानसिक त्रास होतो पण भारतीय उत्तराधुनिकता समजून घ्यायची असेल तर ह्या व्होकॅबलरीला पर्याय नाही कारण ती ह्या सहा अंगाने भारतीय समाजात भारतीय समाजाचे वास्तव म्हणून वावरत आहे निवडणुका लढवत आहे कम्युनिस्टांनी तिला ठाम नकार दिला खरा पण त्यामुळे कम्युनिस्ट नामशेष झाले व्होकॅबलऱी टिकली
हिंदुत्व हे ह्या व्होकॅबलरीपासून दूर नाही ब्राम्हण हे ह्या ब्रिटिश प्रबोधन काळात सर्वात प्रथम जागृत झाल्याने साहजिकच हिंदुत्वाची सुरवात स्वामी दयानंद सरस्वतींनी केली त्यांनी जे हिंदुत्व मांडले ते पहिले आर्य वैदिक ब्राह्मणी हिंदुत्व होते आणि त्यांनी वैदिक धर्मात जन्माने नाही तर कर्माने वर्ण होते व जातव्यवस्था व अस्पृश्यता वैदिक धर्माच्या भाग नाहीत असे स्पष्ट सांगितले मी वैदिक धर्मात जन्मदत्त वर्ण , जात ,अस्पृश्यता न्हवती ह्या त्यांच्या मताशी पूर्ण सहमत आहे आणि स्वतःला वैदिक म्हणवणाऱ्या ब्राम्हणांनी स्वतःला आर्य सामाजिस्ट वैदिक ब्राम्हण म्हणवून घ्यावे ह्या मताचा मी आहे
ब्राम्हण धर्माने कधीही वैदिक धर्म स्वीकारला नाही फक्त मंत्रासाठी वापरला व जन्मदत्त स्मृतिजन्य वर्णव्यवस्था स्वीकारली साहजिकच विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी आर्य समाजाच्या विरोधात जाऊन ब्राह्मणी हिंदुत्व मांडले किंबहुना हिंदुत्व हा शब्द चिपळूणकरांनीच मांडला हे मी इतरत्र साधार सिद्ध केले आहे
लोकमान्य टिळकांनी दोघांचा समन्वय साधत गीताधर्मी वैष्णव हिंदुत्व मांडले वैष्णव धर्माप्रमाणे त्यांनी स्मृती स्वीकारल्या आणि गीताही साहजिकच त्यांनी गीतारहस्य लिहिले आणि हिंदुत्व ही संकल्पना एलॅब्रेट केली
पुढे सावरकरांनी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वरील तिन्ही हिंदुत्वाचा मेळ घालत हिंदू हिंदुत्व मांडले व सांस्कृतिक आर्य राष्ट्रवाद डेव्हलप केला जो ज्युडायिक व त्यातील प्रामुख्याने इस्लामसंस्कृतीच्या विरोधात होता
ह्याला शह म्हणून प्रबोधनकर ठाकरे ह्यांनी क्षात्र हिंदुत्व मांडले आणि माझे हिंदुत्व हे जानवधारी ब्राह्मणांचे नाही असं सांगितलं भाजपमध्ये ह्या क्षात्र हिंदुत्वाची सुरवात योगी आदित्यनाथांचा गोरखनाथ मठ व मठाधीपती व लालकृष्ण अडवाणी ह्यांनी केली गोरखनाथांच्या नावामुळे शैवही ह्या हिंदुत्वाकडे आकर्षिले गेले आणि ह्यातून पुढे राममंदिर आंदोलन उभे राहिले व त्याने भाजपला नवी ओळख दिली ह्यानिमित्ताने ब्राह्मणकेंद्री हिंदुत्व व क्षात्र हिंदुत्व एकत्र आले आणि बाळासाहेब ठाकरे ह्यांनीही आपले क्षात्र हिंदुत्व ह्या क्षात्र हिंदुत्वाशी जोडले
ह्या दोन्ही प्रकारच्या हिंदुत्वाची सांगड घालत प्रमोद महाजन ह्यांनी तिसरे वैश्य कार्पोरेट हिंदुत्व जन्माला घातले खरेतर ते जगले असते तर तेच पंतप्रधान झाले असते पण त्यांच्या अकाली मृत्यूमुळे नरेंद्र मोदी ह्यांच्यासाठी जागा तयार झाली मोदींनी वैश्य आणि ओबीसी ही पारंपरिक युती पुन्हा घडवली भारतात ना वर्णसंघर्ष आहे ना वर्गसंघर्ष आहे आहे ते वर्गसमन्वय व वर्णसमन्वय ह्यांचे तत्वज्ञान ! मोदींनी घडवलेल्या ह्या प्रवर्गसमन्वयामुळे आणि त्यांना ब्राह्मणकेंद्री हिंदुत्व व क्षात्र हिंदुत्व ह्यांनी पाठिंबा दिल्याने ते प्रचंड बहुमतांनी निवडून आले
आता हा कार्पोरेट हिंदुत्ववाद सेटल झालाय आणि त्याला ब्राह्मणांची आवश्यकता वाटत नाहीये जे प्रमोद महाजनांच्यासारखे (प्रमोद महाजन हे फक्त नावालाच ब्राम्हण होते त्यांची मनोवृत्ती ही पक्की वैश्य होती ) वर्णजातिमुक्त ब्राम्हण आहेत त्यांच्याशीच त्याचे जुळू शकते ह्या हिंदुत्ववादाला मी मागे म्हणालो त्याप्रमाणे आता पक्षातील व बाहेरील ब्राह्मणकेंद्री हिंदुत्ववाद व क्षात्र हिंदुत्ववाद रिप्लेस करायचा आहे मात्र जे प्रमोद महाजनसारखे वैश्य वृत्तीचे ब्राम्हण व शरद पवारांसारखे वैश्य वृत्तीचे पुढारलेले क्षत्रिय आहेत त्यांना सोबत घेऊन जायचे आहे त्यासाठीच शरद पवारांशी अधूनमधून बैठकी होत असतात शरद पवार भाजपमध्ये गेले असते तर त्यांना आता राष्ट्रपतीपद व सुप्रिया सुळेंना केंद्रात गृह , अर्थ वा कृषी पद मिळाले असते पण शरद पवारांना पंतप्रधानपद हवे आहे आणि ते देणे भाजपला शक्य नाही . हे पंतप्रधान मिळणार नाही हे पक्के झाल्यास भविष्यात सुप्रिया सुळे भविष्यात भाजपमध्ये गेल्या तर आश्चर्य मानू नये जर पुन्हा काँग्रेस उभारली गेली व विजयी झाली तर मात्र त्या काँग्रेसमध्येच राहतील व अजित पवार राज्यात व सुप्रिया सुळे केंद्रात हा पारंपरिक करार सुरूच राहील
एकनाथ शिंदे हे क्षात्र हिंदुत्व घेऊन अजूनतरी ठाम आहेत त्यांच्यात व ठाकरेंच्यात एक फरक आहे उद्धव ठाकरे ह्यांचे राजकीय गुरु त्यांचे वडील आहेत तर शिंदे ह्यांचे मेंटॉर आनंद दिघे ! ठाकरे घराणेशाहीशी आवडो न आवडो जोडले गेलेत आनंद दिघे काय किंवा शिंदे काय सेल्फमेड आहेत आणि त्याचे आकर्षण काही शिवसैनिकांना आहे उद्धव ठाकरे नवाजुद्दीनला बाळासाहेबांची भूमिका देऊ शकतात शिंदे आनंद दिघेंची भूमिका हिंदूंलाच देणार हे जाज्वल दाखवतात ठाकरे व धर्मवीर ह्यांच्यात ठाकरे हा सिनेमा ऍव्हरेज व्यवसाय करणारा होता तर धर्मवीर सुपरहिट ! ठाकरे ह्यांचे ह्याकडे पुरेसं लक्ष गेलेले नाही हा सिनेमा अनेक गोष्टींचा राजकीय इशारा होता
गुजरात व युपी दोन्ही राज्यात जाज्वल हिंदुत्वच विजयी झालंय उद्धव ठाकरेंचा आवाज आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व इतकं सभ्य आहे कि त्यांनी जाज्वल हिंदुत्व दाखवलं तरी ते सभ्य वाटतं एकनाथ शिंदे बघताक्षणीच लडाकू वाटतात आता ह्याचा फायदा त्यांना होईल का ह्याचे उत्तर इलेक्शनला मिळेल मोदी व शहा ह्यांना शिंदे ह्यांच्या जाज्वल हिंदुत्वाची गरज निवडणूक जिंकण्यासाठी वाटणे सहज स्वाभाविक आहे पण प्रॉब्लेम एकच आहे शिंदे हे अजूनही शिवसैनिक आहेत ते शपथविधी घेताना कुणाचे नाव घेतात ह्यावर दिल्लीकरांची नजर होती आणि त्यांनी ना मोदी ना शहा ह्यांचे नाव घेतले त्यांनी पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे ह्यांचेच नाव घेतले
ह्याउलट फडणवीस आहेत ते जाणकार आहेत मेहनती आहेत त्यांनी हे सत्तांतर घडावे म्हणून जीवाचे रान केले आहे हे खरं पण फडणवीस आक्रमक झाले कि आक्रस्ताळी वाटतात पण जाज्वल वाटत नाहीत मात्र ते बुद्धिमान आहेत आणि महाराष्ट्रात त्यांचा एक बेस तयार झालाय हा बेस कार्टेलचा नाही तर संघाच्या कार्यकर्त्यांचा आहे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हा संगम महाराष्ट्रातला चालताबोलता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे ब्राह्मणकेंद्री हिंदुत्व त्यांच्यामुळे परत येऊ शकतं दोघेही वैदिक हिंदुत्व मानत असल्याने वर्णजात मानत नाहीत त्यामुळे इतर वर्णजातीतही त्यांना स्पेस आहे त्यामुळे मोदी ह्यांना हा संगम डोईजड वाटला तर आश्चर्य काय ? एखाद्या माणसाला केंद्रात येऊ द्यायचं नाहीये पण महाराष्ट्रात खिळवून ठेवायचं आहे आणि त्याला असलेला बेस पण गमवायचा नाहीये पण त्याला मुख्यही होऊ द्यायचं नाही तर करायचं काय ? तर उपमुख्यमंत्रीपद देणे हे सर्वात उत्तम ! ते दिलं गेलेलं आहे ह्यातून एक इशाराही आहे मुख्यमंत्री व्हायचं असेल तर स्वतंत्र बहुमत कमवा व मुख्यमंत्रीपद हक्काने मिळवा
एका अर्थाने रावही पडले आणि पंतही पडले आणि शिंदे विजयी झाले अशी ही सिच्युएशन आहे
उद्धवराव पुन्हा शिवसेना उभीच करू शकणार नाहीत असे वातावरण निर्माण करण्यात आले आहे त्यावर मात करून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पक्ष उभा करणे ह्याशिवाय उद्धव ठाकरेंना पर्याय नाही खरेतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ह्यांनी एकत्र येणे ही काळाची आणि ह्या परिस्थितीची गरज आहे पण हे दोघांनाही कसे पटवायचे ?
ह्या सगळ्यात सामान्य माणसाचे काय ?
आदित्य ठाकरेंनी राखलेले आरे जंगल पुन्हा दावणीला बांधले जणार काय ?
केंद्रांची अडवणूक थांबून विकासकामांना अधिक गती मिळणार काय ?
लोकशाहीत मतदारांनी दिलेला कौलच महत्वाचा आहे असतो हा कौल हिंदुत्वाच्या बाजूने होता पण वचनमोडल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे विरोधात गेले जर मतदार महत्वाचा होता तर ठाकरेंना निषेध म्हणून मंत्रिमंडळाबाहेर राहून बाहेरून पाठिंबा देता आला असता पण हे घडले नाही उद्धव ठाकरे बाहेर जातायत म्हंटल्यावर त्यांना थांबवण्यासाठी मतदारांचा कौल प्रमाण मानून त्याचवेळी एकनाथ शिंदे ह्यांना मुख्यमंत्रीपद देऊन भाजपला मतदारांचा रिस्पेक्ट करता आला असता पण हेही घडले नाही उलट राष्ट्रवादी फोडून शिवसेनेला बाहेर ठेवण्याचे कारस्थान रचले गेले पण ते फसले ते जर फसले नसते व अजित पवार एकनाथ शिंदेंच्याइतके आमदार घेऊन बाहेर पडले असते तर भाजपने सरकार बनवले नसते काय ? मग हेच उद्धव ठाकरे ह्यांनी घडवल्यावर ते अयोग्य कसे ठरते आणि कुठल्या तर्कानुसार ? मतदारांचा अनादर दोन्ही बाजूंनी झाला मग एकमेकांवर चिखल उडवून काय फायदा ? शरद पवार ह्यांनी म्हंटल्याप्रमाणे एकनाथ शिंदे एव्हढ्या मोठ्या संख्येने आमदार घेऊन गेले हे त्यांचे मोठेच कर्तृत्व ! त्याचे बक्षिसही त्यांना घसघशीत मिळाले , समटाईम करेज वर्क्स , एकनाथ शिंदे ह्यांच्याबाबत ते वर्क झाले अजित पवारांच्याबाबत ते वर्क आऊट झाले नाही एव्हढेच ह्या सगळ्या गड्बडकांडीत मतदार कुठे होता ?
आता एका अर्थाने मतदारांनी दिलेला कौल सत्तेवर आला हे खरंच पण त्यात राजकारणी लोकांचे कर्तृत्व कमी आणि सत्ताकारणाचा फिरता रंगमंच अधिक जिम्मेदार आहे
असो
डावे समाजवादी धोरण फेल गेलं म्हणून नरसिंहरावानी उजवे धोरण स्वीकारले मात्र गांधीवादी चौकट त्यांनी व पुढे मनमोहनसिंगांनी तोडली नाही मोदींनी गांधीवादी आर्थिक चौकट पूर्णच तोडून अतिउजवे धोरण आणले खरे पण त्याची फळे अजूनही दिसत नाहीत मोदीवादी व मोदी सतत दूर गगनके तले पहायला सांगतायत पण लोक दूर पाहून पाहून आता कंटाळले आहेत लोकांना काही नजीकचे इफेक्ट्स लागतात एकनाथ शिंदे ह्यांच्यावर हे नजीकचे इफेक्ट्स घडवून आणण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे माझ्या त्यांना शुभेच्छा
चांगल्या लोकशाहीत सत्ताधारी व विरोधी दोन्ही बळकट लागतात आता दोन्हीही बळकट व युतीत आहेत हे ह्या राजकारणाचे सर्वात उत्तम फळ होय .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment