वेदोक्त शाहू महाराज टिळक
वेदोक्त पुन्हा श्रीधर तिळवे नाईक
शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त काही पोस्ट फिरल्याने हे लिहितो आहे. क्लॉड लेवी स्ट्राउसच्या मते द्विध्रुवात्मकता ही प्रत्येक संस्कृतीच्या संरचनेत अटळ असते त्यामुळेच असुर आर्यांची संस्कृती द्विध्रुवात्मकता मानते म्हणजे असुर विरुद्ध देव
देवासूर आर्य संस्कृती स्पष्टपणे सुरवातीला सूर विरुद्ध असुर व नंतर आर्य आणि आर्येतर अशी द्विध्रुवात्मकता मानते पुढे परशुरामाने क्षत्रिय मारल्याने व कलियुगात वैश्य न राहिल्याने देवासुरांनी आर्य म्हणजे ब्राम्हण अशी व्याख्या बदलून घेतली आणि ब्राम्हण विरुद्ध शूद्र अशी द्विध्रुवात्मकता उभी केली
ही द्विध्रुवात्मकता ह्या काळात टिळकांच्यापुढे उभी टाकली ती सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराज ह्यांच्या संदर्भातील वेदोक्त प्रकरणामुळे ! ह्या प्रकरणाची कृतिजन्य बाजूची चर्चा आपण आधीच पाहिली आहे मात्र तात्विक बाजू पाहिली न्हवती ती आता आपण पाहणार आहोत अनेकदा ह्या बाजूची चर्चाही होत नाही टिळकांचे हिंदुत्व म्हणजे नवब्राम्हणवाद त्याचा ढळढळीत पुरावा म्हणजे ही तात्विक मांडणी होय
ह्या संदर्भात टिळकांची बाजू तीन निबंधात आली आहे
१ श्री गायकवाड सरकार यांचा वेदांत केसरी १ ऑक्टो १९०१ पान क्र ३१२ ते ३१६
२ मराठे आणि वेदोक्त कर्म १ केसरी २२ ऑक्टो १९०१ पान क्र ३१६ ते ३१९
३ मराठे आणि वेदोक्त कर्म २ केसरी २९ ऑक्टो १९०१ पान क्र ३१९ ते ३२३
(लोकमान्य टिळकांचे लेख खंड ४)
टिळकांचे ह्या प्रकरणात "सध्याच्या जगात ब्राम्हण आणि शूद्र हे दोनच वर्ण आहेत" हे सांगणारे धर्मग्रंथ अधिक योग्य आहेत हे मानतात व ते प्रमाण मानतात हे धक्कादायक आहे पण ते मानतात ही वस्तुस्थिती आहे
आता प्रश्न येतो कि भोसले क्षत्रिय आहेत कि नाहीत ? टिळकांच्या मते शिवाजी महाराज क्षत्रिय आहेत पण त्यांच्या वंशजांनी असा काही पराक्रम केलेला नाही कि ज्यामुळं त्यांना क्षत्रिय म्हणावं ! आता हाच न्याय मग ह्याच तर्काने ब्राम्हणांना लावला तर किती ब्राम्हणांना ब्रम्हप्राप्ती झाली म्हणून त्यांना ब्राम्हण म्हणावे ? किंवा कितीजणांना चार वेद पाठ आहेत ? म्हणजे ब्राम्हणांना त्यांची ब्रम्हकर्मे आली नाहीत तर चालतं आणि क्षत्रियांना मात्र चालत नाही हा खासा न्याय आहे ? मुळात हा वर्णव्यवस्थेचा हा खटाटोपच भंपक आहे ते सोडा पण टिळकांचा तर्क लावला तर काय दिसते हा मुद्दा आहे ह्या संदर्भातला दुसरा मुद्दा म्हणजे ज्या क्षत्रियांच्याबाबत हा वेदोक्त कि पुराणोक्त वाद उदभवला ते दोन्ही क्षत्रिय सयाजीराव आणि शाहू महाराज दोघेही कर्तृत्ववान क्षत्रिय होते त्यांना हा अधिकार द्यायला काय हरकत होती ?
पुढे टिळक म्हणतात कि त्यावेळी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला तेव्हा वेदोक्त मंत्र म्हंटल्याचा कसलाही पुरावा नाही माझं म्हणणं असं कि पुरोणोक्त मंत्रच म्हंटले गेले ह्याचा तरी कुठे पुरावा आहे ? मुळात राज्याभिषेकाचे मंत्रच मराठी ब्राम्हणांना माहित न्हवते म्हणून काशीहून गागाभट्टांना आणावे लागले म्हणजे राज्याभिषेकाचे मंत्र माहीत नसले तरी मराठी ब्राम्हण हे ब्राम्हणच !
पुढे टिळक म्हणतात कि मंत्र पुराणोक्त म्हंटल्याने काय फरक पडतो ब्राम्हणांच्या घरच्या स्त्रियांचे जे विधी असतात त्यावेळी पुराणोक्तच मंत्र म्हंटले जातात त्यामुळे ब्राम्हणी स्त्री शूद्र होते काय टिळकांना कुणीतरी हे सांगायला हवं कि हो ब्राम्हणी स्त्रिया शुद्रच मानल्या जात म्हणूनच त्यांच्यासंदर्भातले विधी पुराणोक्त म्हंटले जात आणि क्षत्रिय आणि वैश्यांच्यावेळी पुराणोक्त मंत्र म्हंटले जातात तेव्हा ते ब्राम्हणवादी धर्मानुसार शुद्रच होतात
पुढे टिळक म्हणतात कि राज्याभिषेकाचे मंत्र वेदोक्त होते पण महाराजांच्या राज्याभिषेकावेळी इतर जे विधी झाले त्यावेळी पुराणोक्तच मंत्र म्हंटले गेले होते टिळक असे जेव्हा म्हणतात त्याचा एक अर्थ असाही होतो कि ही मांत्रिक गंडवागडवी शिवाजी महाराजांच्यावेळीही झाली आणि शाहू महाराजांना जशी राजारामशास्त्री भागवत ह्या ब्राम्हणाने ती नजरेस आणून दिली तशी शिवाजी महाराजांच्या लक्ष्यात ही कुणी आणून दिली नाही त्यामुळे त्या काळात वेदोक्त प्रकरण उदभवले नाही कारण सर्वच तत्कालीन ब्राम्हणांना हे मान्यच होते आणि कुणीही हा सस्पेन्स फोडला नाही
पुढे टिळक म्हणतात कि शिवाजी महाराजांच्यावेळी पुराणोक्त मंत्र म्हंटले गेले होते तेव्हा आताच्या क्षत्रियांच्यावेळी ते म्हंटले गेले तर ते शास्त्राला धरून आहे माझे म्हणणे असे कि असे म्हणणे म्हणजे त्यावेळी गुन्हा घडला म्हणून आताही तो घडला तर तुम्ही तो स्वीकारला पाहिजे . हा तर खासा न्याय आहे का बाबांनो आता जर का अक्कल आली असेल तर ती थांबवून धरावी का ?
मुळात ब्राम्हणधर्माची मान्यता शोधावीच कशाला हा प्रश्न मला पडतो कारण ती शोधायला गेलात कि ब्राम्हणी धर्मशास्त्रानुसार कलियुगात ब्राम्हण आणि शूद्र असे दोनच वर्ण उरणार आणि ब्राम्हण तुम्ही जर ब्राम्हणवादी ब्राम्हण नसाल तर तुम्हाला शुद्रच म्हणणार त्यांचाही नाईलाज आहे कारण त्यांचे धर्मशास्त्र असं म्हणतं जे लोक शैव ब्राम्हणांना ब्राम्हण म्हणून मान्यता देत नाहीत आणि त्यांना शूद्रात टाकतात ते इतर वर्णांना काय कवटाळणार ? ह्यावर उपाय एकच आहे ब्राम्हणांनीच ब्राम्हण्यत्व फेकून देणे सुदैवाने ते करणाऱ्यांची संख्या वाढत चाललीये
खरेतर हे मी लिहिलं नसतं पण शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त काही पोस्ट फिरल्याने हे पुन्हा थोडे तपशीलवार लिहावे लागले मी मागेच म्हंटले आहे कि वेदोक्त प्रकरणात टिळक पूर्ण चुकलेत मात्र ह्या एका प्रकरणावरून टिळकांना मोडीत काढणे मला मंजूर नाही प्रत्येक महापुरुषाच्या आयुष्यात दोन मेजर आणि तीन मायनर हिमालयन ब्लन्डर्स होतात वेदोक्त प्रकरण हे टिळकांच्या आयुष्यातले मेजर हिमालयन ब्लन्डर आहे
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १०४
Comments
Post a Comment