डे कॅथलॉन तंत्र

राजकुमार यादव या माझ्या मित्रासाठी


माझ्या कवितेत भावना नाहीत 

की माझ्या कवितेतील भावना तुला कळत नाही ?

की माझ्या कवितेतील भावना तुझ्यापर्यंत पोहोचतच नाहीत ?


राजकुमारा 

फक्त इमोशनल अपीलवर किती काळ 

कवितेच्या कोर्टात अपील करत राहणार ?


कसं आहे 


तू असं गृहीत धरायला लागलायस 

की भावना पूर्वीसारख्याच वाहत्या आहेत 


ओढे अजूनही आढे- वेढे न घेता वाहतात 


नद्या अजूनही तशाच ओसंडतात 


पण मित्रा 

जग बदलत चाललंय 


नद्या आता फक्त पाणी घेऊन धावत नाहीत 

त्यांच्यात अनेक केमिकल लोचे असतात 


भावना पूर्वीच्या मेंदूत थांबलेल्या नाहीत 

कुठे त्यांचं बर्फ झालंय 

कुठे त्यांची वाफ

आणि कुठे त्या नवीन मेटल्सनी प्लास्टिकच्यापण बनलेत 


मित्रा माझा मेंदू वेगळा

किंवा तुझा मेंदू थांबलेला आहे 


मी तुला आऊटडेटेड म्हणत नाही 

मी फक्त अपडेट झालोय एवढेच तुला सांगतोय


शक्य आहे की भावना आहेत 

पण पुढच्या आहेत

आणि तुझ्या पारंपारिक डोळ्यांना त्या दिसत नाहीत 

किंवा तुझ्या पारंपारिक हृदयाला त्यांचे पाणी झोंबत नाही 


मी पुढे मुसंडी मारणारा अवकाश यात्री आहे


तुला आता माझ्याबरोबर बैल पाहायचा आहे 

आणि मी यानात बसून

शंकराकडे चालतो आहे 


म्हटलं तर मी सनातन आहे 

म्हटलं तर मी नित्य नूतन 


तू गणपतीसारखी स्वतःच्या आई भवती एक फेरी मारून ये 

मी स्कंदासारखा कवितेच्या मोरावर बसून 

अस्सलपणे जगभ्रमण करून येईन म्हणतो 


श्रीधर तिळवे नाईक 

(डे कॅथलॉन या सिरीज मधील डे कॅथलॉन: अनकॅटेगरीकल :तंत्र या काव्य फायलीतून)

आपण स्वतःला पुरेसे पडत नाही म्हणून 

आपण दुसरा शोधतो 

तो दुसराही आपणाला पुरेसा पडत नाही म्हणून 

तिसरा मग चौथा मग पाचवा मग सहावा 


मी ही चेन थांबवली 


ताबा ताबडवायला लागतो 

सोडून जाण्याचे भय व्याकुलता निर्माण करते 


रोमँटिक व्हायला अक्कल लागत नाही 

पझेसिव होणे पुरते 


कोमल वेलींची आक्रंदणे आपल्यातल्या कमळाला गुंडाळायला लावतात 


चिखल माजतो आणि माजही देतो 


समोरच्याकडून क्षमा काढून घेण्यात कसलं आलंय प्रेम ?


इंद्रियांच्यात बुडलं की ढीगभर इमोशन्स बाहेर पडतात

ढग घेऊन 


माझं प्रेम आदरापासून सुरू होतं 

तू जशी आहेस तसं तुला स्वीकारणं म्हणजे आदर 


मी गुलाबांची फुलं सादर करणाऱ्यातला नाही 

मी स्त्रीला गुलाब बनवतो 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरीज मधील डेकॅथलॉन तंत्र या काव्य फायलीतून)

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे