ब्रिटिश क्षत्रिय आणि आत्ताचे काही प्रश्न भाग आठवा (ब्राह्मणी हिंदुत्व , प्रबोधनकार ठाकरे आणि जरांगे )श्रीधर तिळवे नाईक 


भारतामध्ये जेव्हा राजा राम मोहन राय यांनी कळत नकळत हिंदूवाद मांडला तेव्हा त्याला शह द्यायला नवा चेहरा उदयाला येणे अटळ होते हा चेहरा वैदिक होता आणि तो स्वामी दयानंद सरस्वती यांनी मांडला होता त्या संदर्भात मी विस्तृत लिखाण इतरत्र केलेले आहे प्रश्न असा आहे की आर्य समाजाला काउंटर म्हणून विष्णुशास्त्री चिपळूणकर महाराष्ट्रातच का निर्माण व्हावे आणि त्यांनी ब्राह्मणी हिंदुत्व का मांडावे? त्यांनी वैदिक हिंदुत्व का स्वीकारले नाही ?स्वामी दयानंद सरस्वती जसे आहेत तसे का स्वीकारले गेले नाही ?हा एक फार मोठा प्रश्न आहे कारण उत्तर पेशवाई मध्ये जो काही हाहाकार माजला होता आणि लोकहितवादींनी संपूर्ण पेशवाईचे सगळे निगेटिव्ह गुण आपल्या लेखनातून शतपत्रांच्यातून पुन्हा पुन्हा मांडल्यानंतर विष्णुशास्त्री चिपळूणकरांना पुन्हा एकदा ह्या उत्तर पेशवाईची तत्त्वज्ञान मांडण्याची हौस का निर्माण झाली ? वास्तविक लोकहितवादी यांच्या लिखाणानंतर सर्व ब्राह्मणांनी ह्या उत्तर पेशवाईचे अत्यंत परखड परीक्षण करणे आवश्यक होते पण ते राहिले बाजूला आणि संपूर्ण मराठा साम्राज्य हे जणू काही एकसंध प्रोसेस होती आणि त्यामध्ये शिवशाही ,पेशवाई आणि उत्तर पेशवाई असे कोणतेही पिरियड अस्तित्वात नव्हते आणि हे तिन्ही कालखंड ब्राह्मणवादाच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार करत वर्ण व्यवस्थेचा प्रचार करत होते असा असा दोषपूर्ण प्रचार विष्णुशास्त्री चिपळूणकरांना का करावासा वाटला ? की ब्राह्मणांना खरोखरच ब्राह्मणांच्या खेरीज कुठल्याच लोकांच्या हिताची काळजी नसते? म्हणजे स्वतःच भलं झालं म्हणजे झालं काय ? हिंदुत्ववादाची सुरुवात ही "आर्य म्हणून सर्व भारतीय लोकांना एकत्र आणावे'' या दृष्टिकोनातून झाली होती आणि हा दृष्टिकोन आर्य समाजाचा होता आणि भले त्याचे नामकरण चुकले असेल भले हा दृष्टिकोन युरेशियन असेल पण तो निदान सगळ्यांचं भलं व्हावं असं म्हणत होता पण विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे ब्राह्मणी हिंदुत्व असे काही म्हणत होते का ? त्याला सर्वांच्या भल्याची काळजी होती का ?


शिवाजी महाराजांची वैदिक प्रतिमा ही विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनीच प्रथम अत्यंत विस्तृत प्रमाणात तयार केली आणि साहजिकच त्याला काटशह म्हणून महात्मा फुले यांना शिवाजी महाराज हे बहुजनांचे कुणबी लोकांचे नायक होते हे सांगायची वेळ आली वाईट गोष्ट अशी आहे की आज सुद्धा शिवाजी महाराज हे कसे वर्णव्यवस्थेचे समर्थक होते हे अप्रत्यक्षरीत्या सुचवले जाते आणि ते शैव आहेत किंवा होते हे तर आता संपूर्ण विसरच पाडायची गोष्ट बनवून दिली गेलेली गोष्ट आहे 


यामध्ये सर्वात मोठी गोची जर कोणाची झाली असेल तर ती म्हणजे लोकमान्य टिळक यांची ! ना धड वैष्णव ना धड ब्राह्मणी असे पारंपारिक वैष्णववादी वैष्णव हिंदुत्व त्यांनी सादर केले त्यामुळेच कळत नकळत वर्ण व्यवस्थेचे एक हिडन समर्थन आपणाला टिळक यांच्या लेखनात दिसते ते श्रुती स्मृती पुराणोक्त धर्माला ठोकर मारत नाहीत त्यामुळेच पूर्ण पणे नव वैष्णववादी होत नाहीत 


याचा परिणाम काय होतो ? तर विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना उत्तर पेशवाईच पुन्हा हवी होती तशीच उत्तर पेशवाई आत्ताच्या हिंदुत्वाला हवी आहे का असा प्रश्न वारंवार निर्माण होतो आणि ब्राह्मणांना पुन्हा पुन्हा असे ब्राह्मणी हिंदुत्व का हवेसे वाटते त्यांना आपली धार्मिक पोझिशन का टिकवावीशी वाटते असाही प्रश्न आता निर्माण होतो वास्तविक वेळ आली अशी की सर्व ब्राह्मणांनी अत्यंत जाणीवपूर्वक आपल्या सर्व धार्मिक जागा आणि पदे सोडून द्यावीत आणि सर्व मंदिरे आणि देवळे ही ब्राह्मणेतर पुजारांच्या ताब्यात देऊन टाकावी एक तर या धंद्यामध्ये फार काही आता राम राहिलेला नाही त्यापेक्षा बिजनेस टाकून पैसा कमावणे कधीही चांगले ! हा धंदा भले सनातन असेल परंतु त्यात काही आता आदर उरलेला नाही जर का डोकेच असेल तर मग ते डोके नवीन व्यवसायासाठी नवीन करिअरसाठी का वापरू नये ? माझे स्वतःचे स्पष्ट मत असे आहे की ब्राह्मणांनी सर्व पारंपारिक पौराहित्याचा त्यागच करावा त्यात ब्राह्मणांचे भले आहे आणि मुख्य म्हणजे मंदिर चालवणे किती कठीण असते हे ब्राह्मणेतर समाजाला कळणे सुद्धा आवश्यक आहे त्यामुळे एक मेसेज असाही जाईल की आम्ही आता विष्णुशास्त्री चिपळूणकरवादी राहिलेलो नाही आम्ही आता ब्राह्मणी हिंदुत्ववादी राहिलेलो नाही अलीकडे जे काही बिनडोक ब्राह्मण थोडेफार शिल्लक आहेत त्यांनी सुद्धा आपल्या ब्राह्मण बंधूंच्याकडे छोटे छोटे फायदेशीर उद्योग शोधावेत हे बरे पौराहीत्य करण्यापेक्षा हे केव्हाही अधिक चांगले आहे माझी भारत सरकारला आणि सर्व सरकारांना विनंती आहे की त्यांनी आता सर्व मंदिरे आणि देवालये ब्राह्मणेतरांनाच देऊन टाकावीत आणि ब्राह्मणेतरांनाच या पुरोहित लोकांच्या जबाबदाऱ्या देऊन टाकाव्यात हिंदुत्वाचे खरे भले त्यात आहे  


आता प्रश्न असा की महाराष्ट्रातच हा हिंदुत्ववाद का जन्मला कारण महाराष्ट्रातच पेशवाई होती आणि मराठ्यांच्या प्रदेशातच इंग्रजांच्या विरोधातल्या शेवटच्या लढाया झाल्या पण स्वतःच्या साम्राज्याचे संस्कार साम्राज्यवादी संस्कार का मिरवायचे? सतत होऊन गेलेल्या इतिहासात किती घुटमळायचे? इतिहासाचे तेच तेच घोट घेत इतिहासाला दारू का बनवायचे ? तेव्हा ब्राह्मण आणि पंडितांनो शक्य असेल तर या सगळ्या धार्मिक जबाबदाऱ्या ब्राह्मणे तर लोकांच्यावरच सोपवा आणि नव्याने आलेल्या चौथ्या नवतेच्या संस्कृतीमध्ये आपले करिअर कसे घडवता येईल आपण जागतिक संस्कृतीचे कसे भाग बनू ते पहा 


या ब्राह्मणी हिंदुत्वाला प्रतिकार होणे अटळच होते आणि तो प्रतिकार महाराष्ट्रातच होणे हेही अटळ होते कारण भारतामधील नववैष्णववादाचा पाया सुद्धा चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रातच घातला होता भारतातील नववैष्णववादाचे श्रेय जर का आपण विसाव्या शतकात कोणाला द्यायचे असा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचे उत्तर प्रबोधनकार ठाकरे यांचे हिंदुत्व हे आहे त्यांनी जितक्या ठसठशीतपणाने नववैष्णव हिंदुत्व मांडले तसे कोणीच मांडले नाही प्रबोधनकार ठाकरे यांच्या या नववैष्णव वादाने एकीकडे विठ्ठल स्वीकारला गीता स्वीकारली आणि दुसरीकडे शाक्त संप्रदाय स्वीकारला तुळजाभवानी स्वीकारली म्हणजे रामानुजाचार्य जसे शिव शक्ती नंदी आणि कार्तिकेय यांना नकार देतात आणि फक्त गणपती स्वीकारतात तसे प्रबोधनकार ठाकरे पंचायतनांच्या पैकी विष्णूच्या ऐवजी राम आणि कृष्ण स्वीकारतात गीता स्वीकारतात मात्र कळत नकळत शिव , नंदी आणि कार्तिकेय म्हणजेच स्कंद यांना महत्त्व देत नाहीत मात्र शक्ती जिला ते आई जगदंबा म्हणतात आणि गणपती यांना स्वीकारतात हा वैष्णवादाला धरून असलेलाच विचार आहे कारण वैष्णव वादाने नंतर शैव तंत्र स्वीकारल्याने अनेक गोष्टी स्वीकारल्या त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट शक्ती ही संकल्पना होती मात्र पार्वतीचा महिमा कमी व्हावा म्हणून अत्यंत जाणीवपूर्वक या लोकांनी महालक्ष्मी हे दैवत पुढे आणायला सुरुवात केली प्रबोधनकार ठाकरे महालक्ष्मी वादी नाहीत मात्र ते पार्वतीवादी आहेत म्हणूनच आई जगदंबा आणि तुळजाभवानी यांचा प्रचार केला जातो एका अर्थाने ते खऱ्या प्रकारे हिंदुत्ववादी आहेत आणि आज शिवसेना वैष्णव वाद आणि शैववाद यांचा समतोल साधतच पुढे जाण्याची इच्छा धरून आहे कारण कृष्ण आणि त्याची राजनीती ही या लोकांना आदर्श वाटत होती 


हे का घडले या प्रश्नाचे उत्तर आपण शोधायला गेलो तर मात्र आपणाला स्पष्टपणे दिसते की विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या उत्तर पेशवाई प्रमाण मानणाऱ्या ब्राह्मणी हिंदुत्वाला या लोकांचा स्पष्ट आणि स्वच्छ नकार होता आणि हा नकार प्रबोधनकार ठाकरे यांनीच दिला होता आणि पुढे जाऊन त्यांनी आपली चळवळ ब्राह्मणेतर चळवळीशी जोडली होती म्हणजे एका अर्थाने जे टिळक यांना साधत नव्हते ते प्रबोधनकार ठाकरे यांना साधत होते आणि याचे कारण ते कायस्थ होते क्षत्रिय होते वास्तविक अजित पवार आणि शरद पवार यांना या क्षत्रिय हिंदुत्वाचे आकर्षण वाटले तर ते समजण्याजोगे होते किंबहुना या लोकांच्या मध्ये जे साटेलोटे झालेले आहे त्याचे कारण कळत नकळत हा नववैष्णववादी हिंदुत्ववाद आहे हा नव वैष्णववादी हिंदुत्ववाद स्पष्ट आणि स्वच्छ पणाने हिंदुत्वाची क्षत्रिय मांडणी सादर करतो याचाही मूल उद्देश सत्ता मिळवणे हाच असतो परंतु कृष्ण हा राजनीतिज्ञ म्हणून आदर्श असल्याने त्याची कुटनीती अनेकदा वापरली जाते अर्थात मग कधी कधी हीच कूटनीती जेव्हा शिवसेनेतले कार्यकर्ते उदाहरणार्थ नारायण राणे , छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मूळ नेतृत्वाच्या विरोधातच वापरतात तेव्हा मग प्रश्न निर्माण होतो पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुळात प्रबोधनकार ठाकरे यांच्या मांडणीमध्येच ही श्रीकृष्णाने मांडलेली क्षत्रिय कुटनिती आहे आणि ही इंग्रजांच्या आणि ब्राह्मणांच्या विरोधात आपण वापरली पाहिजे हा त्यांचा आग्रह होता तो हे लोक बदलून स्वतःच्याच नेतृत्वाच्या विरोधात ही कुटनीती वापरतात 


हे कोणाकडून घडते ? ज्या क्षत्रियांना काँग्रेसमध्ये जागा निर्माण झाली नव्हती अशा क्षत्रियांना शिवसेनेने जागा दिली हे सर्व क्षत्रिय ते होते जे गरीब होते किंवा मध्यमवर्गीय होते परंतु ज्यांचे आपल्या नववैष्णव हिंदू धर्मावर प्रेम होते प्रश्न असा आहे की या नव वैष्णव हिंदू धर्मात आणि गांधीजींच्या नव वैष्णव धर्मात काही फरक होता की नाही ? तर होता गांधीजींच्या नव वैष्णव धर्मामध्ये शैव धर्माचा कसलाही प्रभाव दिसत नाही त्या उलट प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांमध्ये त्यांच्या हिंदुत्वामध्ये शाक्तधर्म फार महत्त्वाचा झालेला दिसतो म्हणूनच शस्त्र वापरायला ते हरकत घेत नाहीत आणि कधी कधी गांधीजींची खिल्ली ही उडवली जाते 


म्हणजेच आपण असे पाहू शकतो की नव वैष्णव वाद हा विसाव्या शतकामध्ये प्रबोधनकार ठाकरे विरुद्ध महात्मा गांधी अशी अशी द्वि ध्रुवात्मक द्वंद्वता घेऊनच आला 


आज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये जो द्विध्रुवात्मक द्वंद्वतेचा संघर्ष निर्माण झाला आहे तो या प्रबोधनकार ठाकरे यांच्या नव वैष्णव हिंदुत्ववादामुळे निर्माण झालेला आहे त्यामुळे जरांगे शिंदे यांच्यावर टीका करायला तयार नव्हते इतकेच नव्हे तर महात्मा गांधी जसे बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल सॉफ्ट कॉर्नर बाळगून होते तशाच प्रकारचा सॉफ्ट कॉर्नर जरांगे हे आंबेडकरांच्या वंशाच्या बद्दल म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल बाळगून आहेत ते वंशज हा शब्द वापरतात आणि खानदानी मराठ्याला वंश किती महत्त्वाचा वाटतो हे काही सांगायची गरज नाही म्हणजेच वंशाला मान आहे वैचारिकता तपासणीची तयारी नाही वास्तविक प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल तुमच्या मनात जर काय वाद असतील तर ते वाद तुम्ही स्पष्ट मांडले पाहिजे पण वंशवाद स्वीकारला की मग श्रद्धा आलीच बरं ज्यांच्याबद्दल हा वंश वाद दाखवला जातो तेही यामुळे संतुष्ट पावतात 


साहजिकच मग प्रबोधनकार ठाकरे यांना स्वतःचा शिवाजी निर्माण करावा लागतो त्यातूनच दगलबाज शिवाजी सारखे पुस्तके येते आणि याच धारेला पुढे नेत पुढे गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होते या अंगाने क्षत्रिय पद्धतीने विश्लेषण करणारे पुस्तक येते कम्युनिस्ट लोक कळत नकळत ठाकरे यांच्या नववैष्णववादी हिंदुत्वाला इथे येऊन मिळतात आणि त्याचवेळी हेही दाखवून देतात की खुद्द शिवाजी महाराजांचे काही सोयरे सुद्धा स्वराज्याचे कसे शत्रू होते मराठा सर्वच्या सर्व शिवाजी महाराजांच्या कसे मागे नव्हते आणि कसे शत्रूला मदत करत होते पानसरे यांची हत्या ही नेमकी कशामुळे झाली हा प्रश्न त्यातूनच निर्माण होतो ब्राह्मणी हिंदुत्वाने ही हत्या केली असा प्रचार आहे पण ज्यांच्याकडून ही हत्या केली गेली ते ब्राह्मण होते का ? पानसरे यांचे पुस्तक मराठा समाजाविरोधात आहे असा अपप्रचार कोणी केला ? वास्तविक पानसरे या पुस्तकांमध्ये त्यांच्या दृष्टीने त्यांना पटलेली एक मांडणी करत होते आणि ही मांडणी करताना ते काही पुरावे देत होते त्यांना विरोध करायचा असेल तर हे सर्व पुरावे आपण खोडून काढले पाहिजे अशी माझी त्यावेळी मांडणी होती आणि जर का ते पुरावे खोडता येत नसतील तर मग अशा प्रकारच्या शक्यता मान्य केल्या पाहिजेत विरोधकांना संपवणे आणि तेही सशस्त्र संपवणे हे शाक्तधर्मांमध्ये बसते हे खरे असले तरी जिथे वैचारिक वाद असतो तिथे हे करायचे नसते असेही बंधन आहे प्रथम सर्व काही बोलूनच सोडवायचे असते आणि वैचारिक स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला असलेच पाहिजे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला असलेच पाहिजे याबाबतीत ठोकू ही प्रवृत्ती योग्य नव्हे नाहीतर मग लोकशाहीचा त्याग करावा लागतो लोकशाही हवी निवडणुका हव्यात मात्र लोकशाहीने दिलेली संविधानात्मक चौकट नको हे चालत नाही याबाबतीत जरांगे यांचे कौतुक करावे तितके थोडे ! ते सहसा संविधानात्मक चौकट तोडत नाहीत असे दिसते . किंबहुना मराठा आंदोलनाचे जे काही श्रेयस आहे त्यामध्ये संविधानात्मक चौकटीमध्ये आंदोलन करणे हे फार मोठे श्रेयस आहे बलुचिस्तान मधल्या पठाणांच्या आंदोलनाची आठवण यानिमित्ताने नेहमी येते माझ्यावर स्वतःवर वीर समाजाचे संस्कार आहेत आणि कोल्हापुरात वाढल्याने ते अधिक खोल आहेत आरेला का रे करणे ही आपोआपच वीर समाजात नैसर्गिक वृत्ती बनून जाते त्यामुळेच असा संयम हा किती अवघड असतो हे मी आतून ओळखतो म्हणूनच मराठा आंदोलकांनी आंदोलनावेळी असा संयम दाखवणे हे केवळ लाजवाब आहे असे मला वाटते म्हणजेच एका अर्थाने महात्मा गांधी आणि प्रबोधनकार ठाकरे एकत्र यावेत तसं काहीतरी झालेलं आहे . आंदोलनाची पद्धत गांधीवादी मात्र भाषा ठाकरे पद्धतीची ! 


या आंदोलनामध्ये देवेंद्र फडणवीस हे वारंवार जन्माने ब्राह्मण असल्यामुळे विचित्र खेळात सापडत होते पण त्यांनी ज्या संयमाने हे सर्व हाताळले त्याची तारीफ केलीच पाहिजे मी मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे हे सर्व रामधोरण होते प्रश्न असा आहे की अशी शंका का घेतली जाते? त्याचे कारण विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी मांडलेले ब्राह्मणी हिंदुत्व आहे त्यामुळे प्रत्येक ब्राह्मणाबाबत शंका घेतली जाणे अटळ आहे याबाबतीत नेते आणि बहुजन समाज यांच्यामध्ये कमालीचा विरोध आहे सर्वसाधारणपणे आता जो 21 व्या शतकातला बहुतांशी ब्राह्मण आहे त्याच्याबद्दल बहुजन समाजाला प्रचंड आदर आहे आणि जे जे ब्राह्मण करेल ते ते आपण केले पाहिजे असे या बहुजन समाजाला वाटतं अनेकदा तर बहुजन समाजातल्या नेत्यांनी बहुजन समाजासाठी काय केले असाही प्रश्न हल्ली बहुजन समाज विचारतो आहे बहुजन समाजातल्या बहुतेकांच्या हवेल्या मोठ्या होत गेल्या पैसे मोठे होत गेले बँक अकाउंट मोठी होत गेली हे बहुजन समाजाने पाहिलेले आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा भ्रष्टाचार मुक्त असलेला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा ब्राह्मण नेता येतो तेव्हा बहुजन समाज आपल्या नेत्यांचे यासंदर्भात काहीही ऐकत नाही उलट ब्राह्मण परवडला असे बहुजन समाज म्हणतो अगदी शासन संस्थेत सुद्धा ब्राह्मण भ्रष्टाचार करताना खूप कमी पैसा घेतो असे अनेक लोक म्हणत असतात शिवाय पैसे घेतल्यानंतर ब्राह्मण जनरली काम करतो असेही म्हटले जाते आपल्या बहुजन समाजातल्या नेत्यांच्यावर आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या वर बहुजन समाज किती वैतागलेला आहे हे यातून दिसत असते पण या वैतागाची कसलीही दखल बहुजन समाजातले नेते घेत नाहीत त्यातूनच मग जरांगे हे अत्यंत प्रामाणिक वाटल्यामुळे आणि भ्रष्टाचार मुक्त वाटल्यामुळे त्यांच्याकडे नेतृत्व जाते आणि बहुजन समाज त्यांच्याभोवती संघटित होतो अर्थात त्यामुळे काही लोकांच्या पोटात गोळा उठतो आणि असे लोक ब्राह्मण शाही आणि मराठेशाही यांना एकत्र तोलायला लागतात यातून एक मेसेज मिळतो आहे तो म्हणजे मराठा 96 कुळी समाज हा सुद्धा आता नवीन नेतृत्वांच्या शोधात आहे अशी नवीन नेतेमंडळी उदयाला येत आहेत का हा खरा प्रश्न आहे एक उत्तर जरांगे यांच्या रूपाने आलेले आहे पण एक जरांगे पुरेसे आहेत का ? मराठ्यांना नेहमीच फुटीचा शाप आहे त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस फुटली शिवसेना फुटली त्यामुळे भांडणारे लोकच नकोत आणि सांधणारा कोण आहे असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे आता यामुळे कोणती कोणती नेतृत्व येतात हे पाहावे लागेल श्रीकांत शिंदे यांच्या बद्दल सुद्धा खूप चांगले मत जनतेमध्ये आहे त्यामुळे ते कदाचित दुसरे नेतृत्व म्हणून उदयाला येतील 


एकंदर काय तर ब्रिटिश लोकांनी केलेल्या संस्कारामध्ये घुटमळत घुटमळत का होईना परंतु आता भारतातल्या वीर समाजांच्या मध्ये घुसळन सुरू झाली आहे हे जरांगे यांनी निर्माण केलेल्या आंदोलनाचे कदाचित सर्वात मोठे फलित असावे 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे