मदाचा प्रश्न आणि अहंकार श्रीधर तिळवे नाईक
आशुतोष दिवाण यांनी नैतिक माणसांच्यामध्येसुद्धा विशेषत: पुरोगामी लोकांच्या मध्ये सुद्धा कसा अहंकार असतो आणि त्यामुळे तो शेवटी शत्रूशी लढता लढता अंतर्गत शत्रूशी कसा लढायला लागतो असे सांगणारी एक पोस्ट टाकलेली होती. खरे तर त्यावर मला रिएक्शन द्यायची नव्हती पण प्रश्न आले म्हणून देतो
शैवांच्या मध्ये जे काही विकार मानले जातात त्यातील मद हा एक विकार आहे आकार आणि विकार यांच्यातला फरक असा आहे की विकार हा विकृतीकडे घेऊन जातो तर आकार हा कृतीकडे घेऊन जातो निराकार हा मोक्षाकडे घेऊन जातो आणि मोक्ष हीच खरी संस्कृती असेल तर आपण असे म्हणू शकतो की निराकार हा संस्कृतीकडे घेऊन जातो
जेव्हा तुम्ही मदयुक्त निर्णय घेता तेव्हा प्रमाद होतो आणि म्हणूनच मग मोक्षाच्या साधनांमध्ये जैन लोकांच्या मध्ये अप्रमाद असाही शब्द येतो आणि तो साधनेचा एक सर्वोच्च बिंदू बनतो मदातूनच माज येतो पब्लिक लाईफ मध्ये व्यक्त झालेला मद म्हणजे माज होय तर शरीराच्या आत जो असतो तो मद होय . हा मद जेव्हा संभाषणातून व्यक्त होतो तेव्हा आपण त्याला अहम असे म्हणतो आणि त्याच्या आकाराला अहंकार असे म्हणतो
नैतिकतेला अहंकार प्राप्त होतो का किंवा गर्विष्ठपणा प्राप्त होतो का ? गर्व म्हणजे तुलनेतून आलेला मद होय त्यातून समोरच्याला आपल्यापेक्षा कमी लेखणे येते . त्यामुळेच गर्व हा अनेकदा विषमतेचा मूळ उगम स्थान असतो म्हणूनच विषमतेवरचा सर्वात मोठा इलाज हा गर्वहरण असाच असतो म्हणूनच जेव्हा पुरोगामी लोकांनी फ्रेंच रशियन चायनीज वगैरे क्रांत्या केल्या तेव्हा त्यांनी राजे समजणारे सरंजामदार समजणारे जे उच्च समजणारे लोक होते त्यांना मुद्दाम त्यांचे कपडे काढून घेऊन त्यांना रस्त्यावर हिंडवून मग फाशी दिले गर्वहरण करण्याचा हा सर्वात मोठा राजकीय प्रयत्न होता .
वस्तुस्थिती अशी आहे की अहंकार हा कोणाकडेही असू शकतो जसा नैतिक माणसाला आपण नैतिक असल्याचा किंवा आपण कायदे करतो या गोष्टीचा अहंकार प्राप्त होऊ शकतो त्याचप्रमाणे अनैतिक माणसाला सुद्धा आपण अनैतिक आहोत सहजरीत्या नीती आणि कायदे मोडतो किंवा मग नीती आणि कायदे करून आपण ते मोडतो असा अहंकार असू शकतो तेव्हा मुळातच फक्त इथे अहंकार असतो आणि तिथे अहंकार असतो या म्हणण्याला फार अर्थ उरत नसतो अहंकार असणे ही माणसाची एक सहज प्रवृत्ती बनलेली आहे प्रश्न असा आहे की ती येते कुठून ? अनेकदा तिचे उगमस्थान सत्ता असते आणि सत्ता अनेकदा आपण उच्च काही आहोत असा फील देत राहते त्यामुळेच सत्ता मुळातच विषमता निर्माण करणारी असते त्यामुळेच कार्ल मार्क्स हा मुळात राज्याचा अंत झाला पाहिजे असे म्हणत होता कारण सत्तेचा अंत म्हणजे राज्याचा अंत किंवा राज्याचा अंत म्हणजे सत्तेचा अंत अशी त्याची समजूत झाली होती त्याला कम्युनिस्ट राजवटी म्हणजे कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटी हे समीकरण अभिप्रेत नव्हते ते नंतर प्रस्थापित झाले अन्यथा त्याला स्वतःला प्राचीन काळातली गणव्यवस्था जिथे सर्व सभासद एकमेका बरोबर आनंदाने राहत एकमेका बरोबर अत्यंत समतेचा व्यवहार करतील आदर्श वाटत होती प्रत्यक्षामध्ये असा गण व्यवहार असतो ही एक रोमँटिक कल्पना आहे परंतु कार्ल मार्क्स तसा रोमँटिकच होता त्याच्यामुळे घडून आलेल्या राज्यक्रांत्या सुद्धा रोमँटिकच होत्या पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की असे जर स्वप्न आपण पाहिले नाही तर परिवर्तन होणे शक्य नाही या जगातली बहुतांशी परिवर्तने ही नेहमीच रोमांटिक लोकांनी घडवलेली आहेत अगदी विनायक दामोदर सावरकर सुद्धा रोमँटिकच होते अहंकाराची एक व्याख्या स्वतःविषयी झालेले रोमँटिक गैरसमज अशीही करता येते .
दुसरे कारण थोडे वेगळे आहे स्वतःच्या जीवनाला काही अर्थ असावा असे प्रत्येकाला वाटते विशेषत: जिथे जिथे भाषा विकसित होत जाते तिथे तिथे अर्थ सुद्धा अधिकाधिक विकसित होत जातो आणि मग संपूर्ण जीवनाला सुद्धा अर्थ असायला हवा अशी अपेक्षा केली जाते जणू काय जीवन हा एक शब्द आहे प्रत्यक्षात जीवन शब्दच नाही जीवन म्हणजे भाषाही नव्हे त्यामुळे जीवनाला अर्थ वगैरे काही असत नाही पण आपणाला भाषेची इतकी सवय होऊन जाते की आपण जीवनाला सुद्धा भाषा समजतो आणि मग या जीवनाला अर्थ प्राप्ती व्हावी म्हणून धडपडत राहतो त्यामुळेच मोक्षाची साधना करताना एक वेळ अशी येते की तुम्हाला भाषेचाच त्याग करायला लागतो आणि त्यातूनच मग मौन साधना सुरू होते ही या अर्थविकृतीविरोधात साधनेची सुरुवात आहे . आयुष्यात शांतता उपलब्ध होत नाही तर निदान मौन पाळा असा हा आरंभ आहे. त्याची गरज नैतिक आणि अनैतिक अशा दोन्ही लोकांच्या अहंकारांच्या उपाययोजनेमध्ये येते शील हा तुमचा जन्म दत्त स्वभाव आहे तर नीती ही तुम्हाला समाजाने दिलेली असते त्यामुळे ती असण्याबद्दल पण अहंकार असू शकतो आणि नसल्याबद्दल पण अहंकार असू शकतो . आपण दुसऱ्याला उल्लू बनवलं यामध्ये सुद्धा अचिव्हमेंट मानणारे लोक पदोपदी भेटत असतात आणि त्याच्या मुळाशी अहंकारच असतो
मोक्षक नेहमीच शील पाळता येत नसेल तर निदान नीतिमत्ता तरी पाळा अशा अपेक्षा करत असतात मात्र त्यांना हे माहीत असते की जोवर माणसाला भाषाच येते आणि मौन येत नाही तोपर्यंत अहंकार येतच राहणार उगवतच राहणार कारण तो जाणतो की अहंकाराच्या मुळाशी मुळात मन असते.
मनाचे नसणे म्हणजे मौन! बघा जमलं तर साधते का ?
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment