फाळणीची कारण मीमांसा, पुरोगामीवाद ,काँग्रेस, मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्षे श्रीधर तिळवे नाईक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त चर्चा सुरू झाली आणि त्यामध्ये फाळणीचा प्रश्न वारंवार उपस्थित होतो आहे. अर्थातच पहिला प्रश्न फाळणी कोणी केली हा आहे
फाळणी कोणी केली या प्रश्नाचे माझे साधे उत्तर पुढील प्रमाणे आहे.
या देशाची फाळणी मुस्लिम लीगने केली हा एकच पक्ष असा होता जो सुरुवातीला मुस्लिम संस्कृती वेगळी आहे असे वारंवार सांगत होता आणि नंतर मुस्लिम केवळ संस्कृती म्हणून वेगळी नाही तर राष्ट्र म्हणून सुद्धा वेगळे आहे असे सांगायला लागला. या मुस्लिम लीगला 95% मुसलमानांचा पाठिंबा होता ही वस्तुस्थिती! पण आपल्याकडे चर्चा फाळणी कुठल्या हिंदू नेत्याने केली ही होते. आपली अक्कल त्यातून दिसते. हे असे का होते?
याला सर्वात प्रथम कारण हिंदू लोकांना कायमच स्वतःला ब्लेम करण्याची अत्यंत घाणेरडी सवय लागलेली आहे.बाहेरचा माणूस काय करतो ते बघायचेच नाही फक्त आपण काय xx खाल्ले याची जास्त चर्चा करायची ही हिंदूंची सवय आहे तीच इथे वारंवार येते आणि मग कुठल्या हिंदू नेत्यामुळे हे घडले याची चर्चा हिंदू जास्त करतात आणि शेवटी जिना यांना मारण्या ऐवजी ते आपल्याच गांधी नावाच्या महात्मा असलेल्या हिंदू नेत्याला मारतात. या उलट असा समर प्रसंग आला की स्वामी दयानंद सरस्वती असो किंवा स्वामी श्रद्धानंद असो अरेबियन केंद्री इस्लाम धर्माचे कट्टर समर्थक असणारे मुस्लिम थेट हिंदू नेत्याची म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती आणि श्रद्धानंद यांच्या हत्या करतात.
यामागे मुस्लिमांच्यावर थेट टीका करण्याचे वाटणारे भय आहे. हे भय नेमके का निर्माण झाले हे सांगणे अवघड आहे इस्लामची क्रूरता हे बहुदा या मागचे कारण असावे याबाबतीत किमान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा तरी एक निश्चित ठाम भूमिका घेईल असे वाटले होते परंतु संघाने अशी निश्चित भूमिका घेतलीच नाही संघाने काय केले तर संघाने यासाठी जबाबदार काँग्रेसला आणि महात्मा गांधी यांना धरले. जणू काय हे लोक ही फाळणी थांबवू शकणार होते. प्रत्यक्षामध्ये हे शक्यच नव्हते कारण या देशातले बहुतांशी मुस्लिम हे फाळणीच्या बाजूने होते आणि त्यांना स्वतंत्र देश हवा होता . मुस्लिम लीगच्या शाखांना मुस्लिमांचा मिळणारा प्रतिसाद मुस्लिम बहुल प्रदेशांमध्ये प्रचंड होता कारण तिथे हिंदूंचे भय नव्हते जिथे हिंदूंचे भय होते तिथे मात्र मुस्लिम समाज विभागला गेला होता तो एकाच वेळेला काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघांच्या बाजूने काम करत होता कारण दैनंदिन जगण्यासाठी त्याला हिंदूंशी सलोखा करणे आवश्यक वाटत होते आणि त्याचवेळी आपला इस्लाम धर्म जपणे ही आवश्यक वाटत होते त्यामुळे आजही हा मुस्लिम ही कसरत करत असतो. फक्त आता तो काँग्रेस ऐवजी सत्ताधारी भाजप असल्याने भाजपशी जुळवून घेण्याच्या मनस्थितीत आलेला आहे या काळात फक्त अपवादात्मक लोक मुस्लिम समाजामध्ये धर्मनिरपेक्षतावादी होते. पण मुस्लिम लोकसंख्येमध्ये यांचे प्रमाण धड 10 टक्केही नव्हते. जो सामान्य मुस्लिम होता आणि आहे त्यातल्या अनेकांना सामान्य हिंदूंच्या प्रमाणेच राजकारणापेक्षा स्वतःच्या दैनंदिन प्रश्नांमध्ये जास्त रस होता आणि आहे. त्याला कोण सत्तेवर येते यापेक्षा आपण जगू कसे हा महत्त्वाचा प्रश्न वाटत होता साहजिकच यांना आपण राजकारणाबाबत तटस्थ असणारे लोक असे म्हणू शकतो हे ते लोक होते ज्यांना फाळणी हा फार गंभीर विषय आहे याची जाणीव सुद्धा नव्हती आणि असली तरी ती जाणीव फिकट होती साहजिकच हे कौटुंबिक मुसलमान होते आणि जेव्हा फाळणी झाली तेव्हा त्यांच्या पुढचा प्रश्न हा दैनंदिन होता आपले स्वतःचे घर सोडून आपण पाकिस्तान मध्ये गेलो तर आपणाला आपले घर आपणाला जमीन मिळणार आहे का असा त्यांचा आर्थिक प्रश्न होता आणि या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी येत नव्हते या लोकांच्याकडे असलेली इस्टेट आणि कॅश सुद्धा इतकी नव्हती की इस्टेट विकून आणि कॅश घेऊन पाकिस्तानात जाऊन सेटल व्हावे साहजिकच इथली सगळी मुळे नाकारून पाकिस्तान मध्ये जाणे हा पर्याय त्यांच्या दृष्टीने एक आर्थिक पर्याय होता आणि तो त्यांना आर्थिक दृष्ट्या परवडणारा नव्हता मात्र धार्मिक बाबतीत ते मुस्लिम लीगच्या बाजूनेच होते आणि अजूनही कित्येक लोक इस्लामच्या जीवनशैलीशी निगडित आहेत त्या जीवनशैलीच्या बाजूने आहेत ते भारतात राहतात कारण एकतर त्यांचा नाईलाज आहे आणि दुसरी गोष्ट इथला हिंदू अजून कट्टर झालेला नाही याची त्यांना कल्पना आहे . म्हणजेच बाहेर जायला मुळात स्कोप नाही. इतर मुस्लिम राष्ट्र स्वीकारायला तयार नाहीत आणि पाकिस्तान आणि बांगलादेश सुद्धा बंद आहेत. साहजिकच मुळात पर्यायच अस्तित्वात नाहीत आणि पुन्हा तोच प्रश्न आहे की इस्टेट विकून जाता येणे शक्य नाही कारण तेवढी इस्टेटच नाही. भारतात राहण्याचा जो पर्याय या लोकांनी निवडलेला आहे तो धार्मिक नव्हता नाही तर आर्थिक होता आणि आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे याबाबतीत विनाकारण जो विशिष्ट पद्धतीने मुलामा दिला जातो तो मुलामा फक्त एक टक्का जास्तीत जास्त पाच टक्के सेक्युलर मुस्लिम लोकांच्या बाबतीत सत्य आहे. प्रश्न असा आहे की हे लोक मग देशद्रोही झाले का? तर नाही मुळातच हिंदूंचे जेवढे आपल्या देशावर प्रेम आहे तेवढेच या लोकांचे आहे पण उद्या संधी मिळाली तर हिंदू जसे स्थलांतर करायला मोकळे असतात तसे हेही असतात. मात्र उद्या जर का खरोखर गजवा ए हिंद झाले तर हे लोक धार्मिक होतील का हा खरा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचे खरे उत्तर कोणाला सापडत नाही म्हणूनच सगळा गोंधळ चालू आहे. वस्तुस्थिती अशी आहे की इस्लामवर जगात आता कोणाचाच विश्वास राहिलेला नाही अगदी युरोपमध्ये सुद्धा यासंद भात प्रचंड मोठा अविश्वास निर्माण झालेला दिसतो हा असा अविश्वास का निर्माण होतो आहे याचे आत्मपरीक्षण करण्याऐवजी इस्लामफोबिया नावाची नवीन संकल्पना राबवत स्वतःचे समर्थन करणे चालूच आहे. जिथे मेजॉरिटी आहे तिथे इस्लामिक राष्ट्र स्थापन करायचे आणि जिथे मिळणारी टीथ आपण आहोत तिथे मायनॉरिटी चे सगळे हक्क मिळवत स्वतःचा इस्लाम वाढवत नाही असे हे धोरण आहे येथे राहणारे मुस्लिम काही वेगळा विचार करत होते का आणि आता करत आहेत का हा खरा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर अजूनही नीट आणि स्पष्ट मिळालेले नाही ही वस्तुस्थिती आहे . पुरोगामी लोक मुस्लिम लोकांची अशी गॅरंटी कधी देत नाही ते फक्त पॉझिटिव बोलत राहतात पण ही पॉझिटिव्हिटी म्हणजे गॅॅरंटी नाही.
आणि आता तर गोष्टी पूर्ण बदललेल्या आहेत कारण आर्थिक गणित बदलत गेले आहे.आता तर अवस्था अशी आहे की पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या पेक्षा भारत राहण्यासाठी आर्थिक पातळीवर कधीही जास्त सुटेबल आहे साहजिकच पाकिस्तान मध्ये जाण्याची इच्छासुद्धा आता कोणी करत नाही उलट पाकिस्तान आणि बांगलादेश मधल्या काही मुसलमानांना भारतात सेटल व्हायचे आहे कारण आर्थिक दृष्ट्या भारत जास्त परवडतो कारण अधिक मोकळेपणा आणि स्वातंत्र्य भारतामध्ये मिळते तेव्हा हा चॉईस हा काही धार्मिक चॉईस नाही हा आर्थिक चॉईस आहे. आर्थिक सुबत्ता मिळवण्याच्या चान्सेसचा चॉईस आहे .आता सर्वसामान्य माणूस असाच जगत असतो त्याच्यासाठी धर्म ही सुद्धा अनेकदा आर्थिक गोष्ट मागण्यासाठी निर्माण झालेली नवसाची किंवा मन्नतची सिस्टीम असते. आर्थिक व्यवस्था जे प्रश्न सोडवणार नाही ते प्रश्न देव सोडवेल असे त्याला वाटत असते अन्यथा धर्माचा त्याला तसा दैनंदिन जीवनात फार मोठा अर्थ वाटत नसतो. एकदा ही बेसिक गोष्ट कळली की मग इथे मुसलमान इतक्या संख्येने का राहिले हे स्पष्ट व्हावे. त्या उलट जे मुळातच पाकिस्तानात होते किंवा ज्यांना आपली इस्टेट विकून पाकिस्तानमध्ये जाऊन तिथे नवीन इस्टेट घेणे शक्य वाटत होते ते सर्व पाकिस्तान किंवा आत्ताच्या बांगलादेशमध्ये गेले. खरा प्रश्न आता जे भारतामध्ये मुसलमान आहेत त्यांना कसे हाताळायचे हा आहे आणि इस्लाम मुळे हा प्रश्न कधीही सुटणे शक्य नाही. भारतातली मुस्लिम लोकसंख्या एकदा हिंदूंच्या बरोबरीने झाली की या देशांमध्ये आणखी एक युद्ध अटळ आहे मग पुरोगामी वाद आणि लोक काहीही म्हणोत.
थोडक्यात काय फाळणीचे सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात बेसिक आद्यकारण हे मुस्लिम लीग आणि लीग मागे उभी असलेली मुस्लिम लोकसंख्या हेच आहे.
प्रश्न असा आहे की मग हिंदुत्ववादी आणि धर्मनिरपेक्षतावादी एकमेकाला ब्लेम का करत आहेत याचे कारण अर्थातच राजकारण आहे . स्वतंत्र भारतापुढचा पहिला राजकीय प्रश्न हा फाळणीचा प्रश्न होता मग साहजिकच प्रश्न असा येतो की या फाळणी बाबत राजकारण झाले म्हणजे नेमके काय झाले ? तर राजकारणाच्या नावाने ब्लेम गेम झाला म्हणजे फाळणीसाठी काँग्रेसने हिंदुत्ववादी लोकांना जबाबदार धरायचे आणि हिंदुत्ववादी लोकांनी काँग्रेसला गांधींना नेहरूंना जबाबदार धरायचे. वस्तुस्थिती अशी आहे की हिंदुत्ववादी या काळामध्ये गोंधळलेले होते आपण द्विराष्ट्रवाद स्वीकारावा की अखंड राष्ट्रवाद स्वीकारावा हे त्यांना स्वतःला समजत नव्हते त्यांना मुस्लिम लीगशी लढायचे होते आणि त्याचवेळी इलेक्शन मध्ये त्यांना मुस्लिम लीगशी युती ही करायची होती हा परस्पर विरोध होता आणि त्यामुळेच हिंदू महासभेवर हिंदूू लोका भाऊ मत मिळवण्याासाठी आवश्यक असलेला प्रचंड मोठा विश्वास शेवटपर्यंत बसला नाही. हिंदूू महा सभेेचा आणि सावरकरांचा सगळा गोंधळ त्या काळातल्या वैचारिक लिखाणांमध्ये दिसतो. संभ्रमाची एक प्रकारची स्थिती दिसते. सशस्त्र क्रांती ही त्यांच्या नेत्याने म्हणजेच सावरकरांनी दाखवलेली दिशा होती पण खुद्द सावरकरच बंदीवान होते आणि सशस्त्र क्रांतीसाठी लागणारी तयारी सावरकरांना करता आली नाही ही वस्तुस्थिती आहे. (पुढे अशी तयारी काँग्रेसमधल्याच एका नेत्याने म्हणजेच नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी दाखवली आणि प्रत्यक्षात तयारी केली अशी तयारी सावरकरांना का करता आली नाही हा प्रश्न खरं तर विचारायला पाहिजे. सावरकरांच्यातला स्वातंत्र्यवीर नंतर हळूहळू लोप पावत चालला हीच वस्तुस्थिती आहे)
अशा या पार्श्वभूमीवर हिंदू महासभा न स्वीकारता काय करता येते हा प्रश्न खरा निर्माण झाला . कारण काँग्रेस ही पूर्णपणे धर्मनिरपेक्ष लोकांची धर्मनिरपेक्ष हिंदूंची संघटना असणार हे स्पष्ट होत गेले. साहजिकच ज्याला निव्वळ हिंदूंचे संघटन म्हणता येईल असे संघटन निर्माण करणे काही लोकांच्यासाठी आवश्यक झाले आणि हे संघटन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होय . आता हे तरी का निर्माण झाले याचे कारण काँग्रेस ही हिंदू संघटना नव्हती ती सेक्युलर संघटना होती आणि कट्टर हिंदूंच्या पुढे चॉईस होता की हिंदू राष्ट्र बनवायचे की सेक्युलर राष्ट्र बनवायचे? आणि हिंदूंनी या काळामध्ये सेक्युलर राष्ट्र बनवायचे हा चॉईस काँग्रेस मुळे घेतला ही वस्तुस्थिती आहे. पण तरीही काही लोक असे होते ज्यांना असे वाटत होते की हा देश प्राचीन काळापासून हिंदू आहे आणि तो हिंदूच राहायला हवा . त्यांचा प्रॉब्लेम हा होता की या देशातला धर्मनिरपेक्षतावाद हा हिंदूंच्यामुळे अस्तित्वात होता आणि बहुतांश हिंदू धर्मनिरपेक्ष काँग्रेसच्या मागे होते . आजही भारतामध्ये धर्मनिरपेक्ष वाद आहे त्याला कारण बहुतांशी हिंदू लोक आहेत धर्मनिरपेक्षता वाद या देशांमध्ये मुस्लिम लोकांच्या मुळे अस्तित्वात नाही कारण जर का बहुतांशी मुस्लिम सेक्युलर असते तर फाळणी झालीच नसती. खुद्द जिना यांच्या हे लक्षात आले नाही त्यांना असे वाटले की मुस्लिम सर्वच आपल्या नेतृत्वाच्या बाजूने आलेत ते आपण हवे तसे वळवू शकतो पण त्यांच्या मागे गेलेले मुस्लिम सेक्युलर नव्हते आणि याचा व्हायचा तोच परिणाम झाला आणि पाकिस्तान इस्लामिक राष्ट्र झाले. जीनांचे सेक्युलर पाकिस्तानचे स्वप्न धुळीला मिळाले.
आता अशा या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फाळणी होणे अटळ होते प्रश्न असा आहे की मग फाळणीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इतका बलाढ्य कसा होत गेला? नेमके झाले काय? झाले असे की संविधान बनवताना तथाकथित सेक्युलर असलेले नेहरू आणि इतर लोक मुस्लिम लोकांच्या पुढे झुकले वास्तविक समान नागरी कायदा हा सेक्युलर लोकांनी आणि नेहरूंनी काँग्रेसने आणायला हवा होता पण नेहरू यांनी हे केले नाही आणि नेहरू आणि सेक्युलर वादी लोकांच्या या पापामध्ये इथल्या सनातन कर्मठ हिंदुत्ववादी लोकांचा सुद्धा तितकाच वाटा होता कारण या सनातन लोकांना सुद्धा वैयक्तिक पातळीवर धार्मिक कायदाच हवा होता जेव्हा वैयक्तिक पातळीवर हिंदू आणि मुस्लिम असे दोघेही वैयक्तिक कायद्यांचा आग्रह धरू लागले तेव्हा दोन्ही बाजूंनी हे आग्रह धार्मिक होते. या आग्रहापुढे स्वतःःला सेक्युलर समजणाऱ्या काँग्रेसने झुकता कामा नये पाहिजे होते परंतु दुर्दैवाने काँग्रेस आणि हिंदुत्ववादी दोन्हीही या आग्रहापुढे झुकले आणि आत्ताचे संविधान वैयक्तिक धार्मिक कायदा घेऊन आले. अर्थात इतर बाबतीत मात्र तो समानच कायदा झाला. हे सर्व होण्याचे कारण काय तर दोघांनाही आपापले धार्मिक मतदार सांभाळायचे होते काँग्रेसला सेक्युलर हिंदू व भले अल्पसंख्याक असतील पण असलेले सेक्युलर मुस्लिम आणि सेक्युलर नसलेले कट्टर मुस्लिम असे दोन्ही मतदार सांभाळायचे होते तर हिंदुत्ववादी लोकांना कट्टर हिंदू मतदार सांभाळायचा होता. म्हणजे पुन्हा राजकारणच होते. देशाच्या भवितव्यापेक्षा दोघांनाही स्वतःचे राजकीय हितसंबंध अधिक महत्त्वाचे वाटले अर्थात इसवी सन १००० नंतर भारतातल्या शासकांची परंपरा ही नेहमीच अशी राहिलेली आहे.ती कधीही योग्य कृती करत नाही तर राजकारणाला सोयीस्कर असलेली कृती हे लोक करत असतात. एका अर्थाने भारतामध्ये राष्ट्रवादी म्हणावे असे शासकच असतच नाहीत. शिवाजी महाराजांच्या सारखे काही अपवाद आहेत पण हे अपवाद नियम सिद्ध करतात.
यातूनच मग फक्त एकमेकांच्या वर चिखल फेक होते. या सगळ्या नेहरू वादाचा स्फोट राजीव गांधींच्या काळात झाला जेव्हा शहाबानो प्रकरण घडले आणि काँग्रेसचा मुस्लिम धार्जिणेपणा स्पष्ट झाला. पारडे इथे फिरले. आणि प्रथमच हिंदू लोकांना आता सेक्युलर संघटना नव्हे तर हिंदू संघटना आवश्यक वाटायला लागली आणि त्यांच्यापुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा राष्ट्रीय संघटना म्हणून आणि भारतीय जनता पक्ष हा हिंदूंचा राष्ट्रीय पक्ष म्हणून उभा राहिला. बहुजनांनी एकही हिंदुत्ववादी संघटना या काळामध्ये निर्माण केली नव्हती आणि ही एक फार मोठी बहुजन वाद्यांनी केलेली चूक होती कारण त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष असे दोनच पर्याय समोर ठाकले होते. अपवाद फक्त महाराष्ट्र होता इथे शिवसेना नावाची बहुजन लोकांची हिंदुत्ववादी संघटना अस्तित्वात आली होती .(उद्धव ठाकरे काहीही म्हणोत की आम्हीी हिंदुुुत्व सोडलेले नाही परंतु कळत नकळत ते हिंदुत्ववादापासून दूर जात आहेत आत्ताच्या दसरा स्पीच मध्ये ते आणखीनच स्पष्ट झाले त्यांचा हिंदुत्ववाद हा आता बहुजनांचा हिंदुत्ववाद राहिलेला नाही. ते आता जगदंबेची पूजा करत नाहीत भवानीची पूजा करत नाहीत तर भाजप प्रमाणेेेच दसऱ्याााच्या दिवशी शस्त्राची आणि सरस्वतीची पूजा करतात . हे स्वतः त्यांनी या दसऱ्याच्या निमित्ताने केलेल्या भाषणामध्ये सांगितले बहुधा त्यांना आपण काय बोलतो आणि त्याचे काय परिणाम होणार आहेत याची जाणीव राहिलेली नाही .सरस्वती ही बहुजन समाजाची देवता न्हवे ती ब्राह्मणांची देवता आहे इतके सुद्धा जर कळत नसेल तर अवघड आहे )
शहाबानो प्रकरणांमध्ये नको तितका मुस्लिम वाद स्वीकारून एका अर्थाने काँग्रेसनेच आवश्यक असलेले पेट्रोल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांना पुरवले आणि आता भारतामध्ये स्पष्ट पणाने हिंदूंचा पक्ष सत्तेवर आलेला आहे प्रश्न असा आहे की लोकशाहीमध्ये बहुमत मानायचे की नाही? पुरोगामी लोकांचा खरा गोंधळ इथे उडालेला आहे त्यांचा आग्रह असा आहे की प्राचीन काळामध्ये म्हणजे १९४७ पूर्वी संपूर्ण हिंदू जसे सेक्युलरिझम स्वीकारत होते तोच सेक्युलरिझम आणि तसाच सेक्युलरिझम हा आत्ताच्या हिंदूंनी स्वीकारला पाहिजे त्यात त्यांचे भले आहे आणि नवीन तरुण पिढीतील हिंदू लोक ज्यांची सुरुवात आमच्याच नवोदत्तरी पिढीपासून झाली होती त्यांचे हे भले ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही लोकांना आता भारतामध्ये हिंदुराष्ट्र हवे आहे आणि या वस्तुस्थितीचे काय करावे हे पुरोगामी लोकांना कळत नाही म्हणूनच त्यांची अशी वैचारिक सांस्कृतिक वैयक्तिक दुर्दशा निर्माण झालेली आहे. त्यांना असे वाटते की लोक धर्माच्या मोहात पडलेले आहेत धर्माकडून भ्रम मोहित seduce झालेले आहेत. प्रत्यक्षात हे आपल्या मुस्लिम प्रेमामुळे आणि मुस्लिमांच्याकडून मुस्लिम धर्म मोहित भ्रममोहित seduce झाल्याने झालेले आहे हे त्यांना मान्य करायचे नाही. हिंदू लोक यासंदर्भामध्ये त्यांच्या पूर्णपणे विरोधात गेलेले आहेत याची त्यांना जाणीव नाही आणि त्यांना असे वाटते की हे बदलता येईल. पण हे बदलता येणे शक्य नाही अपवाद फक्त जर का हिंदुत्ववादी सरकारे आर्थिक पातळीवर प्रचंड दारिद्र्य आणायला लागली तरच होईल . कारण लोक शेवटी स्वतःच्या दैनंदिन जीवनातले प्रश्न मोठे मानायला लागतात असे झाले तर आर्थिक प्रश्न धार्मिक प्रेमावर मात करतात आणि इथेच पुरोगामी लोकांना संधी आहे कारण असे आर्थिक दारिद्र्य येऊ शकते हिंदुत्ववादी सरकारी धोरणे ही गरिबांच्यासाठी फारशी पूरक ठरत नाहीयेत दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यांच्या हे लक्षात येत नाही काँग्रेसने मुस्लिमधार्जिणे होऊन जी चूक केली ती चूक आत्ताची हिंदुत्ववादी सरकारे नको तितकी भांडवलदारधार्जिणे होऊन करत आहेत दुसरी गोष्ट अर्थातच जर का शैव-धर्माने हिंदुत्ववादाची कास सोडली तर मग हिंदुत्ववाद पराभूत होऊ शकतो परंतु आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की थोडी जरी हिंदुत्ववादाच्या पाठिंब्याची पकड शैवधर्मी लोकांनी ढिली केली की ताबडतोब भाजपकडून आणि संघाकडून हर हर महादेव सुरू होते जय शिवजी जय भवानी सुरू होते. माता पार्वती विषयी आणि भगवान शंकरांच्या विषयी पॉझिटिव पोस्ट पडायला लागतात. याबाबतीत जितके हिंदुत्ववादी स्पष्ट आहेत तितके पुरोगामी लोक नाहीत. उलट आता उलटा धोका आहे तो म्हणजे शैवधर्मी लोक वैष्णवधर्मी आणि हिंदू धर्माच्या नावाखाली ब्राह्मणधर्मी होत चालले आहेत का? तसे प्रयत्न नक्की चालू आहेत त्याबद्दल शंका घेण्याची आवश्यकता नाही हे एका अर्थाने हिंदू संस्कृतीच्या अंतर्गत होणारे धर्मांतर आहे. ते स्पष्ट दिसत नाही पण ते घडते आहे जर का या धर्मांतराला यश मिळाले तर मात्र भारतामध्ये वर्ण जाती व्यवस्थेचे पुनरआगमन होणे अटळ आहे
अर्थातच त्याला शह द्यायला सर्वच शैव आचार्य लोकांनी सुरुवात केलेली आहे . राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कुंभमेळा हा त्यातूनच साकार केला गेला. याबाबतीत गोरखनाथांच्या पिठाचे प्रमुख आदित्यनाथ योगी थेट राजकारणात सामील झाले खुद्द नरेंद्र मोदी पुन्हा हर हर महादेव वादी झाले आदित्यनाथ योगी यांच्या कर्तुत्वामुळेच हा कुंभमेळा शक्य झाला.
जे शैव धर्म पाळणारे लोक प्रथम काँग्रेसच्या सेक्युलर हिंदू या तत्त्वाच्या मागे गेले होते ते शहाबानो प्रकरणामुळे आणि एकंदरच अल्पसंख्यांक समाजाचे होत असणारे लाड बघून काँग्रेस पासून दूर गेले पुरोगामीवादापासून दूर गेले . यापासून योग्य तो धडा पुरोगामी वादाने शिकायला हवा होता पण त्यांनी बहुजन शैव समाजाचा पाठिंबा गृहीत धरला होता आणि आता तो नाहीसा झाला तरी या लोकांना अक्कल येत नाही . हे एक टक्का असलेल्या बौद्ध धर्माच्या मागे ठामपणे उभे राहतात इतके लोकशाहीच्या संदर्भात मूर्ख आहेत . कम्युनिस्ट लोकांना सुद्धा अजून असे वाटते की ते बौद्ध चायना मध्ये आहेत . नवयानी बौद्ध धर्म स्वीकारलेले लोक कायमच पुरोगामी लोकांना आपल्या सोबत फरफटत नेत असतात वास्तविक आता बहुतांशी ओबीसींची अपेक्षा अशी आहे की नवयानी बौद्ध लोकांनी शैव धर्माच्या मागे यावे आश्चर्याची गोष्ट म्हणजे जो सामान्य नव बौद्ध आहे त्याला हे पटलेले आहे पण यांचे जे तथाकथित उच्च वर्गीय नेतृत्व आहे जे मुंबईत बसून आपल्याला समाज कळतो असे समजते त्याला हे पटत नाही हे तथाकथित विचारवंत पुस्तकी विचारवंत आहेत त्यांना असे वाटते की केवळ सगळे ओबीसी आणि आदिवासी आणि आश्चर्यकारकरीत्या जे बौद्ध झाले नाहीत असे पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य हिंदू लोकांना बौद्ध धर्मात धर्मांतर करून त्यांना आपण बौद्ध करू शकतो पण हे आता अशक्य आहे. उलट गंगा वाहत आहे हे सर्व शैव लोक आता आपली शैव ही आयडेंटिटी अभिमानाने मिरवत वावरत आहेत . त्यामुळेच गणपती बसवला जात आहे हे लोक गरबा अटेंड करत आहेत त्यामुळे बाकीचे ओबीसी आणि आदिवासी जाऊ द्या पण जे बौद्ध झाले होते ते सुद्धा आता शैव आणि बौद्ध अशी मिश्र आयडेंटिटी मिळवत आहेत तयार करत आहे . हा नवा फिनॉमिना आहे पण तो तथाकथित आंबेडकरवादी नेतृत्वाच्या लक्षात येत नाही. अगदी वंचित आघाडीच्या सुद्धा तो लक्षात येत नाहीये . वैष्णव लोकांना पाठिंबा देऊन आपण वैष्णववादी आणि ब्राह्मणवादी हिंदुत्वाला मदत करतो इतके सुद्धा जर तुम्हाला कळत नसेल तर तुमचे या देशाविषयीची आकलन संशयास्पद आहे. तुम्ही राम आणि कृष्ण यांच्या विषयी बाबासाहेब आंबेडकरांनी काय लिहिले आहे हे नीट वाचलेले नाही हे स्पष्ट दिसते आहे.
या सगळ्याचा पूर्ण फायदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांना होणे अटळ आहे. ही परिस्थिती जर अशीच राहिली तर पुढची इलेक्शन सुद्धा भाजप जिंकणार आहे. ही घौडदौड फक्त भाजपच्याच आर्थिक धोरणाच्या नतद्रष्ट्रपणामुळेच थांबली गेली तर थांबेल . अर्थात त्याचा सुद्धा फायदा उठवण्याची ताकद विरोधी पक्षात आहे का? हा खरा प्रश्न आहे.
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment