हिंदुत्ववाद काँग्रेसमधून का आयझोलेट केला गेला श्रीधर तिळवे नाईक 

मागील लेखात आपण पाहिले की लाल बाल पाल म्हणजेच लाला लजपत राय ,बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल हे तिघेही हिंदुत्ववादी होते आणि काँग्रेस वाढवण्यामध्ये या लोकांचा सर्वाधिक वाटा होता . यातील मुख्य नेतृत्व हे बाळ गंगाधर टिळक यांचेच होते आणि ते पक्के हिंदुत्ववादी होते. त्यामुळेच काँग्रेस कित्येक वर्षे त्यांचा पुतळाच संसद भवनात बसवायला तयार नव्हती .खुद्द त्यांच्या हयातीत त्यांना कधीही काँग्रेसचे अध्यक्षपद मिळणार नाही याचा चोख बंदोबस्त काँग्रेस मधील सेक्युलर वादी लोकांनी केला होता त्यातल्या राजकारणावर मी तपशीलवार आधीच लिहिले आहे. प्रश्न असा आहे की सुरुवातीपासूनच हिंदुत्ववाद हा असा आयझोलेट केला गेला होता एकटा पडेल याची कशी काळजी घेतली गेली? . मात्र तरीही टिळक का हवे होते ? वस्तुस्थिती अशी होती की त्या काळात सुद्धा सेक्युलरवादाचा फारसा परिणाम जनतेवर नव्हता त्या उलट हिंदुत्ववादी असलेल्या लोकमान्य टिळक यांचा प्रभाव भारतीय जनतेवर प्रचंड पडला होता आणि त्यांच्या या प्रभावामुळेच काँग्रेस वाढत चालली होती तिचा बहुजनांच्या मध्ये पाया घट्ट होत चालला होता टिळकांचा हा जो राष्ट्रीय प्रभाव होता तो हिंदुत्ववादी प्रभाव होता पण त्याला मान्यता देणे शक्य नव्हते मात्र त्याचा वापर काँग्रेस वाढवण्यासाठी करता येईल याचा अंदाज रानडे ,फिरोजशहा मेहता वगैरे सेक्युलर वादी मुख्य नेतृत्वाला होता मात्र त्याच वेळेला गोपाळ कृष्ण गोखले नावाचे काउंटर नेतृत्व काँग्रेसमध्ये तयार करण्यात आले होते मराठी माणसाकडून मराठी माणसाचा काटा काढणे किंवा मराठी माणसाकडून मराठी माणसाला शह देणे असे काहीतरी हे राजकारण होते. ते यशस्वी झाले आणि त्यामुळेच लोकमान्य टिळक यांना कधीही काँग्रेसचे अध्यक्ष पद मिळाले नाही . म्हणजे एका अर्थाने काँग्रेसमध्ये असलेला हिंदुत्ववाद बहुजन लोकांच्या मध्ये मान्यता पावत असताना प्रत्यक्ष पक्षांमध्ये मात्र सेक्युलर लोक महत्व पावत होते. ही एक अजीबो गरीब घटना होती . तिला छेद मिळाला तो 1915 स*** महात्मा गांधी यांच्यामुळे! 


1915 नंतर अचानक महात्मा गांधी आले आणि त्यांचे काय करायचे हे ब्राह्मण लोकांना कळेना. कारण ते ब्राह्मण नव्हते आणि नेतृत्व फक्त ब्राह्मण लोकांचे स्वीकारायचे किंवा जास्तीत जास्त क्षत्रिय व्यक्तीचे स्वीकारायचे असे वर्णाश्रम व्यवस्था सांगते. साहजिकच सर्व टिळकवाद्यांची चांगलीच पंचायत झाली. पर्याय दोनच होते एक तर काँग्रेसमध्ये राहून महात्मा गांधी यांचे नेतृत्व स्वीकारायचे. हा पर्याय नेहरूंच्या पासून विनोबा भावे यांच्यापर्यंत अनेक लोकांनी स्वीकारला किंवा मग काँग्रेस मधून बाहेर पडायचे

यातील जे हिंदूवादी होते सेक्युलर होते ते सहजरीत्या गांधींना स्वीकारायला तयार होते कारण त्यातले अनेक समाजवादी होते पण जे समाजवादी नव्हते हिंदुत्ववादी होते त्यांची खरी गोची झाली. या लोकांना काँग्रेसबाहेर पडण्याखेरीज दुसरा कुठलाही पर्याय राहिला नाही अगदी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू हे सुद्धा यामध्ये येतात आणि त्यांनी सुद्धा स्वराज्य पार्टी नावाची पार्टी काढली होती पुढे ती पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन झाली कारण जवाहरलाल नेहरू यांनी तसे कन्विन्स केलेले असावे थोडक्यात जे डावे ब्राह्मण होते ते एक तर कम्युनिस्ट समाजवादी झाले किंवा मग गांधीवादी झाले आणि जे उजवे ब्राह्मण होते ते काँग्रेसच्या बाहेर हळूहळू एकटे पडत गेल्याने बाजूला झाले . या लोकांना हे कळून चुकले होते की स्वातंत्र्य चळवळीचा संग्राम हा पूर्णपणे गांधी यांच्या नेतृत्वाच्या हातात गेलेला आहे आणि काँग्रेस ही स्वातंत्र्याची चळवळ चालवणार. अशावेळी पर्याय काय असतो ? . तर स्वतःची संघटना निर्माण करणे आणि आपली वेळ येईल त्या वेळेची वाट पाहणे. माझ्या मते ब्राह्मणांची सर्वात मोठी ताकद ही या वाट पाहण्याच्या बाबतीत आहे. योग्य वेळ येईपर्यंत ब्राह्मण अतिशय चिकाटीने काम करत राहतात हेच संघाबाबत घडलेले आहे.टिळकवादी हिंदुत्ववादी लोकांच्या बाबत हेच घडले आणि त्यांनी हेच केले आणि त्यातूनच हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची संघटना स्थापन केली आणि स्वातंत्र्य चळवळ काँग्रेसला देऊन टाकली ही एक क्रियात्मक आत्महत्या होती जी करायला नको होती पण ही हेडगेवार यांच्याकडून झाली. एकाच वेळी चळवळीत भाग घ्यायचा आणि स्वतःची संघटना मात्र स्वयंसेवक संघटना  म्हणून पुढे आणायची. म्हणजे वैदिक धर्मापेक्षा स्वतःला वेगळे ठेवायचे आणि नंतर वैदिक धर्म ताब्यात घेऊन टाकायचा वासुदेव वैष्णव धर्मापेक्षा स्वतःला वेगळे ठेवायचे आणि नंतर वैष्णव धर्माला ताब्यात घेऊन टाकायचं हिंदू धर्मापेक्षा स्वतःला वेगळे ठेवायचे आणि मग नंतर हिंदू धर्म स्वतःच्या ताब्यात घ्यायचा. (ब्रिटिश राज्याच्या जनगणनेमध्ये ब्राह्मण लोकांनी आपण हिंदू नाही आहोत असे सांगितले होते ही वस्तुस्थिती आहे) त्यामुळे पुन्हा एकदा वाट पाहण्याची ब्राह्मण लोकांची तयारी होती आणि ब्राह्मण्यवादी लोकांनी वाट पाहायला सुरुवात केली. ब्रिटिश लोकांशी लढायचे नाही तर मग कुणाशी लढायची शत्रू नंबर एक कोण? ब्रिटिश नाही तर कोण?

या प्रश्नाचे उत्तर देणारी घटना नेमकी याचवेळी घडली ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रायोरिटी ही ब्रिटिश साम्राज्यशाही विरोधातला लढा होती ती बदलली आणि अचानक तुरुंगातल्या मुस्लिम कैद्यांच्या आलेल्या अनुभवामुळे ते कट्टर हिंदुत्ववादी बनले त्यांचा हा हिंदुत्ववाद धार्मिक नव्हता तर सांस्कृतिक होता त्यांच्या स्वतःच्या भावना किती धार्मिक होत्या हा एक खरोखर प्रश्न आहे ते एका अर्थाने पॉलिटिकली धार्मिक होते तुरुंगात आलेल्या मुस्लिम लोकांच्या मुस्लिम कैद्यांच्या अनुभवावरून ते आपले हिंदुत्व डिझाईन करून बसले आणि सावरकरांची प्रायोरिटी थेट ब्रिटिशांच्याकडून मुस्लिमांच्या कडे सरकली आणि नंबर एक शत्रू ब्रिटिश न राहता मुस्लिम झाले. सावरकर यांचे हे वैचारिक स्थित्यंतर त्यांच्या हिंदुत्व या पुस्तकामध्ये स्पष्टपणे दिसते किंबहुना या पुस्तकाचा प्रभाव अनेक हिंदुत्ववादी लोकांच्यावर आहे याच्या आसपासच प्रबोधनकार ठाकरे यांचे हिंदुत्वावर पुस्तक आले म्हणजेच साधारणपणे या काळामध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे हिंदुत्व लोकमान्य टिळक यांचे हिंदुत्व या दोन हिंदुत्वानंतर आता सावरकर यांचे हिंदुत्व आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे ज्याला मी क्षात्र हिंदुत्व म्हणतो ते आले विष्णुशास्त्री चिपळूणकर लोकमान्य टिळक हे कळत नकळत ब्राह्मणी हिंदुत्व होते. तर सावरकर यांचे हिंदुत्व हे वेदांती हिंदुत्व होते . त्याला छेद देणारे क्षात्र हिंदुत्व हे प्रबोधनकार ठाकरे यांनी आणले म्हणजेच एका अर्थाने कळत नकळत किमान महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणेतर लोक हिंदुत्वाकडे यायला लागले आणि ठाकरे यांचा त्यामध्ये सर्वाधिक वाटा होता ते फक्त येऊन थांबले नव्हते तर त्यांनी आता ब्राह्मणेतर हिंदुत्वाची मांडणी करायला सुरुवात केली ज्याचे फळ म्हणून शेवटी शिवसेना निर्माण झाली आणि नंतर सत्तेवर पण आली.

हिंदुत्व हे असे आल्यापासूनच सुरुवातीपासूनच बहुमुखी हिंदुत्व होते यामध्ये सर्वाधिक मागासलेले मागे पडलेले हिंदुत्व जर कोणाचे असेल तर ते म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे ब्राह्मणी हिंदुत्व आणि संघामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये नेमक्या याच हिंदुत्वाचाच प्रभाव होता ही वस्तुस्थिती आहे किंबहुना काँग्रेसमध्ये ब्राह्मणी हिंदुत्वाला काडीची ही जागा मिळणार नाही हे स्पष्ट झाले खुद्द टिळक हे स्वतःच बहुजनांचे नेते बनत गेले होते आणि त्यांच्यातला बदल ब्राह्मणी हिंदुत्व मानणाऱ्या लोकांना मानवलेला नव्हता . एका अर्थाने सर्वाधिक मोठा एकांत वास हा या ब्राह्मणी हिंदुत्वाला लाभला होता आणि त्यातून वाट काढण्यासाठी म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन झाला . पुढे गोळवलकर यांनी या ब्राह्मणी हिंदुत्वाला अतिशय स्पष्ट असा ब्राह्मण्यकेंद्री पाया दिला जो सरळ सरळ रामदासी होता. 

याचा एक दुष्परिणाम असा झाला की अचानक सर्वाधिक लडाकू भाषा करणाऱ्या ब्राह्मणी हिंदुत्वाने ब्रिटिशांच्या पुढे शस्त्रे टाकली याचे कारण स्पष्ट होते कारण या ब्राह्मणी हिंदुत्वाचा जो मुख्य नेता होता त्या सावरकर यांनीच शस्त्रे टाकून दिली . यानंतर जो सशस्त्र प्रतिकार आला तो सरळ सरळ काँग्रेसच्या सेक्युलर वादा मधूनच आलेला होता त्याच्यावर हिंदुत्ववादी जे क्लेम करतात ते क्लेम चुकीचे आहेत नेताजी सुभाष चंद्र बोस कधीही हिंदुत्ववादी नव्हते उलट ते कट्टर डावे होते आणि बंगालमध्ये डाव्या लोकांनी विजय मिळवला त्यामागे कळत नकळत पार्श्व संगीतासारखे नेताजी सुभाषचंद्र बोस वाजत होते. हेडगेवार हे फारसे बोस यांना भेटलेले नाहीत याबाबतीत ज्या काही दंतकथा तयार केल्या जातात त्या खोट्या आहेत इतकेच कशाला सावरकर हे कोणत्याही अर्थाने नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे गुरु नव्हते. याबाबतीत माझे स्पष्ट मत आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वीकारावे की १९२० नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वातंत्र्याच्या चळवळीतला सहभाग हा कमी झालेला आहे किंबहुना जवळजवळ शून्य म्हणावा इतकाच तो आहे याचे कारणच सावरकर यांच्या शत्रू क्रमांक वन मध्ये झालेला बदल आहे. एका व्यक्तीला तुरुंगात काही अनुभव येतात आणि त्यामुळे संपूर्ण विचार प्रणालीचा शत्रूच बदलून जातो हे अचंबित करणारे सत्य आहे. 

प्रश्न असा आहे की मग हे शत्रुत्व तरी हिंदुत्ववादाने नीट पेलले का ? तर नाही मुस्लिम लीगशी युती करून हिंदुत्ववादी लोकांनी आपले ऑथेंटीसिटी घालवली . या युतीमुळेच फाळणीमध्ये जे काय होत होते त्याचा तमाशा हिंदुत्ववादी लोक पहात राहिले. राजकीय पातळीवर काय करावे याबद्दल फार मोठा संभ्रम या काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या मध्ये दिसतो तो तसा होता हे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ऍडमिट करावे हे बरे. मुळातच हे घडण्याचे सर्वात मोठे कारण या काळामध्ये हिंदुत्ववाद हा प्रबोधनकार ठाकरेंच्या दिशेने जाण्याऐवजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या दिशेने गेला हे होते. आणि ब्राह्मणी हिंदुत्व हे मुसलमानांशी तडजोड करायला तयार होते. लोकमान्य टिळक यांनी जो लखनऊ करार केला त्यामध्ये स्पष्ट आणि स्वच्छपणाने मुसलमानांशी नको त्या तडजोडी केल्या गेलेल्या आहेत आणि त्या तडजोडीच पुढे काँग्रेसला महागात पडले किंबहुना महात्मा गांधींचे सर्वात मोठे वैशिष्ट्य जर काही असेल तर ते म्हणजे त्यांनी टिळकाने आखून दिलेली चौकट मुस्लिमांच्या संदर्भातली आखून दिलेली चौकट कधीही मोडली नाही ना ते त्या पलीकडे कधी गेलेले आहेत पण हिंदुत्ववादी लोकांना आपल्याच एका हिंदुत्ववादी माणसाने केलेली चूक सुधारायची राहिली बाजूला साधी ऍडमिट सुद्धा करायची नाहीये.  मुस्लिम लोकांच्या  तुष्टीकरणाचे धोरण हे लोकमान्य टिळक नावाच्या हिंदुत्ववादी माणसाने सुरू केले आहे आणि हेच धोरण पुढे महात्मा गांधी यांनी अधिक पुढे रेटत नेले आणि त्यातूनच खिलाफत चळवळ उभी राहील ही गांधींच्याकडून झालेली दृष्टीकरणाची दुसरी स्टेप होती. हिंदुत्ववादी लोकांनी मुस्लिम तुष्टीकरणची दुसरी स्टेप  ही मुस्लिम लीग बरोबर युती करून पार पाडली पुढे मग संविधानामध्ये मुस्लिमांना स्वतंत्र वैयक्तिक कायदा देण्यात आला ही तुष्टीकरणाची चौथी स्टेप होती यानंतर शहाबानो खटला ही पाचवी आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी हजयात्रेसाठी सरकारी मदत ही सहावी स्टेप होती या दरम्यान लोकसंख्या नियंत्रण कायदा न करणे वगैरे वगैरे सर्व मुस्लिम तुष्टिकरणाच्या मोहिमा होत्या आणि यामध्ये सुरवात हिंदुत्ववादी लोकमान्य टिळकांनी केली होती तर तात्पुरता  शेवट अटल बिहारी वाजपेयी यांनी हज यात्रेच्या अंगाने केली आत्ताही समान नागरी कायदा न करणे हे मुस्लिम तुष्टिकरणाचेच हिंदुत्ववादी पाऊल आहे ही लोकमान्य टिळक यांचीच विरासत आहे. तेव्हा मुस्लिम तुष्टीकरण ही फक्त काँग्रेसचीच विरासत नाही ते हिंदुत्ववादी लोकांची विरासत सुद्धा आहे किंबहुना या दोन्हीही पार्ट्या सत्तेवर आल्या की या तुष्टीकोनाल सुरुवात करतात यात काँग्रेस परवडते कारण निदान त्यांचे तुष्टीकरण उघड उघड असते हिंदुत्ववादी लोकांचे तुष्टीकरण हे छुपे असते एकंदरीत ही दोन्ही भावंडे आहेत जी एकमेकाला बरोबर पूरक म्हणून काम करतात त्यामुळे मुस्लिमांना नंबर एक शत्रू मानायचे म्हणजे नेमके काय करायचे हे एकदा हिंदुत्ववादी लोकांनी स्पष्ट आणि स्वच्छपणाने सांगितली पाहिजे नुसती ताप शाब्दिक बडबड करायची शाब्दिक द्वेष करायचा आणि इकडची तिकडच्या गोष्टी करायच्या आणि मुस्लिम आमचा नंबर एक शत्रू असे जाहीर करायचे बहुजन समाजातल्या लोकांना कामाला लावायचे प्रत्यक्ष लढायची वेळ आली की त्यांनाच धाडायचे आणि स्वतः घरात बसायचं असे हे धोरण आहे शिवाजी आणि संभाजी महाराजांचे नाव घेणे वेगळे आणि त्यांच्याप्रमाणे थेट कृती करणे वेगळे! कृती शैवाने करावी बाकीच्यांनी फक्त शेपूट घालावी.

प्रश्न आता असा येतो की शत्रू नंबर एक ब्रिटिश नाही मुस्लिम आहेत तर मग शत्रू नंबर दोन कोण?

सावरकर यांनी शत्रू बदलला आणि काँग्रेस आणि गांधीवाद देखील कळत नकळत शत्रु नंबर दोन झाले म्हणजेच ब्रिटिश या काळामध्ये हिंदुत्ववादाचे शत्रू नंबर तीन झाले हे आश्चर्यकारकच नाही तर लाजिरवाणे आहे. याचा परिणाम म्हणूनच काँग्रेसचा जो मुख्य नेता आहे महात्मा गांधी त्याचीच हत्या करण्याचे उद्योग नथुराम गोडसे आणि त्यांच्यासारखे काही लोक यांना सुचू लागले गांधी मुस्लिम धार्जिने आहेत आणि त्यामुळेच हिंदूंचे शत्रू नंबर दोन आहेत अशी ही विकृत विचारसरणी होती आणि आहे. ब्राह्मण कधीही परकीय लोकांचे शत्रू बनत नाहीत ते ना कधी मुस्लिमांचे शत्रू बनले ना कधी ब्रिटिशांचे शत्रू बनले अगदी अलीकडे तालिबान च्या मंंत्र्याच्या समोर जे लोटांगण घातले गेले ते हे सिद्ध करते. अपवाद फक्त लोकमान्य टिळक ! बाकी स्वातंत्र्य चळवळीमध्ये सामील होणारे बहुतांशी लोक हे स्वतःला ब्राह्मण म्हणून घेत असले तरी ते बहुतांशी पंडित आहेत आणि त्यातले सुद्धा अनेक जण उदाहरणार्थ सावरकर व नेताजी सुभाषचंद्र बोस हे शाक्त आहेत. अगदी राजाराम मोहन रॉय सुद्धा शाक्त होते (ते आईकडून शाक्त होते आणि त्यांच्या विचारसरणीवर आईचा प्रचंड प्रभाव होता वडिलांचा नव्हता). शस्त्र उचलणे हे या लोकांच्याकडे परंपरेंकडूनच आलेले होते .

थोडक्यात काय लाल बाल पाल यांनी हिंदुत्ववादी म्हणून काँग्रेसला व्यापक बनवले हे जितके खरे आहे तितकेच नंतरच्या काळामध्ये हिंदुत्ववादी लोकांनी शत्रू बदल करून स्वतःला कळत नकळत संकुचित करून घेतले. अर्थातच या काळामध्ये हे जे ब्राह्मणी हिंदुत्ववादी लोक होते त्यांची संख्या मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये वाढत गेली आणि जवळजवळ सर्वच ब्राह्मणी विचार करणारे ब्राह्मण संघाच्या नेतृत्वाखाली संघटित झाले. शेवटी ब्राह्मणधर्मी ब्राह्मणांना स्वतःची संघटना हवी होती ती यानिमित्ताने मिळाली. अर्थातच पुढे सावरकर पुन्हा एकदा बदलले त्यांनी भारतातल्या मुस्लिम लोकांना शत्रु मानण्यास नकार देऊन हिंदुत्ववादाला पुन्हा एक नवी दिशा दिली गोळवलकर होते तोपर्यंत ही दिशा स्वीकारण्याची संघाची तयारी नव्हती पण गोळवलकर गेले आणि हळूहळू सावरकरांची ही नवी दिशा स्वीकारण्यामध्ये संघाला अडचण आली नाही . अटल बिहारी वाजपेयी हे कट्टर सावरकरवादी नेतृत्व हळूहळू हे त्यामुळेच केंद्रस्थानी आलेले दिसते. सावरकर हे ब्राह्मण असले तरी ब्राह्मणधर्मी नव्हते ते काहीसे वेदांती होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे किंबहुना त्यांच्या हिंदुत्वाला वेदांती हिंदुत्ववाद सुद्धा म्हणता येते . साहजिकच ज्ञान मार्गाने जाणारा हा वेदांत हिंदुत्ववादी पद्धतीने मांडण्यात सावरकरांना यश आले जो अटल बिहारी वाजपेयी यांनी अधिक व्यापक बनवला . सावरकर यांच्यावर ब्राह्मणवादापेक्षा विवेकानंद आणि टिळक यांचा प्रभाव अधिक होता . हे दोघेही विज्ञानाला भयंकर मान देत होते अशाच प्रकारचा मान सन्मान सावरकर यांनी विज्ञानाला दिलेला आहे आणि वेद आणि पुराणे यांना नकार दिलेला आहे . गाय हा पवित्र पशु आहे या ऐवजी गाय हा उपयुक्त पशु आहे अशा प्रकारची मांडणी त्यामुळेच येते. त्यातूनच मग "आपले पूर्वज हिंदू होते हे सहज स्वीकारणारा राष्ट्रवादी मुस्लिम" ही एक संकल्पना विकसित होत गेली आणि संघाने हळूहळू ती आत्मसात करत नेली. आजही संघ अशा मुस्लिमांच्या करता खुला असतो आणि आहे माझा अंदाज चुकला नाही तर भविष्यामध्ये अशा प्रकारच्या मुस्लिमांची संख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये वाढत जाणार आहे कारण खुद्द मुस्लिम लोकांनाच आता कळून चुकले आहे की भारताच्या बाहेर भारतीय मुस्लिमांना जागा नाही. आपली मुलगी हिंदूला देण्यामध्ये पूर्वी प्रचंड विरोध होता आणि आता मी बघतो आहे की हा विरोध तितका कट्टर राहिलेला नाही . माझ्या स्वतःच्या एका असिस्टंट चे लग्न त्याची प्रेयसी मुस्लिम होती तेव्हा धुमधडाक्यात मुस्लिम सासर्‍याने करून दिले होते आणि तेही लखनो सारख्या सिटीमध्ये ! हळूहळू अशा लग्नांची संख्या वाढत चाललेली आहे . एकंदरच संघाला अभिप्रेत असणाऱ्या राष्ट्रवादी मुस्लिमांची संख्या भविष्यात वाढत जाणार हे आता स्पष्ट आहे आणि काँग्रेसला यामुळे चांगले चॅलेंज निर्माण झालेले आहे. सेक्युलरवाद हा इस्लाम मध्ये बसत नाही त्यामुळे सेक्युलर वादी लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या बाजूने इस्लाम फिरणे शक्य नाही. उलट हिंदुत्ववादी संघटनांची आणि पक्षांशी युती करणे त्याला सोयीचे जाते . अगदी बसपा सुद्धा पुन्हा भाजपच्या युतीमध्ये आला तर मला आश्चर्य वाटणार नाही . हा बदलता भारत आहे आणि सेक्युलर वादाला हा बदलता भारत राष्ट्रीय स्वयं सेवक संघाने आणलेला आहे म्हणून प्रचंड दुःख वाटते . त्या दुःखाचे मूळ अज्ञानात आहे .

मुळातच लोकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्याने स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला नाही म्हणून माफ केलेले आहे कारण काँग्रेस सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये अशीच होती संघ सुद्धा असाच होता . त्यामुळे संघाशी लढायचे असेल तर सेक्युलर वादी लोकांना काही वेगळ्या गोष्टी कराव्या लागतील. 

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे