गांधीजींच्या बद्दल येणारी ऑब्जेक्शनस आणि त्यामधील खरे खोटे श्रीधर तिळवे नाईक
गांधीजींच्या विचारसरणीबद्दल येणारी ऑब्जेक्शनस म्हणजे अनेकदा गांधीजी न वाचता न समजता किंबहुना अनेकदा जाणीवपूर्वक समजून न घेता केलेला प्रचार असतो
यातले पहिले ऑब्जेक्शन हे नेहमीच गांधीजी वर्णव्यवस्थेचे आणि जाती व्यवस्थेचे समर्थक होते असे आहे .
याबाबतीत हो आणि ना असा उत्तराचा प्रयोग केला जातो प्रत्यक्षात त्यात काही अर्थ नाही वस्तुस्थिती अशी आहे की सुरुवातीच्या काळामध्ये गांधीजी वर्ण- जाती व्यवस्थेचे समर्थक होते पण त्यातही कट्टर वर्ण जात व्यवस्था ते पाळत होते असे म्हणता येत नाही. गांधीजींची सुरुवातीची याविषयीची संकल्पना आहे की आडवा अक्ष चालतो पण उभा अक्ष नको ही आहे(हाच विचार पुढे भालचंद्र नेमाडे यांनी चालवलेला आहे किंबहुना राम मनोहर लोहिया ,भालचंद्र नेमाडे वगैरे भारतातील सर्व देशीवादी लोकांचा देशीवाद म्हणजे उत्तर आधुनिक गांधीवाद आहे) म्हणजे सर्व कामांना समान प्रतिष्ठा असायला हवी याविषयी ते आग्रही होते परंतु उभी व्यवस्था ते सुरुवातीला मोडून काढावयास तयार नव्हते परंतु १९३५ नंतर कदाचित बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा परिणाम झाल्यामुळे असेल किंवा त्यांना स्वतःलाच हळू हळू वर्ण- जाती व्यवस्थेतील मूर्खपणा कळाल्याने असेल आणि मला जे वाटते की त्यांना मुळात सुरुवातीपासूनच विरोध करायचा होता परंतु हा विरोध केला तर काँग्रेसमधील सर्व उच्चवर्णीय पुढारी निघून जातील आणि आपण एकटे पडू आणि कदाचित स्वातंत्र्यलढा लढताच येणार नाही असे त्यांना भय वाटणे ज्यात बहुदा तथ्य असावे त्यामुळे ते सुरुवातीला आडव्या अक्षाचे समर्थक होते परंतु उभा अक्ष त्यांनी त्यावेळी ही स्वीकारला नव्हता
एकदा स्वातंत्र्यलढा आता यशस्वी होणार याची खात्री जेव्हा त्यांना पटली आणि ब्राह्मण(किमान काँग्रेस मधले) सुधारलेत याचीही जेव्हा त्यांना खात्री पटली तेव्हा त्यांनी मग पुढचे पाऊल टाकले ते म्हणजे वर्ण- जाती व्यवस्था मोडीत काढणे . किंबहुना ते याबाबतीत बाबासाहेब आंबेडकर यांच्या पेक्षा देखील दोन पावले पुढे गेले. आणि यापुढे मी फक्त आंतरजातीय आणि आंतरवर्णीय विवाहच अटेंड करेन अशी अत्यंत स्ट्रॉंग भूमिका त्यांनी घेतली जी बाबासाहेब आंबेडकरांनाही कधी घेता आली नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समुदायात किती आंतरजातीय लग्न लावली हा एक संशोधनाचा विषय आहे तर यावर कोणीतरी खूप खोलात जाऊन संशोधन करणे गरजेचे आहे . ते आंतरविवाहंचे समर्थक होते परंतु कृती त्यांनी सामाजिक पातळीवर किती केली हा नक्कीच विचारण्याजोगा प्रश्न आहे आज सुद्धा बौद्ध विहारांच्या मध्ये मंदिरामध्ये किती आंतरजातीय विवाह होतात हे एकदा कुणीतरी नीट तपासले पाहिजे . होते काय आहे की जय भीम म्हटले की काम भागते. प्रत्यक्षामध्ये कृतीच्या पातळीवर नेमके काय चाललेले आहे याविषयीचा कसलाही स्टॅटिस्टिक आढावा आंबेडकरवादी सादर करत नाहीत मी स्वतः आचार्य असल्याने अनेक आंतरजातीय विवाह लावलेले आहेत अगदी माझ्या घरात सुद्धा लावले आहेत पण लग्नाची बोलणी करायला गेलेलो असताना माझा याबाबतीतला अनुभव फार निराशा जनक आहे म्हणजे पूर्वाश्रमीचे महार पूर्वाश्रमीच्या खालच्या लोकांच्या बरोबर विवाह करताना कसे बोलतात तथाकथित उतरंडीत त्यांच्यापेक्षा खाली असणाऱ्या लोकांच्या बरोबरच्या लग्नाच्या वाटाघाटीत हा उतरंडीचा मुद्दा कसा येतो याचा माझ्याकडे व्यवस्थित अनुभव आहे सर्वात आश्चर्यकारक म्हणजे आदिवासी असणाऱ्या काही जमाती चक्क अस्पृश्यांना आपल्या बरोबरीच्या समजत नाहीत त्यांच्यात बसून वाटाघाटी करताना अधिकच अवघड जाते हा माझा अनुभव आहे त्यामानाने आर्य समाजात आंतरजातीय विवाह होण्याचे आकडे अधिक असावेत (आणि कदाचित राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सुद्धा)असा माझा अंदाज आहे यावर जर का कोणी संख्याशास्त्रीय पुरावे देऊन माझे म्हणणे खोडून काढले तर मला खरोखरच आनंद होईल. मी वैदिक धर्माचा आणि श्रद्धेचा द्वेष करत नाही याचे एक सबळ कारण म्हणजे हा समाज ही श्रद्धा आता पूर्णपणे बदललेली आहे या श्रद्धेमध्ये वावरणारे काही ब्राह्मणधर्मी लोक तिला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात परंतु एकंदर समाज जो खरोखर वैदिक श्रद्धेत आणि वैदिक संस्कारात वाढलाय तो असा उरलेला नाही आणि त्यामुळेच जेव्हा समकालीन ब्राह्मणांची स्थिती येते आणि त्यांच्या मधील जे पक्के वैदिक आणि कर्मदत्त वर्ण व्यवस्था स्वीकारून आर्य समाजाचे झालेले आहेत ते पूर्णपणे वेगळे वर्ण जात न मानणारे ब्राह्मण असतात हा माझा अनुभव आहे तिथे वर्ण जात व्यवस्था कार्यान्वित असलेली दिसत नाही असा माझा अनुभव आहे. अपवाद आहेत पण हे अपवाद अल्पसंख्यांक आहेत बहुसंख्यांक नाही म्हणूनच मी वैदिकांना आदर देतो परंतु ब्राह्मण धर्माला आणि वैष्णव धर्माला आदर देत नाही (मराठा समाज विशेषता 96 कुळी कट्टर बनण्याचे सर्वात मोठे कारण रामायण महाभारतातील राम व कृष्ण यांचा प्रभाव होय या निष्कर्षाला मी येतो आहे)कारण त्यांच्या बाबतीत माझा अनुभव हाच आहे की हे दोन्ही धर्म अत्यंत कट्टरपणे वर्ण जात व्यवस्था पाळत असतात.
दुसरे ऑब्जेक्शन आहे गांधीजींचे तरूण पोरींच्यामध्ये झोपण्याचे ब्रह्मचर्य केंद्र असलेले प्रयोग आणि त्यामुळे
त्या पोरींची मानसिकता आणि आयुष्य उजाड झाली हे असते . मला आजतागायत समजलेले नाही की या मुलींच्या पैकी कुठल्या मुलीने अशी तक्रार केलेली आहे की यामुळे आमची आयुष्य उजाड झाली ? याबाबत सांगितलेला एक किस्सा प्रत्यक्षात फेक निघालेला आहे. त्यामुळे याची नीट चौकशी झाली पाहिजे. याबाबतीतली सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मुळात गांधीजींचा लैंगिक संयम कधीही याबाबतीत सुटलेला नव्हता ही वस्तुस्थिती आहे. गांधीजींनी शारीरिक संयम कमावला होता पण मानसिक संयम आहे का याची तपासणी गांधीजी करत होते . ज्यांना क्रिया तंत्र माहिती आहे त्यांना हे सहज कळू शकते कारण अनेकदा अशा प्रकारचे प्रयोग क्रिया तंत्रामध्ये केले जातात आणि त्यांचे विधी आहेत गांधीजी कर्मयोगी आहेत आणि क्रिया तंत्र हे मोक्ष मिळवण्याच्या बाबतीत सर्वाधिक कठीण असलेले तंत्र आहे अगदी लोकमान्य टिळक सुद्धा क्रिया तंत्रवादीच होते म्हणजे वैष्णव भाषेत कर्मयोगी होते त्यांचीही काही वेळा अर्धवट कोटेशन उद्युक्त करून भडकवले जाते म्हणजे वैश्य तागडी घेऊन सभेमध्ये काय करणार वगैरे. त्या वाक्याची सुरुवात ब्राह्मण त्यांची पंचपात्रे आणि पळ्या घेऊन काय करणार यापासून होते त्यांना म्हणायचे होते असे की तुम्ही जर का पारंपारिक गोष्टी घेऊन लोकशाहीमध्ये लोकशाही संस्थांच्या मध्ये निवडणुकीद्वारे जाल तर तिथे तुम्ही काय करणार हे तुम्हाला स्पष्ट झाले पाहिजे तुम्हाला या सर्व सोबत असणाऱ्या पारंपारिक गोष्टी आज ना उद्या सोडाव्या लागतील असे ते सुचवत होते आणि ते त्या काळातली भाषा वापरत असल्यामुळे अनेकदा गोंधळ उडतो टिळक जिथे पारंपारिक आहेत तिथे मी त्यांना भरपूर झोडपलेले आहे पण ते काळाच्या पुढे असलेले नेते होते हीच वस्तुस्थिती आहे. कुठलाही नेता हा आपल्या काळानेच बंद असतो गांधीजी होते टिळक ही होते बाबासाहेब आंबेडकर ही होते कोणीही काळापासून सुटलेला नाही. त्या काळामध्ये असे प्रयोग योगी लोक करायचे तर कोणीही काहीही बोलायचे नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्या काळातले आपले सामान्य लोक याबाबतीत अत्यंत ओपन मंडळ होते अलीकडे आपण विचित्र रित्या संकुचित बनत चाललेलो आहे वस्तुस्थिती अशी आहे की त्या काळातल्या सार्वजनिक जीवनात अशा प्रकारचे प्रयोग जे मोक्ष प्रधान प्रयोग होते त्यांना मान्यता दिली जात होती.त्यावरून आत्ता असा गोंधळ माजवला जातो तसा गोंधळ माजवला जात नव्हता अपवाद फक्त हिंदुत्ववादी लोक होते आणि याचे एकमेव कारण ते गांधीजींना विरोधासाठी विरोध करत होते ज्यात काही अर्थ नव्हता दुसरे आंबेडकर होते तेही विरोधासाठी विरोध काही वेळा करतात मुळातच आंबेडकर लैंगिकतेबाबतीत स्पष्ट सांगायचे तर नको तितके पुरोगामी होते हळूहळू तेही बदलत गेले . मुळातच बौद्ध व्यवस्था हीच याबाबतीत पारंपारिक आहे आणि गौतम बुद्धाचा प्रचंड प्रभाव बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर असल्यामुळे ते विवाह संस्था मोडायला तयार नव्हते हे आपण लक्षात घेतले पाहिजे मी यालाच संस्काराची आणि काळाची मर्यादा म्हणतो आणि ती प्रत्येकाला लावतोय प्रत्येक विसाव्या शतकातल्या महापुरुषाला 21 व्या शतकातल्या किंवा प्राचीन काळातल्या कसोट्या लावून तपासणे हे आता बंद केले पाहिजे
तिसरे ऑब्जेक्शन अर्थातच ते भांडवलदारांचे समर्थक होते भांडवलदारांचे पीट्टे होते वगैरे वस्तुस्थिती अशी आहे की गांधीजींना कल्याण वाद व्यवस्थित कळत होता आम्ही शैव लोक त्याला शिवकल्याण वाद म्हणतो(मुळात शिव ह्या शब्दाचा एक अर्थ कल्याण असाही आहे) बसवेश्वर यांनी जेव्हा पुरोगामी वादाची सुरुवात भारतामध्ये केली तेव्हा पुन्हा एकदा नवा कल्याण वाद मांडला कल्याण मंडपाची स्थापना केली मी स्वतः जी आर्थिक व्यवस्था प्रमोट करत असतो तिला मी चिन्हमध्यकल्याणवाद म्हणतो गांधीजी एका बाजूने संपूर्ण वाणी पणी वर्गाला भांडवलशाही व्यवस्था निर्माण करण्याच्या संदर्भात मदत करत होते मार्गदर्शन करत होते आणि नैतिकता सुद्धा देत होते ज्याची गरज त्या काळामध्ये प्रचंड होतीच पण अलीकडच्या काळामध्ये प्रचंड वाढलेली आहे बसवेश्वर यांनी यासंदर्भात केलेले कार्य ते अधिक पुढे घेऊन जात होते भांडवलशाहीकडून समाजवादाकडे जाण्याची पहिली शक्यता गांधीजींनी भारतामध्ये भारतीय पद्धतीने शोधायचा प्रयत्न चालवलेला होता तो दुर्दैवाने मध्यात देखील पोहोचला नाही कारण त्यांची अचानक हत्या झाली. अन्यथा आपणाला 1950 नंतर एक वेगळे आर्थिक धोरण असलेले गांधी बघावयास मिळाले असते . गांधीजींचा पैशाचा हिशेब किती चोख होता हे आता पुढे आले आहे उगाच याबाबतीत गांधीजींच्यावर ऑब्जेक्शन घेऊ नका केवळ वादासाठी वाद हा एका मर्यादेपर्यंत चांगला असतो माझे तर म्हणणे उलटे आहे की याबाबतीत आता पुन्हा एकदा गांधीवादाचे संपूर्ण पुनर्जीवन होणे गरजेचे आणि प्रत्येकाने आपले हिशेब गांधीजींच्या प्रमाणे एक एक पायी पायी चा प्रत्येक पैशाचा हिशेब लोकांना दिला पाहिजे अपार पारदर्शकता हे गांधीजींच्या आर्थिक व्यवहाराचे वैशिष्ट्य होते आणि हे वैशिष्ट्य प्रत्येक पक्षाने जपले पाहिजे. प्रत्येक शासन आणि प्रशासन संस्थेने जपले पाहिजे.
बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधीजींच्या वर जी ऑब्जेक्शन घेतली आहे त्यातील एक ऑब्जेक्शन म्हणजे त्यांनी वापरलेला हरिजन हा शब्द ! माझे स्वतःचेही याला ऑब्जेक्शन आहे पण गांधी वैष्णववादी होते आणि साहजिकच ते हरी समर्थक होते त्यांच्या दृष्टीने हरी म्हणजे ईश्वर होता आणि हरिजन हा शब्द ते वापरत होते त्याचे कारण त्यांच्या दृष्टीने त्याचा अर्थ ईश्वराची माणसे असा होता ईश्वराचे जन असा होता मला नेहमीच असे वाटते की त्यांनी हरिजन हा शब्द वापरला नसता आणि त्या ऐवजी काही वेगळा शब्द वापरला असता तर फार बरे झाले असते . मी याबाबत आंबेडकर यांच्याशी सहमत आहे .
गांधीजींच्या बद्दल यानंतरचे येणारे ऑब्जेक्शन जवळजवळ सर्व समाजवादी साम्यवादी मुस्लिम लीग वादी आणि आंबेडकरवादी लोकांच्या कडून येत असते ते म्हणजे गांधी हे बनिया होते धूर्त होते मी स्वतः त्यासाठी कायमच धोरणी आणि गांधीजींच्या बाबतीत ध्येयधोरणी असा शब्द वापरेन. एकदा ध्येय ठरले की मग त्यांचे धोरण ठरवायचे आणि ते धोरण ते मुत्सद्दीपणाने व्यवस्थित राबवायचे बाकीच्या सर्व नेत्यांच्यात आणि गांधीजींच्यात फरक जर कुठे असेल तर तो म्हणजे बहुतेक नेत्यांना धोरण ठरवता यायचे परंतु त्या धोरणाची अंमलबजावणी करता यायची नाही गांधीजी हे कदाचित या देशातले एकमेव असे नेते होते की ज्यांच्या धोरणात आणि त्या धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये फारसे अंतर नसायचे असे अंतर पडले आहे असा त्यांना संशय जरी आला तरी ते थांबायचे . त्यांचे हे थांबणे अनेकदा टिकेला पात्र झाले आहे अर्थात याबाबतीत टोक गाठणे मात्र त्यांनी १९४० नंतर थांबवले आणि त्यामुळेच १९४२ च्या चले जाव quit india आंदोलनात हिंसा होऊनही त्यांनी आंदोलन थांबवले नाही . त्यांचे ध्येय धोरण फार स्वच्छ असायचे किंबहुना जोपर्यंत ते स्वच्छ होत नाही तोपर्यंत ते कृती करायला जातच नसत. मुख्य म्हणजे ते छोटी छोटी ध्येय देत आणि हळूहळू ती पुरी करत . आपल्या अनुयायांच्याकडून सुद्धा प्रचंड अपेक्षा ते ठेवत नव्हते त्यांना झेपेल असेच ते ध्येय देत धोरण देत आणि अंमलबजावणी करताना आपली कडक दृष्टी ठेवत . नेतृत्व कसे करायचे याचे गांधीजी आदर्श आहेत . लोकांना सोबत कसे घेऊन जायचे याचेही गांधी आदर्श आहेत याबाबतीत त्यांच्यापूर्वी ना कोणी असा नेता झाला आणि ना कोणी होईल माझ्या मते त्यांच्यासारखी ही आध्यात्मिक किमया अध्यात्मिक क्षेत्रात फक्त भगवान शंकर ,गौतम बुद्ध त्यानंतर बसवेश्वर त्याच्यानंतर गुरुनानक यांना साधलेली होती. त्यानंतर अध्यात्मिक क्षेत्रात अशी किमया साधणारे गांधीजी हेच पाचवे नेते आहेत राजकीय क्षेत्रात मात्र आपणाला असे खूप लोक दिसतात शिवाजी महाराज हे उत्तम उदाहरण आहेत तेव्हा ते धोरणी आणि डिप्लोमॅटिक होते म्हणून त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांचे धोरणी धोरण आपण मॅनेजमेंटच्या पातळीवर अभ्यासणे आणि आत्मसात करणे खूप आवश्यक आहे. प्रत्येक राजकीय नेत्याने ज्याला नैतिक कणा आहे त्याच्यासाठी भगवान शंकर ,गौतम बुद्ध ,बसवेश्वर , गुरु नानक आणि महात्मा गांधी हे पाच आदर्श महापुरुष भारतात होऊन गेलेले आहेत. अगदी अण्णा हजारे यांच्यासारखा अर्धा गांधी सुद्धा गांधीजींच्या पद्धतीमुळे मोठा होऊन जातो . त्याआधी जयप्रकाश नारायण असे होते . काही प्रमाणात विनोबा भावे होते. तेव्हा गांधीजींचा द्वेष करण्यापेक्षा गांधीजींच्या कडून काय शिकता येईल ते सर्वांनी पहावे. बाबासाहेब आंबेडकरांच्या कडे ध्येय होते धोरण होते आणि धोरणी पणही होते दुर्दैवाने त्यांच्याकडे गांधीजींच्याकडे असलेली एक गोष्ट नव्हती ती म्हणजे मध्य वर्ण(मी वैश्य वर्णाला मध्यवर्ण म्हणतो त्याचे कारण तो ना धड उच्च आहे ना धड निच्च आहे) !अन्यथा तेही गांधीजींच्या पेक्षा काही कुठे कमी पडले नसते. सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी त्यांनी सुद्धा उत्तम खेळ्या खेळलेल्या आहेत(उदाहरणार्थ अलीकडे ज्या पुस्तकावरून वाद झाला त्या जेधे जवळकर यांच्यासाठी खटला लढणे) दुर्दैवाने ज्या संघाकडून ते उतरले होते त्याला त्यावेळी बाबासाहेब काय होते हे कळले नव्हते आणि आजही त्या संघाकडून खेळणाऱ्यांना ते कळलेले नाही . आपल्याकडे अंध फॅनगिरीची (भक्ती हा शब्द मी का वापरत नाही ते मी एका लेखात स्पष्ट केले आहे)सुरुवात बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांच्यापासून होते . गांधींच्या बाबतीत मात्र असे झाले नाही याचे कारण त्यांनी स्वतःच्याच बुद्धिमत्तेच्या तोला मोलाचे अनेक लोक आसपास जमवले आणि त्यांना टीका करण्याची ही अनुमती दिली. असे लोक बाबासाहेब आंबेडकरांना जमवता आले नाहीत ही त्यांच्या नेतृत्वाची नाही तर त्यांच्या काळाची मर्यादा आहे.
तेव्हा बाकीच्या लोकांचे काय असेल ते असो सर्व शैव म्हणजेच पंडित , वीर , वाणी पणी,ओबीसी, बीसी आणि आदिवासी लोकांनी गांधीजींच्याकडून अवश्य ज्या गोष्टी घेता येण्याजोग्या आहेत त्या घ्याव्यात. माझे स्वतःचे वडील गांधीवादी होते त्यामुळे साधा सामान्य गांधीवादी आचरणामध्ये नैतिकदृष्ट्या किती आणि कसा कणखर बनत जातो हे मी स्वतःच्या डोळ्यांनी लहानपणापासून पाहिलेले आहे. व्यापार करताना सुद्धा तो नैतिकतेनेच केला पाहिजे याविषयी माझे वडील प्रचंड आग्रही होते . गांधीजी नसते तर ते असे झाले नसते याविषयी माझ्या मनात शंका नाही . गांधीजींच्या विचारातली नैतिकता ही नेहमीच राजकारणात ही आवश्यक होती आहे समाजकारणात ही आवश्यक होती आहे आणि अर्थकारणात सुद्धा आवश्यक आहे होती. त्यांचे परखड परीक्षण झालेच पाहिजे पण परखड याचा अर्थ विरोधासाठी विरोध असा होत नाही गांधीजींना जिथे झोडपायचे असते आहे तिथे मी नेहमीच झोडपलेले आहे . पण त्याच वेळेला जिथे जिथे मला गांधीजींच्या ज्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी दिसतात त्या पॉझिटिव्ह गोष्टी मी मांडत असतो . गांधीजी ही किती फार मोठी हस्ती होऊन गेली हे जर का आपणाला अजूनही कळत नसेल तर आपण अंड्यात आहोत असे समजावे .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment