माझ्या वैचारिक लेखन प्रवासाविषयी थोडेसे श्रीधर तिळवे नाईक 


तुझे सध्या काय चालले आहे ?तू सध्या कसा काय जगतो?(हा प्रश्न किशोर कदम मला नेहमी विचारत असतो) इतिहासाच्या इतक्या पोस्ट कशा असे तीन प्रश्न मला नेहमीच हल्ली विचारले जातात म्हणून एकत्र उत्तर देतो 


पहिले उत्तर इतिहासासंदर्भात आहे. 2005 ते 2010 यांच्या दरम्यान मी Our Paradigms and Their Paradigms नावाचा इतिहासाचा अतिशय मोठा ग्रंथ लिहिला आहे ज्या विषयी मी पोस्ट फेसबुक वर टाकलेली होती जेव्हा तो ग्रंथ पूर्ण झाला होता. त्या लेखनाच्या वेळेलाच काढलेल्या टिपा सध्या वापरतो त्याचे बीज जे एन यु मध्ये सादर केलेल्या पेपरमध्ये होते शिवाय महाविद्यालयात बी ए ला माझा मुख्य विषय इतिहास होता आणि मी इतिहासाचे सर्व मिळून किमान सहा पेपर दिलेले आहेत त्याच्याही नोट्स असतातच . त्यामुळे इतिहास हा माझा मुख्यच अभ्यासाचा विषय होता आणि मी इतिहासावर लिहितो यामध्ये काहीही आश्चर्यकारक नाही याच काळात घरातल्या भविष्य विज्ञानाविषयी असलेली परंपरा मी आत्मसात केलेली होती त्यामुळे भविष्य विज्ञान हे देखील इतिहासाइतकेच माझ्या घरामध्ये उपस्थित होते. म्हणजे एका अर्थाने न्यू कॉलेजमध्ये महाविद्यालयात इतिहास आणि काही प्रमाणात मराठी साहित्य तर घरामध्ये भविष्य विज्ञान , संगीत ,चित्रकला ,अभिनय, चित्रपट असा माझा बालपणातल्या व तरुणपणातल्या जडणघडणीचा माहोल आहे.


सविकल्प समाधी मिळाल्यामुळे साहजिकच मी धर्माच्या विरोधात होतो आणि या काळातले माझे धर्मावरचे लिखाण म्हणजे एक सिरीज होती आणि मोक्षाचा डिफेन्स करण्यासाठी म्हणून ती लिहीली होती जी मी कोल्हापुरात इतिहासाचा अभ्यास करतानाच लिहिली आहे त्यातून मी बाहेर आलो आणि ते बरे झाले तिचाच वापर अनेकदा धर्माच्या इतिहासासंदर्भात मी करत असतो . शिवाय कोल्हापूर हे शहर प्रामुख्याने इतिहासात जाते त्यामुळे कोल्हापूरचा प्रभावही होताच 


त्याचवेळी घरामध्ये भविष्य पाहण्याची हजारो वर्षाची परंपरा होती आणि आहे. मी फक्त फलज्योतिषशास्त्रातून भविष्य विज्ञानाकडे झेप घेतली कारण प्रत्येक वेळी आपल्या मागच्या पिढीपेक्षा पुढे जाते भारतात फ्युचरॉलॉजी अजूनही प्रस्थापित झालेली नाही मात्र माझ्या घरातल्या वातावरणामुळे भविष्य विज्ञान माझ्या आयुष्याचे नैसर्गिक काम बनत गेले माझ्याकडे येणारे मोजके क्लाइंट हे भविष्य विज्ञानाचे असतात आणि ते मला बरे पैसे देतात विशेषतः परदेशातून येणारा ग्राहक हा तर मी दिलेल्या वेळेप्रमाणे पैसा देतो भारतीय लोकांच्याकडून मी पैसे घेत नाही कारण मला फक्त जगण्यापुरतेच पैसे लागतात . माझ्या भविष्य विज्ञानाच्या वेडामुळेच चौथी नवता वगैरे गोष्टी केंद्रस्थानी येत गेल्या मात्र पुढे कोल्हापूर मला मर्यादित वाटायला लागले आणि मी मुंबई गाठली. मला फेलोशिप मिळाले असल्यामुळे जगण्याचे प्रश्न सुरुवातीच्या काळामध्ये पडलेले नव्हते.


मुंबईत प्रायोगिक नाटकावर पीएचडी करत जगत असल्याने आधुनिकता उत्तर आधुनिकता यांच्या शोधात अनेक साठोत्तरी आणि तिला खोडण्यासाठी चौथ्या नवतेची समीक्षा आणि तत्त्वज्ञान मी वाचलेले आहे. भविष्य विज्ञानामुळे कोल्हापुरातच याची सुरुवात झाली होती पण मुंबईत पुस्तके मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने आणि मुख्य म्हणजे पीएचडी साठी लिखाण करत असल्याने आणि भविष्य विज्ञानामुळे परकीय लोकांशी संपर्क जास्त आल्याने जास्त नाही पण थोडे शिस्तबद्ध वाचन झाले आणि लेखन अधिक सोपे होत गेले त्या वेळच्या वाचनाच्या जीवावर मी आज सुद्धा नाट्यशास्त्र शिकवत असतो सगळे इजम म्हणजे नॅचरलीजम पासून पोस्ट मॉडर्निझम पर्यंत अनेक इजम शिकवत असतो आजही वर्गात बोलत असताना माझे संदर्भ फारसे चुकत नाहीत माझे विद्यार्थी एक वेळ गुगल चुकेल पण सर चुकणार नाहीत(गुगलच्या चुका मी अधून मधून दाखवत असतो ) असे म्हणतात तेव्हा मी निसर्गाचे आभार मानतो कारण निसर्गानेच मला ही स्मरणशक्ती दिलेली होती आणि अपघातांच्या नंतरही अजूनही थोडी शाबूत आहे 


मी माझी व्याख्याने नेहमी उत्स्फूर्त देत असतो प्रत्येक वर्षी विषय आणि अभ्यासक्रम सेम असून सुद्धा व्याख्याने वेगळी होतात कारण सर्व काही उत्स्फूर्त कारभार असतो मुख्य म्हणजे मी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर अवलंबून असतो शंकांच्यावर अवलंबून असते शंका वेगळी आणि नवीन आली की आपोआपच त्या विषयात माझ्याकडून भर पडली जाते ही व्याख्याने लिहून काढावी म्हणून खूप लोक मागे लागतात पण 2014 नंतर मला लिहायची फार दांडगी हाऊस उरलेली नाही अनेकदा तर कविता सुद्धा रेकॉर्ड करतो आता तर google मुळे आपोआपच इन्स्टंट छपाई आल्याने इन्स्टंट छापले जात असल्याने फार काही मेहनत करावी लागत नाही एका अर्थाने लिखाण सुटलेच. आता गुगलच्या साह्याने जे डिजिटल उमटवले जाते त्याला लिखाण म्हणावे का हा एक फार मोठा प्रश्न आहे . मला तर उमटवणे हाच शब्द हेच क्रियापद या लिखाणासाठी अधिक योग्य वाटते कारण इथे उच्चार उमटवला जातो . एका अर्थाने आपण लिहीत नाही आहोत उमटवत आहोत. पूर्वी हस्तलिखित आतील मजकूर पुन्हा टाईप करणे म्हणजे फार प्रॉब्लेम वाटायचा आता तो वाचला तरी आपोआप उमटतो त्यामुळे बराचसा वेळ वाचलेला आहे. 


2014 नंतर मात्र माझे सर्व लक्ष हे फक्त मोक्ष केंद्रित लिखाणाकडे आहे. या लिखाणा मधून आलेले 365 डेज विथ बॉडी हे राज योगा वरचे म्हणजेच योगतंत्रावरचे जोगतंत्रावरचे पुस्तक २०१५ स*** प्रकाशितही झाले आहे. इंग्लिश मध्ये असल्याने मराठी लोकांनी वाचलेले नाही अपवाद फक्त नितीन वाघ किंवा जवळचे लोक!


माझे संगीत चोरणे हे नेमके कधी सुरू झाले ते कोणाचे उद्दिष्ट झाले मला माहित नाही पण हॅकर्सनी माझा मोबाईल आणि कम्प्युटर हॅक केल्याने मला खूप ताप होत असतो अलीकडेच माझ्या मोबाईल वरचे सर्वच्या सर्व फोटो गायब करण्यात आले .पण त्यावर मात करत माझे काम चाललेले आहे.(सगळ्या अँटीव्हायरस अँप माझ्या या उदाहरणात फेल गेलेली आहेत . आता तर मी त्याचा विचार करायची जागा मी बंद केली कारण पैशाची नासाडी खूप झाली आता आणखी पैशाची नासाडी पेलायला माझ्याजवळ पैसे नाहीत )वडिलांनी वचन घेऊन एका अर्थाने मला चांगलेच जाळ्यात टाकले . असे वचन मी दिले नसते तर कदाचित माझे लिखाणच मी माझ्यापुरते ठेवले असते. संगीत आणि चित्र ह्या बाबत मी वचन दिलेले नाही त्यामुळे हे काम माझे माझ्या पुरते आहे मला काही त्यांचे प्रदर्शन मांडावे वाटत नाही फक्त मी आजारी पडलो की आजाराचे ट्रीटमेंटचे पैसे मिळवण्यासाठी अपवादात्मक वेळेला मी संगीत विकले आहे पूर्वी तर मी नाव सुद्धा टाकत नव्हतो धून विकायची आणि मोकळे व्हायचे ज्याच्या नावाने ती धुन व्हायची त्यांना मी अनेकदा भेटलेलो पण नाही किंवा कधी त्यांना वचन दिल्याप्रमाणे वाच्यताही केलेली नाही याचीही सुरुवात माझ्या वडिलांच्या किडनीच्या ऑपरेशनच्या वेळी झाली होती . 2014 नंतर संगीत विकणे बंद पडले कारण कळत नकळत आपण चोरीलाच उत्तेजन देतो असे मला वाटले भले मग ते कितीही प्रामाणिक असेल. विकणाऱ्या उत्पादकाचे नाव त्या उत्पादनावर असावे की नाही हा एक फार नैतिक प्रश्न आहे आणि तो अशा बाबतीत अधिकच गुंतागुंतीचा होतो मी माझी क्रिएटिव्हिटी कोणत्या टर्म्स अँड कंडिशनवर विकायची हा पूर्णपणे माझा प्रश्न आहे हा माझा युक्तिवाद होता. लिखाणामध्ये मुळातच अनेकदा संपादक दुसऱ्यांचे लिखाण संपादकीय म्हणून स्वतःच्या नावावर खपवत असतात तसेच हे आहे. संपादकांना स्वतःचे लेखन वापरायला देणे आणि संगीतकाराने स्वतःची धुन दुसरा संगीतकाराच्या नावाने वापरायला देणे यात फरक नाही 2014 नंतरच्या आजाराबाबतीत मी हे केले नाही आणि त्यामुळेच कधी नव्हे ते मला माझ्या मित्रांच्याकडून पैसे घ्यायची वेळ आली. 


चित्रकलेबाबतीत सुदैवाने अशी पाळी आली नाही . माझा डान्सही माझ्यापुरताच असतो माझी कोरिओग्राफी माझ्यापुरती असते चित्रपटाचे (यात जाहिरातींचे लेखन दिग्दर्शन येते)लेखन आणि दिग्दर्शन मात्र मी प्रोफेशनल पातळीवर ठेवलेले आहे कारण पोटापाण्यासाठी ते आवश्यक म्हणून मी निवडले आहे आणि लिखाणाबाबतीत चित्रपट लिखाणाचा समावेश लिखाणात होत असल्याने वडिलांना दिलेले वचन पाळावे लागते जर एकदा कदाचित एखाद्या चित्रपटाबाबत मी केवळ निखळ दिग्दर्शक झालो तर मी माझे नाव देईन का हा एक फार मोठा प्रश्न आहे अजून तरी तो उपस्थित झालेला नाही पण भविष्यात कधी ना कधीतरी हा उपस्थित होणारच आहे. त्यावेळी काय करायचे ते पाहून घेईन कदाचित लिखाण मी न केल्याने तिथे नाव टाकणार नाही . किंवा कदाचित पोटापाण्याचा प्रश्न आला तर टाकेनही. एका बाबतीत मी नेहमीच क्लिअर आहे ती बाब म्हणजे जर का एखाद्या व्यक्तीने क्रिएटिव्ह काम केले असेल तर तिला तिचे श्रेय दिलेच पाहिजे . सध्या मी ज्या प्रोजेक्टवर काम करतोय तो माझ्या काशी मधल्या एका मित्राच्या कथेवर आधारित आहे तर त्याचे श्रेय मी त्यालाच कथेमध्ये देतोय हा चित्रपट काशीवर आहे बनला तर ठीक नाही बनला तरी ठीक पण मी काम करतोय किंबहुना सर्व हिंदी लेखक मित्र हल्ली तूच बॉलीवूड मध्ये येऊन दिग्दर्शन कर निदान आमचे क्रेडिट व्यवस्थित शाबूत राहील म्हणून आग्रह धरत असतात बॉलीवूडमध्ये फुल टाइम काम करावे की नाही हा एक फार मोठा प्रश्न हल्ली माझ्यासमोर आहे त्याला कारण माझे हे हिंदी मित्र आहेत . यातील काही जण 1990 पासूनच मी साहित्य क्षेत्रात मराठीत लिखाण करू नये हिंदीतच लिखाण करावे म्हणून माझ्या मागे असतात. त्यांना मी सांगितले होते की किमान साठी गाठेपर्यंत मी हिंदीला मुख्य भाषा करणार नाही फक्त अपवाद चित्रपट टीव्ही मालिका आणि वेब मालिका पिक्चर कारण माहित नाही का पण मी हे करायला बसलो की लिखाण आपोआपच हिंदीतून येते मराठीतून येत नाही. अपवाद काही मराठी केंद्रित चित्रपट ! 


बॉलीवूड चित्रपटातील काही गोष्टींच्या बाबतीत सल्ले देऊन सुद्धा मला जेवण्यापुरते पैसे मिळतात जाहिरातीच्या बाबतीत कधी कधी आयडिया दिल्याने पैसे मिळतात (सर्वसाधारणपणे अडला xरी श्रीधरचे पाय धरी अशी ही स्थिती असते आणि सोल्युशन मागण्यासाठी लोक येतात सोलुशन घेऊन पैसे देतात) .भाडे देणे आवश्यक असेल तर भाडे देतात मुळातच माझ्या गरजा खूप मर्यादित आहेत . निर्व्यसनी असल्याने खर्च नाही . वास्तविक जुगार माझ्यावर प्रसन्न होता मला अनेकदा हमखास लॉटरीची तिकिटे लागलेली आहेत पण आयुष्यात मोक्षासाठी सर्वच व्यसने सोडताना लॉटरीचे तिकीट काढणेही सोडून दिले . माझे अनेक डॉक्टर मित्र हे कित्येकदा माझ्याकडून एक पैसा पण घेत नाहीत उलट मी त्यांच्या दवाखान्यात गेलो हॉस्पिटलमध्ये गेलो की सेलिब्रेशनच होते तेच मला खाऊ पिऊ घालतात . याचे कारण अर्थातच त्यातील बहुतेकांच्या बाबतीत आणि त्यांच्या मुलाबाळांच्या बाबतीत मी केलेली प्रेडिक्शन्स फार अचूक आलेली आहेत याचे कारण अर्थातच फ्लॅशेस आहेत त्यामुळे माझ्या स्वतःच्या आरोग्याचा फार अवाढव्य खर्च माझ्यावर पडला नाही डॉक्टर लोक जितके अध्यात्म विषयी अचूक प्रश्न विचारतात तितके इतर प्रोफेशनमधले लोक विचारत नाहीत हा माझा अनुभव आहे . माझ्या मोक्षावरच्या लिखाणामध्ये त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचा वाटा सर्वाधिक आहे. विज्ञानाच्या क्षेत्रातले लोक सुद्धा विशेषता प्राध्यापक लोक यामध्ये येतात. सामान्य लोकांचे मोक्ष विषयीचे प्रश्न अनेकदा मोक्ष विषयी असत नाहीत ते जगण्याविषयी असतात . किंवा मग त्यांच्या अंधश्रद्धा विषयी ! त्यांच्याबद्दल त्यांच्या अंधश्रद्धांच्याबद्दल आस्था दाखवत हळूहळू हे प्रश्न सोडवावे लागतात. शेवटी आपण सर्व माणसं आहोत हे आपल्या जगण्याचे बेसिक गृहीतक असले पाहिजे असे मला वाटते . लोकांची टिंगल टवाळी करायला मला आवडत नाही. त्यामुळेच वैयक्तिक पातळीवर मी सर्व धर्मांच्या अनेक गोष्टींना सन्मान देत आणि मग उलगडा करत वावरत असतो. लोकांना प्रेमाने समजावणे जास्त गरजेचे असते. लोक आपल्या दुःखाने खूप त्रस्त असतात . अशावेळी त्यांच्याशी अधिकाधिक प्रेमळ होणे हेच आवश्यक असते. 


मी पूर्वी म्हणायचो की मी लोक कवी आहे त्या मागची भूमिका इतकीच होती की आपण लोकांच्यात असलो पाहिजे दुर्दैवाने कलावंत लोक अनेकदा कला संस्कृतीतच वावरत असतात लोक म्हणजे कला संस्कृती नव्हे . लोक म्हणजे तुमच्या आसपास जगणारे वावरणारे लोक असतात. सामान्य माणसांना वगळणारा कुठलाही सांस्कृतिक प्रोजेक्ट मला कधीही मान्य नव्हता . आजही नाही. एकेकाळी कम्युनिस्ट व समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे फार चांगल्या रीतीने लोकांशी जोडले गेले होते आता मात्र दोघांचेही लोकांशी असलेले नाते तुटत चाललेले आहे याचा नेमका काय परिणाम होणार आहे हे सांगणे अवघड आहे.

मला वाचनासाठी अफाट वेळ माझ्या जीवनशैलीमुळेच मिळालेला आहे . त्यामुळे अनेक क्षेत्रात मी हिंडू शकतो . आता मात्र पूर्वीसारखे फास्ट वाचन होऊ शकत नाही कारण विषामुळे शरीराला अनेक साइड इफेक्ट प्राप्त झालेले आहेत . मी बेडवर असताना माझ्या विषयीच्या अनेक टिंगल आणि टवाळ्या केल्या गेल्या त्यात माझे काही फेसबुक फ्रेंड सुद्धा सामील होते . त्यांनी माझे मनोरंजन केल्याबद्दल त्यांचेही मी आभार मानलेले आहेत. मला शत्रू समजणारे माझ्या जगण्याला वजन देतात विशेषत: त्यांच्या तृष्णा ! मला नेहमीच त्या बघताना हसू येत असते . 

अर्थात मीही शारीरिक पातळीवर थकतो कधीकधी पण माझा चार्जर कोल्हापूर शहर आणि माझे गाव आहे . तिथे गेलो की मी फ्रेश होऊन येतो.

असो 

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे