धर्मेंद्र

 धर्मेंद्र :एका स्टड स्वप्नाचा अस्त श्रीधर तिळवे नाईक 

एखादा मनुष्य केवळ त्याच्या उपस्थितीने एखादी व्यक्ती रेखा न्यायगत करतो हे एक आश्चर्य असते पण हे अद्भुत एक ॲक्टिंगमधली कॅटेगिरी आहे जी बॉलीवूड मध्ये आणि हॉलीवुड मध्ये फंक्शनाल असते हिंदी त्याची सुरुवात देवानंद यांनी केली होती पण त्यांच्याजवळ stud बॉडी नव्हती जी धर्मेंद्र घेऊन आला .मराठीत फक्त रवींद्र महाजनी असे होते . नंतर अर्थातच आमच्या पिढीत सर्वजण असे झाले अगदी वरूण धवन सुद्धा बॉडी बनवून आला. 


जन्मजात अभिनयाचा दुष्काळ आणि नंतर अनुभवाने सतत प्रॅक्टिस करत मिळवलेला जेमतेम अभिनय अधिक उपस्थिती यांचे हे डेडली कॉम्बिनेशन असते ते काही व्यक्तिरेखांच्या बाबतीत अतिशय व्यवस्थित काम करते उदाहरणार्थ शोले मधला जय हा धर्मेंद्रलाच सर्वात साजेसा दिसतो यांच्या अभिनय शैलीला मी नेहमीच शैलीदार अभिनय म्हणतो म्हणजे शरीरशैली हीच अभिनय बनते आणि अनेकदा ही शैली व्यक्तिगत शैली असते आणि ही व्यक्तिगत शैली ते प्रत्येक व्यक्तीला देत राहतात आणि तरीही ती व्यक्तिरेखा व्यवस्थित उभे राहिली असे वाटते या स्कूल मधला सर्वात पहिला अभिनेता म्हणून मी नेहमीच देवानंद चा उल्लेख करतो त्याच्या आधी हॉलीवुड मध्ये ज्याची त्याने नक्कल मारली तो ग्रेगरी पेक होता. धर्मेंद्रचा असा आदर्श क्लिंट ईस्टवूड होता जरी त्याने आपण दिलीप कुमार यांच्या प्रभावाखाली आहोत असे सांगितले होते तरी तो त्या प्रभावाखाली राहिला नाही किंबहुना जोपर्यंत तो दिलीप कुमारचा प्रभावाखाली होता तोपर्यंत तो प्रभावी नव्हता आणि हळूहळू जेव्हा क्लिंट ईस्टवूड आधीक काही प्रमाणात दारासिंग यांच्याकडे सरकत गेला तेव्हा मात्र तो स्वतंत्र छाप उमटवू लागला. मात्र क्लींट ईस्ट वूड जसा हळूहळू अभिनय शिकत गेला आणि एक पट्टीचा अभिनेता बनला तसा धर्मेंद्र बनला नाही मात्र शून्यापासून मध्यम दर्जाच्या अभिनेत्यापर्यंत त्याचा प्रवास नक्कीच झाला (दारासिंग यांनी सुद्धा आनंद सारख्या चित्रपटात उत्तम अभिनय केला होता )तो पहिला ही मॅन होता देवानंद पासून सुरू झालेले हे शैलीदार अभिनयाचे पर्व ज्यामध्ये देवानंद हा नेहमीच देवानंद होता मग व्यक्तीरेखा कुठलीही असो त्याचप्रमाणे धर्मेंद्र हाही धर्मेंद्रच होता मात्र अभूतपूर्व स्क्रीन प्रेझेन्स असल्याने त्याला त्याच्या शरीर शैलीला साजेसा रोल मिळाला की तो धमाल करायचा या अंगाने शोले आणि चुपके चुपके हेच त्याचे सर्वश्रेष्ठ चित्रपट आहेत जेव्हा या स्कूल मधल्या त्याच्यापेक्षा अव्वल स्क्रीन प्रेझेंस त्याच्या समोर ठाकला तेव्हा त्याचे काही चालले नाही याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मेरा गाव मेरा देश मध्ये त्याच्यापुढे उभा ठाकलेला आणि त्याच्यापेक्षा सरस स्क्रीन प्रेझेन्स असलेला विनोद खन्ना होय. 


अभिनयात त्याला गती नव्हती आणि त्यामुळे नृत्याचा प्रश्न कधी आलाच नाही बागडण्याला नृत्य समजणाऱ्या लोकांना मला काय बोलायचे नाही पण एक मात्र खरे की धर्मेंद्र मध्ये एक लहान मूल दडलेले होते जे बागडण्यात निपुण होते त्यामुळे हे बागडणे सुद्धा नृत्य म्हणून खपून गेले किंबहुना त्याच्या आधी या स्कूलमध्ये जो निर्माण झाला होता तो दारासिंग या लहान मुलापासून वंचित होता त्याच्यात कायमच पैलवान होता धर्मेंद्र चे तसे झाले नाही याला कारण हे लहान मुलं होय अनेकदा तर तो रडायचा सुद्धा लहान मुलासारखा आणि त्याच्या त्या अभूतपूर्व स्क्रीन प्रेजेंसमुळे ते रडणे सुद्धा बाळबोध पण मस्त वाटायचे आमच्या पिढीत त्याच्या स्कूलमध्ये आलेला स्टार म्हणजे सलमान खान त्याने धर्मेंद्रचे स्कूल अतिशय पद्धतशीरपणे पुढे नेले मुख्य म्हणजे आपण काय करतो याची जाणीव धर्मेंद्रला जशी होती तशी सलमान खानला सुद्धा आहे किंबहुना अधिक खोलवर आहे सामान्य माणूस जसा नाचतो तसे नाचावे हे या स्कूलचे प्रमेय असल्याने आणि सलमान खान हा अधिक नृत्य प्रवीण असल्याने त्याला मग आपोआपच सनी देवल पेक्षा अधिक प्रसिद्धी मिळत गेली जो ताल धर्मेंद्र आणि सनिदेवल यांच्यात नाही तो सलमान खान मध्ये असल्याने साहजिकच सलमान खान हा अधिक उजवा होत गेला पण तो आपला या स्कूल मधला बाप कधीच विसरला नाही त्यामुळे त्याचे आणि धर्मेंद्रचे नाते कायमच चांगले राहिले हे नाते इतके चांगले होते की बॉबी देवल चे करिअर जेव्हा संकटात सापडले तेव्हा सलमान खान त्याच्या करिअर मागे ठामपणे उभा राहिला. त्याने त्याला इंडस्ट्रीमध्ये कमबॅक दिला .


धर्मेंद्र चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मर्दानगी ! छातीवरचे अतिशय आवश्यक आणि योग्य प्रमाणात असलेले केस, उत्कृष्ट मसल्स आणि रुबाबदार चाल यांचे धर्मेंद्र म्हणजे डेडली कॉम्बिनेशन होते ही जिमची बॉडी नव्हती तर ती तालमीची बॉडी होती आणि भारतीय लोकांना ती आवडली याचे कारण आम्ही जेव्हा तालमीत व्यायाम करायचो तेव्हा आम्हाला धर्मेंद्रची बॉडी आदर्श म्हणून शिकवली जात होती आपली बॉडी धर्मेंद्र सारखी बनली पाहिजे असे लहानपणी मला वाटायचे पुढे अर्थातच ब्रुसली माझा आदर्श झाला पण ते नंतर पण धर्मेंद्र हा प्राथमिक शाळे मधला आमचा बॉडी बिल्डिंगबाबतीत आदर्श होता असे म्हणायला हरकत नाही मला आठवते मेरा गाव मेरा देश यामध्ये धर्मेंद्र ने विनोद खन्नाला चांगले मारले की विनोद खन्नाने धर्मेंद्र ला चांगले मारले यावर माझ्या मित्रांशी माझे वाद झाले होते आणि माझी थोरली बहीण सुमंगला तिळवे नार्वेकर हिने विनोद खन्नाच्या बाजूने कौल दिल्यामुळे शेवटी आम्ही सर्व गल्लीवाले विनोद खन्नाच्या बाजूने थोडे कललो आणि त्याचेही पिक्चर पाहायला लागलो पुढेही अमर अकबर अँथोनी च्या वेळी विनोद खन्ना ने अमिताभ बच्चनला एवढे मारून सुद्धा एका डायलॉग ने बच्चन ने विनोद खन्नाला संपवले होते एक मारा लेकिन सॉलिड मारा ना हा आमचा लहानपणाचा आदर्श बनला शोलेमध्ये धर्मेंद्र पेक्षा आणि अमर अकबर अँथोनी मध्ये विनोद खन्ना पेक्षा अभिताभ सरस ठरला आणि सुपरस्टारडम त्याच्याकडे गेले 


अभिताभ बच्चन आणि विनोद खन्नाचा उदय झाल्यामुळेच कळत नकळत धर्मेंद्रला चाप बसला परंतु धर्मेंद्रच्या सुदैवाने अचानक विनोद खन्नाला रजनीश्यांच्या नादाला लागण्याची दुर्बुद्धी सुचली आणि पुन्हा एकदा धर्मेंद्र कमबॅक करून बसला 


धर्मेंद्रचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्या काळामध्ये त्याच्या समकालीन लोकांच्या मध्ये तोच एक असा होता ज्याची फायटिंग कन्वविनसिंग होती अर्थात इथेही त्याला नंतर विनोद खन्नानेच टक्कर दिली आणि अर्थातच मग नंतर आमच्या पिढीचा खरा नायक आला तो म्हणजे मिथुन चक्रवती तो स्वतःच मार्शल आर्ट्समध्ये प्रवीण असल्याने सुरक्षा चित्रपटांमध्ये त्याच्या फाईटस अत्यंत ऑथेंटिक बनत आल्या आणि आम्ही सगळे मिथुन चक्रवतीकडे वळलो शिवाय डान्समध्ये तो या दोघांचा बाप होता त्यामुळे सगळे गणितच बदलले याचवेळी कमल हसनने वेड लावलेच होते 


मिथुन चक्रवतीच्या मार्केट नंतर मात्र धर्मेंद्र आणि विनोद खन्ना दोन्हीही आऊटडेटेड वाटायला लागले नंतर तर जी पिढी आली ती मार्शल आर्ट शिकतच आली आमच्या पिढीचे वैशिष्ट्यच होते की ब्रुसलीच्या ड्रॅगन सिरीजनंतर आमच्यातला प्रत्येक जण मार्शल आटला जॉईन झाला अर्थात तालीम होती नाही असे नाही पण हनुमान तरुण मंडळापेक्षा आणि दिलबहार तालीम मंडळापेक्षा आम्हाला मार्शल आर्ट टेम्पल जास्त महत्त्वाचे वाटायला लागले .


अर्थात तोपर्यंत धर्मेंद्र हळूहळू ट्रान्सफॉर्म होत गेला आणि गजब मधला त्याचा डबल रोल आम्हाला आवडला त्याला या रोल साठी तरी किमान फिल्म फेअर मिळेल असे वाटले होते पण एकंदरीत त्याच्या आयुष्यात त्याला फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार मिळणेच लिहिलेले असावे . त्याला स्वतःला सत्य काम मधला रोल सर्वश्रेष्ठ वाटत होता आणि त्यासाठी पारितोषिक मिळेल असेही वाटत होते पण स्पष्ट सांगायचे तर हा रोल खूप काही ग्रेट नव्हता. त्याला फुल और पत्थर साठी जर पुरस्कार मिळाले असते तर ते चालले असते कारण या चित्रपटाने एक ट्रेंड सेट केला होता 


एका अर्थाने धर्मेंद्र Heman चे मॉडेल सेट करून गेला ज्याप्रमाणे दारासिंग याने हनुमान चे मॉडेल सेट केले होते त्याचप्रमाणे हेही मॉडेल सेट झाले सलमान खानने या दोन्ही स्कूलचा मिलाफ केलेला दिसतो 


धर्मेंद्रच्या कॉमिक सेन्सवर नेहमीच बोलले गेले आहे प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा हा कॉमिक सेन्स होता याबाबतीत तो नैसर्गिक गुणवत्ता घेऊन जन्माला होता याबद्दल काही शंका असू नये किंबहुना त्याची ही साईड अधिक एक्सप्लोर करता आली असती पण दुर्दैवाने ती झाली नाही अपवाद फक्त चुपके चुपके आणि शोले काही प्रमाणात प्रतिज्ञा ! त्याच्या सुदैवाने त्याला गाणी नेहमीच चांगली मिळाली कित्येक गाणे अशी आहेत की जी धर्मेंद्रच्या उपस्थितीशिवाय कल्पना करणे अशक्य होऊन बसते . आज मौसम बडा बेइमान है बडा सारखी गाणी सुद्धा धर्मेंद्रला शोभून दिसली अर्थातच काही गाणी मात्र केवळ धर्मेंद्र आणि धर्मेंद्रच करू शकतो अशी होती उदाहरणार्थ प्रतिज्ञा मधले मैं जट यमला पगला दिवाना किंवा रफ्तारफ्ता देखो 


धर्मेंद्र चे वैयक्तिक आयुष्य मात्र फार गुंतागुंतीचे होते . ते जसे फिल्मी मॅगीजिन मध्ये आलेले आहे तसे काही प्रमाणात होतेच पण त्यापेक्षा त्यात दुखावल्या गेलेल्या जागा खूप होत्या आणि त्या पर्सनल जागा होत्या आणि ज्यांना(ज्या मित्रांना ) त्या भोगाव्या लागल्या त्यांना मी वैयक्तिक पातळीवर भेटलेलो असल्याने मला त्या फार चांगल्या रीतीने माहिती आहेत. धर्मेंद्र-हेमा मालिनी - संजीव कुमार - जितेंद्र यांच्या लव स्टोरी वर अडा हॉ का बाना सुना नावाच्या कादंबरीमध्ये मी जे लिहायचे ते लिहिलेलेच आहे त्यातले तपशील अनेकांना त्यावेळी काल्पनिक वाटत होते पण आता ते खरे असल्याचे स्पष्ट होत चालले आहे मुळातच हेमामालिनी अभिनयामध्ये त्याची पार्टनर शोभावी अशीच होती आणि नेमकी तिचीही वैशिष्ट्ये धर्मेंद्र सारखीच आहेत म्हणजे सारख्याला सारखी भेटली म्हणजे स्क्रीन प्रेजेंस वगैरे मात्र तिच्याजवळ नृत्य नावाची एक अभूतपूर्व गोष्ट आहे किंबहुना तिच्या नृत्याचा याहून अधिक चांगला वापर करता आला असता तिचे धर्मेंद्रशी असलेले अफेअर गाजले आणि अलीकडे हेमामालिनी स्त्री मुक्तीचे सिम्बॉल बनत गेली मला स्वतःला आजतागायत कळालेले नाही की संजीव कुमार सारख्या माणसाने तिला लग्नानंतर अभिनय करता येईल अशी अनुमती का दिली नाही तशी अनुमती दिली गेली असती तर हे लग्न झाले असते परंतु इथेच धर्मेंद्र बाजी मारून गेला म्हणजेच खूप मॅच्युअर रोल करणारा मनुष्य पारंपारिक निघाला आणि ही मॅन धर्मेंद्र आधीक आडवांस आणि अधिक मोकळा निघाला रील आणि रियालिटी या दोन गोष्टी वेगळ्या असतात हेही इथे अंडरलाईन होते 


धर्मेंद्रच्या वैयक्तिक आयुष्यातली मला खटकणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याने काम या जीवनार्थ संदर्भात नात्यातील नैतिकता पाळली नाही . जेव्हा एखादा मित्र तुम्हाला तुमच्या घरात प्रवेश देतो तेव्हा तिथे काही संयम पाळायचा असतो हा संयम पाळला गेला नाही आणि कळत न कळत 1978 नंतर या सर्व गोष्टी इंडस्ट्रीत पुढे येत गेल्या आणि इंडस्ट्रीतला त्याच्याविषयी जो आदर होता तो कमी होत गेला. या फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा एक नैतिकता आहे आणि तिथे काही गोष्टी पाळाव्या लागतात अलीकडे अर्जुन कपूर ने या नैतिकतेची मर्यादा ओलांडली तर त्याचे संपूर्ण करियर फाफलत गेले . भारतीय लोकांना नैतिकतेच्या काही सीमारेषा व्यवस्थित माहिती आहेत आणि ते याबाबतीत कोणालाच क्षमा करत नाहीत धर्मेंद्रची सुद्धा लोकप्रियता यामुळेच घटत गेली . मित्राची बहीण मित्राची बायको ही बहीण म्हणूनच मानली पाहिजे मित्राची मुलगी ही आपली मुलगीच मानली पाहिजे अशी ही नैतिकता आहे मी स्वतः या नैतिकतेचा खंदा पुरस्कर्ता आहे आणि मी माझ्या आयुष्यात ती अत्यंत उग्रपणे आणि संयमाने पाळलेलीच आहे . 


मात्र इतर सर्व बाबतीत मात्र धर्मेंद्र हा एक उत्तम मनुष्य होता . त्याच्यासारखा दिलदार मनुष्य शोधणे कठीण ! राजेश खन्ना आणि धर्मेंद्र हे दोन असे अभिनेते होते ज्यांनी स्वतःच्या लोकांच्यासाठी काहीही केले असते. धर्मेंद्रच्या धनवान काळामध्ये त्याच्या घरी किती लोक जेवून जात याची गणती नसेल . पंजाब मधून आलेल्या प्रत्येक माणसाला जेवण कुठेही मिळाले नाही तर ते धर्मेंद्रच्या घरी मिळेल याची खात्री असायची त्यामुळे पंजाब मधली त्याची फॅनमेल कायमच टिकली . अनेकांना अडचणीच्या काळामध्ये धर्मेंद्रने मदत केलेली होती आणि मुख्य म्हणजे याची फारशी वाच्यतासुद्धा त्याने कधी केली नाही.


त्याच्यावर केलेले उपकार सुद्धा तो सहसा विसरायचा नाही . त्याच्या स्ट्रगलच्या काळात ज्या ज्या लोकांनी त्याला मदत केली त्या त्या सर्वांची मदत उपकार फेड करून त्याने केली अपवाद फक्त एक उदाहरण आहे पण त्यात सुद्धा धर्मेंद्रला ऍक्च्युली विसरच पडला होता त्यामुळे असे घडले होते आणि त्याला कळत नकळत त्या गोष्टीचा पश्चातापच होता बाकी मात्र अनेकांना त्याचे हात मुक्त हस्ते दान देत होते .


सेटवर रंगतदार वातावरण तयार करण्यात तो प्रवीण होता सतत पॉझिटिव्ह राहणे त्याला फार चांगले जमायचे. परिस्थितीशी कसे लढायचे हे त्याला फार व्यवस्थित माहीत होते आणि आपल्या मुलांना सुद्धा त्याने ते शिकवले . त्याच्या बायकोवर कळत नकळत अन्याय झाला हे खरे आहे पण जेव्हा त्रिकोण असतो तेव्हा अशा गोष्टी घडतातच . प्रकाशने हे प्रकरण अतिशय संयमाने आणि व्यवस्थित हाताळले यात काही शंका नाही. आता तर दोन्ही बायकांची मुले व्यवस्थित एक दुसऱ्याशी संबंध ठेवून आहेत त्यामुळे धर्मेंद्र गेला तेव्हा त्याने एक हॅपी फॅमिली क्रिएट केली होती असे म्हणता येते . 


धर्मेंद्र हा भारतीय स्त्रियांचे पहिले स्टडस्वप्न होता त्यामुळे त्यांच्या जाण्याने त्यांना अधिक वाईट वाटणे साहजिक आहे . त्याच्या चेहऱ्यावरचा दिलखुलास पणा आणि मनमोकळे हसणे हे कायमच प्रेक्षागृहामध्ये एक पॉझिटिव्ह फिलिंग देत राहायचे आणि तो जेव्हा कुत्ते कमिने म्हणायचा तेव्हा आपल्या गल्लीतले कुत्ते कमिने सुद्धा हा हादरणार अशी पब्लिकला खात्री होती .


त्याचे हे स्कूल आज सुद्धा सनि देवल , सलमान खान चालवतच राहतील अर्थातच या स्कूलमधील पुढच्या प्रत्येक अभिनेत्याला आता नृत्य शिकणे कंपल्सरी आहे जर का नृत्य शिकला नाही तर तुमचा अर्जुन रामपाल होणे अटळ आहे .


एक उमदा स्टारअभिनेता निघून गेला त्याला माझी आदरांजली ! 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे