संसार प्रणाली आणि भारतापुढचे समकालीन पेच श्रीधर तिळवे नाईक 

संसार प्रणाली म्हणजे संसाराचा जीवाला आलेला अनुभव संसाराचे जीवाला झालेले दर्शन आणि ज्ञान त्यामुळे जीवाचा संसाराकडे पाहण्याचा तयार झालेला दृष्टिकोन , विचार, आचार ,व्यवहार आणि दृष्टी होय . संसारप्रणाली नेहमीच माणसावर नियंत्रण ठेवत असते आणि या नियंत्रणातूनच स्वशासन अनुशासन प्रशासन निर्माण होत असते त्यातूनच तुमची विधी संहिता कायद्याची संहिता तयार होत असते अलीकडच्या भाषेत संविधान तयार होत असते त्यामुळेच संसार प्रणालीकडे खूप बारकाईने पहावे लागते 


संसार प्रणालीचे साधारण आत्तापर्यंत सहा प्रकार उदयाला आलेले आहेत 

१ अनुभव प्रणाली हे प्रामुख्याने अनुभवांच्यामुळे तयार होते आणि अनेकदा कला क्रीडा क्षेत्रामध्ये ती कार्यान्वित असते 

२ मोक्ष प्रणाली ही जीव आणि ब्रह्मांडाशी किंवा शिवांडाशी जोडलेली असते 

३ विज्ञान प्रणाली हे प्रामुख्याने जीव आणि वैज्ञानिक प्रत्यक्ष ज्ञानाशी निगडित असते

४ तंत्रज्ञान प्रणाली ही प्रामुख्याने जीव आणि प्रतिसृष्टीशी आणि प्रति वस्तूंशी निगडित असते

५ चिन्ह विज्ञान प्रणाली ही प्रामुख्याने जीव आणि प्रामुख्याने चिन्ह वस्तूंशी निगडित असते 

६ चिन्ह तंत्रज्ञान प्रणाली ही जीव आणि प्रतिचिन्ह वस्तूंशी निगडित असते 


यातल्या प्रत्येक प्रणालीचे दोन प्रकार होतात १ जीव प्रणाली २ जीवन प्रणाली जीवप्रणाली ही जीवकेंद्रित असते त्यामुळे ती कळत नकळत शरीर केंद्री ,पिंड केंद्री , व्यक्तीकेंद्री , अस्तित्व केंद्री , स्वजाल केंद्री बनत जाते त्या उलट जीवन प्रणाली ही संपूर्ण संसारातील आणि पृथ्वीवरील जीवनाचा विचार करीत असते आणि जीवन कसे चालले आहे त्या अंगाने संपूर्ण मांडणी करत असते त्यामुळे साहजिकच 

 १ भवतालकेंद्री २ शिवांड केंद्री ३ निसर्ग केंद्री ४ प्रतिसृष्टी केंद्री ५ चिन्ह सृष्टी केंद्री ६ प्रतिचिन्ह सृष्टी केंद्री असते यातील प्रतिचिन्हसृष्टी अजून पूर्णपणे जन्मलेली नाही आपण फक्त तिच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मार्फत शक्यताच चाचपतो आहोत 


यातली प्रत्येक संसार प्रणाली ही शेवटी शक्तीकडे आणि शक्ती मधून निर्माण होणाऱ्या सत्तेकडे वळत जाते आणि अंतिमता ती सत्ताप्रणाली राजकीय प्रणाली बनत जाते त्यातूनच भवताला मधून श्रद्धा प्रणाली ,शिवांडा मधून धम्म प्रणाली अथवा धर्मप्रणाली ,निसर्गामधून विचार प्रणाली, प्रतिसृष्टी मधून व्यवहार प्रणाली ,चिन्ह सृष्टी मधून जालनप्रणाली अशा राजकीय किंवा सत्ता प्रणाली उदयाला येतात आणि दुर्दैव आपले असे असते की त्याच आपल्यावर राज्य गाजवायला लागतात कारण त्या सत्तेच्या हव्यासामधूनच निर्माण होत असल्याने आणि प्रत्येक माणसाला सत्तेचे आकर्षण असल्याने साहजिकच त्यांचा सर्वाधिक पगडा बसतो त्यामुळेच मोक्ष बाजूला होतो आणि धर्म उदयाला येते विज्ञान बाजूला होते आणि विचार प्रणाली जास्त डॉमिनेट करायला लागते तंत्रज्ञान बाजूला होते आणि व्यवहाराचा आणि पैशाचा व्यवहार महत्त्वाचा ठरत जातो चिन्ह विज्ञान आणि चिन्ह तंत्रज्ञान बाजूला होते आणि कोण किती फेमस आहे आणि कोणाला किती लाईकस मिळाले हेच महत्त्वाचे होत जाते 


ज्याला आज आपण विज्ञान किंवा पुरोगामी काळ म्हणतो त्या कालखंडामध्ये विज्ञान प्रणाली मधून निर्माण झालेली जी सत्ता प्रणाली होती जिला विचार प्रणाली म्हणतात ती विचार प्रणाली ही प्रचंड प्रभावी होती सर्वसाधारणपणे आपणाला असे दिसते की या कालखंडामध्ये सर्वात प्रथम विज्ञान प्रणाली उदयाला आली आणि तिचा पाया रॉजर बेकन, माँटेग्यु, फ्रान्सिस बेकन यांनी घातला पुढे डेकार्टने तिला एक रूप दिले यातूनच ज्याला आज आपण विज्ञानाचे तत्त्वज्ञान म्हणतो ते उदयाला आले 

या विज्ञान प्रणालीच्या आधारे पुढे सर्व नव्या व्यवस्था उदयाला आलेल्या आहेत यातूनच जिला पुरोगामी ज्ञानव्यवस्था म्हणतात ती उदयाला आली आणि तिच्याच आधारे मग पुढे एक नवीन शिक्षण व्यवस्था उदयाला आली एक नवा अभ्यासक्रम उदयाला आला 


कुठल्याही ज्ञान प्रणालीला राजकीय सत्तेची मान्यता लागते किंवा किमान पाठिंबा लागतो आणि सत्तेला नेहमीच ज्ञान व्यवस्थेचा पाठिंबा लागतो कारण ज्ञान व्यवस्थेतील ज्ञानाशिवाय कायदे निर्माण करता येत नाहीत उदाहरणार्थ उत्तर आधुनिक विज्ञानामध्ये polygamy आणि पॉलीअँड्री या माणसाचा सहज स्वभाव आहे असे सिद्ध झाले साहजिकच भारतामध्ये या संदर्भात ताबडतोब क्रांती झाली आणि विवाहबाह्य संबंधांच्या आधारे सुद्धा जर मूल जन्माला आले असेल तर त्याला कायदेशीर अधिकार प्राप्त झाले इतकेच नव्हे तर व्यभिचाराला जी पूर्वी शिक्षा होती ती शिक्षा आता काढून घेण्यात आली हे उत्तर आधुनिक विज्ञानामुळे झालेले आहे.


पुरोगामी कालखंडामध्ये सुद्धा असेच घडलेले होते नवीन ज्या राजकीय सत्ता ज्ञान व्यवस्थेतून हळूहळू उदयाला आल्या त्यांना विज्ञानाची अत्यंत आवश्यक होती सुरुवातीला आवश्यक असणारा धर्मा विरोधातला ज्ञानाचा भाग या राजकीय सत्तांना धर्माविरोधात पाठिंबा देण्याचा ज्ञान शास्त्री विभाग त्यांना विज्ञानाने पुरवलेला आहे. साहजिकच सर्व युरोपमधल्या राजकीय सत्ता या एकाच वेळेला धर्म आणि विज्ञान यांना बॅलन्स करत सत्ता चालवताना दिसतात . स्वतःच्या सत्तेच्या सोयीने त्यांनी पाठिंबा घेतलेला आहे, दिलेला आहे आणि काढून पण घेतलेला आहे .


याबरोबरच साहजिकच एक उत्पादन प्रणाली उदयाला आली जिला आपण आज भांडवलशाही म्हणतो ॲडम स्मिथने तिची व्यवस्थित मांडणी केली आणि तिला छेद देण्यासाठी एक नवीन आर्थिक प्रणाली उदयाला आली जिला आपण समाजवाद म्हणतो आणि समाजवाद मूलतः उत्पादन प्रणाली असल्याने आणि शेवटी विचारप्रणाली असल्याने तो वाढत गेला आणि शेवटी समाजवादाचे रूपांतर शास्त्रीय समाजवाद किंवा कम्युनिजम मध्ये झाले अर्थातच हे रूपांतर सर्वच समाजवादी लोकांना मान्य नव्हते हे आपण लक्षात घेतले पाहिजे 


आपल्याकडे लोक ज्ञान प्रणाली आणि विचार प्रणाली यांच्यातला फरक समजून घेत नाहीत मार्क्सवाद हा काही नवीन ज्ञान विज्ञान सांगत नाही त्याचे नवीन ॲप्लिकेशन समाजाच्या अंगाने कसे करायचे यासंदर्भातली सत्ताबाज मांडणी करतो ही सत्ताबाज मांडणी थोडे समाजवादाने लोकशाही समाजवादाने ही केली.अर्थ केंद्रीय राजकीय विचार प्रणाली असे आपण त्यांना म्हणू शकतो त्यामुळेच ज्यांना ज्यांना सत्ता प्राप्त करायचे होती त्यांनी त्यांनी समाजवाद आणि मार्क्सवाद यांचा या काळामध्ये आधार घेतलेला दिसतो यामध्ये हिटलर पासून स्टॅलिन पर्यंत सर्व येतात .


पण हे सर्व अर्थशास्त्र पाशी थांबले नाही नंतर समाजशास्त्र उदयाला आले आणि यातूनच मग सामाजिक विचार प्रणालीचा उदय झाला हा प्रामुख्याने ऑगस्ट कॉमट याच्यामुळे निर्माण झाला 


म्हणजेच असे आपण म्हणू शकतो जर विचार प्रणाली ही राजकीय असेल सत्ता प्रणाली असेल तर मग तिचे 

१ अनुभवीक विचार प्रणाली ही प्रामुख्याने अनुभवांशी संबंधित असल्याने तिचा प्रभाव कला क्रीडा आणि धर्म यांच्यावर पडतो 

२ आर्थिक विचार प्रणाली ही प्रामुख्याने उत्पादन केंद्रीय असते 

३ राजकीय विचार प्रणाली कुठलेही नवीन उत्पादन सुरू झाले की राजकारण त्यामध्ये येतेच कारण त्या नवीन गोष्टीपासून सरकारला पैसा हवा असतो शासनाला पैसा हवा असतो त्याचे नियंत्रण हवे असते

४ सामाजिक विचारप्रणाली वरील तीन विचार प्रणाली मधून जे काही निर्माण होते त्यातून हळूहळू सामाजिक संस्था नव्याने उभ्या राहतात आणि त्यांचे विश्लेषण करणे गरजेचे वाटायला लागते म्हणजे विवाह ही संस्था कितीही पुरातन असली तरी प्रत्येक वेळेला संसार प्रणाली तिच्यामध्ये बदल घडवत आणते 

५ आणि या सगळ्याची सांगड घालणारी सांस्कृतिक विचारप्रणाली 

असे पाच प्रकार पडतात सांस्कृतिक विचार प्रणालीमध्ये संश्लेषण करण्याचा प्रयत्न केला जातो तर कधी कधी संस्कृतीच्या नावाने पुन्हा एकदा धर्म परततो परंपरा परत येते वामन परत येतो कारण बळी देणे घेणे गरजेचे भासायला लागते आपल्याकडे आलेला हिंदुत्ववाद हा धर्मकेंद्री सांस्कृतिक प्रणाली आहे 


आपण जर का पुरोगामी कालखंड बारकाईने पाहिला तर आपणाला असे दिसते की प्रत्येक विचार प्रणाली ही मुळातच विज्ञाननिष्ठ असल्याचा दावा करते कारण त्याशिवाय विचार प्रणाली ही धर्मापेक्षा वेगळी होऊ शकत नाही त्यामुळे अनेकदा पुरोगामी म्हटले जाणारे धर्म सुद्धा विज्ञाननिष्ठ असल्याचा दावा करत असतात किंवा जे आधीचे धर्म असतात ते सुद्धा आपण कसे विज्ञाननिष्ठ आहोत हे सांगायला लागतात प्रत्यक्षात या दाव्यांच्या मध्ये खरोखर काही तथ्य असते की नाही हे तपासणे वैज्ञानिक पातळीवर आवश्यक असते आणि हे जर का विज्ञानाने करणे टाळले की मग समाजात अंधश्रद्धा भोकाळायला लागतात . समाजाला भोके पडायला लागतात. आणि शेवटी समाज फाटतो .


पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कालखंडामध्ये आपण पुरोगामी वादाकडून आधुनिकतेकडे जाणे ठरवले होते परंतु आपला गाडा खरोखरच किती पुढे सरकला हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे कारण हिंदुत्ववादाचे झालेले आगमन . 


जेव्हा धर्म हा राजकीय विचार प्रणाली म्हणून उदयाला आला तेव्हा त्याच्या आधारे साम्राज्य निर्माण होणे हे नैसर्गिक होते आणि अशा प्रकारचे नैसर्गिक साम्राज्य प्रथम शैव लोकांनी निर्माण केले खरे परंतु नंतर बौद्ध लोकांनी हे साम्राज्य धार्मिक साम्राज्यवादाच्या आधारे खालसा केले पुढे मग वैष्णव लोकांनी बौद्ध साम्राज्याला रिप्लेस केले आणि या सर्व धार्मिक साम्राज्यांना शेवटी इस्लाम साम्राज्यवादाने रिप्लेस केले . इस्लाम हा एका अर्थाने धार्मिक कम्युनिजम आहे ज्याने सर्व उत्तम धर्मांचा नाश केला .


पुरोगामी कालखंड सुरू झाला तेव्हा काही लोकांना अशी आशा वाटली होती की पुरोगामी साम्राज्यवाद निर्माण होणार नाही परंतु प्रत्यक्षात तो युरोपियन लोकांनी निर्माण केला आणि धर्मापेक्षा वेगळा प्रकारचा साम्राज्यवाद विचारप्रणालींच्या मुळे निर्माण झाला किंबहुना साम्राज्यवाद हा शब्द त्यातूनच जास्त लोकाभिमुख होत गेलेला दिसतो. 


आधुनिकतेने मात्र कोल्ड वॉरच्या नावाखाली नवा साम्राज्यवाद उभा केला परंतु हा साम्राज्यवाद पुरोगामी छत्रछायेच्या खालीच राहिल्याने जगभर जी आधुनिकता पसरायला हवी होती ती पसरली नाही कारण आधुनिकतेची जी लढाई होती ती आधुनिकतेच्या दोन टोकांच्या मध्ये व्हायला हवी होती पण तसे झाले नाही कारण आधुनिकतेचा कालखंड जो कार्पोरेट केंद्र झाला होता तो ऍक्च्युली पुरोगामी साम्यवादाशी भांडत बसला म्हणजे एका अर्थाने हा लढा पारंपारिक अर्थशास्त्र आणि कार्पोरेट अर्थशास्त्र यांच्या मधला झाला कार्पोरेट वाद विरुद्ध साम्यवाद यांच्यातच झाला प्रत्यक्षात लढाई व्हायला हवी होती इंडस्ट्रियल पोस्टइंडस्ट्रियल कार्पोरेट वाद विरुद्ध सामाजिक कार्पोरेट वाद पण मुळातच अशा प्रकारचा सामाजिक कार्पोरेट वाद निर्माण करण्यामध्ये आधुनिकतेला आणि नंतर उत्तराधुनिकतेला कमालीचे अपयश आले मुळातच एनजीओ संस्कृती आली खरी परंतु ज्याला सामाजिक कार्पोरेट वाद म्हणता येईल असे काही निर्माण झाले का? तर ते झाले नाही अपवाद कदाचित असेल तर चीन असेल . प्रश्न असा आहे की चीनचे हे मॉडेल जगभर का पसरले नाही ? याचे साधे सरळ कारण खुद्द चीननेच असा प्रयत्न केला नाही . याचे कारण त्यांना सुद्धा फार उशीरा हे मॉडेल सुचलेले आहे साधारण 1972 नंतर हे मॉडेल आलेले आहे जगभरच्या कम्युनिस्ट लोकांनी जर का त्याचा नीट अभ्यास केला असता तर कदाचित फार मोठा फरक पडला असता. पण असे झाले नाही. भारताने निर्माण केलेला सहकार वाद हा कार्पोरेट वादाला उत्तम शह होता परंतु हा सहकारवाद व्याप्तीच्या बाबतीत खूपच कमी पडला अपवाद फक्त अमूल कोल्हापूरचा वारणा मुख्य म्हणजे शेतीमध्ये हा कार्पोरेट वाद आणता आला असता परंतु तो राजकीय लोकांच्या अडाणीपणामुळे आणता आला नाही . साखर कारखाने त्यामुळे डबघाईला आले नरेंद्र मोदी यांना नव्याने सहकार वादाचा विचार करावा लागेल . फक्त अंबानी अडाणी चालणार नाहीत किमान पक्षी राज्यपातळीवर तरी राज्यीय सामाजिक कार्पोरेटवाद निर्माण करता येईल का हे पाहिले पाहिजे आणि त्यानंतर मग राष्ट्रीय कार्पोरेट वाद कसा आणता येईल ते चाचपता येईल अन्यथा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विषमता निर्माण झालेली आहे ती नष्ट होणार नाही याचा थेट परिणाम अर्थशास्त्र कोसळण्यावर होणार आहे कारण नाही म्हटले तरी एक टक्के लोकांच्या हातात 40% किमान संपत्ती आहे काहींच्या मते ती 52% आहे इतकी विषमता वाढली असेल तर ते परवडणारे नाही कारण कुठलेही मॉडेल हे फक्त उत्पादकाच्या बाजूने चालत नाही तर ते खरेदी करणाऱ्या ग्राहकाच्या बाजूने सुद्धा चालत असते खरेदी करायला ग्राहक उरला नाही तर तुमचा बाजार फक्त एक टक्के लोकांच्या आधारे चालेल असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही भ्रमात आहात . त्यासाठी म्हणून खास भारतीय म्हणावे असे एक मॉडेल नेहरूंच्या काळापासून हळूहळू उदयाला आलेले असते आणि त्याच्यामुळेच अजूनही भारतीय अर्थशास्त्र टिकून आहे हे मॉडेल आहे नोकरदार लोकांचे . राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर असलेले सरकारी नोकर हे ग्राहक म्हणून उदयाला आणले जातात त्यांना त्याप्रमाणे वाढीव पगार दिले जातात (हल्ली आठवा वेतन आयोग) आणि मग हे ग्राहक लोक म्हणजेच साधारणपणे दोन करोड आपण धरले तर प्रत्येक ग्राहकाच्या मागे जर आपण एक फॅमिली धरली तर साधारणपणे दहा करोड आणि खाजगी क्षेत्रातले 10 करोड असे वीस करोड लोक भारतातली ग्राहकशाही चालवत असतात कार्पोरेट शाही आणि ही दहा टक्के लोकांची ग्राहक शाही यांच्या मधून मग बाजार तयार होत जातो आणि याने तयार केलेले मॉडेल हे आपल्याकडे राष्ट्रीय मॉडेल म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सादर केले जाते एक टक्का उत्पादक त्या उत्पादकांच्या हाताखाली काम करणारा एक मोठा प्रशासकीय वर्ग जो साधारणपणे असाच एक टक्का सरकारी नोकरांच्या सारखा असतो म्हणजेच साधारणपणे दहा टक्के लोकसंख्या खाजगी आणि 10% लोकसंख्या सरकारी असे म्हणून हे 20 टक्के लोकांचे मॉडेल असते आणि भारतात साधारणपणे 30 करोड लोक हे मॉडेल चालवत आहे ही एक छोटी अमेरिका आहे भारतातली आणि ती भारतातली अमेरिकाच भारतातली ही कार्पोरेट अर्थव्यवस्था जिवंत ठेवते परंतु त्याचा जो अनुषंगिक फायदा इतर 120 करोड लोकांना व्हायला पाहिजे तो होत नाही झालेला नाही आणि त्यामुळे सर्वात मोठी दरी निर्माण झालेली आहे याचे कारण सहकार कार्पोरेट वाद किंवा साम्यवादी कॉर्पोरेट वाद निर्माण करण्यामध्ये जी एक जागा असावी लागते ती जागा निर्माण करण्यामध्ये पूर्वी मनमोहन सिंग आणि आता मोदी यांना प्रचंड अपयश आलेले आहे सर्व काही आपल्या उद्योगपती मित्रांच्या नावाने केले म्हणजे असे मॉडेल उभे राहील हा जो त्यांचा अमेरिकन भ्रम आहे तो ओसरणे खूप आवश्यक आहे अन्यथा भारत हा अमेरिकेचा भाग नसून आशियाचा भाग आहे हे मोदी यांनी लक्षात घ्यावे अशा प्रकारची टीका मला करावी लागेल . आपल्याला आपले मॉडेल आपल्या लोकसंख्येनुसार करावे लागते उदाहरणार्थ भारतामध्ये ट्रॅफिक सिग्नल ची आवश्यकताच नाही आपल्याला तिथे आवश्यक असलेले मनुष्यबळ मोठ्या प्रमाणामध्ये असल्याने प्रत्येक सिग्नल वर तीन किंवा चार पोलीस पगारी ठेवले तर काम भागू शकते त्यामुळे त्यावर प्रचंड खर्च होणारी वीज वाचू शकते आणि ती इतरत्र वळवता येते उगाचच विजेचा खर्च का वाढवत बसलेलो आहोत बरं पुन्हा ट्रॅफिक पोलीस ठेवावेच लागतात त्यापेक्षा भारतातला ट्राफिक हा मेकॅनिकल कमी आहे तर तो अधिक ह्युमन आहे तर हा जो ह्यूमन ट्राफिक आहे त्याला कंट्रोल करायला ह्यूमन सिग्नलच हवेत तर मग तो व्यवस्थित जास्त चालेल परंतु लक्षात कोण घेतो कारण आपण इंडियन आहोत याचाच आपणाला विसर पडलेला आहे तिकडचं काहीतरी बघून यायचं आणि इकडे राबवायचं असला काहीतरी उद्योग मूर्खपणा चाललेला असतो . सिग्नल ही कन्सेप्ट त्यांच्याकडून आपण घेतली हे बरोबर आहे परंतु सिग्नल भारतीय पद्धतीने आपण राबवायला हवा यालाच मी ग्लोकलायझेशन ऑफ सिग्नल म्हणतो त्यामुळे बेकारी कमी होऊ शकते आणि विजेवर होणारा खर्च हा यांना पगार म्हणून कसा देता येईल ते पाहता येते . 


आपल्याकडे असलेल्या लोकसंख्येचा फायदा घेऊन कित्येक व्यवस्था या अशा ह्यूमन पद्धतीने चालवता येणे शक्य आहे. कारण मोदी यांनी मौन पाळले असले तरी भारतामध्ये या क्षणी 18% किमान बेकारी आहे हे लोक कामाला लावणे अत्यंत आवश्यक आहे पण हे घडत नाहीये . आणि याचे कारण मुळात साम्यवादाची वाटणारी भीती आहे पण साम्यवाद नेमका कशासाठी आला तर तो भांडवलशाहीतल्या विषमता वादामुळे आलेला आहे तर विषमता वादावर उपचार करणे हा साम्यवादाचा खरा प्रतिकार ठरतो पण ते करण्याऐवजी काहीतरी फालतू गोष्टी करत बसाल तर साम्यवाद येणार नाही परंतु विषमतावाद मात्र प्रचंड बोकाळत जाईल आणि ते परवडणारे नाही त्यात सामान्य माणसाचे भले नाही 


प्रत्येक घराला रेशन कार्डद्वारे अन्न पुरवणे हे एक उत्तम धोरण आहे याबद्दल मला शंका नाही पण ते काही मोदी यांनी आणलेले नाही ते नेहरूंच्या काळात सुरू झाले होते मात्र मोदींच्या काळात त्याची व्याप्ती किती वाढली हे खरे आहे पण या व्याप्तीचा किती फायदा झाला याचे वैज्ञानिक विश्लेषण होणे आवश्यक आहे मुळातच यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की ही उपाययोजना वितरण केंद्री आहे म्हणजेच एका अर्थाने साम्यवादाचेच एक वेगळे ढोबळ रूप आहे पण फक्त वितरणाने प्रश्न सुटत नाही इथे तो सुटल्यासारखा वाटतो कारण अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपल्याकडे अजूनही प्रचंड उत्पादन सुरू आहे मुबलकता आहे आणि अन्नधान्य संदर्भातला प्रश्न हा वितरणाचाच आहे त्यामुळे जास्तीत जास्त अन्नधान्य अडवत सडवत ठेवण्यापेक्षा ते गरिबांच्या पर्यंत पोहोचवावे हे योग्य आहे पण मुळात अजूनही स्टोरेज सिस्टीम मध्ये जर का कार्यक्षमता आली नाही तर हे कसे काय साधणार ? गांधीवादाच्या खादी ग्रामोद्योग केंद्रांना नव्याने कामाला लावून त्या मार्फत कपड्यांचे सुद्धा वितरण होऊ शकते का हे पाहिले पाहिजे सरकारने या लोकांच्याकडून कपडे विकत घ्यायला हवेत आणि रेशन कार्डवर प्रत्येक मेंबर मागे किमान दहा कपडे दरवर्षी द्यावेत याशिवाय म्हाडाच्या घर बांधण्याच्या योजना अधिक मोठ्या प्रमाणात यशस्वी आणि गरिबांना परवडणाऱ्या करणे गरजेचे आहे या सर्व योजना अलीकडे गरिबांच्या साठी राहिलेल्या नाहीत त्या गरिबांच्या साठी कशा होतील हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे हॉस्पिटलच्या बाबतीत अलीकडेच फडणवीस यांनी जे शेकडो आजार मोफत करण्यासंदर्भात पाऊल टाकले आहे ते महत्त्वाचे आहे मात्र ते कार्यक्षमतेने काम करेल हे पाहिले पाहिजे हीच गोष्ट शिक्षणाबाबत आहे तिकडे या सरकारचे प्रचंड दुर्लक्ष झालेले दिसते. शाळांच्या जागा काही झाल्या तरी कार्पोरेट वाल्यांना आणि बिल्डरांना देता कामा नये एवढे एक पथ्य तरी किमान या सरकारने पाळावे आणि तिथे मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा कशा कायमच्या ऍक्टिव्हेट राहतील हे पहावे . त्यांची कार्यक्षमता कशी वाढेल ते पहावे . मुख्य म्हणजे कार्यक्षम शिक्षकांचा अभाव हा सध्या फार मोठा प्रॉब्लेम या शाळांच्या मधून आहे तो कसा सोडवायचा हे पाहिले पाहिजे . 


विचार प्रणालींच्या कचाटत सापडण्यापेक्षा व्यवहार प्रणालींचा आधार घेत व्यवस्थापन कसे पुढे नेता येईल हे पाहणे आता खूप गरजेचे झालेले आहे मुळातच त्यासाठी विचार प्रणाली आणि व्यवहार प्रणाली या मधला फरक कळला पाहिजे आधुनिकतेने विचारप्रणाली सोडून दिल्या आणि व्यवहार प्रणाली स्वीकारल्या कारण व्यवहारात व्यवस्थापन आणि असतापण फार महत्त्वाचे असते त्यामुळे भाजपचा व्यवहारी दृष्टिकोन हा कायमच नवीन लोकांना आकर्षित करणारा ठरला परंतु प्रत्यक्ष व्यवहार वाद अजूनही यशस्वी झालेला नाही मुख्य म्हणजे तिथे भ्रष्ट लोकांना वाव देता कामा नये भाजपने हे केलेले आहे म्हणूनच आत्ताचे सर्व वांदे वाढलेले आहेत . आपण जर का स्वच्छ कारभार देण्याची हमी देत असू तर ती हमी प्रत्यक्ष दिसली पाहिजे माझे एक वैयक्तिक मत असे की शिक्षण खाते सद्गुरूंच्या कडे देऊन टाकावे कुठल्यातरी तथाकथित बुवाबाजी करणाऱ्या लोकांच्याकडे धोरण देऊ नये किंवा त्यांच्या आधारे धोरण ठेवू नये ठरवू नये .


नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांची सर्वात मोठी गोष्ट किंवा सर्वात मोठे योगदान कुठले असेल तर ते म्हणजे ते पहिले असे शासक होते ज्यांनी व्यवहार प्रणालीचा अत्यंत शास्त्रशुद्ध अभ्यास करून ती व्यवहारात आणली मोदी यांना पुन्हा एकदा यांचा अभ्यास करावा लागेल आणि मग देश पुढे न्यावा लागेल . त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांनी जे केले त्यातील व्यवहारी प्रणालीच्या चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत राजकीय पातळीवर टीका आम्ही समजू शकतो कारण निवडणूक जिंकण्यासाठी ती करावी लागते पण व्यवहाराच्या पातळीवर शत्रूचे सर्व चांगले आणि सर्वोत्तम आत्मसात करावे ते फायद्याचे असते 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे