सामाजिक कार्यकर्त्यांनी निराश होणे योग्य आहे का अर्थातच नीती राखण, नीती परिवर्तन, मेंदू परिवर्तन आणि कार्यजाल परिवर्तन १ श्रीधर तिळवे नाईक 


माझ्याकडे खूप लोक येत असतात आणि समाज कसा त्याच जागी थांबलाय हे सांगत असतात. अनेक विचारवंत त्याच अंगाने निराशा व्यक्त करत असतात . कार्यकर्ते तर हल्ली प्रचंड नैराश्यात गेलेत . मला वाटते की मुळात गोंधळ असा आहे की आपण जे काम करतो त्यामुळे अख्खा बदल होईल अशी काहीतरी गैरसमजुत झालेली आहे . सर्वात प्रथम ही गैरसमजुत काढावी 


जगण्याच्या ज्या पाच मूलभूत प्रेरणा आहेत ज्यांना मी पंचप्रेरण किंवा पंच प्रेरणा म्हणतो त्यातील एक पोषण , दुसरी प्रेरणा संरक्षण तिसरी संवर्धन चौथी प्रसरण पाचवी मृत्यू ही आहे .


आपले जे सामाजिक कार्य चाललेले असते ते सर्वात प्रथम नीती मूल्यांचे समाजामध्ये पोषण व्हावे म्हणून चाललेले असते. त्यामुळे समाजामध्ये थोडाफार नैतिक मूल्यांचा आधार टिकतो त्याचे पोषण होते. अन्यथा माणसात आणि पशु मध्ये फरकच राहणार नाही त्यामुळे आपण यात सर्वात प्रथम आनंद मानला पाहिजे की आपण पशुमानवाला पशु होऊ देत नाही त्याला निदान मानव पातळीवर पोषित करतो . या मानवाचे पोषण करतो . मग यदा कदाचित थोडेफार यश मिळते ते म्हणजे नीती मूल्याचे रक्षण आपण करतो . आपण सामाजिक कार्य करतो म्हणजे आपण नीती मूल्यांचे रक्षण करतो म्हणजेच एका अर्थाने आपण समाज टिकवतो व्यवस्था टिकवतो कायदा टिकवतो पोलीस व्यवस्था टिकवतो . आपण जर का हे सामाजिक काम केले नाही तर नीती मूल्यांचे संरक्षणच होणार नाही. तेव्हा आपण आपला आनंद या गोष्टीत वाढवून घ्यावा की आपल्यामुळे समाज समाज म्हणून टिकून आहे समाजातली नैतिकता थोडीफार का होईना पण टिकून आहे म्हणजे निदान हा मनुष्य जो पशु आलेला नाही चांगला मनुष्य होण्याचा प्रयत्न करतो आहे तो आपण टिकवतो. अन्यथा अवस्था अशी आहे की माणसाच्या सगळ्या पाशवी प्रेरणा त्याला रसातळाला न्यायला नेहमी तयार असतात .


त्यामुळे ज्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण आपल्या सामाजिक कार्याद्वारे साधत असतो त्याचा आनंद घ्या. ते आपणच आहोत ज्यांच्यामुळे मानवजात पशु न होता टिकली आहे मुख्य म्हणजे संस्कृती टिकलेली आहे .


आपल्याला अपयश लागते ते नंतरच्या तीन पातळ्यांच्या वर ! पण तिसऱ्या पायरीवर आपण नीती मूल्यांचे संवर्धन करणारी काही आपल्या आसपासची माणसे तयार करतो . एका पिढीतील एक अंश तयार करतो जो या नैतिक मूल्यांचे संवर्धन पुढे घेऊन जातो. सामाजिक कार्यकर्ते पुढच्या पिढीतील सामाजिक नैतिक कार्यकर्त्यांना तयार करत जातात . इथे आपल्याला मिळालेले यश हे अर्धे आहे पण ते आहे हे लक्षात घेतले पाहिजे. 


आपले खरे अपयश नंतरच्या दोन पातळ्यांच्या वर येते. या दोन पातळ्या म्हणजे प्रसरण आणि मृत्यू. चांगल्या माणसांची नैतिक माणसांची संख्या समाजामध्ये जितकी वाढायला हवी तितकी वाढत नाही या संख्येचे प्रसरणच होत नाही . आपल्याला अपेक्षा अशी असते की सर्वच माणसांच्या मध्ये नैतिक मूल्यांचे प्रसारण व्हावे परंतु प्रत्यक्षात सर्वच माणसे नैतिक प्रसारणाला स्वीकारत नाहीत . इथे आपल्याला खरे अपयश भेटते .


आपले दुसरे अपयश असते ते म्हणजे अनैतिकतेचा जो मृत्यू घडवून आपण आणला पाहिजे तो आपण घडवून आणू शकत नाही. उलट प्रत्येक पिढीला या अनैतिकतेची आणि ती अनैतिकता कॅरी औट करणाऱ्या गुंडांची समाज दांडग्यांची, अनैतिक राजकारणी लोकांची ,भ्रष्टाचारी लोकांची फार मोठी संख्या पिढ्यान पिढ्या भेटत राहते आणि लढा कायमच अपुरा राहतो. याला कारण मुळातच माणूस हा पशु आहे आणि त्याला पशु म्हणून अनेक आसक्त्या आहेत . भूक, तृष्णा ,निकड यांनी तो असा लडबडून गेलेला आहे की त्यांच्यातून त्याला बाहेर पडता येत नाही . यांच्या चिखलात तो लोळतो आहे . त्यामुळे समाज संपूर्ण नैतिक होतच नाही .


प्रश्न असा आहे कि त्यासाठी आपण निराश का व्हावे शेवटी पशू ला इतके माणसाळत ठेवले हे सुद्धा यश नाही का ?


तेव्हा निराश होऊ नका जो काही समाज आहे तो सामाजिक कार्यकर्त्यांच्या मुळेच आहे . अन्यथा भ्रष्ट नालायक आणि नीच लोकांनी त्याचे रूपांतर कधीच संपूर्ण जंगलात केले असते . अजून तरी समाजाचे जंगल झालेले नाही मात्र समाजात वावरताना हे जंगल सतत आपल्याला स्पर्श करत असते आणि आपल्याला त्यामुळे निराशा येते . तर निराश व्हायचं नाही त्यापेक्षा आपण समाज टिकवला ह्याचे श्रेय घ्यायचे.


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे