संगीत तंत्र आणि मोक्ष

 संगीत तंत्र आणि मोक्ष श्रीधर तिळवे नाईक


संगीताविषयी ज्याला प्रेम नाही त्याला पशु म्हणावे असे म्हटले जाते प्रत्यक्षात पशुंना सुद्धा संगीताचे भान असते ते सोडून द्या परंतु ज्याने ते लिहिले त्याला बहुदा पशुंना सुद्धा संगीताचे भान असते हे माहित नसावे 


साहजिक संगीताचा विचार फार आदीम काळापासून सुरू आहे मोक्षाच्या संदर्भामध्ये संगीत हे फार महत्त्वाचे कारण नृत्य आणि संगीताच्या सहाय्याने मोक्ष मिळवता येण्याजोगीची तंत्रे आहेत त्यांची संख्या 10 आहे साहजिकच प्रत्येक आचार्याला यासंदर्भात विचार करावाच लागतो किंबहुना ज्याला हा विचार करता येत नाही त्याला आचार्य होण्याचा अधिकार आहे की नाही याबद्दल शंका आहे 


या सर्व तंत्रांच्या मुळाशी मुळात तीन गोष्टी बेसिक आहेत त्या 

म्हणजे पहिली लय दुसरे ताल आणि तिसरा प्राण जेव्हा या तीन गोष्टी एकजीव होतात तेव्हा संगीताची साधना मोक्ष म्हणून सुरू होते आणि जेव्हा हे सर्व शून्यात विलीन होऊन जाते तेव्हा मोक्ष मिळतो एकेकाळी असे कलावंत होते पण दुर्दैवाने पुरोगामी कालखंडात ते नामशेष होत गेले आणि ज्यांनी मोक्ष मिळवला त्यांनी आपल्या मागे यासंदर्भात काहीच न ठेवल्याने प्रचंड मोठा अभाव संगीताच्या क्षेत्रात निर्माण झाला आजही तो जाणवत असतो काही प्रमाणात किशोर आमोणकर यांनी यासंदर्भात काही प्रयत्न केले होते परंतु हे प्रयत्नही प्रयत्न राहिले कारण परंपरेचा सर्वनाश झाला होता तरीही त्यांनी श्रुती विचारापर्यंत मजल मारलीच त्यांना मोक्ष मिळाला नाही परंतु एक दैवी स्पर्श त्यांच्या संगीतामध्ये अवतरला जो आपणाला जाणवत राहतो हीच गोष्ट लता मंगेशकर यांचा आहे त्यांना तर ही जन्मजात देणगी मिळालेली आहे आज सुद्धा त्यांच्या आसपास कोणी नाही यामध्ये मुळात असा गोंधळ झाला की चौदाव्या शतकानंतर भारतीय संगीत हे इस्लामच्या ताब्यात गेले आणि साहजिकच पंडित उस्ताद झाले पंडित आणि उस्ताद यांच्यातला फरक हाच होता की पंडितांचा मोक्षावर विश्वास होता आणि उस्ताद लोकांचा मोक्षावर विश्वास नव्हता ते इस्लामिक परंपरेला धरून आपले संगीत सादर करत होते जे धर्माशी जास्त संबंधित होते विशेषता इबादत म्हणजेच भक्ती 


साहजिकच भाव उपायामध्ये संगीताचे क्षेत्र अधिक कार्यान्वित झाले किंवा मग इतर उपायांच्या मध्ये ते कार्यान्वित झाले असेल तर त्याचे पुरावे शिल्लक राहिले नाहीत ते इबादत वाल्यांनी शिल्लक ठेवले नाहीत 


 पुढे पुढे मोक्षतंत्रांच्या संदर्भात लय प्रधान संगीत आणि ताल प्रधान संगीत असे दोन प्रकार पडत गेले अपवादात्मक वेळेला प्राणप्रधान संगीत काही जणांनी व्यक्त केले पण कुमार गंधर्वांचा अपवाद वगळता फार थोडे लोक तिथपर्यंत गेले याबाबतीत अल्लारखाना मिळालेले यश सुद्धा फार महत्त्वाचे होते आणि त्यामुळे साहजिकच झाकीर हुसेन हे त्या दिशेने जाणे अटळ होते संगीतानेच इस्लाम मधली मोक्ष परंपरा सुफियाना नावाने जिवंत ठेवली झाकीर हुसेन यांच्यावर याचा कितपत प्रभाव पडला आहे याचा विचार करावा लागेल मात्र ते आधुनिकतेच्या अंगाने विचार करत होते हे नक्की आहे ते जेव्हा ड्रम कडे वळले तेव्हा त्यांच्यामध्ये फ्युजन चा विचार ऍक्टिव्हेट झाला जरी ते अमेरिकेतून परतले तरी या संदर्भात मग वेगवेगळे प्रयोग होत राहिले 


प्राण संगीतामध्ये लय आणि ताल यांच्या पलीकडे जाऊन थेट प्राणातून गाण्याचा प्रयत्न केला जातो आणि प्राण हे तत्व नेहमीच फ्लो मध्ये असते त्यामुळे साहजिकच प्राण आणि फ्लो यांना प्रमाण मानत ज्याची गायकी सादर होते तो मोठा कलावंत होत जातो मग तो लयप्रधान असो की ताल प्रधान असो अर्थात यामध्ये वेगळा विचार सुद्धा झालेला आहे म्हणजे काही लोक ताल हा लयच आहे असे सुद्धा मानतात ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही पण ही शक्यता सुद्धा जोपर्यंत प्राणातून येत नाही तोपर्यंत ती एका सरफेस लेवललाच वावरायला लागते झाकीर हुसेन यांचे वैशिष्ट्य असे होते की ते या सरफेस मधून निसटून खोलात जायला नेहमीच धडपडायचे आणि कधीकधी अचानक त्यांची एखादी जागा थेट तळ गाठायची भारतातील खरे तर ज्यांनी संगीत आधुनिक बनवले त्यातले ते एक पायोनियर होते त्यांनी ताल आधुनिक बनवला आणि तालाचा विचार पुन्हा एकदा करणे भाग पाडले 


ताल हा संपूर्ण विश्वामध्ये असतो आणि प्रत्येक वस्तूला एक ताल असतो असे आपली परंपरा मानते आणि त्यामध्ये बरेचसे तथ्य आहे पण त्याचबरोबर हेही खरे आहे की प्रत्येक वस्तूला सुद्धा एक लय असते मला स्वतःला व्यक्तिशः असे वाटते की लय ही कळत नकळत अवकाशाच्या अंगाने जाते आणि ताल हा कळत नकळत काळाच्या अंगाने जातो त्यामुळेच जेव्हा एखादी व्यक्ती तबला वाजवत असते तेव्हा ती अनेकदा गणिती बनू शकते कारण काळ हा असा आहे की जो गणिती बनू शकतो साहजिकच या अंगाने झाकीर हुसेन यांनी विचार केलेला होता आणि त्यातूनच मग अनेक वस्तूंचे आवाज साजरे आणि सादर करणे त्यांना जमून गेले अर्थात त्यामागे त्यांचे भाऊ मुळात होते त्यांनी सुरुवात केली होती असे म्हणतात हे वेगवेगळे आवाज का काढले जात होते तर त्यामागे एक बेसिक होते की प्रत्येक वस्तू तबल्यातून सादर होऊ शकते हे कळत नकळत आधुनिक कानांना वस्तूंच्या ऑडिओ मधून पटवणे गरजेचे वाटत होते अर्थात काही लोकांना हे फक्त कर्मकांड वा आजच्या भाषेत मिमस वाटले पण प्रत्यक्षात तसे नव्हते यामागचा उद्देशच ताल प्रत्येक वस्तूचा आहे तर मग प्रत्येक वस्तू तालातून सादर केली पाहिजे हा विचार आहे जर मी रेल्वेच्या आगगाडीचा आवाज तालातून काढू शकलो तर मग मी खरा कलावंत अशीही यामागे धारणा आहे ही काही मिमिक्री नव्हे तर या सगळ्या मागे जो विचार आहे तो हाच आहे की प्रत्येक वस्तूला लय असते किंवा ताल असते किंवा आवाज असतो आणि तो मी जर काय वाद्यातून सादर करू शकत असेल तर हे मी अधिक सहजपणाने कम्युनिकेट करू शकतो 


आधुनिकतेने सर्वात महत्त्वाची गोष्ट काही केली असेल तर ती म्हणजे पुरोगामी लोकांनी प्रस्थापित केलेली घराणे पद्धत मोडून काढली ही घराणे पद्धत पुरोगामी वादाने जरी लवचिक केली होती तरी ती मोडून काढणे त्यांना जमले नव्हते ते काम आधुनिक संगीताने केले आणि त्याची सुरुवात प्रामुख्याने कुमार गंधर्वांच्या मुळे झाली होती झाकीर हुसेन हे लहानपणीच आपल्या वडिलांच्या घराण्यातून बाहेर जाऊन चाचपचाचणी करतच होते त्यामुळेच ते केवळ एका घराण्याचे होते असे म्हणता येत नाही मिश्र राग पुरोगामी परंपरेतच सुरू झाले होते म्हणजे बसंत बहार हा राग तो बसंत आणि बहार या दोन्ही रागांचे फ्युजन होते हा बदल घडवण्यामध्ये फिल्मी संगीताचा वाटा किती असा आपण प्रश्न खरे तर विचारायला हवा कारण याचे श्रेय फिल्मी संगीतालाच जाते कारण फिल्मी संगीतकारांनी अनेकदा हा उद्योग केला साहजिकच त्याचा प्रभाव क्लासिकल वर पडला अर्थात संगीतात काही चमत्कारही ओपी नय्यर यांच्यासारख्या लोकांनी केले म्हणजे एकाच रागात फागुंन चित्रपटाची सारी गाणी कंपोज करणे पण हे करताना त्याने ऑर्केस्ट्रेशन मात्र पूर्णपणे आधुनिक पद्धतीने केले चित्रपट संगीताने आणलेल्या या दबावामुळेच संगीतातल्या क्लासिकल लोकांना सुद्धा स्वतःला बदलणे भाग पाडले 


झाकीर हुसेन यांनी त्यामुळे संगीतात चित्रपटात काम केले याचे आश्चर्य वाटत नाही कारण त्यांच्या पिढीमध्ये आता वातावरण खुले झाले होते किंबहुना रविशंकर यांच्यापासून अनेकांनी हे काम केलेले आहे आणि सत्यजित रे सारखे काही लोक यांना व्यवस्थित आपल्या चित्रपटाचा भाग म्हणून क्रिएटिव्ह पार्ट म्हणून संगीत वापरत होते


त्यामागे एक वस्तुस्थिती अशीच होती की अवकाशामध्ये फक्त व्हिडिओ असत नाही तर ऑडिओ असतो आणि हा ऑडिओ संगीताच्या मार्फत आणि नटांच्या आवाजामार्फत व्यक्त करावा लागतो व्ही शांताराम गुरुदत्त ऋत्विज घटक सत्यजित रे यांच्यासारख्या अनेक दिग्दर्शकांनी याबाबतीत प्रचंड बारकाईने कामं केलेली दिसतात त्यांना सुदैवांने चित्रपट माध्यम कळणारे संगीतकार पण भेटले हे खूप आवश्यक असते यासंदर्भात काही अडाणी लोकांना मी बघितलेले आहे म्हणून हे आवर्जून सांगावे लागते साहजिकच जाकीर हुसेन चित्रपटांमध्ये जास्त कम्फर्टेबल होत गेले यात मला मुळीच आश्चर्य वाटत नाही अर्थात संपूर्ण कम्फर्टेबल होणे हे कुठल्याही कलावंताला होणे शक्य नाही याचे कारण शेवटी चित्रपट ही कला त्याच्या नावाने लागत नाही अपवाद फक्त गाणी! 


प्रश्न त्यामुळे कलावंतांच्या संदर्भात हाच येतो की तो कलावंत लय प्रधान आहे की ताल प्रधान आहे यासाठी आमची कसोटी अशी असते की एखाद्या नवख्या कलावंताला नेहमीच एखादे क्लासिकल नृत्य शिकायला पाठवणे तिथे जर का त्याचा संपूर्ण देह नाचायला शिकला तर आम्ही समजतो की त्याला ताल कळतो आणि ताल त्याच्या अंगात आहे जर हा ताल त्याच्या अंगात आहे असे वाटले आणि जर त्यालाही वाटले की त्याचे संपूर्ण शरीर ताल प्रधान आहे तर मग त्याला आम्ही सांगतो की तू तालाच्या अंगानेच मोक्षाला जा आणि एकदा तुम्ही ताल ऐकायला शिकला की कुठल्याही सिच्युएशन मध्ये प्रसंगांमध्ये लोकांच्या आवाजात ताल ऐकायला लागता त्या प्रसंगातला आसपासचा सगळा ताल ऐकायला लागता आणि मग तुमच्यासाठी असे सगळे प्रसंग तुमच्या क्रिएटिव्ह प्रोसेसचे भाग होत जातात आणि तुम्ही हळूहळू त्या संदर्भात जोडल्या गेलेल्या भुका, तहान आणि निकडी यांच्यातून मुक्त होत जाता अन्यथा तुम्ही फक्त निकडी पोटी डिमांड आणि सप्लाय हे गणित सांभाळत बसता भारतातल्या अनेक संगीतकाराने असे कमर्शियालायझेशन कमावलेले आहे असे लोक मोक्षाच्या दिशेने जाऊ शकत नाही कला संगीताच्या संदर्भामध्ये नेहमीच प्राणाच्या आत न्यावी लागते त्याशिवाय फ्लो साधतच नाही या साधनेत प्राणापर्यंत पोहोचणे खूप आवश्यक असते किंबहुना प्राण ताल झाला पाहिजे किंवा प्राण लय झाला पाहिजे अर्थात हे तालावर नृत्य करणाऱ्या नर्तकाला सुद्धा लागू पडते तिथे लय नसतेच अनेकदा तालच असतो जो लयीशी एकजीव झालेला असतो मराठीत लय झालं म्हणजे जास्ती झालं अशा अर्थाने वाक्प्रचार आहे त्याचे मूळ ह्या संगीतात आहे लय भारी हा शब्द त्याचा विस्तार आहे लयाने भारून टाकणारी जी गोष्ट असते ती लय भारी असते अशा वाकप्रयोगांमधूनच सामान्य माणसं सुद्धा फार संगीताच्या जवळ असलेली कळतं दुर्दैवाने आपण आपली भाषा नीट ऐकत नाही 


भारतामध्ये आता उत्तराधुनिक संगीताचा हायदोस चालू आहे हाय डोस चालू आहे तिथे मोक्ष जवळजवळ मिसिंगच आहे त्यामुळे चर्चा काय करणार पण आधुनिक लोकांना मात्र मोक्ष साधता आला नसेल पण त्यांना किमान यासंदर्भात काही जाणीव होती एक चलन वलन होते 


माझा स्वतःचा संगीताशी संबंध फार गुंतागुंतीचा होता माझ्या वडिलांना संगीत आणि चित्रकला दोन्हीही येत होत्या पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तरी देखील त्यांनी मला चित्रपट शिकवला परंतु चित्रकला शिकवायला नकार दिला संगीत शिकवायला नकार दिला हे खरंतर आश्चर्यकारक आहे परंतु माझ्या आयुष्यात हे घडले मला नेहमीच प्रश्न पडतो की समजा मला हे बालपणापासूनच देण्यात आले असते तर मी काही वेगळा झालो असतो का ? शक्यता नाकारता येत नाही पण एक गोष्ट मात्र मला नेहमी वाटते ती म्हणजे संगीत असो चित्रकला असो मी शेवटी मोक्षाकडेच वळलो असतो


माझ्या वडिलांनी या गोष्टी दिल्या नाही तरी माझ्या घराण्यात मात्र त्या कायमच वावरत होत्या आणि आजही त्या वावरत आहेतच अर्थात माझ्या घरात माझ्यापेक्षा बुलंद असणारे अनेक लोक आहेत उदाहरणार्थ दीपक तिळवे हा तबल्याचा जबरदस्त खेळाडू आमच्या घरात आहे माझा स्वतःचा भाऊ भारत तिळवें उत्तम तबलावादक होऊ शकला असता पण दुर्दैवाने त्याच्या हातात तबला न देऊन माझ्या वडिलांनी फार मोठी घोडचूक केली असे मला वाटते आम्ही कलावंत बनू नये कारण त्यामध्ये ससेहोलपट होते असे त्यांचे ठाम मत होते पण प्रत्यक्षामध्ये काही गोंधळ झालेच अर्थात हे कौटुंबिक गोंधळ होते माझ्या बहिणींना सुद्धा नृत्याची अतिशय आवड होती परंतु कोल्हापुरातल्या काही सरंजामवादी लोकांच्यामुळे माझ्या थोरल्या बहिणीचेसुद्धा नृत्य त्यांनी बंद केले 


असे असूनही प्रत्यक्षात जे मिळत नाही ते कधी कधी स्वप्नात मिळते असे म्हणतात तसे माझ्या बाबतीत झाले म्हणजे अगदी जेव्हा मी उनाड आणि वांड होतो तेव्हाही मला संगीत स्वप्नात दिसत होते त्याचा नेमका अर्थ मला त्या काळात कळत नव्हता पण साधारण वयाच्या दहाव्या वर्षी मी स्वप्नात बंदिशी ऐकतोय याची मला जाणीव यायला लागली ज्या मी कधी आयुष्यात प्रत्यक्षात ऐकल्याच नव्हत्या पुढे पुढे हातात तलवार असताना सुद्धा संगीत ऐकणे असा प्रकार मी केलेला आहे नंतर एक विचित्र गोष्ट मी स्वप्नात करायला लागलो ती म्हणजे लता मंगेशकर यांचा आवाज आणि पाश्चात्त्य देशातल्या बंदिशी ज्या मी कधीच ऐकल्या नव्हत्या त्या माझ्या स्वप्नात फ्युजन म्हणून उगवायला लागल्या आणि चक्क लताबाई पाश्चात्त्य संगीत माझ्या स्वप्नात गायला लागल्या साहजिकच याविषयी मी मौन पाळायला लागलो कारण कोणाला काही बोलणे अवघड होते त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले मी आईला या संदर्भात विचारले तेव्हा ती म्हणाली की हे सर्व तुझ्या मागल्या जन्माचं संचित आलेले दिसतं त्यामुळे पुनर्जन्म हा कायमच माझ्यासाठी मोठा प्रश्न होता कारण मी ज्या बंदिशी ऐकत होतो त्या बंदिशी खरोखरच मी कधीच ऐकलेल्या नव्हत्या मग त्या आल्या कुठून? 


साधारण वयाच्या सोळाव्या वर्षी मी थोडी माझी कॉम्पोझिशन्स करायला सुरुवात केली परंतु नंतर जे काही घडले त्यामुळे माझे आयुष्य बदलले आणि संगीत ही माझ्यासाठी फार वैयक्तिक गोष्ट बनून गेली मी कधी संगीताचा शास्त्रात पडलोच नाही किंवा चित्राच्या शास्त्रातही पडलो नाही याचे कारण मला शास्त्रात पडायचेच नव्हते मी पडलो तर मग आयुष्यभर याच्या मागे लागणार हे मला माहीत होते मी फक्त काव्यशास्त्राच्या मात्र फंदात पडलो कारण ती माझी मुख्य कला होती पण माझे सुरुवातीचे कलेतले आविष्कार हे कायमच चित्रातले आणि नंतर संगीतातले राहिले संगीता इतके शुद्ध काही नाही असे जे म्हटले जाते त्यात काही प्रमाणात तथ्य आहे म्हणजे प्राणाच्या जवळ काही असेल तर ते संगीत आहे व्हॉयझर मधून जेव्हा एलियन्स लोकांशी संवाद साधायचा होता तेव्हा शास्त्रज्ञांनी कुठलीही भाषा निवडली नव्हती तर संगीत निवडले होते याचे कारण संगीत हे मानवाच्या सुद्धा पलीकडे असणाऱ्या लोकांना कळू शकेल असा त्यांना आत्मविश्वास होता हा चुकीचा नव्हता कारण संगीताची भाषा ही ब्रह्मांडीक असू शकते असो 


कुठलीही कला सौंदर्य निर्माण करते त्याला संगीत अपवाद नाही त्याविषयी मी इतरत्र बोललेलो आहे म्हणून येथे काही लिहीत नाही 


सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे की संगीतामार्फत मोक्ष मिळू शकतो फक्त त्यासाठी शरीराची तयारी असावी लागते आणि जन्मजात संगीताची प्रतिभा! माझे स्वतःचे मत असे आहे की संगीताची प्रतिभा ही गणिताच्या प्रतिभेशी मॅच व्हावी लागते त्यातून तुम्ही प्राणापर्यंत जाऊ शकता आणि नंतर एक वेळ अशी येते की जेव्हा सर्व गणित कोसळून पडते आणि तुम्ही शून्यात जाता 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे