मोक्ष: स्पंद

 देवाचे व्रत घेतलेल्या माणसासाठी एक कविता श्रीधर तिळवे नाईक 

तुला मी अडवलेलं नाही 

तुझ्या वेदांचा मला काय फायदा 

असा प्रश्न मात्र नेहमीच विचारलाय 


पूर्वजांनी प्राचीन म्हटले म्हणून प्राचीन 

पूर्वजांनी पवित्र म्हटले म्हणून पवित्र 


मांत्रिकी ही तुला पचली असेल 

मला नाही 

माझे पोट वैज्ञानिक आहे 

ते श्रद्धेच्या आधारे चालत नाही 


पारायण पूर्ण होतात तुझे डबडबलेले डोळे 

ऑथेंटिक होते 

याबद्दलही मला शंका नाही 


तुझ्या वडिलांचा अभिमान खोटा नाही 

हेही मी ओळखून आहे 


पण परंपरा पाठ करण्याला अचीवमेंट म्हणता येईल का 

माझ्या एक पाठीपणाचे कौतुक मला कधीच नव्हते 

एकपाठी काय कॉम्प्युटर पण होऊ शकतो  

त्याचे कसले कौतुक ?


म्हणूनच अपघात झाला आणि मेमरी गेली 

तेव्हा मी म्हणालो 

बरे झाले कॅम्पुटर होण्यापासून सुटलो 


प्रश्न मेमरीचा नसतो 

प्रश्न त्या मेमरीतून शहाणपण येते का हा आहे ?


तुझ्या पारायणाची गेलेली निमंत्रणे 

आवश्यक होती का 

शेवटी कोणापुढे हे पाठांतर सादर करायचे होते आणि का?


पाठांतरे आईन्स्टाईन बनवत नाहीत 

ना न्यूटन 


सगळं वेदांत आहे हे म्हणण्यासाठी 

वेद सगळ्या पुस्तकात आहे 

सिद्ध करावे लागते  


साहजिकच वेद उपनिषदांच्यात गेला स्मृतींच्या आत गेला ब्राह्मण ग्रंथांच्यात गेला 

हे खरे तर वेद नाही 

वेदांचा विस्तार आहे 

म्हणूनच तू सुद्धा एक वेद निवडला पाठांतरासाठी 


काही वर्षांनी कदाचित आईन्स्टाईनची थिअरी मांडणारा निबंध तुम्ही वेद म्हणून ओळखाल 

पण त्याने तो थोडाच वेद होणार आहे ?

लॅटिन संस्कृत मधूनच कशी निर्माण झाली हे सांगाल 

पण त्याने थोडीच लॅटिन अमेरिका 

दिल्लीमध्ये उगवणार आहे ? 


भाषांचे खेळ खेळण्यात तुम्ही निपुण आहात 

पण ही निपुणता 

एकच पुस्तक घेऊन आलेल्यांच्या पुढे सुद्धा पराजित झाली 


तेव्हा भाषा ही काही विजयाची गॅरंटी नाही 

अन्यथा इतक्या वेळा पराभूत कुठे झाले असता ?

वेदामुळे देश सुखी झाला असता 

तर युरो अमेरिकेत इतके लोक पळून कुठे गेले असते ?


परंपरा नष्ट होण्यापासून थोपवली 

पण कुठली परंपरा ? 


गोष्टी या बोटावरून त्या बोटावर नाचवता येतात 

किंबहुना जी सर्व बोटांच्या वर नाचते ती परंपरा 


मला वेद आवडतात कविता म्हणून 

एका आदिम टोळीतील लोक आपली सर्व भीती 

अत्यंत नग्न होऊन शब्दात मांडतात म्हणून 

आपले सर्वस्व कुठल्यातरी आपल्यापेक्षा सर्वश्रेष्ठ असलेल्या पंचमहाभूतांच्या सगुणत्वाशी जोडतात म्हणून 


माणसाला ब्रम्हांडाला जोडण्याची एक आदिम पद्धत 

म्हणून मला वेद आवडतात 


पण मला माझ्या नवीन कविता अधिक आवडतात 

माझ्याच नाही तर इतरांच्याही 


वेदांचा एक कालखंड असतो 

आमच्या कवितांचा एक कालखंड आहे 


उद्या त्यांचे कोणी पारायण केले तर 

त्याला तुझ्या इतका मानसन्मान मिळेल ?


प्रश्न नेहमीच धर्म मान्यतेचा होता 

आमच्या कवितांना धर्म मान्यता नाही 

कदाचित धर्मविरोधच असेल 


मला माहित आहे ही तुलना तुला आवडणार नाही 

कारण प्राचीन पाठ केलेल्या माणसाला 

अर्वाचीन नेहमी तुच्छ वाटत राहते 


मला तुझा पोशाख आवडला 

तू त्यात विलक्षण देखणा दिसत होतास


पण उद्या असाच पोशाख घालून एखाद्या अस्पृश्याने पारायण केले 

तर त्याला समान मानसन्मान मिळेल ?

किंवा एखाद्या ब्राह्मण स्त्रीने ? 


हा मान सन्मान तुझ्या वर्ण जातीचा आहे 

की तुझ्यातल्या माणसाचा आहे ? 


NIOS नाकारण्यात तुझा नक्कीच पुरुषार्थ दिसला 

मला तुझे त्याबद्दल कौतुक आहे 

पण आणखीन शंभर वर्षांनी संस्कृत शिकायला अमेरिकेला या 

अशी दर्पोक्ती एका अमेरिकन प्राध्यापकाने केली होती 

तिच्यात सत्यता नव्हती का ? नाही का ? 


संध्या कुठल्याही नदीच्या काठी केली 

तरी पवित्रच होते 

पारायण कुठल्याही देशात झाले तरी पवित्रच होते 


उद्या पारायणे आंतरराष्ट्रीय झाली म्हणून मला आश्चर्य वाटणार नाही 

ज्यू आणि ब्राह्मण यांच्या चिवटपणाबद्दल मला शंका नाही 

तुम्ही कुठेही गेला तरी आपला धर्म अबाधित राखाल 

पण प्रश्न पुन्हा तोच आहे याचा फायदा काय ?


नव्या जालयुगात काहीच लक्षात ठेवावे लागत नाही 

मोबाईल आणि लॅपटॉप सर्व काही लक्षात ठेवतो 

अशा काळामध्ये पाठांतर हे चमत्कार आहे याबद्दल मलाही शंका नाही 

कदाचित या काळातले पारायण म्हणून हा मानसन्मान असेल 

कदाचित माणसाला कॅम्पुटर पेक्षा अधिक अक्कल असते हे सिद्ध करणारे हे पारायण असेल 

कारण मला खात्री आहे कुठलाच मोबाईल फोन कुठलाच संगणक तुझ्यासारखं पारायण करणे शक्य नाही 


कदाचित म्हणूनच पाठांतर हे सेलिब्रेशन झाले असावे 


स्वतःचा फोन नंबर विसरत चाललेल्या या युगात 

तू तुझा अख्खा मेंदू लक्षात ठेवलास 

ही तुझी अचीवमेंट मला मान्य आहे 


मी गोष्टी नेहमीच सर्व बाजूंनी पाहतो 

मी सर्वबाजूवादी आहे म्हण ना 


तुझ्या स्वात्विक स्वभावाला कोण नाकारेल ?

तुझा अहंकार नाहीसा झालेला नसला तरी 

अधिकाधिक सूक्ष्म होत चाललाय कोण नाकारेल? 


पण तरीही करोनात तुझी आई गेली ती गेलीच ना ?

कुठलाही मंत्र कामी आला नाही हेही खरेच ना ?


मृत्यूला घाबरणारी बालके 

मंत्र पुटपुटताना मी अनेकदा पाहिलेली आहेत 


लहान मुलांना खेळणे द्यावे लागते 


पण परिपक्वता आली की कळते 

खेळणे म्हणजे कवच नव्हे 


जोवर धर्म आहे 

तोवर समजून चला 

मनुष्य अजून बालकच आहे 


आपल्या लहान मुलाने पाठांतर केले म्हणून 

सगळ्या जगाला कौतुकाने दाखवणारी आई 

मला चिरपरिचित आहे 


माझ्यातही एक आई आहे 

जिला पाठांतराचे कौतुक आहे 

पण माझ्या आत अंबाबाईही आहे 

जी सांगते

हे जग मी पाठांतर करून बनवलेले नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

(मोक्ष सिरीज मधील मोक्ष : स्पंद या काव्यफायलीतून)

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे