सुरेश भट यांचे गजले मध्ये नेमके योगदान काय ?श्रीधर तिळवे नाईक

माझ्या मते गझल आणि गजल हे दोन्ही शब्द योग्य आहेत ज्याला जो वापरावासा वाटतो तो वापरावा . लोकांना कळतेच . गजल हा योग्य आहे कारण जसे बेस्ट चे मराठीत बेस होते तसे गजल होते ज हा उच्चार वापरायला प्रॉब्लेम काय आहे ? एक गोष्ट नक्की आहे झ वापरल्याने एक स्त्रैण नजाकत येते ज्यांना ती नजाकत हवी आहे त्यांनी गझल अवश्य म्हणावे . राहता राहिला प्रश्न स्वतंत्र राहूटीचा तर तो बहुतांशी सुरेश भट यांच्या अनुयायांनीच जन्माला घातलेला प्रकार आहे. माझी मुक्त गजल ही संकल्पना तुमच्यासारख्या अनेकांना झेपली नाही गमतीचा भाग असा की तुम्ही सुनीता विषयी बोलला मुक्त सुनीता प्रति सुनीता विषयी तुम्ही बोलत नाही मुक्त गजले विषयी तुम्ही बोलत नाही . कारण तुम्ही सुद्धा भट यांनी निर्माण केलेल्या परंपरेत ठामपणे थांबलेले आहात . इतरांना पारंपारिक म्हणताना इतरांच्या दृष्टीने तुम्हीही कुठेतरी पारंपारिक आहात हे लक्षात घेतले म्हणजे बरे होईल . मराठीकरण हा काही फक्त भट यांचा उद्योग नव्हता तो संपूर्ण देशीवादी चळवळीचा मुद्दा आहे तेव्हा तो काळाचा आवाज आहे. त्याचे संपूर्ण श्रेय मी कधीच सुरेश भट यांना देणार नाही याचे कारण त्याचे बीज विंदा करंदीकर यांच्या गजले मध्ये आहे गजलेचे मराठीकरण विंदा करंदीकर यांच्यापासून सुरू होते सुरेश भट यांच्यापासून नाही . मग भटांचे श्रेय काय ? तर त्यांनी करंदीकर यांनी जे मध्यमवर्गीय गजलीकरण केले होते त्यातून मराठी गजलेला बाहेर काढून गजलेला बहुजनांची गझल केली . त्यांच्यामुळेच अनेक दलित कवी सुद्धा गझल लिहिताना दिसतात आणि हे त्यांचे श्रेय निर्विवाद आहे पण मला नेहमी असे वाटत आलेले आहे की ज्याचे त्याचे श्रेय योग्य पद्धतीने दिले गेले पाहिजे पण होते काय सुरेश भटवादी असणारे सर्व लोक सर्व काही सुरेश भटांनी कसे केले आहे ते सांगत असतात तर ते काही आम्ही स्वीकारायला तयार नाही आहोत. सुरेश भट हा काही गजलेच्या बाबतीतला अंतिम शब्द नव्हे . आणि गजलेचा इतिहास म्हणजे फक्त भटवादी लोकांनी लिहिलेला इतिहास नव्हे . नवीन पिढी ही दुर्दैवाने खूपच पारंपारिक निघाली पण त्याचा अर्थ असा नव्हे की बंड झाले नाही . असो हे खरं तर मी अनेकदा प्रतिवाद करून लेख लिहून मांडलेले आहेच . एक गोष्ट मला नेहमी मान्यच आहे ती म्हणजे वृत्तांत गझल लिहिली गेल्यामुळे वृत्तांचे पुनरागमन जे बोरकर ,पाडगावकर ,ग्रेस यांच्यामुळे सुरू झाले होते ते अधिक लोकाभिमुख झाले . मी स्वतः कधीही वृत्तात लिहिणाऱ्या लोकांना कमी लेखत नाही. पण तुम्ही मात्र मुक्त गझल म्हणजे जणू काय अपराध आहे अशा थाटात तिची उपेक्षा करत असता आणि तिचा प्रवाह वाढूच नये याची योग्य ती काळजी घेत असता. असो. थोडक्यात काय सुरेश भटांचे योगदान मान्यच केले पाहिजे पण हे मान्य करताना वस्तुनिष्ठ इतिहास लिहिला गेला पाहिजे. मराठीत ओवी अभंगांच्या नंतर सुनीत नंतर फक्त गझल हाच एक असा काव्यप्रकार आहे जो तळागाळात पोहचला त्याचे श्रेय हिंदी चित्रपटांना आणि गीतकारांना अधिक आहे त्यांनी हिंदी गझल आधीच मराठी लोकांच्यात रुजवलेली होती हे लक्षात घेतले पाहिजे. थोडक्यात काय समग्र पहा वस्तुनिष्ठपणे पहा. 

श्रीधर तिळवे नाईक 

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे