ब्राह्मण्य , क्षत्रियण्य , वैश्यण्य ,शूद्रण्य आणि बाबासाहेब आंबेडकर श्रीधर तिळवे नाईक
भारतामध्ये सर्वसाधारणपणे पुरोगामी लोक नेहमीच ब्राम्हण्याची चर्चा करत असतात. युरेशियन श्रुती स्मृतीवर शब्द प्रमाणाच्या आधारे श्रद्धा ठेवून त्याप्रमाणे वर्णजातस्मृतीनिष्ठ अशी वर्ण आणि जात यांच्यावर श्रद्धा ठेवून जगली जाणारी जीवनशैली म्हणजे ब्राह्मण्य होय.
युरेशियन श्रुती स्मृतीवर शब्द प्रमाणाच्या आधारे श्रद्धा ठेवून त्याप्रमाणे वर्ण जातनिष्ठ स्मृतीनिष्ठ रामायण महाभारतनिष्ठ पुराणनिष्ठ अशी वर्ण आणि जात यांच्यावर श्रद्धा ठेवून जगली जाणारी जीवनशैली म्हणजे क्षत्रियण्य होय. ही ब्राह्मण्यापेक्षा थोडी मोकळी असते. ती वर्ण आणि जातीमध्ये थोडी समावेशक असते . पुरुषसत्ताक असल्याने इतर वर्णातल्या धर्मातल्या जातीतल्या जमातीतल्या स्त्रियांना सामावून घेऊन त्यांच्यापासून होणाऱ्या संततीना ती क्षत्रियाचा दर्जा देते .
वैष्णव श्रुती स्मृतीवर किंवा जैन धर्मावर शब्द प्रमाणाच्या आधारे श्रद्धा ठेवून त्याप्रमाणे वर्ण जातनिष्ठ स्मृतीनिष्ठ राम कृष्ण निष्ठ पुराणनिष्ठ अशी वर्ण आणि जात यांच्यावर श्रद्धा ठेवून जगली जाणारी जीवनशैली म्हणजे वैश्यण्य होय. ही ब्राह्मण्यापेक्षा थोडी मोकळी असते. ती वर्ण आणि जाती बाबत थोडी समावेशक असते . पुरुषसत्ताक असल्याने इतर वर्णातल्या धर्मातल्या जातीतल्या जमातीतल्या स्त्रियांना सामावून घेऊन त्यांच्यापासून होणाऱ्या संततीना ती वैश्य दर्जा देते .
हिंदू श्रुती स्मृतीवर किंवा जैन धर्मावर शब्द प्रमाणाच्या आधारे श्रद्धा ठेवून त्याप्रमाणे वर्ण जातनिष्ठ स्मृतीनिष्ठ राम कृष्ण निष्ठ अवतारनिष्ठ पुराणनिष्ठ अशी वर्ण आणि जात यांच्यावर श्रद्धा ठेवून स्वतःची गुलामी दैवी आहे असे स्वीकारत जगली जाणारी जीवनशैली म्हणजे शूद्रण्य होय. ही ब्राह्मण्यापेक्षा थोडी मोकळी असते. ती वर्ण आणि जाती बाबत थोडी समावेशक असते . पुरुषसत्ताक असल्याने इतर वर्णातल्या धर्मातल्या जातीतल्या जमातीतल्या स्त्रियांना सामावून घेऊन त्यांच्यापासून होणाऱ्या संततीना ती शूद्र दर्जा देते .
वैश्य लोक सामवेद स्वीकारतात आणि ऋग्वेद वाचत सुद्धा नाहीत . त्यांच्याकडे होणारे यज्ञ हे सामवेदी किंवा पौराणिक असतात आणि ब्राह्मण येऊन ते करतात . ते त्यांना दक्षिणा देतात. त्या उलट शूद्रांच्याकडे होणारे यज्ञ सरळ सरळ पौराणिक असतात. शूद्र ब्राह्मणांना दक्षिणा देतात . हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण आणि शूद्र असे दोनच वर्ण उरले होते त्यामुळे वैश्य आणि क्षत्रिय यांच्यासाठी सुद्धा पौराणिक मंत्र नंतर म्हटले जाऊ लागले . शाहू महाराजांच्या बाबतीत घडलेले वैदोक्त प्रकरण हे त्यामुळेच घडलेले आहे.
शूद्रांनी स्वतःचा वर्ण का स्वीकारला हा एक फार मोठा कळीचा प्रश्न आहे की त्यांनी तो स्वीकारलेलाच नव्हता आणि फक्त ब्राह्मण ग्रंथांनी आणि ब्राह्मण इंग्रजांनी युरोपियन लोकांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या मध्येच अत्यंत जाणीवपूर्वक हा उल्लेख आणि प्रचार केला गेला आहे ?
कलियुगात जर ब्राह्मण आणि शूद्र एवढेच दोन वर्ण होते तर मग शिवाजी महाराज कसे काय जन्मले? वस्तुस्थिती अशी आहे की शैवधर्मीलोक वर्णव्यवस्था स्वीकाराला तयार नव्हते म्हणून नंतर सुद्धा होळकर झालेले दिसतात. वस्तुस्थिती अशी आहे की मुस्लिम राजवटीने शैव लोकांना अत्यंत जाणीवपूर्वक वर्णव्यवस्था स्वीकारायला लावली जेणेकरून त्यांना शूद्र अतिशूद्रांचे धर्मांतर करता यावे पुढे ब्रिटिशांचे सुद्धा हेच धोरण होते त्यामुळे ऍक्च्युली वैष्णव(महाराष्ट्रात उत्तर यादव आणि उत्तरकालीन पेशवाई हे वैष्णव राजवटीची उत्तम नमुने आहेत), मुस्लिम आणि ब्रिटिश राजवट यांच्यामुळे फक्त ग्रंथांच्यात पडून असलेली वर्ण जाती व्यवस्था ही भारतीय समाजामध्ये रूढ झाली, दृढ झाली . याला एक मूळ कारण असेही होते की किताबी धर्म नावाची संकल्पना इस्लाम मध्ये आहे ब्राह्मण लोकांना वेद होते जे किताबे मांडले गेले परंतु क्षत्रिय आणि इतरांचे काय तर त्यांच्यासाठी म्हणून मग भगवद्गीता हा धर्मग्रंथ म्हणून या काळात आणला गेलेला किताबी धर्मग्रंथ आहे. साहजिकच मग त्यांच्याबाबत धोरण बदलता येते मुख्य म्हणजे त्यांचे धर्मांतर केलेच पाहिजे अशी सक्ती उरत नाही पण याच गीतेमुळे झाले असे की वर्ण व्यवस्था प्रस्थापित झाली . तिच्याबरोबर मग आपोआपच जातिव्यवस्था ही प्रस्थापित झाली .
जवळजवळ नवव्या शतकापर्यंत शैव लोकांच्यापासून हे सर्व वर्ण जात प्रकरण दूरच होते . त्यांच्यात फक्त समाज होते . आणि समाज जन्मनिष्ठ नव्हे तर कर्मनिष्ठ होते . ब्राह्मण मात्र जन्मनिष्ठ व्यवस्था सतत लादण्याच्या प्रयत्नात होते . नंतर यामध्ये जैन पुरोहितांची भर पडली.
आणि याच कालखंडामध्ये क्षत्रियण्य , वैश्यण्य आणि शूद्रण्य यांचा जन्म झाला . यासाठी पद्धतशीरपणे वैष्णव धर्म आणि नंतर हिंदू धर्म निर्माण करण्यात आला राबवण्यात आला . महाराष्ट्रात विठ्ठल हे दैवत वर्ण जाती व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी उभे केले गेले. खुद्द शंकरांना साधन बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यासाठी तशीच शैव पुराणे लिहिली गेली . रामायण महाभारतामध्ये तसे उल्लेख घुसवण्यात आले.
ही बिंबवणी आता इतकी खोलात उतरलेली आहे की सर्वात शूद्र असा उल्लेख झालेल्या जातींनी आपल्या या गुलामगिरीला स्वीकारलेले आहे त्याचा एक दुष्परिणाम असा झाला की शूद्र आता जाती जातीवरूनच भांडायला शिकले . यांच्यात आपापसात सुद्धा आता लग्न होत नाही इतके हे बिंबवणे खोलात गेलेले आहे . ब्राह्मणी हिंदुत्वाने याचा पुरेपूर फायदा घेतलेला दिसतो आणि पुन्हा एकदा वर्ण आणि जात यांचे पुनरजीवन सुरू झालेले आहे . त्या मागचा उद्देश स्पष्ट आहे ब्राह्मणांची राजवट आणणे . मात्र ब्राह्मण आता फक्त एकटे नाहीत त्यांना वैश्य आणि क्षत्रिय यांची जोड आहे एका अर्थाने ओपन प्रवर्गाची राजवट सर्वत्र प्रस्थापित करणे असा हा अजेंडा आहे . त्यासाठीच क्षत्रियण्य आणि वैश्यण्य क्षत्रिय आणि वैश्य यांना शिकवण्यात आलेले आहे . एकनाथ शिंदे आणि अजित पवार मुकेश अंबानी आणि अडाणी मोदी आणि शहा यांच्यासारखे लोक आहारी गेलेले दिसतात. वैष्णव धर्म हे एखाद्या हत्यारासारखे याबाबतीत वापरले जाते आणि त्यातूनच जय श्रीराम या घोषणेचा प्रचार आणि प्रसार चालू आहे . रामायण म्हणजे मागल्या दाराने वर्णव्यवस्था आणण्याचा बिंबवण्याचा मार्ग होता तो पुन्हा एकदा ओपन केला गेला आहे. राम मंदिर चळवळ त्यासाठीच उभी केली गेली होती . महाकाव्यांची नशा बहुजन समाजाला अधिक चढते हे ब्राह्मण लोकांना पक्के माहित आहे. त्यामुळेच महाकाव्यही इतिहास आहे असे समीकरण जुळवले गेलेले आहे . त्यासाठी नव्या दंतकथाही रचण्यात येत आहेत . मूळ दंतकथांची मोडतोड व्यवस्थित चालू झालेली आहे. हे सर्व नवव्या ते १२ व्या शतकाच्या दरम्यान ब्राह्मण लोकांनी केले होते आणि संपूर्ण समाज ब्राह्मण आणि शूद्र अशा दोन वर्णांच्यात विभागून संपूर्ण भारतीय समाज आपल्या कब्जाखाली आणला होता . मुस्लिम आले नसते तर भारतामध्ये ब्राह्मणी राजवटच कायम राहिली असती आणि मग शिवाजी महाराजांनी ती उलथवून लावली असती..
या सर्वांवर एक उपाय बाबासाहेब आंबेडकरांनी शोधला तो म्हणजे त्यांनी वर्ण व्यवस्थेला पर्याय म्हणून प्रवर्ग व्यवस्था आणली . बाबासाहेब आंबेडकर याबाबतीत द्रष्टे ठरले . माझ्या मते निदान परिवर्तनवादी चळवळीने यापुढे प्रवर्गनिष्ठ मीमांसा करावी आणि वर्ण नि जात यांचा उल्लेख करण्याऐवजी जास्तीत जास्त प्रवर्गाचा उल्लेख करावा . निदान आंबेडकरवादी म्हणवणाऱ्या लोकांनी तरी आता हे करायला हरकत नाही. ब्राह्मण्य, क्षत्रियण्य, वैश्यण्य ,शूद्रण्य घालवण्याचा हा एक उपाय सध्या हातात आहे. शेवटी मिडीयम इस द मेसेज आणि मिडीयम मध्ये प्रवर्ग येणे गरजेचे आहे.
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment