लिंगाभ्यास (जेंडर स्टडीज ) आणि शैव श्रुती श्रीधर तिळवे नाईक
अलीकडच्या काळामध्ये लिंग अभ्यास(जेंडर स्टडी) हा फार महत्त्वाचा अभ्यास उदयाला आला आहे . यातील जेंडर साठी लिंग या शब्दच मला योग्य वाटतो कारण स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी ही व्याकरण व्यवस्था आपल्या भाषांमध्ये फार महत्त्वाची मानली गेलेली आहे मी इथे व्याकरणाच्या अंगानेच आणि बायोलॉजिकल अंगानेच लिंग हा शब्द वापरत आहे आणि तो संपूर्ण शरीरासाठी आहे कामूकतेसाठी नाही असो.
जेंडर स्टडी ही एक फार महत्त्वाची शाखा नेमकी कुठे सुरू झाली याबद्दल नेहमीच सर्वच देशात वादविवाद होत असतात. भारतात मात्र हा वाद-विवाद जवळजवळ नाहीये कारण अगदी वैदिक आणि वैष्णव संप्रदायाचे कट्टर पुरस्कर्ते सुद्धा शाक्त पूजा व स्त्री सत्ता ही अवैदिक आणि सिंधू संस्कृतीत आहे हे मान्य करतात मात्र तिचे स्वरूप नेमके काय होते याबद्दल अनेक वाद विवाद घातले जातात अर्थातच वैष्णव लोक अत्यंत पॉलिटिकल होत महालक्ष्मीला केंद्रस्थानी आणायला बघत असतात डॉक्टर सुधाकर देशमुख यांच्यासारखा मनुष्य सुद्धा यातून सुटत नाही मग बाकीच्यांची काय कथा ?
धर्मांच्या आणि श्रुतींच्या इतिहासामध्ये शैवच एक अशी श्रुती आहे जिच्यात शिव हा इनऍक्टिव्ह पण उपस्थित असलेला आणि शक्ती ही ऍक्टिव्ह आणि उपस्थित असलेली आणि संसार निर्माण करणारी मांडणारी म्हणून येत असते . पुढे इसवी सन पूर्व सातव्या शतकात म्हणजेच महावीर बुद्धाच्या आधी हिरण्य वंशातील मोक्षाची साधना म्हणून कपिल याने षष्टी तंत्र हे ज्ञानतंत्र स्वीकारले पण त्याच्या असलेल्या युरेशियन असलेल्या अनुयायांनी शिवाचे रूपांतर पुरुषात केले तर शक्तीचे रूपांतर प्रकृतीत केले. अर्थातच हे करताना वैदिक परंपरेचे भान राखले गेले कारण कपिल हा मूळचा राजवंशी क्षत्रिय असल्याने वैदिक परंपरा नाकारणारा नव्हता . मुख्य म्हणजे तो ब्राह्मणी परंपरेत दाखल झालेला नव्हता . त्यामुळे त्याच्यावर ब्राह्मण धर्माचा कसलाही प्रभाव पडला नाही उलट त्याने जे काम केले त्यामुळे ब्राह्मण धर्माला प्रकृतीचा विचार करणे भाग पडले इतकेच नव्हे तर याच काळात उदयाला आलेल्या ब्रह्म धर्माला शक्तीचा स्वीकार माया म्हणून करावा वाटला म्हणजे शिव आणि शक्ती हे आपल्या लिंग विचार व्यवस्थेत केंद्रस्थानी आहेत हे लक्षात घेतले पाहिजे . लग्न हा शब्द सलग्न या शब्दाचा शॉर्टफॉर्म आहे . इथे शिव आणि शक्तीचे युग्म स्वीकारले जाते सलग्न होणे म्हणजेच युग्म होणे, कपल होणे स्वीकारले जाते . याचा एक थेट परिणाम आपणाला शैव श्रुतीमध्ये असा दिसतो की संसार हा बाईने मांडायचा असतो . गृहिणी असे आपण जेव्हा एखाद्या स्त्रीला म्हणतो तेव्हा आपण कळत नकळत संसार मांडण्याचा हक्क फक्त तिचा आहे असे मान्य करत असतो ती सगळा माझा संसार बघते हा वाक्प्रचार सुद्धा यातूनच येतो . मग नवरा काय करतो ? तर इथे मात्र तो शिवा सारखा इन ऍक्टिव्ह राहू शकत नाही कारण आता तो जीव झालेला असतो आणि जीवाला संसार लागतोच .मात्र संसारात तो इन ऍक्टिव्ह राहतो म्हणजेच संसार नेमका असतो कुठे? तर तो घरात असतो म्हणजेच ग्रह संसार गृह संसार ही संकल्पना हीच संसार होऊन असते आणि मग घराच्या बाहेर शिव महिमा सुरू होतो . तिथे त्याने काय करायचे तर सुरुवातीच्या काळामध्ये पती-पत्नी दोघेही बाहेर राहतात पण नंतर शेती व्यवस्था आली आणि घर कामाची अधिक जबाबदारी पत्नीवर पडली. अर्थात याचा अर्थ असा नाही की ती शेती आणि व्यापारात ऍक्टिव्ह नव्हती . मुळात त्याकाळच्या शेतीला आणि व्यापाराला तिचे इन ऍक्टिव्ह असणे परवडणारेच नव्हते . शेती आणि व्यापार हा एक सहकुटुंब सहपरिवार करायचा उद्योग होता त्यामुळे ब्राह्मण आणि क्षत्रिय स्त्रियांच्या पेक्षा वैश्य शूद्र अति शूद्र आणि आदिवासी स्त्रिया जास्त स्वतंत्र होत्या त्यांना जास्त मोकळीक होती .
शिवशक्ती मध्ये शक्ती निर्माण करते परंतु शिव हा प्रलय घडवतो शेवट करतो . शक्तीही फक्त निर्माण करत नाही तर ती संसार चालवते बनवते या दोन्ही क्रियांना भव आणि भवन असा शब्द आहे त्यातूनच पुढे भवसागर असा शब्द आलेला आहे हा भवसागर पार केल्याशिवाय मोक्ष मिळत नाही . पण संसार मांडल्याशिवाय संसार काय आहे ते कळत नाही त्यामुळेच शैव श्रुतीमध्ये ब्रह्मचर्य या संकल्पनेला स्थान नाही आणि म्हणूनच शंकर पार्वतीला मुले झालेली दिसतात . पुढे बसवेश्वर आणि गुरुनानक यांना सुद्धा मुले झालेली आहेत . याला अपवाद फक्त राजयोगी आहेत म्हणजे गोरखनाथ गहिनीनाथ ज्ञाननाथ निवृत्तीनाथ यांना मुले झालेली नाही कारण हे सर्व राजयोगी आहेत . कारण तिथे शरीर अतिशय महत्त्वाचे असल्याने आणि शरीर हे मोक्षाचे साधन आणि माध्यम असल्याने साहजिकच दुसऱ्या शरीराची उपस्थिती खपवून घेतली जात नाही त्यामुळेच शैव श्रुती मधले ब्रह्मचर्य हे फक्त राज योगी योगिनी लोकांना किंवा जोगी जोगिनी लोकांनाच पाळावे लागते . ही किल्लीच अनेकांना कळलेली नाही त्यामुळे अनेकदा ज्ञानयोगी सुद्धा संन्यास पाळताना दिसतात महावीर आणि गौतम बुद्ध यांचा मार्ग हा ज्ञानाचा मार्ग होता तरीसुद्धा आपणाला असे दिसते की त्यांनी ब्रह्मचर्य पाळले अर्थातच त्यामुळे शैव धर्माशी लोकधर्माशी त्यांचे पटले नाही . पण यांच्या प्रभावाने नंतर शैव श्रुतीमध्ये सुद्धा ज्ञानयोगी लोक ब्रह्मचर्य पाळायला लागलेले दिसतात. वास्तविक ज्ञानामध्ये संसार अडथळा आणत नाही . पण आपल्याकडे नंतर सॉक्रेटिस ची दंतकथा अधिकच जाज्वल स्वरूपात आली आणि ज्ञानयोगी माणसाने संसार करूच नये अशी काहीतरी विचित्र धारणा आपणाला युरेशियन लोकांनी स्वीकारली असे दिसते. आपण राज योगी आहे की ज्ञानयोगी आहे हे त्यामुळे नीट कळणे खूप आवश्यक असते अन्यथा साधना नेमकी काय दिशेने चाललेली आहे तेच कळत नाही . उदाहरणार्थ विपश्यना हे तंत्र फक्त ज्ञानतंत्र आहे पण अनेकदा राजयोगामध्ये म्हणजे शरीरयोगामध्ये लोक त्याचे पालन करतात आणि अपेक्षित फळ मिळत नाही म्हणून उदास होतात मुळातच सर्वच तंत्रे ही ज्ञान तंत्राला पुरेशी पूरक असतील असे नाही . राजयोगी शरीरयोगी माणसाला पतंजली हा जास्त उपयुक्त आहे बुद्ध नाही हे त्याने लक्षात घेतले पाहिजे . माझ्याकडे अनेक लोक हा गोंधळ घेऊन आलेले आहेत म्हणून सांगावेसे वाटते .
एकदा का ज्ञानयोगी माणसाने संसार सोडायची गरज नाही हे आपण स्वीकारले की मग ब्रह्मचर्याचा प्रश्न फक्त शरीर योगा पुरताच उरतो म्हणजेच एका अर्थाने तो जगाच्या बाहेर संन्यास घेऊन गेलेल्या माणसांच्या बाबतीत उरतो जो संसारी मनुष्य आहे त्याच्या बाबतीत उरत नाही आता एकदा हे कळले की मग लिंगाभ्यास करताना ब्रह्मचर्याचा प्रश्न हा या अभ्यासाच्या थोडासा पलीकडे आहे हे स्वीकारावे लागते आणि जे ब्रह्मचर्य पाळत नाहीत त्यांच्याच दिशेने हा प्रश्न अधिक वळवावा लागतो . ख्रिश्चन धर्मामध्ये त्यामुळेच शरीर तंत्र स्वीकारलेल्या लोकांना मोक्ष मिळालेला दिसत नाही कारण जीजस ने दिलेले जे तंत्र आहे ते तंत्र भाव तंत्र आहे तिथे ब्रह्मचर्याची गरजच नाही पण माहित नाही कोणाच्या प्रभावाने पण ब्रह्मचर्य जीजसने स्वीकारलेले होते असा अनेकांचा गैरसमज आहे वास्तविक जीजस ने ब्रह्मचार्य स्वीकारले असो किंवा नसो एक गोष्ट नक्की आहे की तो ईश्वर मानतो स्वतःला ईश्वराचा पुत्र मानतो आणि इतरांनाही ईश्वराचा पुत्रच मानतो . ज्ञान तंत्रयोगात ईश्वराची गरज नाही किंबहुना ज्ञान योगा ज्ञानतंत्र हे नास्तिकच असते निरीश्वरवादी असते तसे ते नसेल तर ज्ञानतंत्र भटकत जाते . ईश्वर हा ज्ञानाचा विषय नसतो कारण त्याचा कसलाही पुरावा नसतो आणि ज्ञान तंत्रामध्ये संशय आणि पुरावा ह्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात याचा एक दुष्परिणाम आपणाला स्पष्टपणे दिसतो तो म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये त्यामुळे मोक्ष फारसा प्रचलित झाला नाही आजही जीजस मोक्षवादी होता की नाही हे सांगणे फार कठीण जाते.
पण एकदा का भाव तंत्र स्वीकारले की सगळा भवसागर स्वीकारता येतो संसार स्वीकारता येतो ईश्वर स्वीकारता येतो म्हणजेच ज्याला आपण लिंगाभ्यास म्हणतो त्याचे सर्वात मोठे व्यापक क्षेत्र हे आपणाला भावतंत्रामध्ये , ज्ञानतंत्रामध्ये ,शक्ती तंत्रामध्ये आणि क्रिया तंत्रामध्ये दिसते . योग (शरीर)तंत्रामध्ये कमी दिसते. अर्थातच यातून काही प्रश्न निर्माण होतात ते म्हणजे स्त्रीला विधवा झाल्यानंतर सेक्स नाकारणे . आता हे सक्तीचे ब्रह्मचर्य आहे हे तर उघड आहे. तर अशा सक्तीच्या ब्रह्मचर्याचा सुद्धा आपणाला स्वतंत्र विचार नक्की करावा लागतो जर एखादी स्त्री योगीन बनणार नसेल तर तिला मग ब्रह्मचर्य पाळायला लावता कशाला? उलट भाव तंत्राशी प्रामाणिक राहून तिचा विवाह ताबडतोब केला पाहिजे पण आपल्याकडे हे होत नाही कारण एक प्रकारची दांभिकता वेगळ्याच पद्धतीने येत असते म्हणजे एकतर प्रश्न ती एकदा माहेर कडून सासरी आल्यानंतर तिच्यावर नेमका मालकी हक्क कोणाचा असा हा प्रश्न आहे आणि जर का तिचा मालकी हक्क हा लग्नामुळे सासरच्या लोकांना मिळतो हे तत्व हा मुद्दा मान्य केला तर मग ती सासरच्या घरीच थांबणार उघड आहे मग तिची जबाबदारी कोण घेणार तर ती सासरा आणि दिराने घेतली पाहिजे. कारण शेवटी मृत्यू झाला तरी तिच्या नवऱ्याच्या मुलांचा इस्टेटवर हक्क उरतोच . तिचे जर का पुन्हा लग्न लावून दिले तर मग तिला जी दुसऱ्या लग्नातून मुले होतील त्यावर हक्क कोणाचा असा हा खरा प्रश्न होता . वास्तविक याचा तोडगा अत्यंत स्पष्ट होता तो म्हणजे दुसऱ्या नवऱ्यापासून तिला जी मुले होतील त्या दुसऱ्या नवऱ्याच्या इस्टेटवर त्या दुसऱ्या नवऱ्यापासून झालेली मुले त्यांचा हक्क दुसऱ्या नवऱ्याच्या इस्टेट वर असणार पण साध्या गोष्टी सरळ पाहायच्या नाहीत आणि अवघड करून टाकायच्या हे ब्राह्मणवादाचे लक्षण आहे . त्यातूनच विधवांचा किचकट प्रश्न निर्माण झाला. बर हा प्रश्न वैश्य शूद्र अतिसुद्र आदिवासी यांच्यामध्ये नव्हता ब्राह्मणांचा महिमा असा की त्यांना सुद्धा तो प्रश्न नंतर त्यांनी दत्तक दिला. पण बऱ्याच जणांनी हे दत्तक विधान काय स्वीकारले नाही. आता प्रश्न असा येतो की असे कसे काय घडले बुवा ? तर त्याचे कारण वैश्य शूद्र अति शूद्र आणि आदिवासी म्हणजेच वाणीपणी ओबीसी बीसी आदिवासी या प्रवर्गांना शैव धर्माची शै व श्रुतीची सवय असल्याने त्यांना हा प्रॉब्लेम बिकट वाटत नव्हता त्यांनी तो मृत्यू पावलेल्या माणसाच्या मुलांना वाढवण्याचा प्रश्न सरळ सरळ काकावर सोपवला म्हणजेच दीरावर सोपवला आणि ती मुलगी जिथे जाईल तिथे मग तिचा नवा संसार असा कायदा अलिखित रूपात पाळला . आता हे सोलुशन समोर असून सुद्धा ब्राह्मण लोकांनी हे सोल्युशन का स्वीकारले नाही हा फार मोठा प्रश्न आहे. यामागे मग परलोकांची संकल्पना दिसते . स्वर्ग आणि नरकामध्ये पतीसोबत पत्नीच असली पाहिजे असा नियम आहे जर का दुसरा पती आला तर मग ही पत्नी स्वर्गात किंवा नरकात नेमकी कुठल्या पतीबरोबर जाणार असा हा व्यवहारिक प्रश्न आहे . शिवाय पुन्हा सात जन्माचा संबंध हा ही प्रश्न आहे एकदा सात जन्माचा प्रश्न असेल तर मग दुसऱ्या नवऱ्याबरोबर विवाह करून कसे चालेल . कारण मग त्याच्याबरोबर पुन्हा सात जन्माचा संबंध तयार होणार या सगळ्यापेक्षा विधवा विवाह होऊ न देणे हेच उत्तम असा हा प्रकार तर्कनिष्ठ होत गेला आणि त्यामध्ये बाईची प्रचंड ससे होलपट झाली .
भारताचा जेव्हा आपण लिंग अभ्यास करतो तेव्हा आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आपल्या या सगळ्या श्रुती मधून उदयाला आलेल्या धर्मांच्या विविध परंपरा लैंगिकतेवर प्रचंड मोठा प्रभाव टाकून आहेत हे स्वीकारावे लागते अनेकदा इथे युरोपियन कसोट्या लागू होत नाहीत हेही स्वीकारावे लागते पुनर्जन्म आणि सात जन्माचे संबंध ही संकल्पना जुड्याईक रीलिजन मध्ये नसल्याने तिथे काही गोष्टी अधिक सोप्या झाल्या आणि विधवा विवाह शक्य झाला.
भारतातील वर्णव्यवस्था ही आराम व्यवस्था , अल्पश्रम व्यवस्था आणि श्रम व्यवस्था आहे . म्हणजे ब्राह्मणांच्यासाठी ती आराम व्यवस्था आहे तिथे फारच कमी मेहनत आहे आणि जी मेहनत आहे ती ज्ञान मेहनत आहे त्यामुळे नेहमीच ज्ञानाचे संस्कार ब्राह्मण वर्णांमध्ये प्रचंड प्रमाणात होत राहतात . जर एखादा ब्राह्मण ज्ञान मिळवत असेल तर त्यात आश्चर्य नाही उलट तो क्षत्रिय झाला किंवा व्यापारी श्रमिक झाला तर ते खरे क्रेडि टेबल मानले पाहिजे . क्षत्रिय वर्णासाठी ही अल्पश्रम व्यवस्था आहे मात्र मरण्याची जोखीम त्याला घ्यावी लागते . शस्त्र आणि अस्त्र शिकणे हे त्याच्यासाठी अनिवार्य आहे त्यामुळे एखादा क्षत्रिय जर का प्रशासकीय कामात असेल किंवा अस्त्र शस्त्र व्यवस्थेत असेल तर त्यात आश्चर्य ते काय खरे आश्चर्य ते मानले पाहिजे जेव्हा तो ज्ञान व्यवस्थेत शिरतो . किंवा व्यापारी बनतो . हीच गोष्ट वैश्य वर्णाबाबत आहे तो सुद्धा ज्ञान व्यवस्थेत किंवा शस्त्र व्यवस्थेत शिरत असेल तर खरा ग्रेट व्यापार तर काय घरात चालतच आलेला आहे. हीच गोष्ट श्रमिकाच्या बाबतीत आहे तो जर का ज्ञान व्यवस्थेत शिरत असेल अस्तर शस्त्र व्यवस्थेत शिरत असेल किंवा व्यापारात फिरत असेल तर तो खरा महान !
आता यामध्ये स्त्रियांच्यावर पडलेली जबाबदारी ही घर व्यवस्थेची होती . आणि ती श्रमव्यवस्था होती हे आपण लक्षात घेतली पाहिजे . म्हणूनच स्त्रीला शूद्र दर्जा दिला गेला . प्रश्न असा आहे की मग अस्पृश्यांच्यातसुद्धा स्त्री ही दुय्यम का झाली ? याचा अर्थ असा की शैव व्यवस्थेत सुद्धा नंतर अनेक दुर्गुण शिरले आणि कळत नकळत याला जबाबदार जैन आणि बौद्ध यांचा प्रभाव आहे.
मानवी व्यवस्थेत स्त्रीलिंग आणि पुल्लिंग हे स्पष्ट असले तरी संसार हा नपुसकलिंगी आहे साहजिकच त्याला हाताळण्याचे हक्क कसे आणि कुणाला दिले गेले हा प्रश्न निर्माण होतो.
लिंगाभ्यास (जेंडर स्टडीज )आणि शैव श्रुती २ श्रीधर तिळवे नाईक
पाश्चात्त्य देशांमध्ये साधारणपणे जेंडर स्टडीज हा सेकंड वेव फेमिनिझम पासून सुरू झाला असे मानले जाते . साठोत्तरी पिढीने जे काही प्रकल्प पाश्चात्त्य देशात आणले त्यापैकी एक जेंडर स्टडी चा प्रकल्प आहे . सर्वसाधारणपणे काम, अर्थ आणि मोक्ष या तिन्ही पातळीवर भेद आणि विषमता ही फक्त वर्ग, वर्ण ,जात यांच्या पातळीवर असत नाही तर ती लिंग पातळीवर सुद्धा असते हे याचे आद्य गृहीतक आहे मग भेद कुठे आहे आणि विषमता कुठे आहे हे शोधण्याची जबाबदारी साहजिकच या अभ्यासकांच्यावर पडली मुळातच त्याआधी जो पुरोगामी आणि आधुनिक विचार प्रणालींचा जीवन प्रणालींचा या काळामध्ये धुमाकूळ चालू होता त्यामध्ये प्रत्यक्ष मध्ये बायकांच्या अनुभवांचा बायकांच्या हितसंबंधांचा आणि बायकांच्या ओळखीचा त्यांच्या अस्मितेचा कसलाही गहन विचार झालेला नव्हता असे काही स्त्री विचारवंतांना लक्षात आले आणि त्यातूनच मग हे असे का झाले असेल असा प्रश्न निर्माण होऊन या संपूर्ण पुरोगामी आणि आधुनिक जीवन प्रणालींची खोल चौकशी केली पाहिजे त्यांचे डी कन्स्ट्रक्शन केले पाहिजे असे त्यांना वाटू लागले आणि ही सगळी चौकशी उत्तर आधुनिकतेच्या टायटल खाली हळूहळू प्रचलित होत गेली. सातत्याने कायमच पुरुष केंद्री विचार होत राहिल्याने स्त्रियांच्यासाठी चूल आणि मूल बाई आणि आई हीच क्षेत्रे वाट्याला येत राहिली म्हणजेच युरेशियन डिस्कोर्स संदर्भात सांगायचे तर बायकांचा विचार कायमच शूद्रांचा विचार म्हणूनच केला गेला जगात जवळजवळ सर्वत्रच बायकांचे स्थान हे प्रतिष्ठित गुलाम किंवा शूद्र असे होते . समाजाचा अभ्यास करणारे लोक सुद्धा पुरुषच असल्याने त्यांना बायकांचा विचार करण्याची गरज भासली नाही . साहजिकच या समाजशास्त्राला जेंडर ब्लाइंड सोशॉलॉजी म्हटले गेले ज्याने मानव अभ्यासामध्ये अनेक गाळलेल्या जागा निर्माण केल्या आणि त्यामुळे आकलन अपूर्ण राहिली. साहजिकच या गाळलेल्या जागा भरण्यासाठी हा प्रकल्प सुरू झाला. या गाळलेल्या जागा फक्त स्त्रियांच्या बाबतीत नव्हत्या त्या दलितांच्या बाबतीत सुद्धा होत्या आणि त्यांचा अभ्यास आधीच सुरू झाला होता विशेषता बाबासाहेब आंबेडकरांनी यामध्ये फार चांगले योगदान दिले होते. आंबेडकरांना हे पूर्ण माहीत होते की स्त्रिया या दलितांच्या हून सुद्धा अधिक पीडित आहेत त्यामुळे त्यांनी समाजाच्या पुरोगामीत्वाची आणि प्रगतीची व्याख्या करताना स्त्रिया ह्याच मोजमापनाचे मूल्य असले पाहिजे अशी एक मूल्य मापन कसोटीच दिली प्रश्न असा होतो की मग प्रवर्ग म्हणून स्त्रियांना स्वतंत्र प्रवर्ग द्यावा की नाही ? म्हणजेच दिसते ते असे की एका बाजूला आपणाला मार्गी ,देशी ,पोटी आणि जमाती असा एक सांस्कृतिक अक्ष निवडावा लागतो तर दुसऱ्या बाजूला ओपन , ओबीसी , बीसी आणि आदिवासी असा दुसरा सामाजिक अक्ष निवडावा लागतो आणि आपणाला मग असे बघावे लागते की ओपन मध्ये ओपन स्त्रियांच्या साठी काही स्पेशल राखीव जागा निर्माण कराव्यात का ? किंवा ओबीसींच्या मध्ये स्त्रियांच्या काही राखीव जागा निर्माण कराव्यात का ? म्हणजेच प्रवर्गाखाली आपण जेव्हा आरक्षण देतो तेव्हा आपणाला प्रत्येक जाती जमातीच्या आरक्षणामध्ये स्त्रियांना पुन्हा उप आरक्षण द्यावे लागते . हे आरक्षण समजा जर का 50% लोकसंख्या असल्यामुळे आपण 50% केले तर ते परवडणारे आहे का ? जर लोकसंख्येचे तर्कशास्त्र आपण राखीव जागांच्या साठी लावत असू तर मग स्त्रियांच्या लोकसंख्येसाठी आणि स्त्रियांच्या आरक्षणासाठी ते का लावू नये ?
लिंगाभ्यास सुरू झाला की अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू होते कारण आपण या प्रश्नाकडे पुरेशा गांभीर्याने पाहिलेले नाही बाकी जाऊ द्या आपल्याकडे अजूनही स्त्री रक्षण प्रश्न हा सर्वात मोठा प्रश्न बनून राहतो . युरेशियन वर्ण व्यवस्थेमध्ये स्त्री ही मुलगी असेल तेव्हा तिचे रक्षण करण्याची जबाबदारी वडिलांची , तरुण असेल तेव्हा या रक्षणाची जबाबदारी भावांची आणि पतीची पतीच्या भावांची आणि ती म्हातारी झाली तर तिच्या रक्षणाची जबाबदारी तिच्या मुलांच्यावर टाकलेली आहे . प्रश्न आहे की आजच्या काळामध्ये अशाप्रकारे जबाबदारी पेलता येईल का ? अनेकदा होते काय की ही जबाबदारी आपल्यावर आहे अशी जाणीव पुरुषमेंदूवर बिंबवली जाते शैव श्रुतीमध्ये या संदर्भात थोडी जबाबदारी स्त्रीवर पण टाकलेली आहे आणि स्त्रियांना शस्त्र चालवणे शिकवले गेले पाहिजे त्यांना संरक्षण करता आले पाहिजे अशी धारणवृत्ती आहे साहजिकच मार्शल आर्ट शिकणे हे अनिवार्य होते
युरेशियन श्रुतीमध्ये मनुस्मृतीचा पगडा असल्याने तिला प्रतिकारासाठी सशस्त्र करणे हे अमान्य आहे . साहजिकच तिच्या रक्षणाची जबाबदारी लग्नापूर्वी भावावर आणि लग्नानंतर पतीवर येते आणि मग भाऊ - बहिणीच्या रक्षणासाठी पती-पत्नीच्या रक्षणासाठी म्हणून बहिणीवरच पत्नीवरच काही बंधने टाकायला लागतो कारण जर का बहिणीचे पत्नीचे रक्षण करण्यामध्ये तुम्ही अयशस्वी झाला तर तुमची समाजामध्ये प्रचंड खिल्ली उडवली जाते . अनेकदा तर अल्फा मेल नावाची जी संकल्पना आहे ती बायकांना आवडण्याचे एक मोठे कारण अल्फामेल संरक्षण करतो अशी त्यांची धारणा असते आणि भल्याभल्या शिकलेल्या सुशिक्षित बायकांना अल्फा मेल आवडतात ते केवळ यामुळेच कारण त्यांना सुद्धा शारीरिक पातळीवर अशा प्रकारचे संरक्षण आवश्यक वाटते .
वास्तविक रक्षणाची जबाबदारी ही आता काही घरापूरती म्हणजेच काम या अक्षाभोवती राहिलेली नाही तर ती अर्थ या अक्षाभोवती समाजाभोवती फिरलेली आहे आणि अर्थ या जीवनार्थामध्ये ही जबाबदारी पोलिसांच्यावर टाकलेली आहे. प्रत्यक्ष जर पुरुषांची मानसिकता आपण तपासली तर तिथे मात्र अजूनही पारंपारिक जबाबदारी त्याला उचलावी लागते . अगदी घरामध्ये स्त्री आणि पुरुष समानता असून सुद्धा अनेकदा ही जबाबदारी पडते .
हे रक्षण अशक्य झाले तर मग त्याची जबाबदारी कोण घेणार ? साहजिकच मग पोलिसांच्या नावाने ठणांना सुरू होते कारण त्यांची ती जबाबदारी आहे पण त्याचबरोबर जर का कुटुंबातल्या पुरुषांनी या संदर्भात काही ढील दिली असेल तर त्या ढिल देण्याच्या प्रक्रियेचा अत्यंत कठोर भाषेत समाचार घेतला जातो.
हंकारे यांच्यासारखे काही लोक तर थेट परंपरेतच घेऊन जातात आणि मुळात समानतेचा मुद्दा घरात पोचलेलाच नसल्याने पारंपारिक घरात वाढलेल्या पुरुषांना ते थोर विचारवंत वाटायला लागतात .
आता अशा वातावरणामध्ये जिथे अजून संरक्षणाचा ही प्रश्न सुटलेला नाही तिथे जेंडर स्टडी अधिक व्यापक कसा बनवायचा ? यापुढे जाऊन मग असा प्रश्न निर्माण करता येतो की संरक्षणाचा प्रश्न फक्त स्त्रियांच्या पुरता आहे का आणि मग आपल्या लक्षात येते की हा प्रश्न संपूर्ण मानव जातीचाच प्रश्न आहे. विधी नियम संविधान पाळणाऱ्या माणसाचे संरक्षण होणार आहे की नाही असा हा मूळ मुद्दा आहे .
यामध्ये काय झाले आहे ते पहा झाले असे की ब्रिटिश लोकांनी नवीन कायदे करून हिंदुस्तानी लोकांना पूर्णपणे नि:शस्त्र केले आणि त्यांची सर्व शस्त्रे जी घरात पुरुषांच्या स्त्रियांच्या संरक्षणासाठी होती ती काढून घेतली . हे नि: शस्त्रीकरण संरक्षणाच्या संदर्भात महागात पडले काय ?
अलीकडच्या काळामध्ये एक फार मोठा बदल जो घडलेला आहे तो ध्यानात घेण्याजोगा आहे हा बदल म्हणजे काही प्रदेशांच्यात घराघरांमध्ये अलीकडे तलवारी आणि परवडत असतील तर कच्च्या बंदुका किंवा गन ज्यांना कट्टा म्हटले जाते आलेल्या आहेत. म्हणजे पोलिसांच्या वर ते संरक्षण करतील अशी गॅरंटी सामान्य माणसांना उरलेली नाही का हा प्रश्न आता सरकाराने स्वतःला विचारले पाहिजे . विशेषतः अतिरेकी लोकांचा जो प्रश्न आहे तो तर या संदर्भात अधिक जोडला गेला पाहिजे . मुळातच कोण अतिरेकी निघेल हे आता सांगता येत नाही कोण हल्ला करेल ते आता सांगता येत नाही अशावेळी मी माझ्या संरक्षणासाठी शस्त्र बाळगले तर ते कसे काय चुकीचे असा प्रश्न काही सामान्य लोक सुद्धा विचारू लागलेले आहेत . एका बाजूला नक्षलवादी लोकांचे निशस्त्रीकरण आणि दुसऱ्या बाजूला सामान्य माणसांच्या मनात वाढत चाललेले शस्त्रीकरण अशा एका प्रचंड विरोधाभासामध्ये आपण सध्या वावरत आहोत. याला एक मोठे कारण असेही आहे की गुंड संघटित होत आहेत आणि अनेकदा त्यांच्याकडे अधिक आद्य यावत शस्त्रे आलेली दिसतात आणि सभ्य माणसे संविधान पाळणारी माणसे मात्र सतत सर्वत्र विखुरलेली दिसतात. साहजिकच या माणसांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांच्यावर येते . गुंड आणि पोलीस यांच्या मधला फरक आता असा आहे की गुंड कधीही केऑस निर्माण करू शकतात कारण त्यांना परमिशनची गरज नाही पण पोलिसांना मात्र कायदेशीर अनुमती लागते तिच्यामध्ये होत असलेल्या विलंबनामुळेच मग अचानक एन्काऊंटर करण्याचा नवा प्रयोग करण्यात आला . हे जे वातावरण आहे त्याचा सर्वाधिक फटका स्त्रियांना पडलेला दिसतो . कारण हे जे शस्त्र धारी गुंड आहेत त्यांच्या अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढत गेले आणि आजही पोलिसांना त्यांचा मुकाबला कसा करायचा हा प्रश्न पडत असतो . यावर उपाय अर्थातच सुचवला गेला की पोलिसांची शस्त्रे ही नेहमीच सैन्य दलाप्रमाणे आद्ययावत करत राहणे . काही अपवादात्मक न्यायाधीश कायदेशीर कारवाई सुद्धा फास्ट करायला लागलेले दिसतात कारण कधी कधी गुंड त्याच लायकीचा असतो .
ही चर्चा करण्याचे कारण म्हणजे स्त्रियांचे प्रश्न स्वतंत्र काढणे प्रत्येक वेळेला परवडेलच असे नाही अनेकदा हे प्रश्न एकंदरच मानवाचे प्रश्न आहेत आणि त्यामुळेच ते स्त्री आणि पुरुष अशा दोघांचेही आहेत.
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment