नाव ठेवण्याचे उद्योग आणि युरेका डेकॅथलॉन 


माझ्या एका जुन्या मित्रांने तू युरेका हे नाव बदलून डे कॅथलोन हे नाव का निवडले असा प्रश्न विचारलाय 


जवळजवळ 1992 पर्यंत मी १ गझल २ अफवा ३ युरेका ४ महानुभव या चार नावांचा विचार करत होतो म्हणजे गझलचे चार खंड काढायचे अफवाचे दोन खंड काढायचे युरेकाचे दहा खंड काढायचे आणि महानुभवचे तीन खंड काढायचे असे हे प्लॅनिंग होते यातील अफवा हा नंतर एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार म्हणून आल्याने प्रश्न मिटला खरे तर काव्यसंग्रहाला काय नावे द्यायचे हा माझ्या पुढे कायमच प्रश्न असतो कारण तुमच्या कवितांचे संपूर्ण सत्व त्या काव्यसंग्रहाच्या नावामध्ये उमटलेले असते आणि मी इतक्या विविधतेत नांदणारा कवी आहे की नावामध्ये सगळं कसं मॅनेज करायचा हा फार मोठा प्रश्न असतो 


युरेका हे नाव मी ठेवले होते कारण मला कविता सापडली होती आणि माझ्यासाठी तो अतिशय आनंदाचा क्षण होता त्यातून ते नाव ठेवले परंतु सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या केरीज खेरीज त्यामागचा इतिहास अनेकांना माहित नाही असे माझ्या लक्षात आले शिवाय दहाच्या दहा खंडांना कसे काय युरेका हे नाव द्यायचे असा प्रश्न निर्माण झाला युरेका मधून आशयाच्या 10 दिशा दिसत नव्हत्या मला एक असे नाव हवे होते जे माझ्या कवितेतल्या आशयाच्या धाई दिशा व्यवस्थित प्रकट करेल आणि त्यासाठी क्रीडा क्षेत्रातील डे कॅथलॉन म्हणजे ऑलम्पिक मधली दहा क्रीडा प्रकारांची सर्वोत्कृष्ट क्रीडापटू ठरवणारी रेस जी माझ्या अतिशय आवडीची होती नाव म्हणून समोर यायला सुरुवात झाली 


युरेका हा शब्द निवडण्याचे कारण मला माझी कविता सापडली म्हणून उत्स्फूर्तता दर्शवण्यासाठी युरेका हा शब्द निवडला होता पण पुढे कविता हळूहळू काय आहे ते स्पष्ट होत गेल्या आणि कवितांचे दहा खंड होत आहेत आणि प्रत्येक खंडामध्ये सुद्धा किमान दहा डायमेन्शन्स आहेतच हेही स्पष्ट होत गेले त्यामुळे शेवटी असा विचार केला की आपण डे कॅथलॉन हेच नाव ठेवावे त्यामुळे हे नाव ठेवले 


१ बाळबोध कविता 

२ डेकॅथलॉन (खरे तर इथे इंट्रो असा शब्द घालणार होतो परंतु तो घातला नाही कारण तो अनेकांना विचित्र वाटला)


३ डेकॅथलॉन रियल


४ डेकॅथलॉन सररियल


५ डेकॅथलॉन ट्रान्सरियल 


६ डेकॅथलॉन वर्ड्स  


७ डेकॅथलॉन लोकल 


८ डेकॅथलॉन अनकॅटगरीकल किंवा टोटल 


९ डेकॅथलॉन एलसेट्रा 


१० एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार


अशा या दहा डायमेन्शन्स आहेत यातील निर्वस्तूवादी कविता डेकॅथलॉन वर्ड्स मध्ये टाकल्या नाहीत त्याचे कारण वेगळे आहे या कवितांचा मधला flow हा कोल्हापुरापुरता मर्यादित नाही नंतरही मुंबईत जवळजवळ ९२ ९३ पर्यंत कंटिन्यू राहिलेला आहे आणि शेवटी तिला चॅनेल निर्वस्तू अशा नावाने फाईल करून टाकले गेले कारण बाकीच्या सर्व कविता या कोल्हापूरशी निगडित आहेत आणि त्या कोल्हापूरच्या अवकाशातच संपतात त्यांना मुंबईचा अवकाश लाभत नाही किंवा लाभला तर कोल्हापूरचा विजिटर म्हणून लाभतो पण असा विजिटर म्हणून अवकाश लाभणे मी माझ्या गोव्याच्या गावात पण जातो अनेक गावात जातो तेव्हा पण लाभतो पण मूळचा जो इसेन्स आहे तो कोल्हापुरी राहतो पण अशा कवितांची संख्या अतिशय अल्प आहे माहित नाही का पण निर्वस्तू वादी कवितांच्यात एक वेगळा फ्लो मुंबईत सुद्धा कंटिन्यू राहिला आणि त्यातल्या काही कवितांच्यावर मुंबईचा निश्चितपणे गाढ संस्कार आहे त्यामुळे शेवटी त्या चॅनेल निर्वस्तूमध्ये टाकून दिल्या 


या काळामध्ये 1992 93 पर्यंतच्या कवितांना मी महानुभव या टायटल खाली आणले होते कारण माझ्यासाठी महानुभव हा शब्द मराठी परंपरेत फिट बसणारा होता आणि तरीही ते नाव मी मला वेगळ्या पाहिजे त्या पद्धतीने वापरू शकत होतो माझ्यासाठी महानगरीचा अनुभव तो महानुभव असा अर्थ मी निश्चित केला होता आणि जर का तो काव्यसंग्रह त्या वेळेला आला असता तर मी नक्कीच प्रस्तावनेमध्ये हे सर्व मांडणार होतो परंतु तो संग्रह आलाच नाही पुढे त्याचे नाव कोल्हापूर ते व्हाया कविता असेही झाले पण तरीही त्यासाठी आवश्यक असणारा पैसा त्या काळामध्ये उभा राहिला नाही त्या काव्यसंग्रहाची जाहिरात सुद्धा आलेली होती मुळात कुठल्या कविता टाकाव्यात कुठल्या टाकू नयेत कोल्हापूर मधल्या कविता टाकाव्यात की नाही टाकाव्यात असे बरेच काही त्या काळामध्ये चाललेले होते कारण प्रकाशक कोल्हापूरचे होते त्यामध्ये सुरुवातीला १९८२ ते १९९२ ९३ असा कालखंड ठरला नंतर खूपच संग्रह मोठा होणार असे वाटायला लागले म्हणून मुंबईतल्या कविता घ्याव्या असे ठरु लागले त्यामुळे १९८८ ते १९९२ पर्यंतच्या कवितांचा समावेश करावा असे निश्चित व्हायला लागले पण या कवितांच्या मधला सत्वांचा जो फ्लो होता तो काही थांबला नाही तो पुढे कंटिन्यूस राहिला त्यातल्या अनेक कविता पुढे क.व्हीं स्त्री वाहिनी चॅनेल अंडर द वर्ल्ड चॅनेल डिस्ट्रॉयरी या काव्यसंग्रहामध्ये आलेल्या आहेत पण नंतर त्या सत्वाशी जोडल्या गेलेल्या आणखीही काही कविता लिहिल्या गेल्या आणि त्यांचीही भर टाकण्यात आली आणि शेवटी चॅनेल सिरीज च्या अंडर ते संग्रह प्रकाशित झाले. त्यातले काही अर्थात अजून बाकी आहेत कुठल्याही लेखकाचे साहित्य हे प्रवाहासारखे वाहत असते कवितासंग्रह काढणे म्हणजे किंवा कथासंग्रह काढणे म्हणजे प्रवाह एका पुडीत बांधण्यासारखे असते या काव्यसंग्रहाच्या वेळी हा अनुभव मला प्रचंड प्रमाणात आला काहीच कळत नव्हते म्हणजे काय बांधावे आणि काय सोडावे हे समजत नव्हते बहुदा माझ्या गोंधळामुळे सुहास एकसंबेकर सतीश पाध्ये या माझ्या मित्रांना भरपूर त्रास झाला असावा असो हा सगळा प्रश्न पुढे पॉप्युलर प्रकाशनाने १९९९ साली कव्हीं अडा हॉ का बा ना सुना ठाणे मार्गी आणि देशी ही तिन्ही पुस्तके स्वीकारून सोडवला खरे तर मी अस्मिता दुभाषी हिचा त्यामुळे नेहमीच आभारी असतो माझा या काळातला गोंधळ तिच्यामुळेच संपला आणि मी एका निश्चित निष्कर्षापाशी पोहोचलो हे मान्य करावे लागेल मुळातच प्रकाशनाला लागलेला पैसा नीट उपलब्ध न होणे हे याचे सर्वात मोठे कारण होते असो 


चॅनेल सिरीज मधले सर्वात मोठे टर्निंग पॉईंट जसे मुंबई शहर आहे तसेच ज्ञ चे आगमन पण आहे माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये मी फक्त एका स्त्रीच्या प्रेमात पडलो आणि ती ज्ञ होती आत्तापर्यंत माझा मोक्ष हलवणारी स्त्री माझ्या आयुष्यात आलेली नव्हती एका अर्थाने काही काळ माझा विश्वामित्र झाला म्हणायला हरकत नाही सुदैवाने मी ढळलो नाही माझी मेनका अष्टपैलू होती मी जितका तिच्या शरीराच्या प्रेमात होतो त्यापेक्षा अधिक मी तिच्या बुद्धिमत्तेच्या आणि भावना शिल आवेगाच्या प्रेमात होतो माझ्या संपूर्ण आयुष्यात इतकी शार्प पोरगी कुठली आली नव्हती त्यामुळे अर्थातच कोंडी खूप झाली अप्सरा या अप्सराच असतात त्या एका जागी थांबत नाहीत त्या स्वतःचे नवे नवे स्वर्ग (कि नरक?) शोधत जातात माझी मेनका काही याला अपवाद नव्हती शिवाय ती स्वयंपूर्ण होती स्वतःची प्रतिसृष्टी निर्माण करण्याची तिची ताकद विलक्षण होती ती इंद्राचे नाही तर इंद्रियांचे ऐकत होती त्यानंतर मात्र मी असा तीव्र कधी प्रेमात कोणाच्या पडलोच नाही पडलो तरी पण मोक्ष हलवावा अशी ताकद कोणातच नव्हती ज्ञ माझ्या आयुष्यातला एक फार मोठा चमत्कार होता हे मान्यच करावे लागेल खरे तर माझ्या कवितेला तिने पराजित केले आहे कारण आमच्या दोघांच्यातले अनेक क्षण कधीही कवितेमध्ये आले नाहीत विशेषतः आनंदाचे आणि इंटेन्सिटीचे अनेक क्षण भाषा नावाच्या बाईला काय पकडता आले नाहीत ते निसटले या नात्याच्या सपाटीकरण्याच्या अनेक शक्यता सतत माझ्यासमोर आल्या पण मी या सपाटीकरणाला कायमच नकार दिला कारण चौथ्या नवतेमधली सगळी गुंतागुंत या नात्यांमध्ये होती दुर्दैवाने पेजरवरील मिस कम्युनिकेशन , दोघांचेही स्वभावदत्त दोष (या नात्यांमध्ये माझ्या स्वभावामध्ये किती दोष होते याची मला नीट कल्पना आहे ते प्रचंड आहेत ) , संबंधांच्या स्वर्गातून संबंधांचा निर्माण झालेला नरक आणि मुख्य म्हणजे बांधकाम चालू आहे यावर झालेला गोंधळ आणि त्या गोंधळात भर टाकणारे दिलीप चित्रे यांच्यापासून अनेकांचे उद्योग त्यामुळे या प्रेम प्रकरणाचा अंत झाला पण कळत नकळत मुंबई वेगळी काढणे मुंबईतल्या कविता वेगळ्या काढणे अशी एक प्रोसेस या निमित्ताने घडली आणि कोल्हापुरातल्या कविता आपल्याला मागे सोडाव्या लागतील हेही अधिक स्पष्ट होत गेले त्या प्रकाशित करायला माझा संपूर्ण पाठिंबा कधीच नव्हता त्या काढल्या हे चांगले झाले की वाईट हे आजही मला ठरवता येणे कठीण आहे केवळ दिलेल्या वचनापोटी त्या काढल्या गेल्या पण या घडामोडीमुळे युरेका वगैरे सर्व नावे मागे पडत गेली एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार या काव्यसंग्रहाच्या वेळेला मी फारसा नावांच्या बाबत जागृत नव्हतो पण आता मात्र आपल्याला नीट विचार करावा लागेल असे मला वाटायला लागले कारण खूपच मित्रांनी तू फार चुकीचे नाव ठेवलेस असे मला सांगितले त्यात अरुण म्हात्रे प्रमुख होता आणि काही प्रमाणामध्ये भुजंग मेश्राम ! दोघांच्याही मते मी अफवा किंवा युरेका किंवा प्रिझम हेच नाव ठेवायला हवे होते ते वैयक्तिक पातळीवर प्रिझम या नावाच्या फेवर मध्ये होते माझा मुद्दा हे नाव सर्व काही स्पष्ट करत नाही असा होता अर्थात नाव ठेवले गेल्यानंतरचा हा युक्तिवाद आहे आणि त्याला फारसा अर्थ नव्हता पण मुंबईच्या कमर्शियल दुनियेत नाव किती महत्त्वाचे असते हे मला ह्या वाद विवादातून अधिक चांगले कळले पुढे जेव्हा मग कोल्हापूरच्या कविता प्रकाशित करायच्या असे ठरले तेव्हा युरेका हे नाव मागे पडले आणि सर्व गोष्टींना सामावून घेईल असे डेकॅथलॉन हे नाव पुढे आले मुख्य म्हणजे माझ्या कवितांचे १० आयाम हे या निमित्ताने पुढे यावेत अशी जी सत्व प्रणाली होती ती इथे नावात प्रकट झाली

सर्वांनाच माहित आहे की डे कॅथलॉन हा क्रीडा प्रकार आहे आणि हा प्रकार उत्क्रांत होत १९१२ मध्ये आधुनिक फॉर्ममध्ये तयार झाला आणि त्यामध्ये 100 metres, 400 metres, 1500 metres, 110 metre hurdles, long jump, high jump, pole vault, discus throw, javelin throw, and shotput.

अशा दहा क्रीडा प्रकारांचा समावेश होतो साहजिकच याचे आकर्षण वाटणे अटळ होते डेकॅथलॉन मधील दहा क्रीडा प्रकाराचा आणि माझ्या कवितांचा काय संबंध आहे याविषयी मी आरामात लिहू शकतो परंतु प्रत्येक गोष्ट मी सांगत बसणे हे योग्य नव्हे अर्थात काही इंडियन पर्याय सुद्धा उपलब्ध होतेच

उदाहरणार्थ दशमुखी दशानन वगैरे सुद्धा नावे पुढे आली होती पण डेकॅथलॉन या नावाला जो ग्लोबल सेन्स होता ज्याच्याशी या कवितांचा खूप खोलवर संबंध आहे तो इतर नावांना आहे असे वाटले नाही शिवाय एका गजलेच्या प्रकाराला मी दशांनन असे नाव दिलेले होते त्यामुळे संपूर्ण कवितासंग्रह मालिकेलाच नाव कसे काय द्यायचे असा प्रश्न आला शिवाय डेकॅथलॉन या नावातून ग्रीक मूळ असलेल्या आणि आता जागतिक बनलेल्या क्रीडा संस्कृतीबद्दल मला असलेला आदर व्यक्त होत होता जो मला हवा होता कारण ऑलम्पिकमध्ये आता डेकॅथलॉन हा प्रकार पूर्णपणे जागतिक क्रीडा प्रकार म्हणूनच रुजलेला आहे आणि जागतिकीकरणाच्या काळामध्ये मला त्यामुळेच तो अतिशय भावला मला वाटते इतके स्पष्टीकरण पुरेसे आहे 


काही देशीवादी लोकांना असे वाटते की परंपरा पूर्णपणे माहीत असलेल्या माणसाने इंग्रजी नावे देऊ नयेत पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की शेवटी देशी वादाला मर्यादा आहेत परंपरेला मर्यादा आहेत म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर का जाल असे नाव दिले तर त्यातून इंटरनेटचा सेन्स निर्माण होत नाही पण त्या उलट तुम्ही जर का नेट सिरीज किंवा चॅनेल सिरीज असे म्हटले की ताबडतोब या सगळ्याचा संबंध चिन्हसृष्टीशी आहे हे स्पष्ट होते जर तुमची परंपराच एकमुखी बनायची सक्ती करत असेल तर तुम्हाला दशमुखी बनावे लागते आणि हे बनवताना संपूर्ण जागतिक संस्कृतीची मदत होत असते तेव्हा एखादी गोष्ट दुसऱ्या संस्कृतीत आहे म्हणून ती आयात करायची नाही हे माझ्या तत्त्वज्ञानात कधीच बसले नाही त्यामुळेच माझ्या काव्यसंग्रहाच्या सिरीजची नावे बिंदासपणे मी इंग्लिश ठेवत असतो कारण त्यातूनच सत्व व्यक्त होते 


आता तुम्ही जर का कट्टर देशीवादी कट्टर सनातनी वगैरे असाल तर तो तुमचा प्रश्न आहे माझा नाही आणि माझ्या कवितांचा पण नाही अनेक कट्टर सनातन वगैरे असणारे लोक आपली पोरे व्यवस्थित इंग्लिश मीडियम मध्ये टाकत असतात किंवा मराठीत देशीवाद मांडत असताना इंग्लिशची किंवा इंग्लिश मध्ये लेक्चरशिप करत असतात आणि कधीकधी इंग्लिश डिपार्टमेंटस बंद झाली पाहिजे असे सांगत असतात हा माझा अनुभव आहे असो दुतोंडीपणा हे भारतीय संस्कृतीचे सर्वात मोठे लक्षण झालेले आहे मला असे करण्याची गरज वाटत नाही मी स्पष्ट सांगतो की मी पृथ्वीवर उभा आहे आणि अख्खी पृथ्वी कवेत घेणे हे माझ्या कवितेचे माझ्या कलेचे माझ्या तत्त्व ज्ञानाचे माझ्या दर्शनाचे नैतिक आणि मोक्षिक कर्तव्य आहे असे मला वाटते हे कर्तव्य युरेका या शब्दापेक्षा डेकॅथलॉन या शब्दांमध्ये अधिक चांगल्या रीतीने व्यक्त होते आणि म्हणूनच हे नाव निवडले गेले.


श्रीधर तिळवे नाईक


(कवितेच्या शोधात या अप्रकाशित पुस्तकातून)

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे