शिवशक्ती विवेक तंत्र श्रीधर तिळवे नाईक
१ इंद्रियांना रूप गोचर होते इंद्रिय मेंदूला गोचर होतात मेंदू प्राण लिंगाला गोचर होतो प्राणलिंग कोणालाही गोचर होत नाही
२ प्राणलिंग म्हणजे शरीरामध्ये असलेला प्राण आणि त्याच्या मर्यादा कारण तो शारीरी असतो मात्र तरीही तो शिवाचा भाग असतो
३ रूपाला रंग असतो रूपाला आकार असतो सूक्ष्म अथवा स्थूल अथवा मध्यम अथवा प्रचंड ! रूप लघु असते किंवा दीर्घ असते इंद्रिये त्यांना इंद्रियतात गोचरतात आणि मायेत सापडली की गोंजारतात
४ इंद्रिय संवेदनशील असतात किंवा संवेदन बधिर डोळस असतात किंवा आंधळी तीक्ष्ण असतात वा बावळी तरीही मेंदू जाणण्याचा प्रयत्न करतो आणि मेंदू द्वारा प्राणलिंग जाणत असते जाण एकप्राण असते
५ चित्त जाणीव आणि जाण यांनी युक्त असते मन असोशी आस आणि आसक्ती यांनी युक्त असते बुद्धी सतर्क ,तर्क आणि कुतर्क यांनी युक्त असते अंत:करण मज्जा जिच्यात मेंदूही येतो , चित्त , मन , स्मृती , अहम यांनी युक्त असते हे अंतकरणच श्रद्धा आणि अश्रद्धा , इच्छा आणि अनिच्छा, काम आणि अकाम , निश्चय आणि अनिश्चय , दृढता आणि चंचलता , भय आणि धैर्य , विवेक आणि अविवेक , आकलन आणि अनाकलन यासारख्या लाटांना निर्माण करत असते कणांना निर्माण करत असते लाटा उठतात ओसरतात त्यांच्या तालावर अवयव नृत्य करतात
६ संसार शिवशक्तीचे नृत्य आहे महाप्राण म्हणजे त्यांचे समर्याद शरीर होय तेच शरीर लिंग म्हणून शरीरमर्यादेत सूक्ष्म शरीर म्हणून उपस्थित असते आणि जीवाला शिव आणि शक्ती पुरवत राहते
७ विवेक म्हणजे मोक्षानंतर प्राप्त झालेली संसारात सार काय आणि असार काय हे ठरवणारी जागृत वृत्ती ! ती मेंदूला समतोल देते आणि मोक्ष मिळालेला नसतो तेव्हा मेंदूला तोल देण्याचा प्रयत्न करत असते. कधी तोल साधतो कधी तोल साधत नाही मोक्षाानंतर मात्र विवेक समतोल होऊन जातो
८ प्राण शरीरात उगवतही नाही मावळतही नाही तो कमीही होत नाही तो जास्तही होत नाही तो संपूर्ण शरीराला प्रकाश देत राहतो जाणीव देत राहतो जाण देत राहतो त्याला ना अवयव लागतात ना त्याला ग्रंथी लागतात तो स्वयंचलित असतो
९ तिसरा डोळा म्हणजेच साक्षी झालेला लिंग प्राण होय
१० बाह्य करण म्हणजे इंद्रिय , ग्रंथी आणि अवयव यांनी सिस्टीम तयार करून केलेला विचार, प्रचार, प्रसार , साकार ,आचार, प्रतिकार, आणि व्यवहार होय .
११ प्राण लिंगाचे घनरूप म्हणजे अस्तित्व होय द्रवरूप म्हणजे असणे होय आणि वायुरूप म्हणजे श्वासणे होय
१२ अहम स्मृतीच्या तालावर नृत्य करायला लागला की मद बनतो मद मत बनवायला लागतो ही मते कधी आकलन देतात कधी अनाकलन देतात पण प्रत्यक्ष जे जसे आहे ते पाहायला देतातच असे नाही यातूनच पूर्वग्रह तयार होत जातात अहम आणि पूर्वग्रह यांनी मिळून अहंकार बनतो . शक्ती जेव्हा या अहंकाराच्या मागे उभी राहते त्याला बल पूरवत राहते तेव्हा अहंकार माज बनतो
१३ स्मृति बिम्ब रूप असते ठसा रूप असते छाया रूप असते आणि चिन्ह या तिन्ही रूपाने युक्त असते तेही स्मृतीचा भाग असते विचार म्हणजे ॲक्टिव्ह झालेली स्मृती होय . जेव्हा हा विचार चित्ताच्या तालावर नसतो तेव्हा आकलन निर्माण होते अन्यथा स्मृती मधून स्मृतीकडे असाच प्रवास सुरू राहतो . अहंकार कायमच प्राण लिंगाला तप्त करत राहतो
१४ पिंड म्हणजे जन्मदत्त शरीर ,स्मृती , मन , चित्त , अहम , प्रतिभा , क्रिया शक्ती , क्षमता , आरोग्य, आयु , स्थिती , गती आणि जीवद्रव्य व त्याची रचना
१५ प्राणलिंग , पिंड , अंतकरण आणि बाह्य करण यांच्याद्वारे शक्ती त्या जीवाचा कारभार चालवत असते संसार चालवत असते ज्या क्षणी हा संसार चालवणे अशक्य बनते त्या क्षणी हा संसार मोडीत काढला जातो . प्राणलिंग महाप्राणात विसर्जित होते
१६ प्राण लिंगाद्वारे पिंड ऍक्टिव्हेट करत राहतो एकदा का चार्जिंग संपले ते प्राणलिंग विसर्जित होते
१७ शक्तीने क्रियाशील बनवलेला प्राण म्हणजेच चेतना होय
१८ मद,अहंकार, माज यांच्याशी जेव्हा अंत: करण तादात्म पावते तेव्हा आसक्ती आवेगात्मक होऊ लागते आसक्ती विवेकाला बाजूला करते लुप्त करते सुप्त करते गुप्त करते आणि मग चित्त खाण्याचा प्रयत्न करते उरते फक्त मन, मनातले भाव ,भावनांच्या स्मृती अर्थातच चित्त कधीही खाता येत नाही पण आपण चित्त खाऊ शकतो असे मात्र आसक्तीला वाटू शकते असे वाटणे म्हणजेच आसक्तीभास होय . आवेग अनेकदा अपकृती निर्माण करतात भासकृती निर्माण करतात . आसक्ती जन्मदत्त पिंड किंवा कर्म दत्त संस्कार किंवा मद अहंकार अहम यांच्यामुळे निर्माण होते
१९ स्वप्नात अहंकार झोपतो पण प्राण पिंड जागा असतो जागृतीत अहंकार जागा असतो बेहोशीत अहंकार अर्धा गुप्त लुप्त सूप्त आणि अर्धा प्रकट आणि जागृत असतो
२० अंत: करणात स्वप्नात सुद्धा अहम उपस्थित असतो त्याने कमावलेली ओळख उपस्थित असते प्रतिभा आणि तिची कल्पनाशक्ती जागी असते संकल्पना आणि कल्पना जाग्या असतात कारण मन चित्त बुद्धी अहम क्रियाशील राहतात क्रियाशील राहतात
२१ प्रक्षेपण आणि विक्षेपण या शक्तीच्या दोन प्रकृती आहेत त्यातील प्रक्षेपणातूनच संपूर्ण संसार उभा राहतो त्याचे निर्माण होते सूक्ष्मजीवापासून अनेक ब्रम्हांडांच्या पर्यंत सर्व काही निर्माण होते प्रक्षेपणावेळी शिव लय प्राप्त करते विक्षेपणावेळी शिव प्रलय प्राप्त करते
२२ प्रत्येक जीव क्षेपणास्त्रासारखा प्रक्षेपित होतो आणि क्षेपणास्त्रासारखाच निक्षेपित होतो
२३ नाम म्हणजेच नाव आणि रूप असलेला प्रत्येक पदार्थ प्रत्येक सौष्ठव हे शिव आणि शक्ती यांच्या मधूनच निर्माण होते आणि ते अस्तित्व जाणीव आणि आनंद यांनी युक्त असतात आणि त्यांचे अंतिम स्वरूप हे समुद्रावरच्या फेसासारखे असते.
२४ अपराशक्ती ही दृश्य आहे ती पंचमहाभूतातून आणि अंत:करणांमध्ये वावरत असते. पराशक्ती ही नेहमीच अनंत असते इंद्रियांच्या कक्षांच्या कायमच पलीकडे राहते पार राहते हा संसार शक्तीनेच निर्माण केलेला आहे आणि संसाराचा आकार हा अपराशक्तीने निर्माण केलेला आहे तर पराशक्ती ही नेहमीच जीवाला मोक्षाकडे शिवाकडे बोट दाखवत राहते . अपराविद्या म्हणजे या समोर असलेल्या संसाराचे ज्ञान होय परा विद्या म्हणजे या संसाराच्या पलीकडे असलेल्या मोक्षाचे ज्ञान होय अपरा शक्ती आणि अपराण्या विद्या या नेहमीच जातकाला संसाराकडे त्याच्यातील प्रसंगाकडे घटनांच्या कडे घटनकडे खेचत असतात .
२५ प्राणलिंग नेहमीच साक्षी भावाने पहात असते प्राण हा साक्षी असतो आणि लिंग प्राणाच्या लगोलग असते लिंग हे नेहमीच मेंदूला मनाची उन्ननिर्मिती म्हणून काम करायला मदत करत असते. ही मेंदूची उन्न निर्मिती म्हणजेच आत्मा होय जो व्याकरणात स्वतःला मी म्हणून जिवंत ठेवत असतो . हा कधीच एक असत नाही तर अनेक असतो . प्राण मात्र नेहमीच महाप्राणाशी जोडलेला असतो किंबहुना महाप्राणाची लाट असतो . महाप्राणाचा अंश असतो .
२६. जेव्हा जीवात हे काल्पनिक व अनित्य असणारे आत्मे गळून पडतात हटतात तेव्हा सारे पडदे गळून पडतात आणि प्राण नग्न होतो
२७ आवृत्त असणारे आणि अनावृत्त असणारे सर्व भेद शिव आणि शक्ती यांच्यामध्ये असणारा भेद गळून पडतात हे भेद तिष्ठत असतात गळून पडण्यासाठी आणि मोक्ष मिळतो ते गळून पडतात कारण सर्वच भेद शेवटी आभासी असतात
२८ जे सगुण असते ते फक्त एकच असते शक्तीयुक्त असते जे निर्गुण असते ते शून्य असते ते शिव असते
२९ शिव आणि शक्तीने निर्माण केलेली ही संसाराची वर्तमानकालीन आवृत्ती जी आवृत्त म्हणजे झाकलेली आहे हे कळत नाही अचानक अनावृत्त होते आणि सर्व भेद गळून पडतात साक्षी भाव हा सुरुवात असतो आणि मोक्ष हा शेवट !
३० यामुळेच सर्ग म्हणजे आत्ताचा संसार स्पष्ट दिसायला लागतो या सर्गापासून तयार झालेला नि:सर्ग स्पष्ट दिसायला लागतो आणि या निसर्गापासून तयार झालेला पृथ्वी नामक संसर्ग स्पष्ट दिसायला लागतो . शक्ती अशा अनेक संसर्गांना जन्म देत असते मनुष्य याच सर्गापासून स्वर्ग तयार करतो किंवा स्वर्ग साधला नाही की आपोआप नरक बनतो स्वतःचा सर्ग म्हणजे स्वर्ग होय (इंग्लिश मध्ये सर्ग या शब्दासाठी phenomenon हाच प्रतिशब्द योग्य आहे )
३१ जगातील प्रत्येक वस्तूला सत्व म्हणजेच नाम, रूप, अस्तित्व , आकर्षण आणि जाण अशा पाच गोष्टी प्राप्त झालेल्या असतात मनुष्याला याशिवाय असण्याची म्हणजेच मोक्षाची आस प्राप्त झालेली असते . पंचमहाभूतांमध्ये सुद्धा या सर्व पाच गोष्टी असतात . मनुष्य कितीही अफाट बनला तरी त्या बनण्याचा त्याला शेवटी कंटाळा येतो आणि तो पुन्हा एकदा असण्याकडे येतोच येतो .
३२ शून्य म्हणजे शिव असते शक्ती म्हणजेच अनंत त्या शून्याला म्हणजे शिवाला स्वतः बरोबर नेत संसार बनवते या संसारातच जे नामरूप असते अस्तित्वात येते जीव हा नामरूप असतो मात्र त्याच्या ठाई शिवशक्ती मधले सर्व काही येते . जे त्याला पुन्हा पुन्हा शिवाकडे म्हणजे मोक्षाकडे ओढत राहते.
३३ मोक्षाकडे जाण्यासाठी माणसाला सर्वात प्रथम नाम आणि रूप यांच्या आकर्षणाचा त्याग करावा लागतो यांच्यापासून स्वतःला वेगळे काढावे लागते आणि त्याचा शोध घ्यावा लागतो जे आनंद आहे , जे फक्त असणे आहे आणि जे फक्त शुद्ध जाण आहे
३४ समाधी दोन प्रकारची असते सविकल्प म्हणजे विकल्पासहित ! हे विकल्प अनेक प्रकारचे येत असतात आणि ते नाहीसे झालेले नसतात जेव्हा सारे विकल्प नाहीसे होतात आणि प्राण महाप्राणात विलीन होत अंतिमतःशिवात कायमस्वरूपी जातो तेव्हा निर्विकल्प समाधी प्राप्त होते. सविकल्प समाधीमध्ये मात्र अनेक विकल्प येत राहतात त्यातील काही विकल्प हे कल्प म्हणजेच कल्पनेने बनलेले तर काही कल्प हे मोक्षाच्या असोशी मधून आणि ज्ञानामधून निर्माण झालेले असतात हे दोन्ही प्रकारचे विकल्प जोवर नाहीसे होत नाही तोपर्यंत सविकल्प समाधी मधून मुक्तता होत नाही सविकल्प समाधीलाच सबीज समाधी असे म्हटले जाते आणि निर्वीकल्प समाधीला निर्बीज समाधी असे म्हटले जाते जोवर बीज नाहीसे होत नाही तोपर्यंत निर्बिज समाधी मिळत नाही सर विकल्प समाधीलाच सज्ञान समाधी म्हणतात तर निर्विकल्प समाधीलाच नि:ज्ञान समाधी म्हणतात तिच्यामध्ये ज्ञानाचा सुद्धा अंत झालेला असतो . याउलट सज्ञान समाधीमध्ये ज्ञान अंत पावलेले नसते ज्ञानाचा पुन्हा पुन्हा मोह होत जातो . ज्ञानावरची वासना उडणे ही सर्वात अवघड गोष्ट असते कारण ज्ञान प्रचंड ओढाळ असते ते पुन्हा पुन्हा स्वतःच्या आकर्षणामध्ये ओढून घेते ज्ञानाचे हे आकर्षण सहजासहजी अनेक ज्ञानी माणसांना कळत नाही त्यामुळे ही माणसे पुन्हा पुन्हा ज्ञानाकडून seduce होत जातात ज्ञानाचे फळ पुन्हा पुन्हा खात राहतात आणि पुन्हा पुन्हा संसाराची निर्मिती करत राहतात . ते ज्ञानी असल्याने सहजासहजी हे कळत नाही की नेमके यांचे काय होत आहे .
३५ शक्ती पुन्हा पुन्हा ज्ञानाचे फळ खाऊन पुन्हा पुन्हा स्वतःच्या आत्मज्ञानासाठी पुन्हा पुन्हा स्वतःचा संसार निर्माण करत राहते आणि आपण या तिच्या संसाराचा भाग म्हणून जन्म घेत राहतो . तिच्या या सतत पुन्हा पुन्हा जन्म घेण्याच्या पुनर्जन्म घेण्याच्या स्वभाव शैलीमुळेच पुन्हा पुन्हा शिवांड निर्माण होत जाते आणि या शिवांडामध्ये असंख्य ब्रह्मांडे निर्माण होत राहतात
३६ शक्तीचा हा पसारा आणि पिसारा दिव्य असतो तो अद्भुत असतो तो सुंदर असतो .
३७ प्रत्येक जीवाच्या ठाई हा पसारा असतो आणि त्याचबरोबर पिसाराही असतो फक्त त्याला मोर बनायचे असते तो मोर बनला की मोक्ष बनतो आणि मग पिसारा फुलवत नाचायला लागतो . हा पिसारा पूर्ण फुलला आणि तो स्वतःच पिसारा झाला की मग पसाऱ्यातून पसार होतो मुक्त होतो
३८ हे घडण्यासाठी त्याला मोक्षाची पिसे लागावी लागतात अन्यथा ही पिसे पिसाटी निर्माण करत राहतात या पिसाटी अनेक प्रकारच्या वासना होतात कामना होतात इच्छा होतात हेतू होतात उद्देश होतात ध्येये होतात ओढी होतात
३९ या सर्व पिसाटींच्या होणाऱ्या नामरूपांच्यावर स्वतःचे संपूर्ण शरीर केंद्रित करणे म्हणजे धारणा होय
४० धारणा अत्यंत तळमळीने करत शेवटी सर्व पिसाटींच्या पासून मुक्तता मिळवणे म्हणजे ध्यान होय हे ध्यानच शेवटी एक दिवस सविकल्प समाधीपर्यंत नेते
४१ सर्वात प्रथम या सर्व पिसाटींना त्यांच्या नामरुपांना आपण साक्षी भावाने पाहायला शिकायला हवे
४२ जेव्हा बनणे पिसाटते तेव्हा ते असण्याकडे जाणे विसरते आणि मनुष्याला मोक्षाचा विसर पडतो त्याची संसारग्रस्तता अधिकाधिक भीषण बनत जाते आणि यातूनच मग स्वर्ग बनवता बनवता तो स्वतःच एक नरक बनतो हा नरक त्याला शेवटी इतक्या यातना देतो की त्याला त्या नकोशा वाटतात आणि मग पुन्हा एकदा त्याला आपल्या मातेची म्हणजेच शक्तीची आठवण येते.
४३ जो साक्षी असतो त्यालाच लोकभाषेमध्ये कधी कधी यम म्हणतात तो तुमच्यात असतो आणि तुमच्यातल्या स्वर्ग आणि नरकाचा हिशेब पाहतो आणि पुन्हा पुन्हा स्वर्गाकडे नेहू पाहतो
४४ यमनियमांची काटेकोर देखरेख हा साक्षी भाव ठेवायला लागतो आणि तुम्हाला स्वतःच्याच कर्माचे कर्म निरीक्षण परीक्षण करायला भाग पाडतो तुमच्या विचाराचे विचार निरीक्षण परीक्षण करायला भाग पाडतो तुमच्या भावाचे भावनिरीक्षण परीक्षण करायला भाग पाडतो
४५ सत म्हणजे शुद्ध असणे होय सत्य म्हणजे असण्याची शुद्ध जाणीव म्हणजेच होय आणि आनंद हाच स्वभाव होणे म्हणजे आनंदी होणे होय सतसत्य आनंद होणे म्हणजेच असणे होय .
४६ नाम म्हणजे ध्वनी नाम म्हणजे आवाज रूप म्हणजे दृश्य
नामरूप म्हणजे ध्वनी दृश्य होय जीव नामरूप असतो म्हणजेच ध्वनिदृश्य असतो . ध्वनिदृश्यांचा हा पुंजका सतत सातत्य राखण्यासाठी धडपडत असतो हे सातत्य म्हणजे जगणे होय जगण्यासाठी म्हणजेच सातत्य ठेवण्यासाठीच तो सतत धडपडत असतो . म्हणूनच ज्याला मोक्ष मिळवायचा असतो त्याला या नामरूपापासून सर्वात प्रथम मुक्त व्हावे लागते
४७ साक्षी भावाची सुरुवात उपेक्षेपासून होते आपल्या नामरूपाची आपल्या आत असणाऱ्या पिसाटींची उपेक्षा करणे ही साक्षी भावाची सुरुवात असते
४८ उपेक्षेनंतर मुदीता येते जे आहे त्यातच आनंद साजरा करता येणे मोद मिळणे म्हणजे मुदिता होय
४९ मुदिता प्राप्त झाली की मग प्रत्येक क्षण सण होतो यालाच सणता असे म्हणतात या सणतेपासूनच पुढे मग त्या त्या क्षणात शून्यता प्राप्त होऊ लागते
५० ही क्षणापुरती लाभणारी शून्यताच पुढे मोक्ष बनते महाशून्यता बनते
५१ निर्वाण म्हणजेच निबाण आणि निबाण म्हणजेच नि: वाण होय जेव्हा सर्व प्रकारची वाणे म्हणजेच बीजे नाहीसे होतात तेव्हा नि:ब्बाण नि: वाण प्राप्त होते प्रत्येक जीव सवाष्ण असतो म्हणजे वाणा सहित असतो बिजासहित असतो
५२ निर्विकल्प समाधी म्हणजे जिला वारा आणि हवा अजिबात हलवू शकत नाही अशी स्वयंप्रकाशित आनंदज्योत असते . ती स्वानुभूती, रस, विशद, शब्द आणि दृश्य यांच्याकडे उपेक्षेने सहज पहात त्यांच्यापासून अंतर राखू शकते त्यांच्यापासून स्वतःला वेगळी ठेवू शकते आणि त्यांच्यावर हसूही शकते .
५३ महान खेळाडू हा खेळापेक्षा वेगळा असत नाही जो खेळापेक्षा वेगळा असतो तो फक्त खेळाडू असतो सविकल्प समाधी मिळते तो महान खेळाडू बनतो आणि महान खेळाडू खेळताना साक्षात स्वतःच खेळ आणि खेळाडू असतो ज्याला निर्विकल्प समाधी मिळते तो महान खेळाडू ही राहत नाही तो स्वतःच खेळ बनतो
५४ तो अखंडआनंदरस पाझरणारी वस्तू बनतो जिच्यातून सतत "असणे"" सत्य" आणि "आनंद " पाझरत असतो तो चिन्ह विचिन्ह होत नाही तो अनंत असल्याने सांतामध्ये छिन्नविछिन्न होत नाही त्याला चिंता वगैरे ग्रासत नाही तो स्वतः समाधी बनतो
५५ स्वतःच्याच आनंद रसाचा स्तब्ध भवाने आस्वाद घेत तो कालातित समाधीची उपस्थिती बनतो .
५६ समाधिपूर्व तो संग असतो संघ असतो सविकल्प समाधीत तो असंग असतो आणि निर्विकल्प समाधीत तो नि:संग असतो साधनेची सुरुवात करताना आपण कुठे संग बनत आहोत आणि कुठे संघ बनत आहोत याचे भान साधकाला सुरुवातीपासूनच ठेवावे लागते अनेकदा मोक्षाचे सुद्धा संघ बनत असतात त्यातूनच मठसंस्कृती आश्रम संस्कृती संघ संस्कृती बनत जाते आणि यातूनच पुढे सुरुवातीला धम्माचा आणि मग धर्माचा उदय होतो. धर्म मूळचा असंगपणा आणि नि:संगपणा नष्ट करायला लागतो आणि हळूहळू एक सत्ता प्रणाली बनत जातो आणि कालांतराने कायदे आपल्या ताब्यात घेत राजकीय प्रणाली बनत जातो साधकाला यापासून सावध राहावे लागते आणि असंगपणा आणि नि:संगपणा कमवावा लागतो गृहस्थ साधकाला संग टाळता येत नाही त्याची पत्नी हीच त्याच्यासाठी सर्वोत्कृष्ट संग असू शकते आणि त्याचे कुटुंब हेच त्याच्यासाठी संघ असते या संघाला एक अनुशासन देणे शिस्त देणे हे त्याचे कर्तव्य बनते .
५७ असंग आणि निसंग हे पुढील प्रमाणे असतात
१ स्वतःच्या शरीराविषयी अनासक्त राहणे
२ स्वतःच्या ज्ञानाविषयी अनासक्त राहणे
३ स्वतःच्या भावनांविषयी अनासक्त राहणे
४ स्वतःच्या सृजनशील ते विषयी अनासक्त राहणे
५ स्वतःच्या अहंकाराविषयी स्वतःच्या प्रतिमेविषयी अनासक्त राहणे
६ स्वतःच्या क्रियेविषयी मिळणाऱ्या फळाविषयी अनासक्त राहणे
७ स्वतःच्या सुरक्षेविषयी अनासक्त राहणे
८ स्वतःच्या व्याप्ती विषयी स्वतःच्या जागेविषयी अनासक्त राहणे
९ स्वतःच्या स्थितीविषयी अनासक्त राहणे स्वतःच्या स्टेटस विषयी अनासक्त राहणे
१० स्वतःच्या देवा विषयी गुरु विषयी स्वतःच्या तंत्राविषयी स्वतःच्या साधने विषयी आणि स्वतःच्या मोक्षा विषयी सुद्धा अनासक्त राहणे
६० आसक्ती ही कायमच गुप्त लुप्त सुप्त आणि प्रकट स्वरूपात वावरत असते तिच्यावर ध्यान करणे हीच असंग राहण्याची गुरुकिल्ली असते संगातून किंवा संघातून प्रसंग आणि प्रसंघ घडत असतात अशावेळी त्यांच्याकडे साक्षी भावाने पाहणे म्हणजेच व्यवहारिक ध्यान होय
६१ सविकल्प समाधीमध्येच स्वप्रभा होते आणि यामुळेच तुमच्या भोवती लोक गोळे गोळा होऊ लागतात तुम्हाला अनेक प्रकारची सामाजिकता आणि नेतृत्व देऊ पाहतात तुम्हाला गुरु बनवू पाहतात तुमच्यासाठी आश्रम काढायला तयार होतात मठ काढायला तयार होतात हाच मोक्षामधला सर्वात मोठा अडथळा असतो अनेक साधक स्वतःच्या स्वप्रभेमध्येच अडखळतात आणि गळून पडतात अंतिमत: ते शेवटी सामाजिक बनतात धार्मिक बनतात अनेक जण स्वतःला मोक्ष मिळालेला नसतानाही नवीन धर्म स्थापन करतात .
६२ सविकल्प समाधीमध्ये आत्मा शिल्लक राहतो आणि जीव स्वप्रभा असलेला एकमेवाद्वितीय जीव बनतो निर्विकल्प समाधीमध्ये आत्माही निघून जातो आणि जीव निखळ केवल शिव बनतो शिवप्रभावंत होतो.
६३ सविकल्प समाधी बाहेरही लागू शकते आणि आतही ! जेव्हा ती बाहेर लागते तेव्हा ती वास्तवापासून भिन्न असते आणि जेव्हा ती आत लागते तेव्हा ती वास्तवापासून अभिन्न असते वास्तव वस्तूंच्या पासून बनलेले असते आणि म्हणूनच वास्तविक समाधीमध्ये तुम्ही त्या वस्तूंच्यावर सुद्धा लक्ष केंद्रित करू शकता. आणि नंतर त्या वस्तूंच्या पासून स्वतःला वेगळे काढत आत येऊ शकता आत वळू शकता
६४ निर्विकल्प समाधीत मुळातच जीव शिवानंद रूप असल्याने वास्तवापासून आनंद घेण्याची गरज संपते
६५ व्यवहारीक आयुष्यात बाहेरील गोष्टींच्या पासून इंद्रिय सुख मिळते मानसिक सुख मिळते बौद्धिक सुख मिळते सविकल्प समाधीमध्ये आनंद मिळतो निर्विकल्प समाधीमध्ये जीव स्वतःच आनंद बनतो
६६ निर्विकल्प समाधीनंतर जीव जीव राहत नाही तो शिव होऊन जातो .
लेखक श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment