चॅनेल dnya : love live in love out
प्रेम
प्रेम न्हवतं तुझं
आणि आय लव्ह यु म्हणत राहिलीस
आत असुरक्षिततेचे कोंब
आकांत आणि निष्ठुर बोंब
मी इमानदारीने कान देत राहिलो
माझा वास घेतलास
कि तुझं फूल व्हायचं नाही
फक्त येणारी उलटी तू दाबून ठेवतीयेस
असं वाटायचं
मग संशय घेतला कि तुझं आय लव यु
मी तुझी इमोशनल सपोर्ट सिस्टीम होतो का
आपत्कालीन आधारविमा
भेटीतल्या उत्कंठा
केवळ डोळ्यांच्या हालचाली होत्या का ?
कि मी तुझी फक्त सवय होतो ?
जीव तर पाळलेल्या कुत्र्यालाही लागतो
मी तुझा पाळलेला प्रियकर होतो का ?
प्रेम आणि मैत्री ह्यांच्या दरम्यान सख्य असते
मी तुझा सखा होतो का
कि मला कसं डिफाइन करायचं हे न कळल्याने
माझ्याबाबत काही डेफिनिटी ठरवता येत न्हवतं ?
माझं प्रेम एकतर्फी
तू नेमकं कशासाठी दुतर्फा केलंस ?
इमोशनल ट्राफिक ज्याम करण्यात
आपण दोघेही ज्याम वस्ताद आहोत
गाड्याच इतक्या पार्क करायच्या
कि रस्ता उरूच नये
मी पुरेसे एफर्टच टाकत नाही कशात बहुदा
मला काहीच अट्रॅक्ट करत नाही जगरहाठीमधलं
लोकांना वास मारतो मला केऑस
आपला रिलेशनल फ़ंडाच चुकलाय का ?
तुला जातांना मी अडवत का नाही
कि तू निघून जावंस असं मला वाटतंय ?
(चॅनेल : ज्ञ , लिव- इन एंड लिव ऑउट ह्या काव्यफाईलीतून )
श्रीधर तिळवे -नाईक
कदाचित हे शक्य असेल की जो आहे मी इनफ नाही
आणि लोक तर म्हणतच आहेत मी पुरेसा पुरुष नाही
तू पकडला हात दुसरा ओळखीचे काही राहिले नाही
अश्रू तसे खूप वाहिले
पण डोळे काही वाहिले नाही
मीच ओळख करून दिली आणि राहिलो सावध नाही
आणि लोक तर म्हणतच आहेत मी पुरेसा पुरुष नाही
चुक कोणाची होती आता त्याने काय फरक पडतो
वाहतो वारा की नाही श्वास पडतो की श्वास झडतो
पिसारा काढून निघून गेलीस फुफ्फुसामध्ये थयथय नाही
आणि लोक म्हणतच आहेत मी पुरेसा पुरुष नाही
ऐकायला तर सारेच हवे टॉन्ट असोत की खोल चेष्टा
हीही तशी साधना आहे बनू न द्यायचे स्वतःस द्वेष्टा
स्त्री सांभाळता येत नाही आणि राग राग करत नाही
आणि लोक तर म्हणतच आहेत मी पुरेसा पुरुष नाही
अंगावरती घ्यायचा आहे मागासलेला हा समाज
ज्याच्याजवळ परंपरा आहे आणि तिचा भक्कम माज
बदलायची आहे डेफिनेशन ती सहज बदलत नाही
आणि लोक तर म्हणतच आहेत मी पुरेसा पुरुष नाही
पुरुषी वादळे स्त्रियांची वादळे वादळावादळात फरक आहे
दिसायला दिसतो सारखा वारा
पण वाहण्यामध्ये फरक आहे
हाही फरक पेलत न्हेईन जरी समाज सोबत नाही
माझे पुरुषत्व मी ओळखून आहे
जुनाट समाज मी ओळखत नाही
म्हणायचे त्यांना म्हणू दे मी पुरेसा पुरुष नाही
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीजमधील चॅनेल ज्ञ: लव, लव इन आणि लव आउट या काव्य फायलीतून)
Comments
Post a Comment