विषघटनाच्या कविता

 सैतान चालून येतो तेव्हा एका भावाला केलेला उपदेश श्रीधर तिळवे नाईक 

रक्त पिळून त्याची कपडे वाळत घालणारी दोर बनवणारे लोक 

शेकींग करणाऱ्या हातांना शॉक देणारे लोक 

नपुंसकतेला ब्लेडच्या तालावर नाचायला लावणारे लोक 

बाहुल्यांना मीठात भिजवून ठेवणारे लोक 

तुझ्या सभोवताली 


मला माहीत नाही तू कसा लढणार आहेस ?


एकेकाळी मी अहिंसेने लढलो होतो 

आणि शेवटी स्वतःच बांधलेलं घर सोडून 

म्हाडात रवाना झालो होतो 


तुझ्यात ही क्षमता आहे ?


भन्ते त्यांनी तुझे हात कापून तुझ्या हातात दिले तर तू काय करशील 

मी त्यांनी माझे पाय शाबूत ठेवले म्हणून धन्यवाद देईन 

भन्ते त्यांनी तुझे पाय कापून घेतले तर तू काय करशील 

मी त्यांनी माझे डोळे शाबूत ठेवले म्हणून धन्यवाद देईन 

भन्ते त्यांनी तुझे डोळे काढून घेतले तर तू काय करशील ?


मी माझी चालण्याची गती स्वच्छ करतोय 

माझी धन्यवाद बोलणारी जीभही कापली जाऊ शकते 

हे मी जाणतो 


आणि भूषण फोनवरून सांगतोय 

दादा , आठजण आहेत 

आणि आ उभाय एकट्याने त्यांच्यासमोर 

तू काय करतोयस 

मला लपायला सांगितलंय 

त्याला सांग काहीही झालं तरी हिंसा नाही 

तो मरेल दादा 


माझा मित्र मुंबईत माझ्यासमोर 

तुमची कोल्हापूरची माणसं लै दिलदार 

तुमची मिसळ आणि पांढरा तांबडा रस्सा 


फोनवर स 

तू पेटलेला 

मला स्पष्टच दिसतंय तू तलवार काढणार 

हिंसा नाही स त्याला आवर 

त्यो कुणाचं ऐकतोय दादा ?

माझा निरोप दे दादांनं सांगितलंय म्हणावं 


गण्याचं भूत कानात 

" कोल्हापूरचा माणूस काय बुद्ध होणार राजा 

नसतं नाद हैत तुझं "


भूषण फोनवर 

दादा तलवार टाकली आणि त्यांनीही हत्यारं म्यान केलेत 

मांडवलीला बसलेत 


मी एका डोळ्यांनं शिव पाहतोय 

एका डोळ्यानं बुद्ध 


इलाका ठरवणारी जनावरं 

आणि आपण माणसं 

ह्यांच्यात काय फरकय ?


मित्र विचारतोय 

मग कोल्हापूरला कधी न्हेतोस 

आणि पुन्हा कोल्हापूरची माणसं लै दिलदार वैग्रे 


हिंसेचा पेच स्क्रीनसारखा फ्लॅट नाही 

जिथे हे , सु , म सारखे संवेदनशील म्हणवणारे कवीसुद्धा 

फोनवरून धमक्या देतात 

आणि माझ्यासारख्याला माझी सॉरी ते विजय समजणार 

हे माहीत असूनसुद्धा 

सॉरी म्हणून 

शाब्दिक हिंसा टाळावी लागते 

तिथे हिंसा वगळून सामान्य संवेदनशीलवाला काय जगणार ?


आणि हिंसक संवेदनशीलवाला ?


"दादा ,सॉरी पन तुला दिल्लेल वचन पाळलंय 

आठजण तलवार घेऊन आल्यावर काय करायचं ते सांग 

मला तुझ्यासारखं व्हायचंय दादा पन राग कंट्रोलमध्ये नाय "


"राग आणि संताप ह्यांना शर्टसारखं घालता आलं पाहिजे 

शर्टसारखं काढता आलं पाहिजे" 


खरंतर सर्वत्र बुद्ध रोज हरतो आहे 


उदासी चारही ऋतूत समान चेहऱ्याने वावरतीये 

किंचाळ्यांच्या तीव्रता दुःखाने वाढतायत 

व्हायोलन्सच्या झाडाचं अरण्य झालंय 


लोक रामायण महाभारतापासून फक्त युद्ध शिकणार असतील तर 

दोष कुणाचा ?

महाकाव्याचा ?लोकांचा ?


हिंसा ही अन्नासारखी गरजेची होणार असेल तर 

महादेवा ,

मी उपाशी राहून मरेन 


श्रीधर तिळवे नाईक 

( निर्वाण सिरींजमधील विषघटनाच्या कविता ह्या काव्यफाईलींमधून )

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे