चॅनेल स्पिरीच्युअल
अनिश्चिततेला घाबरणारे लोक
पुन्हा पुन्हा परततात परंपरेत
पाठीला तोंड समजतात
आणि वाटचाल करतात
सूर्याकडे पाहून ओशाळतात
चंद्राच्या प्रकाशाला मूळ प्रकाश मानतात
पृथ्वीला सपाट समजतात
सपाट वाटचाल त्यांना आवडते
अनिश्चिततेला घाबरणारे लोक
देव निश्चित करतात
आणि त्याच्यात इतरांना फिट बसवतात
त्यासाठी अनफिट इतरांचे हात कापतात
पाय कापतात
आणि त्यांना स्वतःच्या सपाट पृथ्वीवर रांगायला लावतात
स्वतःच्या साईझमध्ये बसवतात
अनिश्चिततेला घाबरणारे लोक
अनुनभवी करुणेला टाचा घासायला लावतात
तिच्यावर आपली हृदये लादत
तिला गाढव बनवतात
त्यांच्याकडे लहानपणापासून जमवलेला तिकिटांचा सनातन संग्रह असतो
त्यांच्याकडे फसवणाऱ्या म्हाताऱ्यांची फौज असते
जी वाद्ये वाजवून मुलांना गुंगवण्यात एक्सपर्ट असते
अनिश्चिततेला घाबरणारे लोक
एकाच सुरवंटातून लाखो फुलपाखरे उडवून दाखवतात
प्रॉब्लेम इतकाच असतो
ही फुलपाखरे कशावरही बसू शकत नाही
ती उडून उडून मरून जातात
त्यांच्यावर घडयाळाच्या सावल्या पडत नाहीत
त्यांना कुठलाही काळ स्वतःत गुंडाळून ठेवता येतो
असा कॉन्फिडन्स असतो
त्यांच्या पापण्या नाजूक नसतात
त्या धुळीने घट्ट झालेल्या असतात
ती आलिंगन द्यायला घाबरतात
कारण त्यांना स्पर्शाचे भय असते
आपल्या वितळणाऱ्या वासना फोटोग्राफमध्ये प्रकटतील
ह्याचे त्यांना भय असते
नेमक्या नको त्यावेळी काळ पाप करवून घेतो
हे त्यांना माहीत असते
अनिश्चिततेला घाबरणारे लोक
प्रेरणांच्यावरची त्यांची पकड ढिली झाली कि
ते मूठ आवळून बोलतात
शास्त्रीय सनातन आधीच ठरलेले संगीत वाजवत
ते पिढ्यांना कान त्यांच्यावरून ओवाळून टाकायला सांगतात
तुम्ही क्षमा करण्याआधीच त्यांनी अपमान केलेला असतो
अन काहीही आश्चर्यचकित करणारे आले कि ते डोळे फिरवतात
तुम्ही त्यांचे काय करणार
किती काळ वाट पाहणार
त्यांना कंटाळा येत नाही
त्यांनी अनिश्चिततेला आयुष्यातून हाकलून दिलेले असते
आणि त्यांची निश्चितता विचलित होण्याची शक्यता बधीर
आशा करा कि
तुझी निश्चितता अधिक निश्चित कि माझी निश्चितता अधिक चांगली
ह्यावर आपापसात लढून ते मरतील
श्रीधर तिळवे
(चॅनेल सिरींजमधील चॅनेल स्पिरिच्युअल ह्या काव्य फाईलीतून )
भिंती चांगदेवांच्या मनातल्या
आता चालवून दाखवाव्या लागत नाहीत
त्या डिजिटल झालेत
स्वतःहून चालत राहतात
चांगदेवाला कळत नाही
त्यांना कसं हाताळायचं
तो ज्ञानेश्वरांच्या शोधात आहे
त्याला अजूनही कळत नाही
भिंती त्याच्या होत्या
आणि त्यांना चालवणारा ज्ञानेश्वर त्याच्या आतच होता
ज्या दिवशी भिंती चालत असल्या तरी
भिंतीच आहेत हे त्याला कळेल
तेव्हा त्याला त्याच्या आतला ज्ञानेश्वर सापडेल
तोवर चालू द्या
जो वर चालतायत
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीज मधील चॅनेल : स्पिरिच्युअल या काव्य फायलीतून)
कुठलेही फील्ड निवड
पण त्याबरोबर अनिश्चितता निवड
नाहीतर इनबॉक्स मध्ये घुटमळत राहशील
आणि आऊट ऑफ बॉक्समधून येणारे लोक
तुझ्या करिअरचा वध करतील
कसं आहे
स्पर्धा आहे
आणि स्पर्धा कधीच इनबॉक्स कडून नसते
स्पर्धा नेहमीच
आऊट ऑफ बॉक्समधून येणाऱ्याच्याकडून असते
तेव्हा इनबॉक्समध्ये वळवळायचं की आऊट ऑफ बॉक्सबाहेर चळवळ करत
वळवळ लाथाडत
धोक्याचे धूर उडवत
पुढं सरकत राहायचं ?
जग म्हणजे काही मळलेली पायवाट न्हवे
हा हमरस्त्यांचा चक्रव्यूह आहे
जो एका निश्चितीनंतर
स्वतःचे पूल बांधायला लावतो
तेव्हा फ्लायवे बांधता येत असतील
तर टिकशील
अन्यथा माशी म्हणून मळवाटेवर पळवाटेवर
उडत राहशील
आणि लोक तुला माशी समजून मारतील
हा देश तसाही माशीचळ लागलेल्या रिकामटेकड्यांचा आहे
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीज मधील चॅनेल स्पिरीच्युअल ह्या काव्यफायलीतून )
Comments
Post a Comment