माझ्याशेजारी पडलेल्या कवीचे स्वगत विभाग १३ श्रीधर तिळवे नाईक
१
देव माणसांप्रमाणे दिसतात
हे कॅरलला आलं कि तीव्रतेनं जाणवतं
माझे वडील जे बबलइतके हलके होते
गोळाफेकीतल्या गोळ्यासारखे जड होत गेले
वजन नेमकं कुठं वाढलं
ते शेवटपर्यंत कळलं नाही
इथल्या देवांचंही काहीसं तसंच झालेलं दिसतंय
देव माणसांपेक्षा वजनानं हलका पाहीजे
तरच माणूस तरतो
नाहीतर देवात बुडून मरतो
२
हे लोक आमच्यासारखेच दिसतात
पण ह्यांचे देव आमच्या देवांपेक्षा क्रूर आहेत
अँडीजच्या पायाशी सुख
शिखरावर नरभक्षक दुःख
ग्रहणांना सतत घाबरणारे लोक
सूर्याला अंडरएस्टीमेट करत असतात
परदेशात स्वदेश सुट्टीवर गेलेला असतो
इथं तसं होत नाहीये
कदाचित हे लोक
समुद्रात वाट चुकलेल्या
आमच्याच पूर्वजांचे वारस असावेत
३
मेलेल्या पूर्वजांच्यात अडकून पडण्याची सवय सगळीकडं
बरं झालं भगवान शंकरांनी पुनर्जन्म सांगितला
निदान आमच्यासारखे काही
पूर्वज पुन्हा जन्म घेऊन सेटल झालेत म्हणून
कायमचे त्यांच्यापासून मुक्त झालो
४
इथले भगत नशा करून प्राणी बनतात
आणि अंगात आल्यासारखे बोलतात
मी इथं पॅरॅक्स डिशेससाठी आलोय
एका श्रीमंतांनं ऑफर दिलीये
मी अँटिक गोष्टींना कमर्शियल करून
सिव्हिलायझेशन्स विकायला काढतोय
असा आरोप
माझ्या इथल्या प्रेयसीनं केलाय
मी म्हणालो
क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशनपेक्षा
कॅश ऑफ सिव्हिलायझेशन केव्हाही बरी
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment