नेट रिलेशन
माझा बापच नेहरू युग आहे
आणि आऊटडेटेड असल्यासारखा वावरतो आहे
सूर्य त्याचाही आहे माझाही
चंद्र त्याचाही आहे माझाही
तरी त्याने टेलिस्कोप हाताळून
नंतर आकाशाकडे पाहून खांदे उडवले आहेत
जे मला अधूनमधून आकाशात ढगासारखे दिसतात
त्याने आईन्स्टाईन वाचलेला नाही
त्याच्या दृष्टीने न्यूटन म्हणजे फिजिक्स आणि डार्विन म्हणजे बायोलॉजी
माणूस होमोपासून बनला आहे
आणि माकड आपले भावंडं आहे
हे त्याला माहीत आहे
मात्र आयुष्यात त्याने कधीही मला माकड म्हंटले नाही
त्याला नेहरूंच्याप्रमाणे माकड म्हंटले कि गांधीजींची माकडे आठवतात
गांधीजींची माकडे बौद्ध माकडे आहेत
आणि त्यांना ती जपानमध्ये भेट मिळाली होती
हे त्याला माहीत नाही
तो दुकान चालवतांना कधीही सफोकेट झाला नाही
आम्ही धंदा खुल्या हवेत केला
इंदिरा गांधींनी हवा बंदिस्त केली
आणि ही स्वातंत्र्याच्या हत्येची सुरवात होती
असे त्याचे मत आहे
नेहरू असते तर त्यांनी आपल्या लेकीला पार्टीमधून हाकलले असते असंही
आणि ते ते आजही खुल्या हवेत मुक्तपणे मांडत असतो
हातोडी हे त्याचं आवडत हत्यार आणि ब्रश
नको ते काढायचं आणि हवं ते रंगवायचं
तो आजही शक्यतो गोळ्या टाळतो
आणि रोज सकाळी खोलवर
गावभर गावाच्या इंटेरियरमध्ये चालत जातो
त्याची बायको त्याच्यावर फक्त करवादते
अशी त्याची तक्रार असते
आणि ह्या संदर्भात आईशी मी बोलावे
अशी त्याची अपेक्षा असते
मी नवरा बायकोच्या भांडणात पडत नाही
कारण संध्याकाळी बाप पुन्हा
आईबरोबरच बसणार
हे मला माहीत आहे
एकमेकांचा शेअर एकमेकाला देण्याइतपत
त्याचं एकमेकांवर प्रेम आहे
आणि माझ्यासाठी ते पुरेसं आहे
श्वास आणि वारा ह्यांच्या बॉर्डरलाईनवर आपण जगतो
आयुष्य म्हणजे श्वासाची किमया
ह्यावर त्याचा गाढ विश्वास
पावसाळ्यात उष्मा
आणि उन्हाळ्यात थंडी निर्माण करण्यात तो निपुण
शून्यातून विश्व निर्माण करणे
आणि त्या विश्वाचा शून्यात लय होतांना अनुभवणे
ह्यातून तो गेला आहे
मी हल्ली त्याच्या चेहऱ्याविषयी विचार करतो
आणि पुन्हा पुन्हा तो इन्व्हेन्ट करतो
मी त्याचे प्रेमात गिअर टाकून बोलणे ऐकतो
आणि त्यातील कातरत जाणारी कातरता ओसंडून जातांना पाहतो
मी माझ्या काळ्या हातांच्या शेवटावर
त्याच्या हाताचा गुलाबी आरंभ हुंगतो
तो हल्ली सतत म्हणतो
काँग्रेस गवताची मूळ
आणि आमचं आयुष्य
ह्यात फरक काय ?
बस एक दुकान उभारलं
आणि दिवाळं काढून फुंकून टाकलं
त्याची फुंक माझ्या कानात बासरी वाजवतीये
आणि ती सुखद कि दुःखद
हे मला ठरवताच येत नाहीये
श्रीधर तिळवे नाईक
(नेट सिरीजमधील नेट: रिलेशन ह्या अप्रकाशित फाईलीतून )
Comments
Post a Comment