महात्मा गांधी आणि हिंदुत्व श्रीधर तिळवे नाईक 


शैव धर्माची साधी दखलसुद्धा न घेणारे महात्मा गांधी शैवांच्या इतिहासात स्थान मिळवू शकले नसले तरी भारतीय इतिहासात त्यांचे स्थान अढळ आहे 


वैष्णव धर्मात पाच टप्पे आहेत 


१ श्रुतिस्मृतिमहाकाव्यपुराणोक्त वैष्णव धर्म हा वेद , स्मृती आणि वर्णजातिव्यवस्था प्रमाण मानतो गांधीजी सुरवातीला ह्या टप्प्यात होते 


२ भक्तिवेदांत : शंकराचार्यांचा वेदांत आत्मसात करून त्यांचे ब्राह्मणीकरण करण्याचा यशस्वी प्रयत्न प्रथम रामानुजाचार्यांनी केला आजही भक्ती वेदांताची चळवळ जोरात आहे हीही वर्णजात मानते ह्यानेच तामिळ वैष्णव भक्ती सिद्धांताचा भारतभर प्रचार केला वारकरी पंथावर नाथ आणि भक्तिवेदांत ह्यांचा समान प्रभाव आहे 


३ गीताधर्म : हा तिसरा टप्पा श्रीकृष्णालाच प्रमाण मानतो व गीतेला धर्मग्रंथ ! भारतातील रानडे , टिळक , गोखले , गांधी ह्या सर्वांच्यावरच ह्याचा प्रभाव पडला आहे गांधींच्या आयुष्यातील तिसरा टप्पा गीताधर्माचा आहे 


४ नववैष्णव : ह्याची सुरवात चक्रधरांनी केली हा कृष्ण व राम ह्यांना प्रमाण मानतो मात्र वर्णजातिव्यवस्था मानत नाही गांधीजी शेवटच्या टप्प्यात १९४० नंतर ह्या टप्प्यात दाखल झाले चक्रधरांचा नववैष्णववाद हा धार्मिक होता गांधींनी तो सामाजिक व राजकीय केला शैवांच्या इतिहासात नवशैव इतिहासात जे स्थान शिवाजी महाराजांचे आहे तेच स्थान गांधीजींचे ह्या नववैष्णव धारेत आहे. 


आर्यांनी १ ब्राह्मणधर्म २ वैष्णवधर्म ३ वेदांतधर्म ह्या तीन धर्मांनंतर हिंदू हा चौथा धर्म निर्माण केला तेव्हा सुरवातीला जो हिंदू धर्म होता तो ब्राह्मण्यकेंद्री होता व त्याने ब्राम्हण व शूद्र अशी द्विवर्णीय व्यवस्था निर्माण केली जी तत्कालीन मुस्लिम राज्यकर्त्यांनाही सोयीची होती गुलामगिरी इस्लामला मान्य होती अन हा आद्य हिंदू धर्म शूद्र नावाचे गुलाम निर्माण करत असेल तर त्यांना हे हवे होते किंबहुना हिंदू म्हणजे गुलाम हे समीकरण प्रथम मुस्लिमांनी रुजवले पुढे स्वामी दयानंद सरस्वती ह्यांनी आर्य समाजाची स्थापना केली तेव्हा हिंदू हा शब्द गुलामगिरी ध्वनित करत असल्याने आपण सर्वांनी हिंदू हा शब्द न वापरता आर्य असा शब्द वापरावा असा आग्रह धरला त्यामागे हीच पार्श्वभूमी होती ब्रिटिशांना मात्र हिंदू हा शब्द हवा होता कारण त्यात ध्वनित होणारी गुलामगिरी त्यांना हवी होती ब्राह्मणक्षत्रियांना हा हिंदू शब्द हवा होता कारण त्यामुळे ते वैश्य शूद्र आदिवासी ह्यांचे मालक बनत होते आंबेडकरांना हिंदू हा शब्द हवा होता कारण दलितांना गुलाम बनवणारी व्यवस्था त्यातून स्पष्टपणे प्रतीत होत होती प्रश्न फक्त वैश्य शूद्र व आदीवासी ह्यांचा होता तर १९१५ नंतर ब्राम्हणांनी वैश्यांचा पापयोनी हा टॅग काढून त्यांनाही पुण्ययोनीचा टॅग बहाल केला म्हणजे उरले शूद्र व आदिवासी ! १९२० नंतर शूद्र आदिवासी ह्यांच्यातून फुल्यांच्या तोडीचा विचारवंतच उरला नाही त्यामुळं हिंदू धर्म नाकारून सत्यशोधक धर्म स्थापन करणारे फुले साईडलाईन झाले अन नेमक्या ह्याचवेळी मी कट्टर कर्मठ सनातनी हिंदू आहे असं सांगणारे गांधीजी उदयाला आले परिणामी सगळ्यांनीच हिंदू हा शब्द मान्य केला मात्र ब्राम्हणांनी ह्या काळात पद्धतशीरपणे आर्यधर्म वा ब्राह्मणधर्म हा शब्द वापरणे सुरु केले आणि हिंदू म्हणजे पूर्वाश्रमीचा आर्यधर्मच वा ब्राह्मणधर्म वा सनातनधर्म अशी मांडणी करायला सुरवात केली पुरोगामी ब्राम्हण क्षत्रियांनी ह्याला काउंटर म्हणून वैदिक धर्म हा शब्द वापरून वैदिक काळात कर्मदत्त वर्णव्यवस्था होती अशी मांडणी करायला सुरवात केली 


ह्याचा एक परिणाम असा झाला कि हिंदू धर्म निर्माण करण्याची एक गुंतागुंतीची प्रक्रिया सुरु झाली ह्याबाबतचे पहिले प्रेषित होते स्वामी विवेकानंद होते त्यांनी नवहिंदू धर्म स्थापन केला आणि सनातन हिंदू धर्माविरुद्ध प्रोटेस्ट केला त्यांनी नववेदान्ती ब्राम्हो प्रार्थना समाज नववैदिक आर्य समाज ह्यांना नकार देऊन वर्णजातीला नकार देणारा नवहिंदू धर्म निर्माण केला गांधी हे जितके नववैष्णव आहेत तितकेच नवहिंदू आहेत 


ह्यातून हिंदू धर्माचे दोन इजम जन्माला आले १ हिंदुवादी २ हिंदुत्ववादी काँग्रेसची स्थापना इंग्रज व हिंदूवादी लोकांनी केली सुरवातीची पाच वर्षे हा हिंदुवाद अविरोध चालला मात्र टिळकांनी १८९० पासून जहालवादी हिंदुत्ववाद काँग्रेसमध्ये मांडायला सुरवात केली अन त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला ते वर्णव्यवस्थेचे समर्थक व जातिव्यवस्थेचे विरोधक होते त्यामुळं त्यांनी ब्राह्मणांना आंतरजातीय विवाह करून जातीव्यवस्था मोडीत काढण्याचे आदेश दिले जे ब्राम्हणांनी पाळायला सुरवात केली म्हणजे जाती मोडायच्या पण वर्ण शाबूत ठेवायचे असा हा सिद्धांत होता त्यांच्या ह्या सिद्धांताला वैश्यांनी पाठींबा दिला कारण टिळक ह्या काळात ब्राम्हणांनी वैश्यांच्या उद्योगधंद्यात व व्यवसायात पडू नये असं म्हणायचे त्यामुळे वैश्यांचे हितसंबंध राखले जात होते टिळकांच्या आविर्भावात भारतात क्षत्रिय अस्तित्वातच नाहीयेत असा सूर होता आणि त्यांचा ह्याबाबतचा तर्क असा होता कि ब्रिटिशांच्याविरुद्ध जे लढत नाहीत जे शस्त्र धारण करत नाहीत आणि इंग्रजांच्या ताटाखालचे मांजर आहेत अन चक्क पेन्शन घेतात भत्ता घेतात ते क्षत्रिय कसले ? साहजिकच इंग्रजांच्या राज्यात नवे उद्योगधंदे व व्यवसाय करणारे त्यांना ऑथेंटिक वैश्य वाटत होते पण क्षत्रिय मात्र त्यांना ऑथेंटिक क्षत्रिय वाटत न्हवते त्याचे पडसाद वेदोक्त प्रकरणात उमटले टिळकांचा वर्णव्यवस्थेवरचा विश्वास ह्या वेदोक्त प्रकरणात स्पष्टपणे दिसतो त्यांनी सयाजीराव गायकवाड ह्यांना धार्मिक उपदेश करायला गेले म्हणून टीकेची झोड उठवली कारण त्यांच्या मते ज्याला संस्कृत येत नाही त्याने धर्मावर बोलू नये ह्याउलट स्वामी विवेकानंद कायस्थ क्षत्रिय असूनही त्यांना संस्कृत येत असल्याने त्यांना मात्र टिळक मान देत होते ते स्वतःच्या राजकीय लढ्याला ब्राम्हणांचा आपद्धर्म म्हणून बघत होते स्वराज्यस्थापनेचे जे काम ह्या देशातील क्षत्रियांनी करायला हवे ते आम्हा ब्राम्हणांना करायला लागते आहे असा एक अस्पष्ट सूर सतत त्यांच्या मांडणीत आहे त्यांना स्वतःला ज्ञानसाधना करायची होती पण राजकीय कार्यामुळे ती करायला पुरेसा वेळ मिळत नाही अशी त्यांना रुखरुख होती 


टिळकांचा धर्म हा गीताधर्म असल्याने त्यांना श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर केलेली हिंसा मान्य होती आर्यधर्मानुसार हिंसा ही राजकीय आवश्यकता होती अन क्षत्रिय कामासाठी ती आवश्यक होती हिंदुत्वाने टिळकांचा हा विचार स्वीकारला होता 


विनायक दा सावरकर हे टिळकांचे अनुयायी असल्याने त्यांनीही जातिव्यवस्थेला कट्टर विरोध करून जातींचा उच्छेद व्हायला हवा अशी भूमिका घेतली अन त्याचवेळी रणावीण स्वातंत्र्य कुणाला मिळाले अशी भूमिका घेतली साहजिकच हिंसा ही त्यांनाही अपरिहार्य वाटत होती 


विष्णुशास्त्री चिपळूणकर , लोकमान्य टिळक , स्वातंत्र्यवीर सावरकर व प्रबोधनकार ठाकरे हे हिंदुत्वाचे पायोनियर हिंसा आवश्यक मानत असल्याने हिंदुत्व शत्रूशी लढताना हिंसा आवश्यक असेल तर केली पाहिजे ही भूमिका घेते अन त्यासाठी श्रीकृष्णाचा रामाचा व गीतेचा दाखला देतं 


महात्मा गांधी हे टिळकांच्या पाठींब्याने काँग्रेसमध्ये उभे राहिले तरी ते हिंदुत्वाच्या हिंसेच्या विरोधात होते ते महाभारताच्या युद्धाला प्रतीकात्मक म्हणून पाहत होते असहकाराची चळवळ खुद्द टिळकांनीही मांडली होतीच त्यामुळं गांधींच्या असहकाराला पाठींबा द्यायला हिंदुत्वाचा विरोध न्हवता प्रश्न मुख्य शत्रू कोण हा होता गांधी म्हणत होते ब्रिटिश हिंदुत्ववादी म्हणत होते ब्रिटिश आणि मुस्लिम !


संघर्षाची पहिली ठिणगी ही मुस्लिमांना शत्रू मानायचे कि नाही ह्यावरून पडली गांधी ब्रिटिशांशी लढायचे असेल तर मुस्लिमांना सोबत घ्यायला हवे ह्या मताचे होते तर हिंदुत्ववाद हा ब्रिटिश हा आत्ताचा शत्रू असला तरी त्यानंतरचा हिंदूंचा शत्रू मुस्लिमच आहेत असं मानत होता साहजीकच मुस्लिमांचे लांगुलचालन त्यांना मान्य न्हवते ब्रिटिशांच्याविरुद्ध शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ह्या न्यायाने ते मुस्लिमांशी युती करायला तयार होते पण ही युती तात्कालिक तडजोड व आपद्धर्म म्हणून त्यांना मान्य होती मात्र आपला मुख्य शत्रू मुस्लिमच आहेत अशी त्यांची धारणा होती हिंदूंच्या गुलामगिरीची सुरवात मुस्लिम राजवटींच्यापासून होते अशी त्यांची मांडणी होती आणि ह्या गुलामगिरीला खऱ्या अर्थाने शह व मात देणारे महान राजे म्हणून त्यांना शिवाजी महाराज प्रिय होते व आहेत शिवाजी महाराजांनी वैदिक राज्याभिषेक करून घेतल्याने ते शिवाजी महाराजांना आर्य मानतात 


दुसरा संघर्षाचा मुद्दा होता गांधींच्या अहिंसेचा ! त्यांना ती मान्य न्हवती व नाहीये साहजिकच अहिंसा अमान्य करायची असेल तर गांधीजींच्या अहिंसेने भारताला स्वातंत्र्य मिळाले हे नाकारणे अपरिहार्य ठरते पण गोष्टी फक्त नाकारून चालत नाही तर मग कुणामुळे मिळाले हा प्रश्न उरतो हिंदुत्ववाद ह्या प्रश्नाचे उत्तर नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांच्या सशस्त्र प्रतिकारामुळे व आझाद हिंद फौजेच्या आक्रमणामुळे भारतीयांना स्वातंत्र्य मिळाले अशी मांडणी करतो इतकेच न्हवे तर नेताजींनी भारतीय स्वतंत्र झाल्याची घोषणा केलेला दिवस स्वातंत्र्य दिन मानतो ह्याला प्रतिसाद न मिळाल्याने सद्य स्थितीत हा मुद्दा रेटला गेलेला नाहीये 


तिसरा संघर्षाचा मुद्दा सेक्युलॅरिझमचा आहे गांधी व त्यांची काँग्रेस स्युडोसेक्युलर असल्याची मांडणी त्यातूनच येते हिंदुत्ववादाला गांधीयन सेक्युलॅरिझम मान्य नाही ह्या स्युडोसेक्युलॅरिझममुळेच देशाची फाळणी झाली अशी त्यांची मांडणी आहे 


चौथा संघर्षाचा मुद्दा गांधींच्या समाजवादाचा आहे हिंदुत्ववाद हा उजवा आहे 


पाचवा संघर्षाचा मुद्दा वर्णजातिव्यवस्था अमान्य करण्याचा आहे कट्टर ब्राह्मण्यकेंद्री हिंदुत्ववाद हा चिपळूणकर टिळकांच्याप्रमाणे वर्णव्यवस्था मान्य करतो जातीव्यवस्था अमान्य करतो गांधीजी नववैष्णव झाले अन गांधीजींचा वर्णव्यवस्थेला असलेला विरोध कट्टर ब्राह्मणी गुरुजीवादी हिंदुत्ववादाला खटकायला लागला पुढे प्रमोद महाजन ह्यांनी आणलेला नवहिंदुत्ववाद वर्णजातिव्यवस्था अमान्य करत असला तरी १९४७ च्या आसपास हिंदुत्ववादावर ब्राम्हण्यव्यवस्थेचा पगडा होता 


साहजिकच कट्टर ब्राह्मण्यकेंद्री हिंदुत्ववादाने गांधीजींची हत्या केली ब्राम्हण्याची असणारी कारणे व दिली जाणारी कारणे अनेकदा वेगवेगळी असतात ५५ कोटी रुपये पाकिस्तानला देणे व गांधीजींना फाळणीसाठी जबाबदार मानणे ही दिली जाणारी कारणे आहेत 


प्रत्यक्षात खरे कारण गांधीजींचा त्याकाळी असलेला प्रभाव व वर दिलेले पाच संघर्षमुद्दे हे आहे जोवर गांधीजी आहेत तोवर हिंदुत्ववादाचा व इस्लामत्ववादाचा अजेंडा यशस्वी होणार नाही व त्याचा प्रभाव पडणार नाही ह्याची मुस्लिम लीगला व हिन्दुत्ववाद्यांना खात्री होती इस्लामत्ववादी मुस्लिम लीग फाळणी पदरात पाडून घेऊन गांधीजींच्या प्रभावापासून मुक्त झाली हिंदुत्ववाद्यांना मात्र ह्या प्रभावाशी डायरेक्ट मुकाबला करावा लागणे अटळ झाले ह्यावर त्यांनी काढलेला गांधीहत्येचा तोडगा हा निषेधार्ह , चुकीचा अन मूर्ख शॉर्टकट होता त्याने गांधीजींचा प्रभाव नष्ट होणे दूर उलट डबल केला गांधींच्या मृत्यूनंतरही गांधीजी मेले नाहीत उलट त्यांचा प्रभाव वाढत राहिला व काँग्रेस विजयी होत राहिली 


ह्या प्रभावाचं करायचं काय ह्या प्रश्नाचं उत्तर अपप्रचार असं आलं हा एक बिनडोक शॉर्टकट होता जो धार्मिक युगात यशस्वी झाला होता साहजिकच हे धार्मिक पौराणिक हत्यार पुन्हा बाहेर काढलं गेलं खोट्याचा खरं म्हणून सतत प्रचार केला कि ते खरं म्हणून हळूहळू रुजतंच हा ह्या मागचा सिद्धांत ! श्रद्धा युगात व धार्मिक युगात जगभरच्या पुरोहितगिरीने तो यशस्वी करून दाखवला होता खुद्द आर्यांनी वैष्णव व हिंदू धर्म असा पुराणांच्या आधारे यशस्वी करून दाखवला होता 


नेहरू व गांधींच्याविरुद्ध असा अपप्रचार सुरु झाला वास्तविक ह्या दोघांशी कसा मुकाबला करायचा ह्याचा एक आदर्श शेषराव मोरे ह्यांनी निर्माण केला होता हिंदुत्ववाद्यांनी मोरे ह्यांचा मार्ग अवलंबायला हवा होता पण हे हव्या तितक्या प्रमाणात झाले नाही परिणामी मनोहर भिडे ह्यांच्यासारखे अपप्रचारक हिंदुत्ववादाचा चेहरा म्हणून उदयाला यायला लागले हिंदुत्ववादाला हे परवडणारे आहे काय ? गांधीजींच्याविषयीची भिडे ह्यांची मांडणी कसलाही पुरावा न देता येते त्यांची बदनामी करते हे सज्जनांचे काम नोहे राज्य करण्याचा अर्थ सज्जनांचा आणि सज्जनपणाचा परीघ वाढवणे जर हे जमणार नसेल तर मग राज्य हवे कशाला ?


भारतीय परंपरा खंडनमंडनाची आहे इस्लाममुळे ती खंडित झाली अकबर शिवाजी ह्यांनी ती पुन्हा जिवंत केली औरंगजेबाने ती पुन्हा गाडली हिंदुत्ववाद्यांना शिवाजी महाराजांच्या मार्गाने जायचे आहे कि औरंगजेबाच्या ? भारतीय परंपरेने जायचे आहे कि हिटलरी मार्गाने ? हिंदुत्ववाद्यांनी एकदा शांतपणे बसून विचार करावा महात्मा गांधी असते तर त्यांनी हेच सांगितलं असतं 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे