निर्वाण सिरीज २५

 तू आत्महत्या का करत नाही श्रीधर 


वायरी जुळत नाहीयेत 

आणि नेटवर्क्स तुझ्यासाठी नामधारी आहेत 


मारलेल्या उड्या मातीला मिळाल्या 

चढाया चढल्याच नाहीत 

उलट पर्वत घेऊन आपटल्या 


तुझ्या वैचारिक रिक्षांपेक्षा आसपासचे गवत नेहमीच उंच राहिले 

व्याकुळतेचे वटवृक्ष धुळीस मिळाले तुझ्या अंतकरणातले 

स्फोटसुद्धा केले नाहीत त्यांनी 

चुपचाप आवाज न करता मेले 


स्वातंत्र्याच्या वाढीचा सुरुवातीचा अगम्य वेग 

स्वतःच्याच पानांच्या वर पॉलिश करत राहिला 


नैतिकतेचे सोने 

सजवलेले अलंकार बनत गेले

आणि शेवटी शब्दांचे अलंकार त्यांना गिळून गेले 


द्वादशशिलता फक्त पाळलेल्या पशुंच्या इतकीच क्वालिटी देत राहिली 

ज्वालामुखींच्या देवता सिगरेट शिलगावत शेवटी व्यसनमुक्ती केंद्रात पोहोचल्या 


काड्यापेटीत वाकलेली लहान मुले 

बालपण गमावत बॅडलक म्हणत राहिली तुझ्या अंगणात


तू लहान मुलासारखा आहेस म्हणत 

बायका पहात राहिल्या सोप ऑपेरे 


रिसेंट फ्लो कुठला आणि अँनशंट फ्लो कुठला हे सुद्धा कळणे मुश्किल होऊन बसले ॲक्शन फ्लोला 

आणि शेवटी कळाले की फक्त आपली लघवी वाहिली होती 


जग चमकले पण सुधारले नाही 

जगण्याच्या वासना भाकरीत सुद्धा धुमसत राहिल्या 


उत्सवांचे इव्हेंट झाले इव्हेंट्सचे इ- इवेंट्स 

चंद्र आणि सूर्य बल्ब झाले 

होमो सेपियन्सची सेवा करणारे 


तुझा आतला प्रकाश काही काळ डान्स करत राहतो  

बल्ब सारखा विझतो 


तू आत्महत्या का करत नाही श्रीधर 


टेम्परेरी समाध्या मोक्ष मिळवून देणार आहेत का 

सनातनच्या शोधात गेलेले आद्यतन 

स्वतःचे नवीन शरीर प्राप्त करणार आहेत का 


तुझे शरीर सडत चाललेले आहे 


तुझा मेकअप न करण्याचा अट्टाहास 

सूर्याला आवडलेला नाही 

तो तुझा चेहरा इमानइतबारे काळा पाडत चाललाय 

कुठलेही मेडिटेशन तुला वाचवू शकलेले नाही 

प्राणायामाने काहीही साध्य होते या दंतकथेत 

किती काळ सत्य काढत राहणार आहेस चेहऱ्याचे 

तुला रामदेवासारखे थोडेच धंदेवाईक मिशन चालवायचे आहे ?


नातेवाईकांचे काय 

त्यांना तू फ्युचर विवेकानंद वाटतो 

आता त्याला कोण बळी पडणार ?

मोक्ष न मिळवताच जगाला उपदेश देत कोण फिरणार ?


त्यापेक्षा तू आत्महत्या का करत नाही श्रीधर 


येणारे बिल शील बुडवते आजकाल 

झोपेत बबल किती आणि ट्रबल किती कळत नाही 

स्वप्ने दारू पिऊन झिंगतात

आणि मेंदू नामक गुत्त्यात मरून जातात 


कयामतीची रात्र आली म्हणावे तर सूर्य उगवलेला असतो 

आणि चंद्र खुंट्याला टांगून आकाश सूर्याच्या आहारी गेलेले 


दिवस फॅसिनेटिंग राहिलेले नाहीत श्रीधर 


मोक्षाची तळमळ ट्रिक नसते 

ती येते व्याकुळ होते जाते 


पण अंतिम परिणाम कुठे आहे 

ती शेवटची संजीवन समाधी कुठे आहे


तुझ्यातले जीवन नष्ट झालेले नाही 

याचा अर्थ ते नष्ट होणार नाही असा नाही 


त्यापेक्षा स्वतः नष्ट का होऊ नये 


बायका भोगून सुद्धा भोगवटा सुटत नाही 

पर्यावरण राखून सुद्धा फुफाटा सुटत नाही 


तळमळ उरतेच 

आणि आता ती मळमळायला लागलीये 


तू आत्महत्या का करत नाहीस श्रीधर ?


श्रीधर तिळवे नाईक 

(निर्वाण सिरीज मधील निर्वाणा पूर्वीच्या कविता या काव्यफायलीतून)


तुझ्या हातात गन आहे 

आणि माझ्या हृदयात मोक्ष 

तू मला मारू शकतोस 

पण हरवू शकत नाहीस 


तुझ्या हातात तलवार 

आणि माझ्या मेंदूत मोक्ष 

तू मला कापू शकतोस 

पण मरणाची धमकी देत झापू शकत नाहीस 


तुझे पैसे 

माझा मोक्ष विकत घेऊ शकत नाहीत 


तुझी सत्ता 

माझ्या मोक्षाला घाबरवू शकत नाही 


माझी द्वादशशीलता 

तू तलवारीच्या जीवावर बनवलेल्या कायद्यावर अवलंबून नाही 

ती माझ्यातून फुलासारखी उमललेली आहे 

तू फुलांची मान मुरगळू शकतोस 


तुझे एकही शस्त्र आणि अण्वस्त्र एकाही साध्या फुलाला जन्म देऊ शकत नाही 

इतका तू लिमिटेड आहेस 


तेव्हा या बाजारगप्पा 

आणि सत्तेच्या पोकळ वल्गना 

मला दाखवू नकोस 


ज्याने ईश्वर पाहिला 

त्याला माणूस दिसत नाही 


मला सुद्धा फक्त तुझ्यातला ईश्वरा दिसतोय 

जो सध्या मूर्खासारखा हातात कधी गन कधी तलवार घेऊन उभा आहे 


ज्या क्षणी तुला तुझ्यातला ईश्वर दिसेल 

 माझी खात्री आहे 

ही तलवार या धमक्या सर्व आपोआप गळून पडतील 

आणि तू ही ईश्वर पहायला

सुरुवात करशील 


तोवर करत रहा 

तुझ्या आतल्या फुलांच्या सुगंधांची नासाडी 


श्रीधर तिळवे नाईक 

(निर्वाण सिरीज मधील निर्वाणानंतरच्या कविता या काव्य फायलीतून)

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे