net love
तू जवळ आहेस
आणि ती दूर
तिच्याजवळ खूप झाडं आहेत
आणि शिशिर ऑन आहे
ती मला पानगळीत बुडवणार
हे स्पष्ट आहे
तू एकुलत्या एक झाडासारखी
ओसाड पण झाड असल्याने झाडपणावर खुश
मी तुझ्या सावलीत झोपावं
कि तिच्या अरण्यात चालतं व्हावं ?
मोडलेल्या खिडक्या फिक्स करण्यात ती वाकबगार
आणि तुला दारं सताड उघडी टाकल्याशिवाय झोप येत नाही
ती गोवन मासेमारीत निपुण
तिच्या हातांना पाणी सवयीचे
आणि वय ती हालचालीवरून ओळखते
तू मुंबईकर
कोळीवाड्यातली तुझी येजा फक्त सिनेमॅटिक
तुला समुद्राची फक्त सवय आहे
पण त्याच्यात वाकणारं आकाश
तू फक्त फोटोसाठी वापरतेस
आणि फक्त फोटोपुरता हातात पकडलेला सूर्य
जो पहायला तू सकाळी लवकर उठतही नाहीस
ती जे जगण्याच्या स्पर्धेत टिकत नाही
तळघरात ढकलते
अडगळी आपसुख मरतात अशी तिची समजूत
तू न टिकणाऱ्या गोष्टींना ठार मारलं पाहिजे म्हणत
त्यांच्यामागे काळाची गन घेऊन त्यांच्या मागे
गोव्यातील हिप्नॉटिक शेवटांना ती देते आरंभ
तू लोकलमध्ये आरंभशूर
मग गर्दीवर सोपवून
मोबाईल गेम खेळत लेडीज डब्यातील लाटांच्याप्रमाणे धपापणारी
असं नाही कि मी थ्रीसम खेळू शकत नाही
पण तुमच्या अहंकाराची मॅनेजमेंट करता करता माझी पिसं निघतील
हे मी जाणतो
असंही नाही कि चीटिंग करायला लागणारी चॅप्टरगिरी माझ्यात नाही
पण फसवणूक माझ्या नैतिकतेत बसत नाही
पतनाला अक्कल लागत नाही
आणि वासना अक्कलशून्य
पाणी काढून
ताटात काहीच न वाढता निघून जाणारी
तुम्हां दोघींनाही मी सांगतोय कि दोघी आहात
आणि मी केऑसमध्ये
"हे सगळं तुझ्या पत्रीकेतील लाभात असलेल्या तुळेच्या चंद्र शुक्र युतीमुळे घडतंय
आणि मी ती दुरुस्त नाही करू शकत "
गोवेकर निघून चाललीये
आणि तू चंद्राला आग लावत
"शुक्र करो मैं ऍस्ट्रोलॉजी पे विश्वास नही करती "
मी मुंबईत बॉल टाकतोय
आणि तू आणलेला कंडोम
त्यांना व्यवस्थित वाया जाऊ देतोय
श्रीधर तिळवे नाईक
(नेट सिरीज मधील नेट लव्ह ह्या काव्यफाईलीतून )
Comments
Post a Comment