नितीन वाघ गेला नितीन वाघ ची गोष्ट

 नितीन भरत वाघ पूर्वार्ध

नितीन मला भेटला होता तो आल्हाद भावसार याची ओळख सांगत! आल्हाद भावसार हा माझा अत्यंत जवळचा दोस्त ! साहजिकच त्याला मी माझ्या आयुष्यात ताबडतोब ऍडमिशन दिले . तो आला ते मुळातच मी तुमच्या लिखाणाचा आणि कवितांचा फॅन आहे असे सांगत ! माझ्या जीवनाविषयी त्याने काही खऱ्या आणि काही खोट्या गोष्टी ऐकल्या होत्या . आणि तो त्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत असे गृहीत धरूनच बोलत होता साहजिकच मला काही गोष्टींच्या बाबत असं काहीही घडलेलं नाही असं सांगावं लागलं . न केलेल्या पराक्रमाविषयी श्रेय घेणे माझ्या तत्वात बसत नाही त्यामुळे साहजिकच मी ह्या गोष्टी केलेल्या नाहीत हे मला त्याला नाईलाजाने सांगावे लागले 

नंतर मग मी भावसार ला फोन केला तर त्याने सांगितले की त्याने रेफरन्स दिलेलाच नाही आणि इथूनच हा कायमच परस्पर विरोध नितीन वाघबरोबरच्या माझ्या संबंधाबाबत वावरत राहिला 


पहिल्याच भेटीमध्ये जाणवलेली पहिली गोष्ट म्हणजे त्याने त्याच्या पिढीतल्या लोकांच्या पेक्षा आमची पिढी अधिक काळजीपूर्वक वाचलेली होती दुसरी गोष्ट त्याची बुद्धी अतिशय तैलबुद्धी होती तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्या मनात जे येत होते ते तो स्पष्ट आणि स्वच्छपणाने बोलत होता साहजिकच मला त्याचा हा स्वभाव आवडला कारण मला कायमच रोखठोक बोलणारी माणसे आवडतात प्रॉब्लेम फक्त एकच होता तो म्हणजे त्याला माझ्या लाईफस्टाईल विषयी असलेले विचित्र आकर्षण ! आणि अर्थातच दुसरा प्रॉब्लेम प्रत्येक बौद्धिक माणसा बाबत देतो तोच होता तो म्हणजे बौद्धिक अहंकार आणि कधीकधी इतरांच्या विषयीची तुच्छता ! 


माझ्या लाईफस्टाईल विषयीचे वाटणारे आकर्षण मिर वणारा तो फक्त एकटाच असा नव्हता त्या काळात माझ्या भोवती साहित्याच्या बाहेरच्या क्षेत्रात सुद्धा असे काही लोक होते आणि त्यांचे काय करायचे याविषयीचे माझे धोरण स्पष्ट होते माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये मी कधीही कोणाला आंधळा फॅन होऊ दिले नाही कोल्हापुरी भाषेत सांगायचे तर अशा लोकांना मी झेन लाथा घालायचो कारण फॅन्स चे डोळे उघडण्याचा तोच मार्ग असतो 


माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये मी कायमच समाज फाट्यावर मारला त्याला त्याचे विलक्षण आकर्षण होते मी ते आकर्षण जितके काढून घेता येईल तितके काढून घेण्याचा प्रयत्न केला कारण माझी जीवनशैली ही संन्याशातून जन्मलेली जीवनशैली आहे त्यामुळे त्याला जर का गृहस्थ आश्रम स्वीकारायचा असेल तर त्याने ती जीवनशैली स्वीकारू नये असे माझे स्पष्ट मत होते साहजिकच काही झेन लाथा घालणं सुरू झाले मुख्य म्हणजे कामवासनेवरचा संपूर्ण कंट्रोल हा या जीवनशैलीसाठी अत्यंत आवश्यक होता . लग्न व्यवस्था तुम्हाला अनेकदा कामवासनेसाठी आवश्यक असणारी वारंवारता पुरवते पण संन्यास शैलीमध्ये तुम्ही गेलात की हे होईलच याची कसलीही खात्री नसते तुम्ही बौद्ध संन्यास घेतला तर तुम्हाला पूर्णपणे ब्रह्मचर्य पाळावे लागते ते पाळता येणे शक्य आहे का हे तू स्वतःला विचार असे मी त्याला म्हणालो मुळातच शैव-धर्मामध्ये ब्रह्मचर्य मान्य नाही पण बौद्ध धर्माला मात्र ब्रह्मचर्य मान्य आहे आणि तुला नेमक्या कोणत्या शैलीने जगायचे आहे ते तुला ठरवायला लागेल असे मी म्हणालो हळूहळू या संदर्भात त्याच्या असे लक्षात आले की त्याला गृहस्थ आश्रमाची गरज आहे साहजिकच मी म्हणालो की तू लग्न कर आणि लग्न करायचे तर भारतीय समाजामध्ये अनेक गोष्टी लागतात त्या परवडणाऱ्या आहेत का हा खरा प्रश्न आहे याबाबत काय करता येईल ते पहा.


त्या काळात माझ्या कविता फारशा प्रसिद्ध नव्हत्या पण नितीन वाघला माझी बाडे बघायला मी अनुमती दिली होती आणि त्याचा एकच धोशा सुरु झाला तो म्हणजे काही करून तुम्ही तुमच्या कविता तुमचे लिखाण छापील स्वरूपात आणले पाहिजे आज माझे जे काही छापील स्वरूपात जुने लिखाण येते आहे त्याचे श्रेय ज्या मोजक्या लोकांना आहे त्यामध्ये नितीन वाघ याचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे . 


पहिल्या भेटीत त्याच्या काही अडचणी त्याने सांगितल्या मुख्य अडचण अर्थातच घराबाबत होती माझा एक इस्टेट एजंट मित्र होता त्यामुळे साहजिकच तिथूनच त्याला मदत करणे सुरू झाले 


दुसऱ्या भेटीत मात्र तो अधिक स्पष्ट होता आणि त्याने स्पष्ट सांगितले की त्याला पाचवी नवता मांडायची आहे साहजिकच चौथ्या नवतेविषयीची त्याची मते तो रोखठोक भाषेत मांडणे सुरू झाले माझे म्हणणे असे की जे आहे त्याला विरोध करायचा असेल तर मुळात जे मांडले गेले आहे ते नीट समजून घेतले गेले पाहिजे म्हणजे मी भालचंद्र नेमाडे असो किंवा दिलीप चित्रे असो किंवा विलास सारंग असो संपूर्ण नीट वाचले होते तुला त्याप्रमाणेच आधीचे सर्व लोक नीट वाचायला लागतील त्यांच्यातले विरोधाभास नीट हेरावे लागतील त्याला हे मान्य झाले आणि त्याने काय वाचले आणि आणखी काय वाचायला हवे या अंगाने मग चर्चा होऊ लागल्या यातूनच मग पुढचा निष्कर्ष त्याने काढला तो म्हणजे श्रीधर तिळवेला बाजूला काढले की संपूर्ण नवोदत्तर पिढी बाद करता येईल याबाबत अभिधाचे जे धोरण होते ते त्याने स्वीकारले ते म्हणजे श्रीधर तिळवे ऐंशोत्तरी पिढीत टाकायचा आणि अख्खी नवोदत्तरी पिढी बाद करून टाकायची हे अभिधानंतरच्या धोरणाच्या नेमक्या विरोधात होते म्हणजे अभिधानंतर ग्रुप हे स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी हे करत होता नितीन वाघ हे या नवोदत्तर पिढीला विस्थापित करण्यासाठी हे करू इच्छित होता जेणेकरून 2000 नंतरचे लेखन हे पाचवी नवता म्हणून प्रस्थापित करता येईल मला हे सर्व स्ट्रॅटेजिक वाटत होते आणि हे सर्व नेमके कुठे घेऊन जाईल ते सांगणे अवघड होते पण त्याच्या वैचारिक स्थलांतराची मांडणी माझ्यापुढे तयार होताना मी पहात होतो पूर्वार्धात तो नेमाडे यांचा भक्त होता ही वस्तुस्थिती ! माझा नेमाडे यांच्या देशीवादाला असलेला ठाम विरोध त्याला कितपत जबाबदार होता कोणास ठाऊक ! मी साठोत्तरीला शह द्यायचा म्हणून आधुनिक नवतेतील बाळ सिताराम मर्ढेकर आणि विंदा करंदीकरांशी जशी नाळ जुळवून घेतली पण सत्यकथावादी झालो नाही अशी त्याची ठाम समजूत होती त्यामुळे त्याचप्रमाणे 90त्तरी पिढीला शह देण्यासाठी म्हणून आमच्या आधीच्या पिढीतील म्हणजेच साठोत्तरी पिढीतील भालचंद्र नेमाडे आणि अरुण कोलटकर यांच्याशी नाळ जुळवून घेणे सोयीचे होईल असे त्याला वाटत होते प्रॉब्लेम असा होता की मी मुळात जशी ह्या आधुनिक नवतेच्या लोकांनी कट्टर मार्गीवादी भूमिका घेतली होती तशी घेतलीच नव्हती उलट मार्गी, देशी ,पोटी आणि जमाती अशा चारी अंगांना चौथ्या नवतेने कवटाळले पाहिजे अशी माझी मांडणी होती आणि आजही आहे त्यामुळे त्याची चांगलीच पंचायत झाली होती आणि यावर काहीतरी सोल्युशन शोधणे त्याला आवश्यक वाटत होते मी स्वतः नेमाडेंच्या लेखनाची थोरवी ही कशी मार्गीवादात आहे हे सांगत होतो त्याने नेमके हेच पण उलट्या अंगाने केले साहजिकच मग श्रीधर तिळवे हा कसा देशीवादी आहे हे पटवणे सुरू केले आणि माझ्या लेखनाची थोरवी कशी देशी वादात आहे हे सांगायला सुरू केले ज्याचा परिणाम कळत नकळत त्याच्या पिढीवर झालेला असावा 


त्याचा माझ्याबरोबरचा पूर्वार्ध हा जडणघडणीचा काळ होता माझे म्हणणे या बाबतीत अत्यंत स्पष्ट होते त्याला त्याच्या स्वतःच्या बॅकग्राऊंड पाशी गेले पाहिजे आणि त्याची बॅकग्राऊंड ही नव बौद्ध आंबेडकरवादाची होती मात्र आंबेडकर वादाची चिकित्सा झालीच पाहिजे असे माझे त्यावेळीही ठाम मत होते आणि मी स्वतः तशी ती केलेली होती सौष्ठवचा एक अंक त्या अंगाने प्रसिद्ध झाला होता जो त्याच्याकडे होता त्याचा याला विरोध होता याचे कारण त्याला जातविरहित जगायचे होते मला या गोष्टीविषयी शंका होती पण हे शक्य आहे असेही वाटत होते पण त्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागते भारतामध्ये तुम्हाला मिळणारा लेखक म्हणून ऑडियन्स गमवावा लागतो कारण भारतात तुमचा ऑडियंस सुद्धा तुमचा वर्ण , तुमची जात आणि तुमचा धर्म निश्चित करतो माझे स्वतःचे बॅकग्राऊंड अतिशय गुंतागुंतीचे व संकरित असल्याने माझ्याबाबतीत ते शक्य होते परंतु त्याच्या बाबतीत ते कितपत शक्य होईल याबद्दल मला शंका होती पण या काळामध्ये त्याची जिद्द तशी होती हे मात्र खरे ! त्याच्या कॉलेजची बॅकग्राऊंड ही अत्यंत गुंतागुंतीची होती आणि कळत नकळत त्याच्या जातीचे काही चटके त्याला बसले होते . पण हे सर्व बाजूला सारून एका मोठ्या मानवतावादामध्ये विलीन होता येईल असे त्याला वाटत होते परंतु भारतातली अत्यंत हीन दर्जाची वर्ण जात व्यवस्था त्याला हे करू देणार नाही याची मला थोडीशी गॅरंटी होती 


त्याने या अंगाने अत्यंत नेटाने प्रयत्न केले आणि त्याचे मुंबईत सेटल होण्यासाठी करावयाचे प्रयत्न हे त्यासाठीच होते . माझे यावर म्हणणे असे होते की तू बॉलिवूडमध्ये प्रयत्न कर कारण हे एकच क्षेत्र असे आहे जिथे तुमची जात कोणी विचारत नाही कारण इथे अनेकांचे जन्म हे संकरित जन्म असतात परंतु त्याला आयुष्यात स्थिर व्हायचे होते आता अशी स्थैर्य स्थिती बॉलीवूडमध्ये कशी मिळणार ? 


त्याची कलेविषयीची तळमळ ही अत्यंत खोल आणि व्याकुळ करणारी होती पण भारतामध्ये कलेविषयीची तळमळ तुम्हाला पुरेसे पैसे देत नाही साहजिकच या संदर्भात चर्चा होऊ लागली आणि त्यातूनच स्त्री वाहिनी हा माझा काव्यसंग्रह अनुवादित करायचा अशी संकल्पना जन्मली मी त्याला इंग्रजी अनुवादासाठी 5000 रुपये देतो असे सांगितले आणि त्याने हे काम अंगावर घेतले काम पूर्ण झाल्यावर साहजिकच एका हाताने तुम्ही काम घ्या आणि दुसऱ्या हाताने पैसे द्या असे ठरले मी त्याला तयार झालो आणि एन एन पी मध्ये एका हॉटेलमध्ये आम्ही हा व्यवहार करायचे ठरवले मी पैसे दिले मात्र अनु वादात काही त्रुटी राहिल्यामुळे अनुवाद नंतर देतो असे त्याने सांगितले मुळातच यामध्ये त्याला आर्थिक मदत करणे हाच उद्देश असल्याने मी काही हा विषय लांबवला नाही आणि पैसे देऊन घरी परतलो पुढे त्याने हा व्यवहार पूर्ण केला आणि स्वतःच हे पुस्तक प्रकाशित केले 


त्याचे स्वतःचे काही वाङ्मय होते तेही प्रकाशित होत नव्हते साहजिकच मग काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला या काळात कीर्ती शिंदे या माझ्या मित्राने नवता प्रकाशन नावाचे प्रकाशन सुरू केले होते मी त्याला पुस्तके पाठवायला सांगितली आणि मी स्वतःच कीर्तीशी बोलतो असे सांगितले पुढे काही वर्षांनी नवता प्रकाशनातर्फे मग त्याची काही पुस्तके आली त्यातील झेन वरचे त्याचे पुस्तक गाजले 


अर्थात या सर्व गोष्टींच्यामुळे त्याची आर्थिक गरज भागणे शक्यच नव्हते त्यासाठी सरकारी नोकरी किंवा खाजगी नोकरी करणे आवश्यक होती किंवा उद्योगधंदा उभा करणे आवश्यक होते त्याच्या सुदैवाने त्याला सरकारी नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली पण सरकारी नोकरी करणे हे त्याच्या जीवावर आलेले होते पण तरीही त्याला ती स्वीकारावी लागली कारण पैसे आटत होते . नामदेव ढसाळ सारखे पैसे मागत किंवा मग श्रीधर तिळवे सारखे मिळेल ते काम करत तुला जगावे लागेल हे तुला झेपणार आहे का हे तू व्यवस्थित शांत डोक्याने ठरव असे मी त्याला सांगितले होते त्याने मग सांगितले की हे दोन्ही मार्ग त्याला झेपणारे नाहीत आणि मग सरकारी नोकरी करणे निश्चित झाले 


या तडजोडीमध्ये त्याचे व्यक्तिमत्व थोडे बदलायला लागले आणि तो अधिक व्यवहारी व्हायला लागला नोकरी किंवा धंदा करताना मनुष्य भारतामध्ये अनेक तडजोडी करायला शिकतोच तो त्याला अपवाद ठरणे शक्यच नव्हते साहजिकच तो व्यवहारी बनत गेला साहजिकच त्याचे काही व्यवहारिक सल्ले माझ्या अंगावर आदळायला लागले आणि मी ते अंगाला लावून घेत नव्हतो त्यामुळे साहजिकच त्याच्या दृष्टीने अधिकाधिक मूर्ख होऊ लागलो तुम्ही माझ्यावर लिहा मी तुमच्यावर लिहीन असे सुद्धा तो सांगायला लागला आणि मला हे फार विचित्र वाटायला लागले 


सरते शेवटी तो पुण्याच्या दिशेने सेटल होण्याच्या निष्कर्षापर्यंत सरकला आणि इथून जो नितीन वाघ उगवला तो पूर्णपणे आत्तापर्यंतच्या नितीन वाघपेक्षा वेगळा होता . अर्थातच हा बदल एका रात्रीत घडला नव्हता तो हळूहळू घडत गेला आणि 2020 नंतर आमचे संबंध हे प्रचंड गुंतागुंतीचे होत गेले. 

(क्रमशः )


श्रीधर तिळवे नाईक


नितीन भरत वाघ उत्तरार्ध श्रीधर तिळवे नाईक 


उत्तरार्धातील नितीन बरोबर माझे तीनदा कडाक्याचे भांडण झाले पहिली वेळ अर्थातच 2014 ला माझ्या आयुष्यात जे काही घडले त्याला काय म्हणावे आणि काय म्हणू नये या अंगाने होते त्याच्या स्वतःच्या काही कसोट्या होत्या आणि त्या पुस्तकी होत्या त्याला बुद्धाची रिपीटेशन अभिप्रेत होती आणि तो मूर्खपणा होता आणि आहे 

दुसऱ्यांदा जे भांडण झाले ते माझ्या शैव मांडणीवरून झाले त्याच्या मते मी बौद्ध धर्माकडून पुन्हा शैव-धर्माकडे सरकणे हे माझ्या साहित्यातल्या करियर बाबतीत अत्यंत अनुचित ठरणार आहे आणि तुम्हाला तुमची ही भूमिका कायमची संपवेल असे त्याचे म्हणणे होते मी मराठी साहित्यामध्ये कमालीचा एकटा ठरेन एकटा पडेन असे तो म्हणत होता त्याच्या मते माझ्या साहित्याचा सर्व पाठिंबा हा दलित लोकांच्या वर अवलंबून आहे आणि या मांडणीमुळे दलित लोक दूर जाणे अटळ आहेत असे त्याला वाटत होते माझे म्हणणे असे होते की असे होईल म्हणून मी माझी मांडणी थांबवणे योग्य नव्हे मला जे सत्य वाटते ते मी बोललेच पाहिजे 

तिसऱ्या भांडणाच्या मुळाशी मात्र मीच होतो कारण त्याचे नोकरी सोडणे मला मान्य नव्हते तू गृहस्थ आश्रम स्वीकारलेला आहेस तर जोपर्यंत जगण्याची समांतर व्यवस्था तू निर्माण करत नाही तोवर तू हे करता कामा नये असे माझे म्हणणे होते याबाबत तो मला माझ्या जीवनशैलीवरून मी कसा जगलो ते सांगत राहिला माझे म्हणणे असे होते की मी तगलो कारण मला अनेक गोष्टी येतात वेळप्रसंगी मी अंग मेहनतीची कामे सुद्धा करू शकतो केलेली आहेत आणि काही ना काही करून मी सहजरीत्या कुठल्याही अडथळ्यातून बाजूला पडतो दुसरी गोष्ट धम्माप्रमाणे जो जगु शकतो त्याला आपोआपच काही ना काही सोय उपलब्ध होत जाते बुद्धाच्या भाषेत सांगायचे तर तुम्ही धम्माची काळजी घ्या धम्म आपोआपच तुमची काळजी घेतो झेनवर पुस्तके लिहिली म्हणजे तू काही निर्वाणप्राप्तीला उपलब्ध होत नाहीस त्यामुळे धम्म तुझी काळजी घेइल ह्याची कसलीही खात्री नाही तेव्हा नोकरी सोडू नकोस प्रथम आधी उत्तम पैकी समांतर पैशाचा सोर्स तयार कर आणि मग तुला जे काय करायचे ते कर त्याला हे शेवटपर्यंत मान्य नव्हतं साहजिकच नंतर सुद्धा आमच्या फोनवरच्या बोलण्यामधून वाद व्हायलाच लागला 

मात्र माझ्या समग्र कविता आणि धर्म आणि अर्थ या दोन बहुखंडी कादंबऱ्या प्रकाशित करण्याचे त्याने दिलेले वचन पाळायचे ठरवले प्रत्यक्षात ते पाळता येणे अशक्य होत गेले कारण यासाठी लागणारा प्रचंड पैसा त्याच्याजवळ नव्हता मात्र एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार समग्र हा काव्यसंग्रह डिझाईन करण्याचे मुख्य काम त्यानेच केले होते पण इथेही हिंदीत लिहिलेल्या कवितांच्या संदर्भात मतभेद झालेच मी सर्व हिंदी गजला या संग्रहात आल्या पाहिजेत असे म्हणत होतो त्या उलट त्याला फक्त मराठीच कविता यामध्ये समाविष्ट कराव्यात असे वाटत होते आणि त्याने त्याचा हट्ट पुरवला आणि त्याच्याच सांगण्यावरून हा ग्रंथ विनायक येवले यांच्या हस्ताक्षर प्रकाशनतर्फे आला या सगळ्या प्रोजेक्ट ला "तिळवे भांडार "असे नाव द्यावे असे माझे मत होते हेही त्याला अमान्य होते त्यातच भरीसभर म्हणून तो जी प्रस्तावना लिहिणार होता ती बहुदा त्याने लिहिली नाही आजही या पुस्तकावरचा मलपृष्ठावरचा मजकूर नेमका कोणी लिहिला आहे मला माहित नाही तो त्याने लिहिला असावा असे वाटते पण विनायक येवले यांनी सुद्धा तो लिहिलेला असू शकतो 

या सगळ्या गदारोळात आणखी एक गोष्ट घडत होती ती म्हणजे मी त्याला त्याच्या लेखनाला पुरेसा प्रतिसाद देत नाही असे त्याला वाटत होते याबाबतीत झेनच्या बाबतीत माझी भूमिका फार सुरुवातीपासूनच स्पष्ट होती एक तर अशा प्रकारच्या झेन कथा मराठीत दुर्गाबाई भागवतांच्यापासूनच येत होत्या दुसरी गोष्ट इंग्रजीमध्ये अशा संकलनांचा संग्रह खूप वेळा आलेला आहे त्यामुळे हे जे काम आहे ते प्रचंड ओरिजनल काम आहे असे मला वाटत नाही असे मी त्याला सांगितले 

याच काळामध्ये मी माझा 365 days with your body हा ग्रंथ पुढे आणला होता आणि 2014 यावर्षी जे घडले त्यावरून त्याच वर्षी आला होता त्यावरूनही वादविवाद झाले पुढे मग त्याचा स्वतःचा बुुद्धा च्याा सिद्धांतावरचा ग्रंथ आला 

इथूनच माझ्या शैव मांडणीला अत्यंत पराकोटीचा विरोध सुरू झाला आणि हा विरोध तात्विक पातळीवर करण्याऐवजी असभ्य भाषेत सुरू झाला आणि मी त्याच्याशी बोलणे हळूहळू कमी करत आणले 

नेमक्या ह्याचवेळी नोकरीच्या अंगाने आमचे भांडण सुरू झाले माझे स्वतःचे म्हणणे असे होते की तू काही निर्वाणप्राप्तीसाठी साधना करत नाही मग अशा प्रकारची पुस्तके कशाला लिहितोस ज्या गोष्टीचा तुला अनुभवच नाही त्या गोष्टीत तू शिरतोच कशाला मग तुझ्यात आणि सत्यकथेमध्ये काय फरक राहिला ? शाब्दिक प्रभुत्व म्हणजे मोक्षिक प्रभुत्व नव्हे . मग अर्थातच नोकरीचा मुद्दा ! मला त्याचे नोकरी सोडणे मान्य नव्हते कारण तो काही खरा साधक नव्हता अशावेळी हे नोकरी सोडणे म्हणजे प्रचंड ताण वाढवणारे होते रोजच्या जीवनातल्या अनेक गोष्टी काळजाला घरे पाडणाऱ्या ठरणार होत्या हे सर्व तुला झेपणारे नाही तू नको तितके प्रेशर घेत राहशील असे मी त्याला म्हणालो यावर त्याने माझेच उत्तर माझ्या तोंडावर फेकले ते म्हणजे जो धम्माप्रमाणे वागतो त्याची धम्म काळजी घेतो मी म्हणालो तू जर का खरोखरच धम्माप्रमाणे जाणार असशील तर धम्म तुझी नक्कीच काळजी घेईल पण खरोखरच तू तसा जाणार आणि जगणार आहेस का ? त्याला हा मी त्याच्यावर दाखवलेला अविश्वास वाटत होता. 

तो मराठीतल्या अनेक लेखकांच्या पेक्षा अधिक ऑथेंटिक होता याबद्दल मला आजही शंका नाही परंतु त्याच्या बाबतीत सुद्धा काही मानवांचे प्रश्न होते जो मदत करतो तो मोठा हे माणसाचे नेहमीच जीवन प्रमेय असते साहजिकच अनेकदा मनुष्य त्या मनुष्याने केलेल्या मदतीच्या अंगाने त्या माणसाला थोर किंवा नीच ठरवायला लागतो. त्या माणसाची मदत थांबली की माणसे त्या माणसाला थोर म्हणणे थांबवतात त्याला तो अपवाद होता का हा एक खरंतर खूप मोठा प्रश्न आहे. माणसाचे संसारी जीवन हे नेहमीच हितसंबंधांच्यावर आणि अनेकदा आर्थिक हितसंबंधांच्यावर ठरत असते फार लोक कमी असतात जे आर्थिक हितसंबंधांच्या पार जातात 

त्याची माझी शेवटची भेट सुद्धा ह्याच अंगाने झाली होती आणि त्याला पैशाची गरज होती सुदेवाने त्याच वेळेला काजोलच्या एका काकाने मला एका कामाचा दहा हजाराचा चेक दिला होता त्याच्या जीवावर मी त्याला दहा हजाराचा चेक दिला तो त्याने बँकेत टाकला नाही की टाकला मला माहित नाही कारण मी अद्याप ते बघितलेच नाही पैसे दिले की ते विसरून जावेत हे माझे फार पूर्वीपासूनचे धोरण आहे हे पैसे तो परत करणार असे मात्र त्याने सांगितले होते ती वेळ काही आली नाही तो चेक वटवला गेला की नाही हे मला आजही माहित नाही

नंतर वेगवेगळ्या कॉमेंट मधून आल्या त्या फक्त असभ्य भाषेतल्या प्रतिक्रिया ! शेवटी शेवटी मी त्यांनाही प्रतिक्रिया देणे बंद केले 

माणूस वेगळा आणि त्याचे साहित्य वेगळे कला वेगळी असे एक धोरणच असावे त्यामुळे त्याच्या साहित्याचे योग्य ते मूल्यमापन झालेच पाहिजे मला स्वतःला त्याची व्हर्जिन ही कादंबरी चौथ्या नवतेतली एक अतिशय महत्त्वाची कादंबरी वाटते त्याच्या कवितांच्या बाबतीत मात्र मी फारसा अनुकूल नव्हतो उलट तू सपाट कविता लिहितोस म्हणून काव्य लेखन करणे सोड असे त्याला मी स्पष्टपणे सांगितले होते तुझा सृजनशील कल हा गद्य लेखनाला अधिक पूरक आहे असेही मी त्याला सांगितले होते त्याने कथा वांग्मय सुद्धा लिहायला हवे असा माझा आग्रह होता पण त्याने तो काही फार मनावर घेतल्याचे दिसले नाही पाचवी नवता मांडण्याचे कौशल्य आणि सृजनशीलता त्याच्याकडे होती की नाही हे सांगणे आता कठीण झाले कारण माणसाची संपूर्ण वैचारिक मांडणी ही नंतरच अधिकाधिक स्पष्ट होत जाते 

उत्तरार्धात त्याच्यामध्ये घडलेला सर्वात महत्त्वाचा बदल हा त्याचे आंबेडकरवादाकडे परतणे होते मात्र तो आंबेडकरवादाचा इतरांच्या प्रमाणे गुलाम नव्हता तो त्यांच्या वारशाला अधिकाधिक पुढे घेऊन जाणार आहोत असे मानणारा होता केवळ देशी वादाच्या जीवावर ज्याप्रमाणे नेमाडे यांनी तिसरी नवता आणली तशी पाचवी नवता आणता येईल असे त्याचे गृहीतक होते प्रत्यक्षामध्ये हे चुकीचे होते याचे कारण तशी जागा मीच मुळात ठेवलेली नाही मी चौथी नव्हता ही मार्गी ,देशी, पोटी आणि जमाती या सर्वांना सामावून घेणारी असली पाहिजे असे मांडल्याने देशी किंवा पोटी च्या आधारे नवता निर्माण करणे अशक्य होते त्याला हे कळले नाही वास्तविक नवता निर्माण होण्यासाठी काळाची साथ लागते म्हणजे असे की ज्ञानाच्या किंवा इतर क्षेत्रांमध्ये क्रांतिकारक बदल व्हावा लागतो माझ्या सुदैवाने असा क्रांतीकारक बदल झाला होता म्हणूनच मी चौथी नवता मांडू शकलो परंतु असा कुठलाही क्रांतीकारक बदल दुसऱ्या पिढीच्या नशिबी आला नाही बाळ सिताराम मर्ढेकर यांनी सुद्धा जेव्हा नवता मांडली तेव्हा त्यांनाही अशी काळाची साथ होती त्या उलट नेमाडे यांना फायदा मिळाला तो मार्गीवाद नको तितका बोकाळल्याने अन्यथा त्यांना हा फायदा मिळाला नसता आजही नेमाडेंची नवता ही खरी नवता मानावी का हा प्रश्न आहे कारण नेमाडे यांच्या नवतेने कुठलही नवीन सामाजिक समीकरण मांडलेले नाही किंवा कलेचे समीकरण मांडलेले नाही आधुनिकतेने जे समीकरण मांडले तेच त्यांनी देशी केलेले आहे ते त्यांना नवता म्हणून मिरवता आले कारण आधुनिक नवतेच्या लोकांनी नको तितके सत्यकथावादी मार्गीवादी होणे स्वीकारले होते ते जर घडले नसते तर नेमाडे यांची नवता ही नवताच झाली नसती श्री पु भागवत यांनी जर का कोसला स्वीकारली असती तर आपोआपच नेमाडे यांची कादंबरी आधुनिक नवतेतली कादंबरी म्हणून स्वीकारली गेली असती आणि देशी नवता निर्माणच झाली नसती हे आधुनिक नवतेचे दुर्दैव आहे की तिने केवळ देशीवादाच्या जीवावर एक नवता येऊ दिली आणि या मधले सर्वात मोठे खलनायक हे श्री पु भागवत आहेत मी भागवत नव्हतो आणि नितीन वाघ यांना हे कळले नाही 

नितीन हा एक उमदा मनुष्य होता याबद्दल काही शंका असू नये त्याच्या अंत:करणातली करुणा ही नेहमीच दुसऱ्याचे भले व्हावे म्हणूनच होती अगदी माझे सुद्धा भले व्हावे असेच त्याला वाटत होते आणि मी जे काय करतो आहे त्यामुळे माझे भले होणार नाही अशी त्याची खात्री असल्याने तो माझ्यावर प्रखर टीका करत होता मला याची कल्पना असल्यानेच मी कधीही वैयक्तिक वाद वाढू दिला नाही आणि बहुदा मला हे माहित आहे हे त्याला माहीत असल्याने त्यानेही हा वाद कधी प्रखर केला नाही मात्र मी शैवधर्म स्वतंत्र मांडणी करून बाबासाहेब आंबेडकरांना समुद्रात बुडवायला निघालेलो आहे असे त्याचे ठाम मत होते आणि हे होणे त्याला नको असल्याने तो माझ्या विरोधात ठाम उभा राहिला. माझी ह्यालाही हरकत नव्हती मी काही भालचंद्र नेमाडे नव्हतो की उपेक्षा करून संपवा माझे म्हणणे एवढेच होते की तुला निष्कर्ष मांडून आणि पुरावे देऊन मला संपवावे लागेल ते त्याला जमले असे मला वाटत नाही 

काल अचानक कीर्ती कुमार शिंदे याचा फोन आला आणि मी नेमका गोव्याच्या विमानात होतो त्याने सांगितले की "तुझा पार्टनर नितीन भरत वाघ गेला" या बातमीवर विश्वास ठेवणे मला कठीणच होते साहजिकच खातर जमा करण्यासाठी मला अनेक फोन करावे लागते बातमी कन्फर्म झाली आणि प्रचंड नि:संग असलेला मी क्षणभर ओला झाला 

हे काय जायचे वय होते ? 

नितीन कडून माझ्या बऱ्याच अपेक्षा होत्या तो चौथ्या नवतेच्या अनेक चमकदार कादंबऱ्या लिहिल याबद्दल माझ्या मनात शंका नव्हती स्वतःचा समकालीन अवकाश आणि काळ त्याला फार व्यवस्थित उमगलेला होता जाती-जातीतले ताणे बाणे त्याला हळूहळू समजायला लागले होते तो सायन्सचा विद्यार्थी असल्याने आत्ताच्या काळाचा सायंटिफिक ethos त्याला नीट माहिती होता एक प्रकारचा कडवटपणा जरी त्याच्या आत आला असला तरी हा कडवटपणाच सृजनशील काम त्याच्याकडून घडवेल याविषयी माझ्या मनात शंका नव्हती 2000 नंतरच्या पिढी मधला तो एक फार सशक्त असा साहित्यिक होता या पिढीचा संघटक म्हणून त्याने काम करणे बाकी होते आणि मी त्याने हे करावे म्हणून वारंवार सांगत होतो अशा प्रकारची क्षमता संतोष पवार, प्रणव सखदेव आणि त्याच्याकडेच होती . तो एका अर्थाने फार एकलकोंडा होता गर्दीत त्याचा जीव घुसमटून जायचा आणि तरीही 2000 नंतरच्या बौद्ध समाजाचे वैचारिक नेतृत्व करण्याची कळत नकळत एक जबाबदारी त्याने उचलली या जबाबदारीचा ताणसुद्धा त्याच्यावर होता ओबीसींना कसे समजवावे हा एक फार मोठा प्रश्न माझ्यापुढे होता तोच त्याच्या पुढे उभा राहिल त्याने मग शूद्र वर्णाचे कसे वैदिकीकरण झाले आहे याची मांडणी करायला सुरुवात केली आणि मग ब्राह्मणे तर लोकांचा कसा मेमरी लॉस झाला आहे ते तो मांडत राहिला 

मेहुला संस्कृती किंवा सिंधू संस्कृती ही भारतीय इतिहासातला फार मोठा कळीचा प्रश्न आहे त्याला सुद्धा याची जाणीव झाली होती आमचे याबाबत तीव्र मतभेद नंतर झाले कारण तो बौद्ध धर्माचा अस्तित्वात नसलेला इतिहास निर्माण करू पाहत होता या संस्कृतीचा आणि बौद्ध धर्माचा काडीचाही संबंध नाही असे माझे स्पष्ट मत होते आणि आहे . ही संस्कृती शैव संस्कृती आहे असे माझे मत असल्याने साहजिकच आम्ही दोन टोकाला गेलो 

आंबेडकर वादाला नेमकी नितीन वाघ याने कोणती नवी दिशा दिली या अंगाने आता चर्चा होणे आवश्यक आहे पण मुळात त्यासाठी आधी आमच्या पिढीला तपासावे लागेल आणि मग आमच्या नंतर आलेल्या पिढीला तपासावे लागेल हे करायला मुळात खूप पेशंस असायला हवा तो किती लोकांच्याकडे असेल याबद्दल मला शंका आहे 

आमच्या पिढीतील अभिधानंतर ग्रुपने नवसत्यकथावाद स्वीकारल्यामुळे त्याला काही प्रमाणात फायदा नक्कीच झाला मात्र तरीही देशीवादाच्या अंगाने जाता येईल यावर माझा आजही विश्वास नाही मी त्याला याबाबत एक सल्ला दिला होता तो म्हणजे तू ग्लोकलायझेशन संकल्पना स्वीकार आणि ग्लोबलायझेशन आणि ग्लोकलायझेशन यांच्या अंगाने काही करता येते का ते पहा देशीवादाच्या अंगाने कल्ला करशील तर गोंधळ करशील त्याच्यानंतर काम करणाऱ्या लोकांना ही दिशा अजूनही ओपन आहे 

मित्रा , तू जसा आहेस तसाच मी तुला स्वीकारला होता आणि आता तू नाहीस . तू जे केलेस त्याचे यथोचित मूल्यमापन करणे हीच तुला आदरांजली ठरेल 

अलविदा !

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे