युरेशियन लोकांचे शत्रुत्व , बौद्ध धर्माची हकालपट्टी , जैन लोकांचे वर्णीकरण ,शैव-धर्माचे विस्थापन आणि त्यांचे कमबॅक 


भारताचा विचारप्रणालीपूर्व म्हणजेच आयडियालॉजीच्या आधीचा इतिहास हा प्रामुख्याने धर्म ह्या राजकीय विचारसरणीने गजबजलेला आहे आणि धर्मच या काळामध्ये समाजाला अधिक सामाजिक आणि राजकीय आणि आर्थिक आकार देत होता असे दिसते 


श्रमण संस्कृतीच्या उदया नंतर युरेशियन संस्कृतीच्या अंतर्गत संघर्ष जेव्हा सुरू झाला तेव्हा त्याचे काय करायचे हा ब्राह्मण धर्मापुढे फार मोठा पेच होता कारण जैन आणि बौद्ध हे युरेशियन धर्म असले तरी वर्णव्यवस्था स्वीकारायला तयार नव्हते इतकेच नव्हे तर या लोकांनी धर्माच्या परलोक (यामध्ये स्वर्ग आणि नरक असे दोन लोक येतात आणि जगातल्या जवळजवळ सर्वच धर्मामध्ये ते दिसतात )आणि कल्पलोक (यामध्ये चंद्रलोक ब्रह्मलोक सूर्यलोक असे अनेक लोक येतात अनेकदा हे फक्त भारतात जन्मलेल्या धर्मातच आढळतात )या दोन संकल्पना पूर्णपणे नाकारल्या होत्या आणि मनुष्य मरणानंतर फक्त पुनर्जन्म घेतो आणि तो इथेच घेतो अशी मांडणी केली होती म्हणजेच मनुष्याची यात्रा ही इहलोकांतून इहलोकांकडेच होते असा इहलोकवादी सिद्धांत हे लोक मांडत होते मात्र या सिद्धांतात जो मुख्य प्रॉब्लेम होता तो म्हणजे आपले आप्त आणि नातेवाईक पुनर्जन्मामध्ये पुन्हा भेटतीलच याची कसलीही खात्री नव्हती कारण चेहरे बदललेले असणार असे कळत नकळत हा सिद्धांत गृहीत धरत होता तत्कालीन मनुष्याला आपल्या आत्तांचे आणि नातेवाईकांचे गणगोतांचे आणि त्यांच्याही आणि स्वतःच्या मरणोत्तर जीवनाचे इतके प्रचंड आकर्षण होते की स्वर्ग आणि नरक या दोन संकल्पना त्याला जगण्यासाठी आवश्यक वाटत होत्या. निदान इथे सुख मिळाले नाही तर निदान परलोकात तरी ते मिळेल अशी ही आसक्ती होती आजही ही आसक्ती सुटत नाही याचा एक असा परिणाम झाला की या धर्मांचा किंवा धम्माचा प्रचार जितक्या व्यापक पद्धतीने व्हायला हवा होता तितका तो होत नव्हता साहजिकच हळूहळू या धम्मामध्ये निर्माण झालेल्या पुरोहित लोकांनी परलोक स्वीकारायला आणि त्यांना आपल्या पद्धतीने निर्माण करायला सुरुवात केली आणि त्याचा एक परिणाम असा झाला की हे धम्म परलोक मानणारे धर्म बनत गेले म्हणजेच सुरुवातीला कर्मफलसिद्धांत या दोघांनी स्वीकारला होता (किंबहुना काही लोकांच्या मते कर्मफल सिद्धांत हा मुळात प्रथम जैन किंवा बौद्ध लोकांनीच आणला काहींच्या मध्ये तर पुनर्जन्म ही संकल्पना सुद्धा बौद्ध लोकांनी किंवा जैन लोकांनीच प्रथम आणला ) माझ्या मते हे आवश्यक होते याचे कारण असे होते की मनुष्याला आपल्या कर्माची फळे मिळतात अशी भीती घालणं त्याने चांगले कर्म करावे म्हणून सर्वच नैतिक व समाजात नितिमत्ता टिकवू पाहणाऱ्या लोकांना आवश्यक वाटत होते साहजिकच तू काहीही कर पण त्याचे फळ असणार असा सिद्धांत रूढ होता प्रश्न असा होता की फळ कुठे मिळणार? परलोकांवर विश्वास नाही कल्प लोक मान्य नाहीत त्यामुळे साहजिकच इथल्याच लोकात ही कर्मफळे मिळायला हवीत आणि ती मिळायची असतील तर मग कशी मिळणार कारण प्रत्यक्ष या जन्मात तर अशी फळे काही मिळताना दिसत नव्हती साहजिकच मग पुढच्या जन्मात फळे मिळतील असे सांगणे गरजेचे बनले. थोडक्यात पुनर्जन्माच्या सिद्धांतामागे इहलोक सिद्धांतच आहे अनेकदा हे कळत नाही म्हणून मी हे सांगतोय मनुष्याने चांगले कर्म करावे म्हणून अनेकदा नैतिक लोक अशा प्रकारची मांडणी करत होते हा सिद्धांत हळूहळू प्रस्थापित झाला पण तरीही आपल्या शरीराचे आकर्षण काही संपले नाही स्वर्गामध्ये आणि नरकामध्ये शरीरसुद्धा आणि ओळखसुद्धा पृथ्वीवरीलच असल्याने ओळख शाबूत ठेवायला सतत धडपडणाऱ्या माणसाला स्वर्ग आणि नरक मेल्यानंतर सुद्धा आवश्यक वाटायला लागले शिवाय या सिद्धांतात मी मागे म्हटल्याप्रमाणे आप्त आणि नातेवाईक आपण पाहिल्या त्याच शरीरात भेटत नव्हते एका अर्थाने हा अमरत्वाचा ध्यास आहे मेल्यानंतर सुद्धा आपण स्वर्गात किंवा नरकात जिवंत असणार म्हणजेच अमर असणार अशी ही भूमिका आहे इतकेच नव्हे तर आपले सारे आप्त आपल्याला परलोकात पुन्हा भेटणार हे ऐकायला बरे वाटते विश्वास ठेवायला चांगले वाटते थोडक्यात काय माणूस मरायला तयार नसतो साहजिकच परलोक आणि कल्पलोक न मानणाऱ्या धम्मानी पुनर्जन्म आणि कर्मफल सिद्धांत स्वीकारला 


सर्व धर्मामध्ये शैव लोकांच्या मध्ये अशा काही भूमिका घेण्याची गरजच निर्माण झाली नव्हती कारण मुळातच हा धर्म मानव जातीच्या पशुपालक अवस्थेत निर्माण झालेला होता त्यामुळे साहजिकच शेतीतला जे बीज पेराल त्याचेच पीक उगवेल हा कर्मफलवादी सिद्धांत त्यांना सुचणेच शक्य नव्हते त्यांना ती गरजही नव्हती त्यामुळे शिव,शक्ती, संसार, जीव आणि मोक्ष ही पाच तत्वे त्यांच्या आधारे मोक्ष म्हणजेच महाअक्ष नीट चालला होता धर्म ही संकल्पनाच त्यांना गरजेची वाटत नव्हती पण आता शेती आल्यानंतर सगळ्यांनीच परलोक स्वीकारल्यामुळे काय करायचे असा एक फार मोठा प्रश्न शैव धर्मा पुढे निर्माण झाला हळूहळू शैव लोकांनी सुद्धा धर्म ही संकल्पना स्वीकारायला सुरुवात केली ही शेतीच्या युगाशी केलेली तडजोड होती 


यातूनच मग मूळ आदियानी धम्म गेला आणि त्या जागी बौद्ध धम्मामध्ये महायान उदयाला आले जे जवळजवळ युरेशियन होते जैन लोक मात्र अजूनही परलोक स्वीकारायला तयार नव्हते 


यांच्याशी लढायचे कसे असा पेच जेव्हा निर्माण झाला तेव्हा मग युरेशियन लोकांच्यातल्या सर्वसामान्य म्हणजेच विश लोकांनी निर्माण केलेला वासुदेव धर्म जो मूळचा विशुदेव धर्म होता त्याला मुख्य प्रवाहात सामील करणे गरजेचे बनले युरेशियन लोकांच्या मध्ये विश म्हणजे जनता पुरोहित आणि शासक समाज सोडला तर जी जनता असते ती सर्वच्या सर्व विश होती जेव्हा तिच्यातून वैश्य वर्ण निर्माण झाला तेव्हा तिला ब्राह्मणधर्माने यज्ञ करण्याचा हक्क नाकारायला सुरुवात केली तुम्ही फक्त यजमान व्हा पण वेद शिकण्याचा तुमचा हक्क आम्ही नाकारतो आहोत अशी भूमिका घेतली गेली परिणाम असा झाला की या लोकांनी शैव अनार्य धर्मांच्या पासून प्रेरणा घेत पूजा पद्धत स्वीकारली मंदिर पद्धत स्वीकारली आणि स्वतःचाच वासुदेव धर्म निर्माण करायला सुरुवात केली वासुदेव या शब्दाचा मूळ अर्थ विश लोकांचा देव असा आहे महाभारता बाहेरचा जो खरा कृष्ण आहे तो वासुदेव होण्याची इच्छा धरून आहे त्याला वासुदेव कृष्ण व्हायचे आहे कारण बलराम थोरला असल्याने यादवांचे राजे पद त्याच्याकडे गेलेले आहे वासुदेव हा राजांचा राजा असल्याने साहजिकच त्याला राजांचा राजा व्हायचे आहे तो वासुदेव झाल्यानंतर कृष्णाला बलराम अधिक मान देताना दिसतो त्याचे कारण तो वासुदेव म्हणजेच राजांचा राजा आहे श्रीकृष्ण यादव यांना ही वासुदेव म्हणून मान्यता इंद्रप्रस्थ नगरी स्थापन झाली तेव्हा मिळालेली दिसते मात्र त्याच्या या मान्यतेला हस्तीनापुर मधून विरोध झाला हेही दिसते विश हे लोक प्रामुख्याने व्यापार ,शेती आणि पशुपालन करत. विष्णू ही प्रामुख्याने या वैश्य लोकांची म्हणजेच शेती पशुपालन आणि व्यापार करणाऱ्या लोकांची सूर्यदेवता होती आणि तिचा मूळ अर्थ सूर्य असाच होता वेदात आदित्य वगैरे सूर्यदेव होते त्यांना प्रतिष्ठा होती पण विष्णूला मात्र फारशी प्रतिष्ठा नव्हती म्हणूनच त्याच्यावर ऋग्वेदात फक्त पाच ते सात सूक्ते आहेत विष्णूला पूर्वीपासून स्थान होते पण ते फार दुय्यम होते साहजिकच पुढे विष्णू आणि वासुदेव एकत्र केले गेले आणि त्यातूनच नंतरचा वैष्णव धर्म निर्माण झाला हा आदी वैष्णव धर्म नेमका काय होता हे आता गुलदस्त्यात गेलेले आहे काही शिलालेखामध्ये व नाण्यांच्यावर मात्र वासुदेव स्पष्टपणे दिसतो विशेषता जे राज्यकर्ते बाहेरून आले होते त्यांना युरेशियन लोकांच्या मधील या सामान्य जनतेसाठी ज्या गोष्टी करणे आवश्यक होते त्यामध्ये वासुदेवाला मान्यता देणे ही एक आवश्यक गोष्ट होती अनेकदा एका बाजूला शिव आहे आणि दुसऱ्या बाजूला वासुदेव आहे असे दोन्ही प्रकारचे स्वीकार बाहेरच्या राज्यकर्त्यांनी केले आहेत कारण त्यांच्या दृष्टीने जनतेमध्ये दोन्ही होते 


जेव्हा जैन आणि बौद्ध असे दोन धर्म आले तेव्हा त्यांच्याशी सामना करणे आवश्यक होते आणि त्यात तो सामना कसा करायचा याचे उत्तर ब्राह्मणांना वासुदेव धर्मात सापडले मुळातच ब्राह्मण प्रथम इराण इराक मधून हाकलले गेले होते नंतर बौद्ध आणि जैन धर्माचा प्रभाव प्रचंड वाढत गेला तसा ते पंजाब उत्तराखंड बिहार इथूनही हाकलले गेले परिणामी यज्ञ संस्कृतीला घरघर लागली आणि या लोकांना आश्रय मिळाला तो मथुरेच्या आसपास असणाऱ्या सामान्य जनतेकडून विश लोकांच्याकडून ! मथुरेतच ब्राह्मणांनी प्रथम शैव धर्मी लोकांची पूजा पद्धत स्वीकारली वेदांचा कळत नकळत त्याग केला आणि एकाच वेळी यज्ञ आणि पूजा अशा दोन्ही प्रकाराने एक तिसरा धर्म ऍक्टिव्हेट केला तो म्हणजे वैष्णव धर्म होय वैष्णव धर्मामध्ये तुम्हाला यज्ञ आणि पूजा ह्या दोन्ही गोष्टी एकत्र चाललेल्या दिसतात रामायण आणि महाभारतामध्ये त्यामुळेच राम आणि कृष्ण कौरव आणि पांडव यज्ञ आणि पूजा दोन्ही करताना दिसतात दक्षिणेत आलेल्या ब्राह्मणांनी आपल्या ह्या वैष्णव धर्मामध्ये दक्षिणेकडची आणखी एक शैव देवता ऍड केली ती म्हणजे हरी ! ही मूळची शैव देवता होती आणि ती समुद्राची देवता होती आणि तिला शंकराची बहीण मानले जात होते म्हणूनच हराची बहीण ती हरी असे समीकरण दृढ होते त्यामुळेच हरी संदर्भातले उल्लेख दक्षिणेकडे खूप मोठ्या प्रमाणात होत होते हे सारे उल्लेख नंतर रामायण आणि महाभारतामध्ये सामावून घेण्यात आले आणि त्यातूनच पुढे राम कृष्ण हरी हा मंत्र डेव्हलप होत गेला युरेशियन लोक हे प्रामुख्याने पुरुषसत्ताक असल्यामुळे साहजिकच हरी हा स्त्रीलिंगी शब्द असला तरी प्रत्यक्षात तो पुल्लिंगी करत त्याला पुरुष करण्यात आले 


एकदा हा वैष्णव धर्म नीट आकाराला आल्यानंतर पुन्हा एकदा ब्राह्मण लोकांनी आपली दादागिरी सुरू केली वैष्णव धर्म हे ब्राह्मण धर्माचे या काळामध्ये मुख्य शस्त्र होते त्यांनी गुप्त काळामध्ये प्रथम वासुदेव धर्मी लोकांना स्मृती स्वीकारायला लावल्या नंतर वेद स्वीकारायला लावले आणि वैष्णव धर्म हा श्रुती स्मृती पुराणोक्त झाला त्यांनी मग मथुरेच्या राज्यामध्ये निर्माण झालेली रामायण आणि महाभारत ही दोन्ही महाकाव्य ब्राह्मणी करून टाकली त्यांचे काल्पनिक हिरो हे इतिहास बनवले इतकेच नव्हे तर रामायण आणि महाभारत यांना इतिहास म्हणायला सुरुवात केली आणि इथूनच भारतामध्ये राम आणि कृष्ण या केंद्रवर्ती देवता होत गेल्या 


हे सर्व करण्याचा उद्देश स्पष्ट होता तो म्हणजे युरेशियन लोकांच्यावर पडत गेलेला जैन आणि बौद्ध धर्माचा प्रभाव नाहीसा करणे किंबहुना वैष्णव धर्म हा प्रामुख्याने जैन बौद्ध आणि शैव धर्म नष्ट करण्यासाठीच जन्माला घालण्यात आला वैष्णव धर्माने आपले काम जास्तीत जास्त चोखपणे कसे केले याचा एकदा नीट धांडोळा घेतला जाणे आवश्यक आहे 


यामध्ये प्रामुख्याने तीन प्रकारचे धोरण दिसते पहिले बौद्ध धर्माविषयीचे धोरण आहे यामध्ये बौद्ध धर्म हा पूर्णपणे उखडून टाकणे हे उद्दिष्ट स्पष्ट दिसते साहजिकच जवळजवळ सर्वच बौद्ध विहार आपल्या ताब्यात घेऊन त्या जागी विष्णू ही देवता किंवा विष्णूचे अवतार स्थापित करणे सुरू केलेले दिसते बौद्ध धर्मग्रंथ जवळजवळ नष्ट करण्यात आलेले आहेत भारतामध्ये हे काम प्रामुख्याने मुस्लिम लोकांनी केले असले तरी ब्राह्मण धर्मीय लोकांनी सुद्धा यामध्ये वाटा उचललेला आहे किंबहुना इस्लाम आणि वैष्णव हे दोन्ही धर्म बौद्ध धर्म नष्ट करण्याबाबत एकत्र होते असेच दिसते हे करण्यासाठी आद्य शंकराचार्य यांचा वापर करण्यात आला आणि वेदांत नावाचा धर्म निर्माण करण्यात आला म्हणजेच तुम्ही जर का सातव्या शतकानंतरचा भारताचा धार्मिक इतिहास बघितला तर त्यामध्ये वैष्णव आणि वेदांत हातात हात घालून काम करताना दिसत आहेत असे तुम्हाला दिसेल हे आद्य शंकराचार्य कुठून आले याविषयी मी सर्वत्र लिहिलेलेच आहे पुन्हा याविषयी नंतर माहिती देईनच 


आद्य शंकराचार्य यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असे सांगितले जाते की त्यांनी सर्व बौद्ध पंडितांना पराभूत केले मुख्य म्हणजे आत्म्याचा सिद्धांत स्वीकारायला लावला आत्मा आल्याने साहजिकच पुनर्जन्माचा सिद्धांत आधी स्वीकाराला गेला होता मात्र आता आत्मा स्वीकाराला गेल्याने स्वर्ग आणि नरक या संकल्पनाही स्वीकाराव्या लागल्या कारण मेल्यानंतर आत्मा कुठे जातो या प्रश्नाचे उत्तर स्वर्ग, नरक आणि पुन्हा इहलोक असे होते म्हणजेच एका बाजूने बौद्धिक पातळीवर वेदांताच्या सहाय्याने बौद्ध लोकांना बौद्ध धर्माला पराभूत करणे आणि दुसऱ्या पातळीवर त्यांचे सर्व ग्रंथ नष्ट करत त्यांची सर्व परंपरा नष्ट करणे असा उद्योग सुरू झालेला दिसतो सुदैवाने हे सर्व ग्रंथ चीन आणि तिबेटमध्ये भाषांतरित झाल्याने वाचले तिबेट मध्ये वैष्णव धर्माला फारसा स्कोप मिळाला नाही म्हणून तिबेटमध्ये ग्रंथ वाचले अन्यथा तेही कदाचित नष्ट झाले असते चीन बाबत वैष्णव धर्माचा प्रश्नच आला नाही इतका तिथे बौद्ध धर्म प्रभावी होता एका बाजूला मुस्लिम आणि दुसऱ्या बाजूला वैष्णव अशा आक्रमणामुळे भारतामधून बौद्ध धर्म पूर्णपणे उखडला गेला हे चांगले झाले नाही कारण एक अतिशय सुंदर धर्म आपल्या मूळ स्वरूपामध्ये बदल करत प्रथम विद्रूप झाला आणि नंतर तो पूर्णपणे नाहीसा करण्यात आला 


जैनांच्या बाबतीतले युरेशियन लोकांचे धोरण सलोख्याचे राहिले याचे कारण अचानक सातव्या शतकानंतर सर्व जैन धर्मांच्या आचार्य लोकांनी वर्णव्यवस्था स्वीकारली इतकेच नव्हे तर पंचम वर्ण सुद्धा स्वीकारला आणि अस्पृश्यतेला मान्यता दिली साहजिकच केवळ वेदाला मान्यता देत नाहीत या कारणावरून जैन लोकांशी जीवघेणा संघर्ष करणे ब्राह्मण लोकांना गरजेचे वाटले नाही उलट जैन धर्मातले आचार्य आणि ब्राह्मण धर्मातले आचार्य यांचे साटेलोटे सुरू झाले ही युती गाढ होत गेली आणि मुळातच जैन हे युरेशियन वा वाणी पणी व्यापारी असल्याने त्यांच्याशी स्वतंत्र संघर्ष करण्यापेक्षा त्यांच्याशी जुळवून घेतलेले बरे असा कुठेतरी विचार झाला त्यांनी या काळातच वर्ण व्यवस्था स्वीकारल्याने संघर्ष करण्याची गरजच भासली नाही याउलट बौद्ध धर्माने कधीही जन्मदत्त वर्णव्यवस्था पूर्णपणे स्वीकारली नाही ते कायमच हर्षवर्धनाच्या काळामध्ये सुद्धा वर्ण व्यवस्था ही कर्म प्रधान आहे असेच म्हणत राहिले साहजिकच त्यांना उखडून टाकणे गरजेचे बनले जैन धर्माबाबत हा प्रश्न आला नाही जैन धर्माने आश्चर्यकारकरीत्या जन्मदत्त वर्णव्यवस्था स्वीकारली 


शैव धर्माबाबत मात्र चांगलीच पंचायत झाली याचे कारण ज्या आद्य शंकराचार्य यांच्या आधारे हे सर्व करण्यात आले ते मूळचे आचार्य शंकर हे शैव होते आणि त्यांनी जे पंचायतन दिले ते पूर्णपणे शिव,शक्ती ,स्कंद अथवा कार्तिकेय ,गणेश आणि सूर्य असे होते साहजिकच ते पूर्ण नष्ट करणे शक्य झाले नाही फक्त सूर्याचे जे स्थान होते ते विष्णू ही सूर्यदेवता असल्याने तिला सूर्याच्या जागी घालून एक नवा धर्म निर्माण करण्यात आला तो धर्म म्हणजे हिंदू धर्म होय एका अर्थाने आद्य शंकराचार्यांनीच हिंदू धर्म निर्माण केला आणि म्हणूनच आज सुद्धा अनेकदा हिंदू धर्माचे आचार्य म्हणून आपण आद्य शंकराचार्य यांनाच पाहतो आणि आज सुद्धा शंकराचार्यच महत्त्वाचे झालेले दिसतात पण आश्चर्यकारकरीत्या मूळचे आचार्य शंकर हे शैव असल्याने हे सर्व शंकराचार्य कपाळावर आडवा शैव तीलक लावत असतात बहुजन समाजाने हिंदू धर्मात राहावे म्हणून करण्यात आलेली ही तजवीज आहे 


आद्य शंकराचार्य यांच्या साह्याने नेमके काय केले गेले तर बौद्ध धर्माला उखडून टाकले गेले तर जैन धर्माचे वर्णीकरण झाले तसे काहीही शैव लोकांचे केले गेले नाही उलट त्यापेक्षा वेगळा उपाय शैव लोकांच्या बाबतीत योजला गेला तो म्हणजे त्यांचे सर्व आखाडे मठ मंदिरे आणि इतर सर्व धार्मिक स्थळे ताब्यात घेऊन तिथे असलेले बहुजन समाजाचे पुरोहित विस्थापित केले गेले म्हणजेच आजचे ओबीसी ,बीसी आणि आदिवासी समाज यांना या मंदिरातून पुजारी म्हणून काढण्यात आले त्यांना विस्थापित केले गेले आणि त्या जागी हिंदू धर्म स्वीकारणारे, वर्णव्यवस्था स्वीकारणारे पुजारी आणले गेले जिथे जिथे पंडित लोकच वर्णव्यवस्था स्वीकारायला तयार होते तिथे तिथे पंडित लोकांच्याकडे ते मंदिर किंवा तो आखाडा किंवा ते धर्मस्थळ देण्यात आले , ही सगळी शैव व्यवस्था ज्या पद्धतीने हिंदू धर्माच्या नावाखाली ताब्यात घेण्यात आली ती पद्धत आश्चर्यकारक आणि दुःखदायक आहे आणि आज अवस्था अशी आहे की जवळजवळ सर्वच शैव आखाडे ,मंदिरे ,मठ आणि इतर धर्म स्थळे ही ब्राह्मण धर्माच्या ताब्यात गेलेली आहेत अगदी मूळचे शैव असलेले विठ्ठल मंदिर सुद्धा महादेव कोळी लोकांच्याकडून काढून घेऊन दुसऱ्या हिंदू धर्म मानणाऱ्या वैष्णव पुरोहितांच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत अर्थात याचा प्रतिकार सुरू झाला आणि त्याचे प्रणेते बसवेश्वर होते त्यामुळे कळत नकळत आजही कित्येक शैव मंदिरे ही ब्राह्मणेतर पुरोहितांच्या ताब्यात राहिली त्याचे श्रेय कळत नकळत बसवेश्वर यांचे आहे .


थोडक्यात काय तर बौद्ध धर्माचे उखडन , जैन धर्माचे वर्णीकरण आणि शैव धर्माचे विस्थापनिकरण करत ब्राह्मण धर्माने साधारणपणे दहाव्या शतकानंतर संपूर्ण भारतावर प्रभुत्व निर्माण केले इतकेच नव्हे तर पुन्हा हळूहळू ब्राह्मण धर्म असेच टायटल आले जे इंग्रजांच्या काळात 1880 पर्यंत शाबूत होते अर्थात बहुजन समाजाचा धर्म वेगळा आहे याची कल्पना काही इंग्रज ऑफिसर लोकांना होती त्यांच्या पुस्तकांच्यात तसे वारंवार उल्लेख येतात पण बहुतांशी ओरिएंटालिस्ट आणि ब्रिटिश अधिकारी आणि लेखक मात्र पूर्णपणे ब्राह्मण धर्माच्या आहारी गेले होते त्यांनी मात्र हिंदू धर्म म्हणजेच ब्राह्मण धर्म आणि ब्राह्मण धर्म म्हणजे हिंदू धर्म असे समीकरण मांडत ब्राह्मण धर्माला मदत केली लिंगायत धर्म हा शैव धर्मापासून पूर्णपणे वेगळा काढून सर्व लिंगायत यांना शुद्राचा दर्जा द्या हे ब्राह्मणी फर्मान इंग्रजांनी स्वीकारले याचे कारण काही करून शैवधर्मात फूट पडली पाहिजे असे खुद्द इंग्रजांनाच वाटत होते कारण मी अनेकदा सांगितले आहे की शेवटी इंग्रजांशी अंतिम लढाया करणारे लोक हे शैव होते आणि हे शैव लोक आता काही झाले तरी बलवान बनता कामा नयेत अन्यथा ते हर हर महादेव म्हणत बंड केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत याची पूर्ण कल्पना इंग्रजांना होती थोडक्यात शैव लोकांना पायबंद घालणं हे ब्राह्मणधर्मी आणि ख्रिश्चन धर्म इंग्रज या दोघांनाही सोयीचे असल्याने इंग्रजांच्या काळामध्ये हळूहळू शैव धर्माची पीछेहाट सुरू झाली साहजिकच इंग्रजांच्या विरोधात लढायचे असेल तर आपले वैष्णव लोक काही कामाचे नाहीत याची कल्पना लोकमान्य टिळकांना होती म्हणूनच त्यांनी जेव्हा समाज एकत्र यावा म्हणून सार्वजनिक उत्सव निर्माण केले तेव्हा त्यांनी शिवाजी आणि गणपती हे दोन्ही शैव नायक निवडले आणि इतर वेळी मात्र गीतारहस्य सांगत राहिले म्हणजे लढाई आली तर शैव आणि हर हर महादेव आणि तडजोड आणि वाटाघाटी करायचे असेल तर कृष्ण नीती वगैरे असे हे टिळकांचे धोरण होते पुढे महात्मा गांधींनी सशस्त्र मार्ग आणि हर हर महादेव सोडून दिले आणि पूर्ण अहिंसक असा वैष्णव जैन धर्माला पूरक संत परंपरेला साजेसा असा अहिंसक लढा उभा केला आणि युद्धभूमीवर लढलेच पाहिजे असे म्हणणारे शैव अधिकच बाजूला पडले अपवाद फक्त घरातील शाक्त धर्माने प्रेरित असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाष चंद्र बोस होते. इंग्रज हे सभ्य असल्यानेच वैष्णव लढा परवडला मात्र आजही त्यांनी देश सोडला याचे खरे कारण सुभाष चंद्र बोस किती आणि गांधीजी किती हा खरोखरच प्रश्न आहे पुरोगामी लोक बोस यांचे योगदान नाकारत असले तरी प्रत्यक्षात ते गांधीजींच्या पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे कारण आजही इंग्रज नेमके का गेले या प्रश्नाचे उत्तर निश्चित करता आलेले नाही 


एक गोष्ट मात्र नक्की जो बौद्ध धर्म उखडला गेला तो पुन्हा इंग्रजांच्या काळामध्ये परत आला कारण बौद्ध धर्म हा इंग्रजांना परत येणे आवश्यक वाटत होता जो जैन धर्म वर्णीकरण झालेला होता तो गांधीजींच्या सारख्या वैश्य वैष्णवांना परवडणारा होता कारण व्यापारी हितसंबंधांना ते पूरक होते यामध्ये सर्वाधिक गोची झाली ती शैव-धर्माचीच झाली सावरकर आणि सुभाष चंद्र बोस यांनी व कम्युनिस्ट लोकांनी जर का हर हर महादेव घोषणा दिली असती तर या देशातल्या सशस्त्र क्रांतीची आणि इंग्रजा विरुद्ध लढाईची दिशा बदलली गेली असती असे माझे स्पष्ट मत आहे. या लोकांनी शैव धर्माला कळत नकळत पूर्ण मान्यता दिलीच नाही आणि कम्युनिस्ट फाफलले तर नथुराम गोडसे यांचे निमित्त करत (अलीकडे माफी वीर असे म्हणत) सावरकर डावलले गेले तर सुभाष चंद्र बोस इतिहासातून जवळजवळ नाहीसे करण्यात आले हे पद्धतशीरपणे झाले की आपोआप घडले याचीही चौकशी आता करण्याची वेळ आलेली आहे अगदी संघाला सुद्धा आजकाल सावरकर नकोसे असतात कारण कळत नकळत शाक्त प्रभाव सावरकरांना शक्तीची उपासना करण्याला आणि त्यामुळेच वैज्ञानिक दृष्टिकोन घ्यायला भाग पाडतो अवस्था अशी आहे की संघाला आजही सावरकर आणि बोस यांच्यापासून सुटका कशी करून घ्यायची हे कळत नाहीये त्यामुळे ते एकाच वेळेला यांच्या महानतेचा जयजयकार करतात आणि दुसऱ्या वेळेला प्रत्यक्ष अंमलबजावणी मध्ये मात्र हे लोक कुठेच दिसणार नाही त्याची काळजी घेतात अंधश्रद्धांना उत्तेजन देतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जर का शैव हिंदुत्व स्वीकारायचे असेल तर अंधश्रद्धेला उत्तेजन देणे थांबवावे लागेल आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा लागेल अन्यथा ब्राह्मणी हिंदुत्वाच्या ओझ्याखाली एक ना एक दिवस संघ सुद्धा कोसळल्याशिवाय राहणार नाही 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे