दशावतार प्रभावी अभिनय आणि मेसेजचा चित्रपट श्रीधर तिळवे नाईक 


कुठलाही वाद हा प्रथम कवितेत मग कथा कादंबरी व नंतर नाटकात आला की तो सर्वात शेवटी चित्रपटात पोहोचतो आणि नंतर टेलिव्हिजनमध्ये आणि कदाचित चित्रपटाच्या बरोबरीने वेब सिरीज मध्ये ! देशी वाद किंवा उत्तर आधुनिक वाद याला अपवाद नाहीत ते चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये हॉलिवूडमध्ये 70 पासून आणि बॉलीवूडमध्ये 2000 पासून पोहोचायला सुरुवात झाली उत्तर आधुनिक चित्रपटातील हिंसा ही अत्यंत रानटी स्वरूपाची असते ती तशी का असते हा एक प्रश्न असावा परंतु कळत नकळत माणसातला पशु दाखवणे हा त्याचा उद्देश असतो याला दशावतार फार अपवाद नाही परंतु तरी देखील मराठी प्रेक्षकांना इतका रानटीपणा झेपणार नाही हे लक्षात ठेवून हिंसा थोडीशी सौम्य केलेली आहे मात्र वराह किंवा नरसिंह अवतारा सारखे अवतार दशावतारातील मास्क पद्धतीने वापरत ही हिंसा भडक केलेली आहे . अर्थातच कन्नड चित्रपटांमध्ये उदाहरणार्थ कांतारा ज्याचा या चित्रपटावर प्रभाव आहे भडक हिंसेचे भडक चित्रण अधिक प्रभावी पणाने आलेले आहे कारण तिथे संहिता आणि दिग्दर्शन अधिक प्रभावी आहे 


दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचे वैशिष्ट्य हे आहे की त्यांनी हिंसा देखील अतिशय व्यवस्थित आपल्या अभिनयात पेललेली आहे मुळात राम गोपाल वर्माच्या "सरकार"सिरीज मधील एका भागात विलन सादर करताना त्याचा प्रत्यय आला होता इथे मात्र ते पूर्णपणे भरात आलेले दिसतात मुख्य म्हणजे त्यांनी सादर केलेली हिंसा केंद्री अभिनयाची शैली सरकार या चित्रपटाप्रमाणे आवश्यक तेवढीच भडक होते पण हा चित्रपटाचा प्लस पॉईंट आहे की मायनस पॉईंट आहे हे ठरवणे फार अवघड आहे . फक्त डोळ्यांचा वापर ते फार प्रभावीपणाने करतात कारण सरकार पेक्षा इथे त्यांना जास्त फायदा आहे आणि मुख्य म्हणजे मास्क या गोष्टीचा जो आधार मिळतो तिचा त्यांनी पुरेपूर वापर केलेला आहे मुळात यम सादर करतानाच याची सुरुवात होते त्यांच्या उंचीचा प्रचंड फायदा दृश्यात्मक शैलीला मिळतो असे म्हणता येते की एक अभिनेता म्हणून त्यांनी आपले काम चोख केले. किंबहुना या चित्रपटाविषयी मी पहिली पोस्ट टाकली होती व्हाट्सअप वर स्टेटस म्हणून त्यात मी चित्रपटाचा उल्लेख केलाच नव्हता मी फक्त दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचा उल्लेख केला होता आणि त्यासाठी हा चित्रपट पहा अशी शिफारस केली होती याचे कारण अभिनय उत्तम अगदी भरत जाधव याचासुद्धा थोडा वेगळा धाटणीचा अभिनय उत्तम आहे हीच गोष्ट विजय केंकरे यांच्या बाबतीत! त्यामुळेच अभिनय उत्तम पण चित्रपट फिका अशीच माझी समजूत होती आणि आत्तासुद्धा ती कायम आहे . या चित्रपटाचे प्रफुल्ल चंद्र पार्श्वसंगीत हे अत्यंत उत्तम जमलेले आहे गुरु ठाकूर यांच्या गाण्याबाबत मी समाधानी नाही मात्र मुख्य दशावतारातल्या काही गाण्यांना आवश्यक ती पार्श्वभूमी चांगली जोडली आहे मात्र आपण ही गाणी गुणगुणत बाहेर येत नाही तसा त्या एवढा प्रभाव त्यांचा नाही मात्र भावपूर्ण म्हणता येईल असा इफेक्ट साधलेला आहे पण आवश्यक असलेली दणकटता नाही याला कारण अर्थातच मुळात फिके चित्रकरण आहे मला थोडासा बॅकग्राऊंड म्युझिकचा प्रकार हँडल करून माहिती आहे अनेकदा सिन फिका असला की संगीताद्वारे तो गडद केला की गडबड होते म्हणून म्युझिक देतानाच संगीतकार थोडा सौम्य होत जातो तसे इथे घडलेले आहे. तरीही संगीताला पाच पैकी तीन स्टार द्यायला हरकत नाही 


खानोलकरांना दिग्दर्शक म्हणून काही वेळा उत्तम यश आलेले आहे मात्र प्रत्येक वेळेला सातत्य टिकलेले नाही शेवट तर नको तेवढा फिल्मी झालेला आहे जो या चित्रपटाच्या एकंदर आशयरेखेला अजिबात शोभत नाही मात्र व्हिलनला मारण्याचे मंडल दृश्य शेवट सांभाळून नेते कारण दृश्यात्मक पातळीवर त्या टॉप शॉटचा इफेक्ट पडतो 


दशावतारामध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्याची ही कहाणी असली तरी शेवटी ती एका व्यवस्थेविरोधात लढणाऱ्या माणसाची होत जाते ही व्यवस्था म्हणजे काय तर सरपंच एक फॉरेस्ट ऑफिसर एक पोलीस एक खलनायकाचा उजवा हात जो स्थानिक पातळीवर काम करतो चित्रपटाच्या विषयाला हा माहोल देशीवादासंदर्भात ठीक आहे पण प्रत्यक्षात उत्तराधुनिक कार्पोरेट हाऊस अशा तऱ्हेने काम करत नाही एक सरपंच अशा तऱ्हेचे नियंत्रण मिळवू शकत नाही यापेक्षा अधिक मोठा अधिकारी किंवा राजकीय नेता दाखवणे आवश्यक होते 


मुळातच एका धातूचा बहुदा कोबाल्ट उल्लेख आहे परंतु त्याच्या आंतरराष्ट्रीय मार्केटची काहीही जाणीव लेखकाला नाही बहुतेक! याबाबतीत पुष्पा हा अधिक उजवा होता त्याच्यामध्ये ज्या प्रति वस्तू बनवण्यासाठी मूळ निसर्ग वस्तूची गरज आहे त्या निसर्ग वस्तूचे जागतिक मार्केट व्यवस्थित मांडलेले होते इथे असे काही घडलेले नाही कदाचित बजेटचा प्रश्न असावा त्यामुळे ज्याच्यासाठी हे सर्व चालले आहेत ती गोष्ट अतिशय विरविरीत स्वरूपात येते 


दुसरी गोष्ट म्हणजे जंगलाचा रखवालदार ! कोकण ज्यांना माहिती आहे त्यांना या संदर्भातल्या अंधश्रद्धा किती प्रभावीपणाने काम करतात हे माहिती असतेच . किंबहुना यांना अंधश्रद्धा म्हणणे सुद्धा अनेकांना जड जाते कारण फार वेगवेगळे प्रत्यय आल्याच्या गोष्टी कोकणामध्ये प्रचलित आहेत त्यामुळे लेखक एका ठाम पद्धतीने विरोध करत नाही तर एका बाजूला श्रद्धा शाबूत ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला त्याचं तर्कशास्त्रही द्यायचं असं काहीतरी उत्तर आधुनिक त्याला करावं लागलेलं आहे शेवटी नायक बाबुली मिस्त्री रखवालदार होतो आणि संपूर्ण कार्पोरेट शाहीला ज्याची त्यालाही काही कल्पना आहे असे वाटत नाही पराभूत करतो. मुलाची प्रेयसी त्याला या संदर्भात मदत करते.


दशावतार मधली आर्थिक संरचना ही एकाच वेळेला अज्ञान दर्शवणारी आहे आणि ज्ञानही दर्शवणारी आहे म्हणजे लेखकाला भांडवलशाहीची कल्पना आहे पण कार्पोरेटशाही माहित नाही की काय अशी शंका येते संपूर्ण फिल्ममध्ये कार्पोरेट स्ट्रक्चर आणि त्यामागे असणारी राजकीय यंत्रणा यांचा कसलाही दर्शनमागमुस नाही त्यामुळे शोधला गेलेला नायकाचा उपाय हा फारच १९७०- ८० च्या हिंदी फिल्म मधला वाटतो अभिताभ बच्चन जसा खलनायकाला मारायचा किंवा लोकांच्या हातात सोपवायचा तसला काहीतरी प्रकार इथे झालेला आहे


वस्तुस्थिती अशी आहे की संपूर्ण फिल्ममध्ये अभिनय एकमेव गोष्ट अशी आहे की जी परफेक्ट झाली आहे पण ती आशयनिष्ठ आहे का तर नाही ती प्रामुख्याने व्यक्तिरेखा निष्ठा आहे दिलीप प्रभावळकरांच्या कडे प्रचंड वेरी एशन्स आहेत विशेषता ऑडिओ एक्टिंग चा हा माणूस बाप आहे आणि ती त्यांनी इथे व्यवस्थित वापरलेली आहे. त्यामुळे ते असलेला प्रत्येक सीन इफेक्टिव्ह आहे परंतु पिक्चर इफेक्टिव्ह होत नाही. केवळ चांगला अभिनय किती काळ पाहणार?


चित्रपटाचा मेसेज हा मात्र आता सर्वकालीन अपील असलेला आहे त्याचा थोडाफार इम्पॅक्ट शेवटी होतो कारण तो आत्ताच्या काळाशी सलग्न आहे 


प्रत्येक कोकणी आणि मराठी माणसाने हा चित्रपट अवश्य पाहिला पाहिजे कारण शेवटी असेच चित्रपट अधिक पुढच्या चांगल्या चित्रपटांची वाट मोकळी करू शकतात 


लेखक सुबोध खानोलकर हा या चित्रपटात दिग्दर्शक खानोलकरांच्या पेक्षा जास्त प्रभावी झालाय पण पुढच्या वेळी यातला समतोल साधला गेला तर मला आश्चर्य वाटणार नाही कारण दिग्दर्शक म्हणून असलेल्या त्यांच्या प्रतिभेची झलक अनेक दृश्यांच्यात दिसते लेखक म्हणून व्यक्तिरेखा उभा करण्यात त्यांना उत्तम यश मिळाले आहे विशेषता नायक आणि त्याचा मुलगा या व्यक्तिरेखा व यांच्यातली रिलेशनशिप ! इतर पात्रेही जमून गेलेली आहेत . बाबुली चा मुलगा हा खरोखर इतका अडाणी असू शकतो का की त्याला त्याच्या आसपासच्या व्यवस्थेतली आसपासची किडलेली माणसे कळत नाही असा प्रश्न नक्की मला पडला कारण अशा संदर्भामध्ये प्रामुख्याने मीडियाचा आधार घेतला जातो मीडियात बातमी पेरली जाते आणि मग लढा लढला जातो या फिल्ममध्ये मीडियाचा रोल अंडर एस्टिमेट केला गेलेला आहे अर्थातच हा लेखकाचा चॉईस आहे . कदाचित पुन्हा एकदा तोच बजेटचा प्रश्न असेल . दिग्दर्शक म्हणून काम करताना अनेकदा बजेट आशयावर मात करते त्याचा मला स्वतःलाही अनुभव आहे तसे या चित्रपटाबाबत अनेकदा झाले असावे असा संशय आहे 


एकंदरीत ज्या प्रकारचे बजेट दिले गेलेले आहे त्या बजेटमध्ये एक अतिशय उत्तम चित्रपट दिला गेला आहे असे आपण अंतिमतः म्हणू शकतो दशावतारच्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन ! 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे