अनुभवविटाळ संस्कृती आणि भारत पाकिस्तान क्रिकेट श्रीधर तिळवे नाईक 

खरे तर हा विषय इतक्यांदा चघळून झालाय पण तरीसुद्धा तो जिवंत होतच असतो आशिया कपच्या निमित्ताने तो पुन्हा जिवंत झाला .

अनुभवसंस्कृती ही कुठल्याही संस्कृतीची बेसिक सांस्कृतिक पाया असते .माणसाचे आयुष्य हे नेहमीच प्रत्यक्ष ,परोक्ष आणि अपरोक्ष अनुभवाच्या आधारे चालत असते पण माणूस फक्त इथेच थांबत नाही .तो अनुभव निर्माण करणे शिकतो किंबहुना माणसाची पहिली तंत्र ओळख ही अनुभव निर्माण करण्यापासून अनुभवाचे तंत्र निर्माण करण्यापासून सुरू होते . नाट्य वेद हा शंकरांनी दिला त्याचे सर्वात मोठे कारण हे तंत्र सर्वात मोठे आहे याची त्यांना कल्पना होती .अर्थातच हे तंत्र प्रामुख्याने चित्र आणि भाषा आहे पुढे मग माणसाचा विस्तार होत गेला तशी माणसाने स्वतःची चिन्ह संस्कृती आणि नंतर माणसाने संपूर्ण चिन्हसृष्टी विकसित केली आणि आज अवस्था अशी आहे की चिन्ह प्रत्यक्ष , चिन्ह परोक्ष आणि चिन्हअपरोक्ष असे तिन्ही प्रकारचे अनुभव माणूस सहजरीत्या निर्माण करत आहे. मी आशा अनुभवांना प्रति अनुभव म्हणतो . भारतात सर्वात मोठा विकला जाणारा प्रति अनुभव म्हणजे क्रिकेट होय . त्याला टक्कर कदाचित फक्त फिल्म अनुभवाची असावी .


हे प्रतीअनुभव प्रामुख्याने कला आणि क्रीडा या दोन क्षेत्रांमध्ये निर्माण होत असतात आणि क्रिकेट हे क्रीडाक्षेत्र असल्याने तिथे ते मोठ्या प्रमाणात आणि व्यापक प्रमाणात होत जातात . 


वैदिक काळानंतर भारतातल्या युरेशियन संस्कृतीमध्ये ब्राह्मण संस्कृती निर्माण झाली तिने या दोन्ही क्षेत्रांच्यावर प्रभुत्व मिळवायचा प्रयत्न केला परंतु इसवी सन १००० पर्यंत तिला यश मिळाले नाही कारण तोवर या देशावर शैव संस्कृतीचेच प्रभुत्व होते नंतर मात्र ब्राह्मण संस्कृतीने सर्व काही ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि तिथूनच भारतीय संस्कृतीचे पतन पण झाले . इस्लाम मध्ये गैर मुस्लिम लोकांच्या बाबतीत जो विटाळ आहे तो ब्राह्मण धर्माला अधिकच पूरक ठरला किंबहुना ब्राह्मण धर्म हा नंतर नंतर इस्लामचे मोठ्या प्रमाणात अनुकरण करत गेला इस्लाम मध्ये क्रीडा संस्कृती नव्हती कारण ब्राह्मण संस्कृती नंतर तीच एक अशी संस्कृती आहे जी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अनुभव विटाळ पाळते . सारख्याला वारके मिळाले आणि दोघेही धुळीला मिळाले .


वास्तविक प्राचीन काळातील भारतीय क्रीडा संस्कृती ही अत्यंत मोकळी होती पण हळूहळू वर्णव्यवस्थेच्या आणि जातिव्यवस्थेच्या नावाखाली तिचे संकुचिकरण घडवण्यात आले आणि अनुभव विटाळ निर्माण करण्यात आला . जातींना आणि वर्णांना एकमेकाचा अनुभवच येऊ नये अशातरीची ही व्यवस्था असल्यामुळे साहजिकच ती प्रति अनुभवांच्या सुद्धा क्षेत्रात अवतरली तुम्ही एकदा स्पर्शच टाळायला लागला , रोटीबंदी बेटी बंदी लागू करायला लागला की मग क्रीडा संस्कृती अशक्य बनून जाते . खेळ ही गोष्टच अशी आहे की जी शरीरांना एकत्र आणते कारण मुळातच ती शरीरनिष्ठ असते आणि ब्राह्मण संस्कृतीला शरीरनिष्ठता नको होती कारण एकदा शरीरनिष्ठता आली की मग आपोआपच शारीरिक संबंध येतात आणि शारीरिक संबंध आले की आपली संस्कृती भ्रष्ट होऊन जाईल अशी भीती व ब्राह्मण लोकांना होती त्यांना आपल्या बायका सुरक्षित ठेवायच्या होत्या साहजिकच ही अनुभव विटाळ संस्कृती त्यांनी अधिकच वाढवत नेली . लोकांची शरीरे एकत्र आली की लोकांची मने सुद्धा एकत्र येतात हे माहीत असल्याने समाज विभाजित राहायचा असेल तर क्रीडा संस्कृती विकसित होता कामा नये असा या ब्राह्मण संस्कृतीचा हेतू होता परिणामी आपल्याकडे बुद्धिबळासारखे खेळ जास्त विकसित होत गेले परंतु शारीरिक खेळांच्या बाबतीत मात्र हळूहळू आपण आकसत गेलो वर्णातल्या किंवा स्वतःच्या जातीतल्या लोकांशीच खेळायचे या प्रवृत्तीने आपले प्रचंड नुकसान केले . खेळ नेहमीच लोकसंस्कृतीमध्ये शारीरिक मोकळेपणा आणि मानसिक मोकळेपण आणतात आणि हा मोकळेपणा नेहमी स्वातंत्र्याकडे घेऊन जाऊ शकतो यातला धोका माहिती असल्यामुळेच ब्राह्मण संस्कृतीने स्वातंत्र्य निर्माण करू शकणारी ही गोष्ट वाढणार नाही याची काळजी घेतली दुसरी गोष्ट अर्थातच नाट्य अनुभव होय ही त्या काळातली सर्वोत्कृष्ट लोककला होती आणि शैव संस्कृतीने ती पद्धतशीरपणे डेव्हलप केली होती. खुद्द भगवान शंकर हेच नटराज असल्याने नाटक आपल्याकडे सहजरित्या डेव्हलप होत गेले किंबहुना युरेशियन संस्कृती आणि शैव संस्कृती यांच्यामध्ये जो फरक आहे तो फरक प्रामुख्याने कलाप्रकारांच्यातसुद्धा अवतरतो म्हणजे शैव संस्कृती ही नाट्य प्रधान आहे तर युरेशियन संस्कृती ही साहित्य प्रधान आहे शैव संस्कृती ही दृकश्राव्यप्रधान आहे तर युरेशियन संस्कृती ही शब्दश्राव्यप्रधान आहे हे अत्यंत जाणीवपूर्वक करण्यात आलेले आहे याचे कारण शब्द प्रामाण्य हे ब्राह्मण संस्कृती मजबूत करण्यासाठी अत्यंत आवश्यक होते म्हणूनच मग वेदातले शब्द जास्तीत जास्त बहुजन लोकांच्या पासून दूर लांब ठेवण्यासाठी प्रथम वेदवाचन करण्याची मनाई केली गेली आणि नंतर संस्कृत भाषा शिकण्यावरच बंदी आणली गेली अर्थातच शैव पंडित लोकांनी ती स्वीकारली नाही तेव्हा युरेशियन लोकांनी शैव धर्मी लोकांची नाट्य संस्कृती ही पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतली गेली आणि अभिनव गुप्ता चे नाट्यशास्त्र हे पूर्णपणे बदलून ते भारताचे नाट्यशास्त्र आहे असा प्रचार केला. हे अत्यंत जाणीवपूर्वक करून आणि त्यात घालघुसड करून शेवटी शैव नटांना शूद्र करण्यात आले म्हणजे शब्द प्रमाणता ब्राह्मण लेखकाकडे आणि त्याने लिहिलेली नाटके मात्र शूद्र नट सादर करणार असा हा अत्यंत परस्पर विरोधी प्रकार होता नंतर आपल्याच नावाने नाट्यशास्त्र करून यांचे अभ्यासक्रमामध्ये सार्वत्रिकरण झाले आणि त्यातूनच दशावतार संस्कृती डेव्हलप होत गेली 


अनुभव बंदी ही युरेशियन संस्कृतीची खासियत असल्याने साहजिकच अनुभव विटाळ निर्माण करण्यात आला आणि आज सुद्धा हा अनुभव विटाळ अधून मधून डोकावत असतो 


भारत पाक यांच्या सामन्यातील मुळाशी ही परंपरा आहे . आणि याबाबत दोन टोके गाठली जातात पहिली आपण पाकिस्तानचे जणू काय फॅन असल्यासारखे उद्योग चालतात तर दुसरी पूर्णपणे अनुभव विटाळ उद्योग ! वास्तविक यामधला मध्य काढणे आवश्यक होते आणि माझ्या मते आशिया कप मध्ये हा मध्य काढला गेला .


पाकिस्तानने जो दहशतवादी हल्ला केला त्या हल्ल्याचे उत्तर आपण दिलेच पाहिजे आणि ते सर्व पातळीवर दिले पाहिजे पण जेव्हा मुद्दा दोन देशांचा नसतो तेव्हा अनुभव विटाळ सोडून द्यावा लागतो. आम्ही तुमच्याबरोबर खेळणार नाही म्हणजेच आम्ही तुमच्याबरोबर अनुभव घेणार नाही आम्ही तुम्हाला अनुभवणार नाही हाच संदेश असतो आता हल्ल्यानंतर आपण पाकिस्तानची कसली पाठ राखण करायला नको पाहिजे परंतु प्रॉब्लेम असा येतो की याबाबतीत सरकारचे धोरण कधीही सरळ नसते पाकिस्तान मध्यंतरी अडचणीत असताना ज्या तऱ्हेने मानवतेच्या पातळीवर आपण मदत केली त्याची कसलीही मुलाइजा पाकिस्तानने बाळगलेली दिसत नाही हा नालायक देश आहे हे त्याने सिद्ध केले अशावेळी आपण कठोर धोरण घेणे हे साहजिकच होते पण कठोर धोरण अवलंबताना नेमके काय करायचे हे आपल्याला स्पष्ट पाहिजे. 


माझ्या मते भारत आणि पाक यांचे थेट सामने आता टाळायलाच हवेत मात्र पाकिस्तानातल्या क्रिकेटपटूंनी जे भाष्य केले आणि भारतीय क्रिकेटला क्रिकेटपटूंना हिणवण्याचे प्रयत्न केले त्याला उत्तर देणे भारतीय क्रिकेटपटूंच्यासाठी अत्यंत आवश्यक होते आणि कधीतरी आमना सामना करणे आवश्यक होत साहजिकच यातूनच एकदा तरी यांना यांची जागा दाखवूया असे काहीतरी झाले दुसरी गोष्ट अर्थातच आशिया कप हा काही पाकिस्तानचा राजकीय अजेंडा नाही ती संपूर्ण आशिया खंडाची अनुभव संस्कृती आहे तर एका नतद्रष्ट राष्ट्रासाठी आशिया खंडातल्या इतर देशांशी आपण खेळणे का टाळावे? जर हा न्याय वापरायचा असेल तर मग तो चीनशी तर अधिक वापरायला हवा होता म्हणजे चीन बलवान आहे म्हणून आपण चीन बरोबर खेळणार आणि पाकिस्तान कमजोर आहे म्हणून पाकिस्तान बरोबर खेळणार नाही अशी काहीतरी दुटप्पी राजनीती चालते अर्थात चीन काही आपल्याशी दहशतवादी उद्योग करत नाही परंतु आक्रमणाचे काय ? आपल्या बळकावलेल्या जमिनीचे काय ? हाच न्याय जर का पुढे नेला तर अमेरिका रशियाने कधी ऑलम्पिक मध्ये एकमेकाला भिडायलाच नको प्रत्यक्ष असे होत नाही कारण जेव्हा आंतरराष्ट्रीय अनुभव संस्कृती अस्तित्वात असते तेव्हा त्यामध्ये आपण एकदा भाग घ्यायचे ठरवले की आपल्याला आपल्या शत्रू राष्ट्राबरोबर सुद्धा खेळावे लागते याला पर्याय नसतो . मात्र त्याबरोबर नाईलाज म्हणून खेळतोय हा मेसेज जाणे खूप आवश्यक असते. त्यामुळे सूर्यकुमार ज्या पद्धतीने वागतो ती पद्धत भारतातल्या धोरणाचीच धोतक आहे . पाकिस्तान बरोबर आमने-सामने तीन सामने झाले ते बरेच झाले एका अर्थाने आपण तीन शून्य अशी ही मालिका जिंकली आहे अर्थातच दांभिक अहंकार ही इस्लामच्या संस्कृतीची खास देणगी आहे आणि पाकिस्तान मध्ये तर ती पुरेपूर भरलेली आहे पडलो तरी टांग वर असा काहीतरी पाकिस्तान क्रिकेटर लोकांचा चाललेला उद्योग असतो हा अर्थातच तिथल्या सांस्कृतिक राजकारणात टिकून राहण्याची गरज असल्याने निर्माण होतो भारताला शिवी दिली नाही तर पाकिस्तान मधले राष्ट्रप्रेम सिद्ध होत नाही साहजिकच मग हे लोक असले काहीतरी उद्योग करत बसतात आणि आपण त्याला रिऍक्ट होत राहतो .


तरीही पुढे सुद्धा हा प्रश्न येणारच तेव्हा आपण या बाबतीत स्वच्छ असावी आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा भारत पाक असा मामला नाही तेव्हा आपणाला सर्वच खेळांच्या मध्ये खेळावेच लागेल याबाबतीत उगाचच अतिरेकी राष्ट्रवाद धारण करण्यात अर्थ नाही काही लोकांना लाईक मिळतात म्हणून असे लोक अतिरेकी राष्ट्रवाद चेकाळून चेकाळून मांडत असतात पण ते प्रत्यक्ष व्यवहाराला धरून नाही . आंतरराष्ट्रीय व्यवहार करताना तुमचे शत्रू नेहमीच तुमच्या समोर येत राहणार अशावेळी त्यांना क्रीडा क्षेत्रात हरवणे हा सर्वात उत्तम उपाय असतो आणि हाच उत्तम उपाय क्रिकेट असोसिएशनने अवलंबला आता तिथे एक भाजपाचा माणूस आहे म्हणून या निर्णयाला शिव्या घालणारे काही पुरोगामी लोक पण आहेत हा दुसरा टोकाचा मूर्खपणा आहे तुम्ही कला आणि क्रीडा क्षेत्रात राजकारण कुठल्याच लेवलला आणून चालत नाही तिथे मोकळीक असलीच पाहिजे . भारतीय लोकांना गेल्या हजार वर्षांमध्ये विटाळाची इतकी सवय झालेली आहे की त्यामध्ये आपली अस्मिता जोपासण्याची प्रवृत्ती आता नैसर्गिक बनत चाललेली आहे. त्यातूनच मग ह्याला हीन मान त्याला श्रेष्ठ मान , फक्त त्याला स्पर्श कर याला स्पर्श कर , याला स्पर्श करू नको त्याला स्पर्श करू नको असले उद्योग चाललेले असतात ही विटाळ संस्कृती आपण जितक्या लवकर सोडू तितके बरे कारण भारताचा जो काय सत्यानाश झालेला आहे त्यामध्ये विटाळ या गोष्टीचा सुद्धा फार मोठा समावेश आहे .या मधली सर्वात हाईट काय असेल तर ती म्हणजे ज्या ब्राह्मण लोकांनी हा विटाळ निर्माण केला ते ब्राह्मण आता तो पाळत नाहीत म्हणजे जगभरात कुठेही स्थलांतरित होण्याची या ब्राह्मण लोकांची तयारी आहे कुठल्याही परक्या माणसाला हे लोक सहज मिठी मारतात आणि या लोकांनी स्पॉन्सर केलेला विटाळ मात्र आपण इथे मिरवत बसतो तेव्हा ब्राह्मणेतर लोकांनी आता शहाणे होणे खूप गरजेचे आहे . विटाळमुक्ती हे माणसाच्या स्वातंत्र्याचे आद्य प्रमेय आहे . तेव्हा तिच्या दिशेने जितक्या लवकर आपण प्रवास करू तितके बरे !


श्रीधर तिळवे नाईक 

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे