शैव लोकांची दृकश्राव्य काव्य परंपरा आणि त्याचे साईड इफेक्ट श्रीधर तिळवे नाईक
भारतीय शैव साहित्याच्या इतिहासामध्ये नेहमीच सर्व कलांना अनेकदा काव्य म्हटले जाते . सर्वसाधारणपणे या परंपरेला दृकश्राव्य परंपरा असे म्हटले जाते आणि काव्याचे दोन प्रकार केले जातात दृककाव्य आणि श्राव्य काव्य ! आजच्या भाषेत सांगायचे तर व्हिडिओ आणि ऑडिओ . पण यामुळेच एक गोची निर्माण झालेली आहे आणि ती म्हणजे कुठेही लिखित नाही . काव्य हे ऐकण्यासाठी असते ऐकवण्यासाठी असते या धारणेमुळे बहुतांशी काव्य हे मौखिक परंपरेने चालत आले तर जे दृककाव्य होते तेही मौखिक परंपरेनेच चालत आले . अपवाद फक्त चित्र आणि भित्तीचित्र शिल्प स्थापत्य! शैव मंदिरामध्ये सर्वसाधारणपणे आपणाला मोठ्या प्रमाणामध्ये चित्र भित्तिचित्र शिल्प स्थापत्य या गोष्टींचा प्रचंड मोठ्या प्रमाणात आविष्कार दिसतो चित्रकला मात्र बहुदा या काळातली नष्ट झालेली दिसते . कारण जे मटेरियल वापरलेले असावे ते टिकलेले दिसत नाही भवभूतीच्या मालती माधव या नाटकामध्ये चित्रे काढल्याचा उल्लेख आहे याचा अर्थ शैव परंपरेमध्ये चित्रे काढली जात होती विशेषत: बायका आपल्या प्रियकराची चित्र काढत होत्या या काळामध्ये युरेशियन परंपरेमध्ये विवाह आई-वडिलांनीच ठरवायचा असल्यामुळे प्रेमप्रकरणांना फारसा वाव नव्हता त्या उलट कालिदास , भवभूती या सर्व नाटककारांच्या मध्ये मात्र आपणाला प्रेम प्रकरणे दिसतात यातले सर्वात प्रभाव टाकणारे प्रेम प्रकरण हे मालती माधवचे आहे ज्याचा बॉलिवूड वर प्रचंड मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे म्हणजे नासिर हुसेन दिग्दर्शित हम किसीसे कम नही हा जो सुपर डुपर हिट चित्रपट आहे त्याची प्रेरणा मालती माधव आहे लहानपणीच पालकांनी ठरवलेला मालती आणि माधव यांचा विवाह एका जरठ मंत्र्यांमुळे (शारदा हे नाटक याबाबतीत पायोनियर नाही ऑलरेडी भवभूती ने हा विषय मालती माधव मध्ये हँडल केलेला आहे) धोक्यामध्ये येतो आणि शेवटी त्यावर मात करून हे दोघे कसे पळून जाऊन शिवमंदिरामध्ये विवाहबद्ध होतात त्याचे चित्रण नाटकामध्ये आहे अर्थातच त्यानंतर सुद्धा नायिकेला पळवून नेले जाते आणि मग नायक नायिकेला सोडवतो अर्थात बहुतांशी हिंदी फिल्म मध्ये पूर्वीच्या काळामध्ये हा फॉर्मुला दिसायचा की प्रेयसी किडनॅप होते आणि मग नायक आपल्या पराक्रमाच्या जीवावर व्हीलनंघरी जाऊन तिला सोडवतो हा फॉर्म्युला सुद्धा या मालती माधवपासूनच आलेला आहे. यामध्ये एका कथानकामध्ये नायिकेला एक तरुण सिंहापासून वाचवतो आणि ती मग त्याच्या प्रेमात पडते हा फॉर्मुला नंतर हिंदी फिल्म मध्ये आलेला आहे.
पळून झालेला विवाह हा शिव मंदिरात होणे हे आपण समजू शकतो म्हणजे अगदी ॲनिमल सारख्या चित्रपटात सुद्धा अलीकडे तो आलेला आहे . आश्चर्याची गोष्ट अशी आहे की यामध्ये चक्क एक बौद्ध संन्यासीनी सुद्धा आहे जी खूप पॉझिटिव्ह दाखवलेली आहे याचे कारण असे की शैव लोक नेहमीच बौद्धांना आपलेच मानत होते
हे मी सांगितले याचे कारण शैव परंपरेतील दृककाव्याचा एक नमुना कसा जनमानसांच्यामध्ये येतो आणि तो बॉलिवूड सारख्या ठिकाणी सुद्धा कसा आज सुद्धा फंक्शनल आहे हे कळावे
भवभूतीने दोन नाटके रचली ती म्हणजे मालती माधव आणि उत्तर राम चरित्र ! रामायणामध्ये जो उत्तर राम चरित्राचा दुसरा खंड आलेला आहे जो घुसवलेला आहे तो या नाटकातून आलेला आहे . अनेकांचा असा समज आहे की हे नाटक भवभूतीने रामावर लिहिलेले आहे परंतु प्रत्यक्षात ते जास्त सीतेवर आहे आणि वैष्णव धर्माच्या कचाट्यात सापडल्याने रामाची कशी शोकांतिका झाली ते दाखवणारे हे नाटक आहे यामध्ये राम वैष्णव धर्माच्या तावडीत सापडून एका पाठोपाठ एक चुकीचे निर्णय घेत जातो आणि त्याच्या या निर्णयांच्यामुळे सीतेची कशी शोकांतिका होते ते दर्शवणारे हे नाटक आहे दुर्दैवाने शैव वैष्णव हा वाद न कळणारे लोक हे समजून घेत नाही किंबहुना त्यांना ते घ्यायचे नाही . भवभुतीने वाल्मिकी रामायणाचा सुखद शेवट हा शेवट न मानता त्याला शेवटचे शोकात्म रूप दिले आणि शेवटी या नाटकाचा प्रभाव इतका पडला की खुद्द वाल्मिकी रामायणामध्ये बदल झाले . लव आणि कुश या व्यक्तिरेखा पूर्णपणे स्वतंत्रपणे त्यांनी निर्माण केल्या.
या नाटकाचा प्रचंड प्रभाव पडून दिलीप धोंडो कुलकर्णी या आमच्या मित्राने मराठीमध्ये उत्तररामचरित आणले होते आणि भवभूतीच्या मूळ संहितेशी प्रामाणिक राहत त्याने रामराज्य कसे वर्णवादी राज्य होते हे व्यवस्थित दाखवलेले होते किंबहुना त्याने या नाटकाला एक अतिशय व्यवस्थित मार्क्सवादी टच देऊन स्वतःचे काहीसे स्वातंत्र्य शाबूत ठेवले होते . दुर्दैवाने कोल्हापुरामध्ये हे नाटक बसवणाऱ्या मार्क्सवादी लोकांना बहुदा ओरिजिनल नाटक नीट माहीत नसावे मात्र शरद भुताडिया यांचा अभिनय कमालीचा होता त्यामुळे हे नाटक तरले . करणारे बहुतेक सर्व युरेशियन परंपरेमधले असल्याने अनेकांना सादरीकरणातला प्रकार नीट कळला नाही आणि दिलीप धों. कुलकर्णी यांना नेमके काय साधायचे होते ते साधणे जरा कठीण झाले अर्थातच मी मग दिलीपचा क्लास घेतला होता पण तो खाजगीत घेतला होता. नाटकानंतरच्या चर्चेतही मी भाग घेतला होता .बहुजनवादी शैव परंपरा न कळल्याने मार्क्सवादी कसे घोळ घालतात त्याचा हा एक नमुना होता .
बाकीची नाटके जी भवभूतीच्या नावाने सांगितली जातात ती भवभूतीने लिहिलेली नाहीत.
प्रश्न असा आहे की शैवधर्मी नाटककारांनी इतकी नाटके लिहिली पण ती का उपलब्ध नाहीत याचे स्पष्ट कारण मौखिक परंपरा हेच आहे. मी कायमच नेमाडे यांना आणि मौखिक परंपरेला प्रचंड विरोध करत आलेलो आहे कारण शैव लोकांनी ही मौखिक परंपरा स्वीकारून स्वतःच्या साहित्याचा स्वतःच्या संस्कृतीचा सत्यानाश करून घेतला असे माझे स्पष्ट मत आहे . फक्त दृक आणि श्राव्य असा विचार केल्याने हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. आपण युरेशियन लोकांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी शैव संहिता वाचवल्या . इसवी सन 900 नंतरच शैव लोकांच्या संहिता लिखित स्वरूपात यायला लागल्या याबाबतीत ब्राह्मणधर्माने आणि शैवधर्म हे एकाच माळेचे मणी आहेत दोघांनाही मौखिकतेचीच जास्त पडलेली असते . याबाबतीत वैष्णव परंपरा ही सर्वाधिक शहाणी निघाली असे म्हणता येते याचे कारण सरळ आहे वैष्णव धर्म हा लिखित परंपरा प्रस्थापित झाल्यानंतरच जन्मलेला आहे किंबहुना जैन बौद्ध आणि वैष्णव या तिन्ही धर्मांना लिखित परंपरा लाभल्यामुळे या लोकांचे सर्व साहित्य कुठे ना कुठेतरी उपलब्ध होत राहते . ब्राह्मणधर्माने देखील स्वतःमध्ये ताबडतोब नंतर बदल केलेले आहेत परंतु शैवलोक अजूनही शहाणे होत नाहीत त्यांना अजूनही मौखिकतेचा माहित नाही का पण प्रचंड शौक आहे याचे कारण ही दृकश्राव्य परंपरा होय प्रत्यक्ष व्यवहारामध्ये दृकश्राव्य लिखित अशी परंपरा असणे हे नेहमीच परवडते.
शैव परंपरेतील श्राव्य काव्य म्हणून भर्तृहरी याचे आता संपूर्ण नसले तरी शतकत्रय उपलब्ध आहे त्यामध्ये शृंगार शतक, वैराग्य शतक आणि नीतीशतक हे येतात .यांचा संबंध तीन अक्षांशी आहे शृंगार शतक हे काम वैराग्य शतक हे मोक्ष तर नीतीशतक हे अर्थ या अक्षांशी संबंधित आहे मी मागेच अनेकदा सांगितलेले आहे की धर्म या गोष्टीला अक्षाचा दर्जा नाही त्यामुळे धर्म या गोष्टीशी निगडित शतक नाही मात्र त्याचा उल्लेख सर्व काव्यामध्ये अधून मधून येत राहतो कारण या काळामध्ये धर्म प्रस्थापित झाला होता.
सर्वसाधारण असे दिसते की पाचव्या शतकानंतरचे शैव काव्य हे लिखित परंपरेमध्ये काही प्रमाणात तरी आलेले आहे याचे उत्तम उदाहरण म्हणून शतकत्रय हे दाखवता येते भर्तृहरी हे गोरखनाथांचे शिष्य होते आणि नाथ धर्मातल्या वैराग्य संप्रदायाचे ते प्रवर्तक होते हे सर्वश्रुत आहे . नाथ संप्रदायाने पूर्णपणे आपले सर्व वाङ्मय हे लिखित स्वरूपात आणलेले आहे आणि इथूनच शैव परंपरा ही लिखित होत गेली पण ती प्रामुख्याने ब्राह्मणांनी जतन केली असल्याने आणि घाल घुसड करून लिहिलेली असल्यामुळे कळत नकळत हिंदू होत गेली असो
निदान आता तरी शैव लेखकाने नेमाडे यांच्या आणि मौखिकतेच्या नादी लागू नये शांतपणाने लिखित परंपरा हीच टिकते हे लक्षात घ्यावे . मुख्य म्हणजे आता मुद्रित आणि डिजिटल परंपरेमध्ये यावे ते जास्त सोयीचे आहे. अलीकडे काही मागासलेले लोक फक्त छापील परंपरेला महत्त्व देतात आणि छापून आले तरच त्या पुस्तकांचा त्या कलाकृतींचा उल्लेख येतो हे राजकारण आहे हे लक्षात घ्यावे .विशेषत: प्राध्यापक लोक आणि अकॅडमीक क्षेत्रातील लोक हे उद्योग फार करतात . बहुजन समाजाने यांच्या नादी लागू नये म्हणजे छापील मध्ये यावे पण सर्वात प्रथम डिजिटल मध्ये यावे .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment