ब्राह्मणीकरण , वर्णगंड आणि मराठीतील वाचन संस्कृती श्रीधर तिळवे नाईक 

भारतातील मौखिक संस्कृतीचा सर्वात मोठा दुष्परिणाम कुठला असा जर कोणी प्रश्न विचारला तर तिने पुरोगामी कालखंडामध्ये जगात सर्वत्र निर्माण झालेल्या वाचन संस्कृतीची केलेली हत्या हा परिणाम सांगता येतो. जगभरात एकंदरच इसवी सन 1000 वर्षापर्यंत वाचन संस्कृती फारशी नव्हती मात्र इसवी सन एक हजार च्या आसपास चीनने आणि कोरीयांनी प्रथम प्रिंटिंगचा म्हणजेच छापीलतेचा शोध लावला आणि ही छापील क्रांती हळूहळू युरोपमध्ये गेली तिथे मग गटेनबर्गने तिला एक आकार दिला 

भारतातील शैव संस्कृती विषयी ती प्रामुख्याने मौखिक आहे हा सर्वात मोठा तिचा दोष आहे हे मी नेहमीच मांडत आलो आहे. आपल्याकडे या मौखिकतेचा पुरस्कार करणारे देशीवादी अतिशहाणे आजही आहेत प्राचीन काळातील मौखिकतेचा पुरस्कार मीही करतो पण हे करताना ती ताबडतोब छापील वा मुद्रित व्हावी म्हणून आग्रहही धरतो कारण दुसरा पर्याय नाही पण दुर्दैवाची गोष्ट अशी की प्रिंटिंग 19 व्या शतकात भारतात आल्यानंतर त्यामुळे जी वाचन संस्कृती तयार व्हायला हवी ती अजूनही तयार झाली नाही आणि याला जबाबदार या देशातील ब्राह्मणीकरण होते . आणि त्याहीपेक्षा अधिक ब्राह्मणेतर अडाणी होते असे खोटे प्रचार ब्राह्मणांनी जे केले तेही होते ब्राह्मणीकरणाचा एक अर्थ असाही होतो की ब्राह्मणेतरांच्या विषयी जास्तीत जास्त खोटे बोलणे, त्यांच्याविरुद्ध अपप्रचार करणे त्यांना अधिकाधिक न्यूनगंड इनफिरीयर कॉम्प्लेक्स देणे. त्यातूनच मग शिवाजी महाराजांना लिहायला वाचता येत नव्हते असा अपप्रचार केला गेला अर्थात हे काही हिंदूंच्या (हिंदू म्हणजे भारतात जन्मलेल्या सर्व धर्मांच्या) पुरते मर्यादित नव्हते खुद्द इस्लाममध्ये सुद्धा महंमद पैगंबर यांना लिहायला वाचायला येत नव्हते असा अपप्रचार तिथल्या पुरोहितांनी केलाच होता आणि तो जवळजवळ विसाव्या शतकापर्यंत टिकला.(या लोकांना अर्थातच काफीर मानले गेले कारण या लोकांच्या मते मूळ कोरान नाहीसे झाले आहे आणि जे कुराण आणले गेले आहे ते राजकीय सत्तेने आणलेले आहे साहजिकच या मांडणीला प्रचंड विरोध होऊन ती आता जवळजवळ नाहीशी झालेली आहे) भारतातले सर्व ब्राह्मणेतर कसे अडाणी होते हे सांगण्यात धन्यता मानणे त्यांना अधिकाधिक इन्फिरिअर कॉम्प्लेक्स देणे म्हणजे ब्राह्मणीकरण होय.

यामुळे ब्रिटिश काळापुरते शहाणपणाचे सगळे कंत्राट ब्राह्मण व क्षत्रिय(ब्रिटिश संस्थानिक झालेले लोक)लोकांना मिळाले खरे परंतु तोटा असा झाला की या सर्व जबाबदारी गोष्टींच्या साठी त्यांना जबाबदार मानले जाऊन 1950 नंतर त्यांच्यावर प्रचंड हल्लेही सुरू झाले . यात मोठा घोळ हा होता की ब्राह्मणांच्या पूर्वजांच्यावर केलेली टीका म्हणजे आपल्यावरही टीका समजली जाऊ लागली असा गैरसमज आत्ताच्या पिढीने करून घेतला तसा तो घेण्याची काहीच गरज नव्हती. माझ्यासारखा मनुष्य जेव्हा ब्राह्मणांच्यावर टीका करतो तेव्हा ती साधारणपणे 1950 पूर्वीच्या ब्राह्मणांवर असते . कारण इतिहासाचा तो भाग असतो. ब्राह्मण अनेकदा हा झटकायला बघतात एकीकडे हिंदुत्ववादाच्या नावाखाली इतिहास आणायचा आणि दुसरीकडे याच इतिहासाच्या नावाने आरोप पत्र दाखल झाले की मग मात्र आक्रमकताळेपणा करायचा असे वर्तमानकालीन ब्राह्मणांचे काहीतरी विचित्र चाललेले असते . यातूनच मग विचित्र ज्याला मी ब्राह्मणगंड म्हणतो निर्माण झालेला आहे . भारतातील वर्णव्यवस्था ही कायमच गंड निर्माण करत असते . विशेषता ब्राह्मण आणि क्षत्रिय हे दोन्हीही वर्ण ब्राह्मणगंड आणि क्षत्रिय गंड या दोन गंडानी ग्रस्त आहेत त्यामागे दोघांचेही वर्ण व्यवस्थेमुळे तयार झालेले वर्ण अहंकार आहेत. त्या उलट वैश्यगंड शूद्रगंड अतिशूद्रगंड आणि आदिवासी गंड हे मात्र अहंकारा ऐवजी न्यूनगंडाने ग्रस्त होत जातात एका अर्थाने ब्राह्मणगंड आणि क्षत्रिय गंड हा सुपिरिअर कॉम्प्लेक्स चा भाग बनत जातो आणि इतर गंड मात्र न्यूनगंडाचा भाग बनत जातो आपल्याकडे सामाजिक मानसशास्त्राचा विचार करताना या गोष्टीचा विचार होत नाही परंतु तो होणे आता गरजेचे आहे कारण नवीन प्रकाशामध्ये अनेक गोष्टी नवीन पद्धतीने सापडू शकतात . ब्राह्मणीकरणाचा अर्थ वैश्य ,शूद्र अति शूद्र आणि आदिवासी यांच्यामध्ये त्यांना पापयोनी मानून पापगंड निर्माण करणे न्यूनगंड निर्माण करणे असाही होतो. सामाजिक मानसशास्त्र असे डेव्हलप करताना भारतामध्ये वर्णव्यवस्थेची दखल घ्यावीच लागते कारण गंड हे केवळ मन बिघडवत नाहीत तर ते पिंडही बिघडवतात त्याला अनहेल्दी करतात आणि अंडरग्राउंड व्हायला भाग पाडतात. ते पिंडाला ऍक्टिव्ह होऊ देत नाहीत आणि मनुष्य मग अत्यंत उथळ असणाऱ्या समाजाने स्पॉन्सर केलेल्या समाज गंडाचा स्वीकार करत जणू एखादा रोल पाडावा तशाप्रकारे भूमिका करत राहतो. म्हणजेच वैश्य वैश्याची भूमिका , शूद्र शूद्राची भूमिका ,अतिशूद्र अतिसुत्राची भूमिका आणि आदिवासी आदिवासी असण्याची भूमिका पार पाडत राहतो या भूमिका पुढे पुढे अस्मितागंड बनत जातात कारण न्यूनगंडावर मात करण्याची ती एक शैली बनत जाते. प्रतिकाराचे ते वेपन बनत जाते.

भारतामध्ये त्यामुळेच वाचन हे ब्राह्मणाने करायचा उद्योग आहे असा एक फार मोठा गैरसमज करून घेण्यात आलेला आहे. आपले पूर्वज अडाणी होते आणि त्यांना वाचायला येत नव्हते असाही गैरसमज ब्राह्मणीकरणामुळे ब्राक्षेतर लोकांच्या मध्ये निर्माण झालेला दिसतो लेखन करणारा आणि वाचन करणारा माणूस हा सुपेरियर असतो हा गंड ज्याला मी अक्षरगंड म्हणतो तो प्रामुख्याने वैष्णव लोकांनी सर्व नाट्यशास्त्र जेव्हा हायजॅक केले आणि त्यात आवश्यक असलेले बदल करून घाल घुसळ करून बिंबवले तेव्हा निर्माण झाले त्यामुळेच मग ब्राह्मण व्यक्तीला नाटक लिहिण्याची अनुमती आहे आणि इतरांना विशेषता जे इतर धर्मीय नाहीत ज्यांनी वैष्णव धर्म स्वीकारला आहे आणि नंतर हिंदू धर्म स्वीकारला आहे त्यांना मात्र अनुमती नाही कारण लिखाण करण्याचे सर्व कंत्राट हे फक्त ब्राह्मण लेखकाकडे असले पाहिजे असा एक गंडच ब्राह्मण लोकांनी रुजवला नाट्यशास्त्र त्यासाठी अत्यंत पद्धतशीरपणे रुजवण्यात आले. याच वैष्णव नाट्यशास्त्राद्वारे मग तुम्ही कंपल्सरी रामायण महाभारत आणि वैष्णवपुराणे किंवा वैष्णव लोकांनी स्पॉन्सर केलेली लिहिलेली शैव पुराणे यांच्या मधल्या कथा घेतल्या पाहिजेत असा नियम करण्यात आला याचा परिणाम असा झाला की मूळ शैव लोकांचा असलेला दशावतार जो मुळात दशशक्तीचा जागर आणि गजर होता तो बदलला जाऊन विष्णूचा दशावतार करण्यात आला. या दशावतारातल्या सर्व गोष्टी जर आपण पाहिल्या तर त्या रामायण महाभारत आणि पुराणे यांच्या मधून घेतलेल्या दिसतात अपवाद फक्त शैव नाटककार होते त्यांनी मात्र बाहेरच्या कथा घेतल्या पण ब्राह्मणांची हुशारी अशी की मूळ शैव असलेली नाटके नंतर पुराण रामायण आणि महाभारतामध्ये बसवण्यात आली. उदाहरणार्थ कालिदासाने रचलेली शाकुंतलम ची कथा नंतर महाभारतात घुसवण्यात आली. आणि ही कथा कशी मूळची महाभारतातली आहे हे बिंबवण्यात आले पुढे तर मग कालिदासाच्या संहितेतही बदल घडवले या सगळ्याचा एक दुष्परिणाम असा झाला की ज्यांनी ज्यांनी लिखाण केले ते चमत्कारिक रीतीने गायब होत गेले म्हणजे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर यांनी समाधि घेतली ,नामदेव पंजाब मध्ये गेले, तुकाराम वैकुंठाला गेले ,मूळचे पंडित असलेले एकनाथ (जो विष्णूची भक्ती करतो तो ब्राह्मण अशी ब्राह्मण या शब्दाची नवीन व्याख्या त्यांनी केली होती)पाण्यात बुडाले , मूळचे शैव संन्यासी असलेले चक्रधर आणि त्यांचा महानुभव पंथ आपोआपच गूढ होत गेला आणि गायब होत गेला जिथे ब्राह्मण सुद्धा सोडण्यात आले नाहीत तिथे इतरांची काय कथा? 

याचा एक परिणाम म्हणून सर्व वैष्णव धर्म स्वीकारणाऱ्या लोकांच्या मध्ये वाचनाचा लिखाणाचा एक धसका निर्माण झाला कथाकथनाचा प्रयोग आणि कीर्तनाचा प्रयोग ब्राह्मण क्षत्रिय लोकांच्याकडे हळूहळू सरकत गेला आणि तुकारामानंतर हळूहळू भक्तीलेखन फार चमत्कारिक रीतीने पंडिती होत गेले आणि रामायण आणि महाभारताच्या बाहेर जाऊन लिखाण करणे ब्राह्मणेतरांना अशक्य झाले. आज सुद्धा रामायण आणि महाभारतावर लिखाण करणारा व वर्ण जाती व्यवस्थेचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष समर्थन करणारा मनुष्य(यामध्ये शिवाजी सावंत यांच्यापासून भालचंद्र नेमाडे यांच्यापर्यंत सगळेच येतात) आपोआपच साहित्यिक क्षेत्रामध्ये वर चढवला जातो. भैरप्पांचा गाजावाजा त्यामुळेच होतो . गिरीश कर्नाड जोपर्यंत बसवेश्वरांच्या वर नाटक लिहित नव्हते तोपर्यंत अतिशय प्रिय होते पण तलेदंड लिहल्यानंतर ते आपोआपच शत्रूच्या स्थानी गेलेले दिसतात. त्यांचे तुघलक हे नाटक मुसलमानांच्या वरची टीका म्हणून घेतले जात होते आणि बहुदा याची त्यांना कल्पना नसावी. त्यामुळेच विजय तेंडुलकर यांना ज्ञानपीठ मिळत नाही परंतु गिरीश कर्नाड यांना ते मिळते कारण विजय तेंडुलकर उघडपणाने घाशीराम कोतवाल आणि सखाराम बाईंडर लिहितात आणि अडचणीचे ठरतात.

साहजिकच नवीन वाचक निर्माण झाले त्यांच्यापर्यंत कुठली पुस्तके जाणार हे सुद्धा ब्राह्मणीकरणच्या या प्रोसेस मध्ये ठरवले जात होते आणि आजही ही प्रोसेस प्रचंड डॉमिनेट करत असते . स्वतःला पुरोगामी समजणारे अनेक लेखक या प्रोसेसला व्यवस्थित मदत करत असतात आणि त्यामुळेच नामदेव ढसाळ यांना ज्ञानपीठ मिळत नाही. बाकी जाऊ द्या दिलीप चित्रे यांना सुद्धा ते दिले जात नाही कारण ते ब्राह्मणवादाचा ठाम प्रतिकार करत असतात. याउलट आडवी जात व्यवस्था मान्य करणारे भालचंद्र नेमाडे यांना मात्र ज्ञानपीठ मिळून जाते . अरुण कोलटकर यांना धर्म मान्यता मिळत जाते कारण ते जेजुरीमध्ये शैवधर्मावर टीका करत असतात .(अर्थातच या टिकेला माझे ऑब्जेक्शन नाही किंबहुना यापेक्षा अधिक कठोर टिका व्हायला हवी परंतु त्यांना का धर्म प्रोत्साहन दिले जाते हे लक्षात यावे म्हणून हा मुद्दा आहे)

यातूनच कळत नकळत मग रामायण महाभारत आणि पुराणे यांच्यातून प्रेरणा घेणारे व त्यांच्याच हिशेबाने लिखाण करणारे वि स खांडेकर( ययातीलाच ज्ञानपीठ मिळाले आहे) , वि वा शिरवाडकर (कौतेय व हिंदुत्ववादी लोकांना आदर्श असणारी झाशी की राणी ). व शिवाजी सावंत हे सर्वाधिक खपाचे कादंबरीकार किंवा नाटककार बनत जातात. या लेखकांचे मुख्य काम समाजामध्ये मुख्य म्हणजे क्षत्रियांच्यात क्षत्रिय गंड रुजवणे असे असते त्यामुळे शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय मध्ये कर्ण म्हणजे जन्मजात क्षत्रिय प्रतिभा लाभलेला परंतु न्याय न मिळालेला क्षत्रिय ठरतो तर युगंधर मध्ये कृष्ण हा गवळी लोकांच्यामध्ये वाढून सुद्धा उत्तम क्षत्रिय ठरत जातो . मराठीची अभिरुची ही प्रामुख्याने त्यामुळे ब्राह्मण केंद्री व क्षत्रिय केंद्री होत जाते आणि वाचन संस्कृती ही फक्त या दोन केंद्रांच्या भवती फिरत राहते. अलीकडे यामध्ये वैश्यकेंद्री वाचनाला उत्तेजन मिळताना दिसत आहे पण त्याचा मुख्य सोर्स भारतीय नाही म्हणूनच अमेरिकेतल्या उद्योगपतींना किंवा तिथल्या हाऊ टू टाईप पुस्तकांना प्रचंड आश्रय मिळालेला दिसतो. याचे कारण स्पष्ट आहे मुळातच ब्राह्मण आणि क्षत्रिय लोकांच्या मध्ये अलीकडे उद्योगपती बनण्याकडे कल निर्माण होत आहे आणि ह्या नव ब्राह्मण व नव क्षत्रिय लोकांना आवश्यक असलेले वांग्मय म्हणून हे वाङ्मय प्रसिद्धीला येत आहे. 

साहजिकच याला एन्काऊंटर म्हणून दलित वाङ्मयाचा उदय झाला आणि ते सुद्धा हळूहळू भरभराटीला आले . हा नवय्यानी प्रभाव होता . 

यामध्ये अपवाद होते ते फक्त ओबीसी शूद्र ! अलीकडे त्यामध्येही शूद्रगंड जोपासणाऱ्या कादंबऱ्यांचे उदय होताना दिसतात आणि हे सर्व देशीवादी चळवळीच्या प्रवाहाखाली झाले आहे आणि याचा एक दुष्परिणाम असा झालेला आहे की सर्व ओबीसी प्रवर्गाने नेमाडे स्पॉन्सर करत असलेल्या देशीवादाचा जातीवर्णचा आडवा अक्ष स्वीकारलेला दिसतो नेमाडे यांच्या कदाचित त्यांनाही अपेक्षित नसलेल्या हिंदुत्ववादाचा हा चमत्कारिक विजय आहे आणि तो सहजासहजी दिसत नाही. म्हणजेच 52% आसपास असलेल्या ओबीसी लोकांनाच नेमाडे यांनी कळत नकळत वर्ण व जात स्वीकारायला लावली . स्वतःला न्यूनगंड विसरायला लावून स्वतःच्या जाती आणि वर्णगंडाचे रूपांतर सुपरहिट सुपेरीयर कॉम्प्लेक्स मध्ये करण्याची ही एक अजीबो गरीब कोशिश आहे प्रयत्न आहे. पण साहित्याच्या क्षेत्रात यामुळे काही भले झाले असेल कारण वेगवेगळ्या ओबीसी जाती जमातींचे एक चित्रण यामुळे झाले पण याचमुळे झाले असे की सर्व ओबीसी वर्ग भाजपाच्या मागे गेला . ओबीसी प्रवर्गातून आलेल्या सुशिक्षित लेखकांनी ही किमया घडवण्यासाठी हातभार लावलेला आहे. न्यूनगंडाचे रूपांतर साहित्याच्या क्षेत्रात सुपरगंडामध्ये होऊ शकते परंतु प्रत्यक्ष व्यवहारांमध्ये मात्र अशा प्रकारचा सुपरगंड ऍक्टिव्ह होऊ शकत नाही झालेला नाही त्यामुळेच छगन भुजबळ मराठा आरक्षण संदर्भात ओबीसींच्या बद्दल बोलताना कळत नकळत एखाद्या ब्राह्मणीकरणाच्या दबावाखाली असल्यासारखे एखाद्या न्यूनगंडाच्या दबावाखाली असल्यासारखे बोलत असतात अर्थातच आर्थिक क्षेत्रातील त्यांचा भ्रष्टाचार आरोप आणि त्याचे ओझेही याला जबाबदार आहे याला कारण ब्राह्मणीकरणाने या सुपेरीयर गंडांची मक्तेदारी फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय यांना आणि अलीकडे वैश्य लोकांना दिलेली आहे. नरेंद्र मोदी हे सुपेरीयर वैश्यगंडाचे उत्तम प्रतिनिधित्व करतात त्यांना आपले सुपेरिअरत्व शाबूत ठेवण्यासाठी त्यामुळे अनेक प्रपोगंडा राबवावे लागतात . पुरोगामी असलेले ब्राह्मण साहजिकच पद्धतशीरपणे याचा फायदा घेत त्या गंडाचे आणि प्रपोगंडाचे निर्दालन करण्याचा प्रयत्न करत असतात त्याला नामशेष करण्याचा प्रयत्न करत असतात. साहजिकच मग नरेंद्र मोदी यांच्यावरची टीका ही वैश्य गंडावर आणि शूद्र गंडावर हल्ला आहे असे वैश्य आणि शूद्र समजतात आणि ते नरेंद्र मोदी यांना आता डबल पाठिंबा देतात . म्हणजेच पुरोगामी लोकांची नरेंद्र मोदी यांच्यावर होणारी टीका ही कळत नकळत ब्राह्मणीकरणाचा भाग मानला जातो आणि बहुदा अनेक पुरोगामी लोकांच्या विशेषत:ब्राह्मण आणि नव बौद्ध पुरोगामी लोकांच्या हे लक्षात येत नाही . शैव आणि नवबौद्ध यांच्यामध्ये हल्ली जी लढाई चाललेली आहे तिच्यामध्ये हे गंड अनेकरीत्या काम करत असतात ते दिसत नाहीत पण खणखणत असतात आपल्या समाजामध्ये वर्ण गंड कसे रुजलेले असतात त्याचे हे उत्तम राजकीय उदाहरण आहे. ठाकरे बंधू आज साईडलाईन होताना दिसतात त्याचे सर्वात मोठे कारण हेच आहे की ते पुरेसे क्षत्रिय गंड वाले नाहीत आणि पुरेसे ब्राह्मणी गंड वाले पण नाहीत. त्यामुळे त्यांना ना धड आता ब्राह्मण निवडतात ना क्षत्रिय ! भाजपाने शिंदे आणि अजित पवार यांना आपल्या क्षेत्रात ओढून क्षत्रिय गंडाचे प्रतिनिधि बनवलेले आहे .

या सगळ्याचा एक परिणाम म्हणून अनेकदा वाचन सुद्धा गंडग्रस्त होत चालले आहे . आपल्या वर्णाच्या बाहेर असणाऱ्या लोकांचे वाचन केले पाहिजे असे कोणालाच वाटत नाही. यदा कदाचित वाचन केले तर अनेकदा शत्रूचे वाचन म्हणून ते केले जाते .त्यामुळे नेमाडे फक्त ओबीसी आणि मराठा यांच्यातच वाचले जातात आणि कधीकधी हा आपला शत्रू म्हणून ब्राह्मण आणि दलित लोकांच्याकडून. शिवाजी सावंत आणि रणजीत देसाई हे सर्वात मोठ्या प्रमाणात क्षत्रिय आणि ब्राह्मण लोकांच्याकडून वाचले जातात. पु ल देशपांडे यांच्यासारखा लेखक सुद्धा जो एकेकाळी सर्व लोकांच्या मध्ये वाचला जात होता आता पूर्णपणे ब्राह्मण गंडाने ताब्यात घेतलेला आहे . म्हणजेच ब्राह्मण असलेल्या आणि ज्यांना ब्राह्मणांच्या सारखे बनायचे आहे अशा लोकांच्याकडून ते जास्त वाचले जातात. 

या सगळ्याचा दुष्परिणाम असा होतो की सर्वांना आवडेल असा मराठीत लेखकच नाही किंबहुना तो तसा होणार नाही याची काळजीच अनेक लोकांनी आणि या गंड संस्कृतीने घेतली आहे. एकेकाळी दलित साहित्याचे अत्यंत उत्साहाने वाचन करणारे ब्राह्मण आता नवीन दलित साहित्याच्या बाबतीत फारसे उत्साही दिसत नाहीत याचे कारण सुद्धा या गंडांमध्येच आहे .(त्यामुळे दलित लोकांचे काही अडत नाही कारण आता त्यांच्यामध्ये एवढ्या सुशिक्षित लोकांची संख्या झालेली आहे की 1000 वाचक सहजरित्या मिळतात)

मराठ्यांची लोकसंख्या ही साधारणपणे किमान दीड दोन करोड आहे त्यामुळे शिवाजी सावंत यांना अजून १०० वर्षे तरी मरण नाही शिवाजी महाराज हे अभूतपूर्व व्यक्तिमत्व साहित्यिकांच्या मुळे अधिकच प्रभावी बनवलेले व्यक्तिमत्व आहे आणि अनेकदा क्षत्रिय गंड जोपासणारे लोक त्यांच्या संदर्भातले प्रत्येक पुस्तक खरेदी करण्याच्या मागे असतात फक्त जाहिरात त्यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे असते .

कुठलाही गंड हा फेक असतो . तो अधिकाधिक घट्ट बनत जातो कारण शेवटी अहगंडातूनच त्याच्या काल्पनिक भरभराटीमधून किंवा अहमगंडाच्या हानी मधून त्याची निर्मिती झालेली असते . तो कायमच आजाराचे संकेत सुचवत असतो परंतु हे संकेत नीट टॅप करणे हे मात्र त्या त्या संस्कृती मधल्या प्रज्ञावान लोकांचे काम असते अनेकदा हे प्रज्ञावान लोक निर्माण होतच नाहीत कारण आत्मपरीक्षण तेही परखडपणे कोणी करत नाही. मेडिटेशन म्हणजे आपण जसे आहोत तसे नीट पहाणे आणि मग त्यावर काम करणे असते. दुर्दैवाची गोष्ट अशी की मेडिटेशन नसल्यानेच अलीकडे मनोविश्लेषणकारकांचे फावलेले आहे. किंबहुना मनोविश्लेषण हे जेव्हा तुम्ही स्वतःचे मेडिटेशन दुसऱ्या माणसाकडे सोपवता तेव्हा सुरू होते त्या उलट जेव्हा मनोविश्लेषण तुम्ही स्वतः करता तेव्हा मोक्षाची सुरुवात असते. औद्योगिक समाज हा कधीही तुम्हाला मोक्षण सुरू करू देत नाही तो नेहमीच तुम्हाला मनोविश्लेषणाकडे घेऊन जातो कारण शेवटी तुमच्या मनावर त्याला मक्तेदारी निर्माण करायची असते. त्यातूनच मग मन ताब्यात घेण्यासाठी अनेक प्रकारचे सामाजिक गंड ही व्यवस्था निर्माण करत असते विशेषत: उत्तर कार्पोरेट वाद यामध्ये अत्यंत उत्साहाने भाग घेत असतो. जाहिराती या सुद्धा अनेकदा वेगळ्या पद्धतीचे मनोगंड स्पॉन्सर करण्यासाठी निर्माण केल्या जातात. तुमचा इगो अधिक सुपेरिअर बनवण्याचा हा काल्पनिक उद्योग असतो परंतु सध्या फिक्शन चा जमाना असल्याने ते अनेकदा लक्षात येत नाही. तुम्ही जास्तीत जास्त सरफेस वर अंगळत राहा कारण देअर इज नथिंग इन डेप्थ हा प्रागमॅटिक तत्त्वज्ञानातला आद्य प्रमेयाचा धागा उत्तर कॉर्पोरेट वाद नेहमीच मिळवत असतो नेटवर्कमध्ये सतत विणत असतो . एव्हरीथिंग इज स्किन डीप आणि एव्हरीथिंग इज स्क्रीन डीप हे दोन मंत्र या तंत्राने स्वीकारलेले असतात. कुठलाही गंड म्हणजे सरफेस वर तरंगणारा तरारणारा तराळणारा मनाचा nostalgia असतो . तो स्मृती प्रधान असतो आणि त्यामुळेच धार्मिक स्मृती सुद्धा अनेकदा यासाठी राबवल्या जातात. नव्या धार्मिक स्मृती ज्या प्रत्यक्षात अस्तित्वातच नसतात या जुन्या दंतकथांच्याद्वारे वा नवीन दंतकथांच्याद्वारे स्पॉन्सर केल्या जातात अनेक नव्या धार्मिक कथा रचल्या जातात आणि त्या जणू काय प्राचीन असल्याच्या थाटात सादर केल्या जातात अर्थात या स्पॉन्सरशिपमध्ये पारंपारिकरित्या प्रॅक्टिस झाल्याने ब्राह्मण लोक प्रचंड वाकबगार आहेत आणि आता त्यांचे हेच काम चाललेले असते कुठल्याही ब्राह्मणधर्म स्पॉन्सर करणाऱ्या वैदिक अथवा अवैदीक साईटवर गेलात की तुम्हाला हे सहजरित्या दिसू शकते 

या सगळ्याचा एक परिणाम असा झालेला आहे की डिजिटल रीडिंग वाढत चाललेले आहे आणि बुकीश वाचन कमी होत चाललेले आहे त्यातूनच अनेक धार्मिक साइट्स आपले प्राचीन वांग्मय हे फुकट पुरवत असतात आणि साहजिकच त्यातून फुकटेपणाची एक विशिष्ट ओढ वाचकाला लागते आणि ही ओढ अनेकदा प्रत्येक गोष्ट फुकट मागत राहते अर्थातच प्रकाशकांना हे परवडणारे नसल्याने ते हे करू शकत नाही मग उपाय एकच उरतो तो म्हणजे वर्ण गंडाला शरण जाणे . आपल्याकडचे अनेक प्रकाशक कळत नकळत हे करत राहतात 

यातच या सर्व भानगडी मध्ये घडलेली सर्वात चमत्कारिक गोष्ट म्हणजे भारतामध्ये वाचन संस्कृती रुजण्याआधीच मुद्रण संस्कृती आली आणि तिने वाचन संस्कृती निर्माण होऊ दिली नाही . आपण वाचन संस्कृतीचा टप्पा थेट हनुमान उडी घेऊन नाहीसा केला त्यामुळेच शालेय संस्कृतीतून वाचन संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न शाळांच्या बाहेर मात्र फिका पडत गेला . आमची पिढी वाचना ऐवजी रेडिओवरच्या मुद्रण संस्कृतीमध्ये जास्त वाढत गेली आणि पुढे टीव्हीच्या दृकश्राव्य संस्कृतीमध्ये ती भरभराटीला आली. मुळात शैव धर्म हा शैव दृकश्राव्य कलाकृतींच्या मध्ये वाढत असल्याने आणि त्यांच्याद्वारे प्रसार पावत असल्याने साहजिकच वाचन संस्कृतीची प्रचंड उपेक्षा करताना दिसला जोपासला गेला. त्याने मौखिकतेमधून मुद्रित संस्कृतीमध्ये आणि मुद्रित संस्कृतीमधून थेट दृकश्राव्य संस्कृतीमध्ये उडी घेतली. याचा एक मोठा दुष्परिणाम असा झाला की बहुजन समाजामध्ये दृकश्राव्यता जी सुरुवातीपासूनच शैवधर्मामुळे अस्तित्वात होती ती अनेकदा आपोआपच उत्तेजित होत गेली तिला प्रोत्साहन मिळत गेले पुढे मग डीजी दृकश्राव्य होत गेली आणि साहजिकच उत्सवांचे रूपांतर डिजिटल म्हणजेच डीजी दृकश्राव्य उत्सवामध्ये करण्यात आले. दक्षिणेमध्ये सर्व प्रभाव प्रचंड असल्याने तिथे फिल्म संस्कृती हीच मुख्य संस्कृती बनत गेली आणि वाचन संस्कृती फापलत गेली आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये तर शैव धर्म कोंडण्यात आला त्यामुळे फिल्म संस्कृती सुद्धा धड डेव्हलप झाली नाही आणि यातून एक चमत्कारिक भाषिक गंड मराठी लोकांच्या मध्ये डेव्हलप होत गेला. त्यातच वारकरी संप्रदायाने मागच्या शैव परंपरा पूर्णपणे तोडल्या म्हणजे प्राचीन काळाचे मौखिक हातात नाही वाचन संस्कृती हातात नाही थेट मुद्रित आणि मग दृकश्राव्य डीजी! या सगळ्याचा एक दुष्परिणाम असा झाला की मराठीत कसलीही स्थायी संस्कृतीच नाही. फक्त फुगे आहेत . आणि ते उडत राहतात आणि ज्याचा उंच उडतो त्याला तात्कालीक यशाचे श्रेय मिळते आणि नंतर तो फुगा फुटतो. या सगळ्यांमध्ये वाचन संस्कृती पूर्णपणे फाफलत जाते . जे लोक वाचन संस्कृतीचा प्रचंड प्रचार करत राहतात त्याविषयी मुंडके देतात हुंदके देतात ते सुद्धा वाचले जात नाहीत त्यामुळे हे हुंदके सुद्धा अरण्यरुदन ठरते.

हा लेख सुद्धा एक अर्थाने अरण्यरूदन आहे. 

जंगल मे कौन रोया 

जो अकेला बचा था वो रोया 

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे