इंग्लंड जर्मनीमधील धार्मिक राष्ट्रवाद , भारतातले क्षत्रिय आणि हिंदुत्वाचा मूळ उगम श्रीधर तिळवे नाईक 

अलीकडेच इंग्लंडचा राजा जो तिथल्या प्रोटेस्टंट इंग्लंड धार्मिक चर्चचा प्रमुखही आहे आणि सध्याचे व्हॅटिकन सिटी मधील कॅथोलिक धर्मप्रमुख पोप यांची गळा मिठी झाल्यामुळे अचानक पणे कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट यांच्यातल्या संबंधावर नव्याने चर्चा युरोपमध्ये सुरू झालेली आहे ही चर्चा होण्याचे कारण अर्थातच कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट हे दोन्ही ख्रिश्चन धर्म आता पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत का आणि तोडगा काढला जाणार असेल तर त्याचे स्वरूप काय असणार या अंगाने आहे. इस्लामच्या वाढत्या धोक्यामुळे हे घडले आहे का हा दुसरा प्रश्न आहे याचे कारण कळत नकळत आता सर्व ख्रिश्चन लोकांनी पुन्हा एकदा इस्लाम विरोधात उभे ठाकले पाहिजे अशी भावना संपूर्ण ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये उभी राहिली आहे. आपल्याकडे आपण आत्ताचे शंकराचार्य ज्यांचा प्रत्यक्ष शैव धर्माशी काडीचाही संबंध नाही लिंगायत धर्माशी, शीखधर्माशी , सत्यशोधक समाजाशी किंवा रामकृष्ण मिशनशी तोडगा काढायला एकत्र बसलेत असे इमॅजिन सुद्धा करू शकत नाही इतके आपले युरेशियन धर्मप्रमुख धार्मिक दृष्ट्या कर्मठ आहेत आणि काही मूर्ख लोकांना याचा अभिमान ही वाटतो . याबाबतीत हिंदुत्ववादाची सतत होणारी उत्क्रांती एवढाच काय तो दिलासा आपल्याला मिळत असतो अन्यथा आपले धार्मिक युरेशन नेते नेमके काय बदल करणार आहेत काय सामावून घेणार आहेत याचा कसलाही अंदाज प्रत्यक्ष व्यावहारिक पातळीवर येतच नाही जसा तो व्हॅटिकन सिटीच्या धोरणा मधून स्पष्टपणे करतो . कळत नकळत हिंदुत्व वाद हा व्हॅटिकन सिटी सारखा बनावा याहून दुर्दैव ते काय ? एका गोष्टीकडे तर यामध्ये साफच दुर्लक्ष झालेले दिसते . शंभर वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सेलिब्रेट केली जात आहेत अशा प्रकारे सावरकरांचा हिंदुत्ववाद सेलिब्रेट केला गेला नाही हे लक्षात घेण्याजोगे आहे वास्तविक हिंदुत्व हे पुस्तक 1923 ला आलेले आहे त्यावेळी या पुस्तकाचे शंभर वर्षे साजरे करता आले असते पण ते झाले नाही म्हणजेच हिंदुत्ववादी संस्था महत्त्वाची आहे हिंदुत्व नाही असा हा मेसेज आहे.

या सगळ्या घटनांच्या मुळाशी गेलो तर त्याचा भारतावर असलेला परिणाम प्रचंड आहे म्हणूनच तर त्याची चर्चा करावी लागते याचे कारण जर्मन तत्वज्ञानाचा सावरकरांच्यावर झालेला विलक्षण परिणाम. सावरकर यांनी बिस्मार्क आणि गॅरेबल्डी वर लिखाण केले हा योगायोग नाहीये . यावर त्यांचे स्वतंत्र पुस्तक आहे ते सावरकर त्यांचे पूर्व संस्कृतीकार पूर्वज सांस्कृतिकार नेमके कुठे शोधत आहेत ते दाखवते व आपणाला हे पूर्वजत्व स्पष्ट कळते विशेषत: बिस्मार्कचा प्रभाव प्रचंड आहे आणि हा जर्मन प्रभाव आहे. खुद्द बिस्मार्क वर हेगेलचा प्रभाव प्रचंड आहे त्यामुळे साहजिकच सावरकर कितीही म्हणत असले तरी प्रत्यक्ष त्यांनी हेगेल वाचला असावा जर्मन राष्ट्रवादामध्ये या प्रोटेस्टंट राष्ट्रवादाचा वाटा प्रचंड आहे आमचा धर्म हा कॅथोलिक नाही याचा एक वेगळाच फील एहसास हा आपणाला जर्मन तत्त्वज्ञानात विशेषतः राष्ट्रवादी तत्त्वज्ञानात आढळतो हेगेल शेवटी शेवटी तर ईश्वर आणि स्टेट यांच्यातलां फरकच नाहीसा करतो सावरकरांना हिंदुत्ववाद मांडताना हेगेल यांच्यासारखेच काही अभिप्रेत आहे आणि पुढे हाच कित्ता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गिरवलेला आहे तिथे संघ महत्त्वाचा आहे व्यक्ति महत्त्वाची नाही आणि हेगेलच्या राष्ट्र राज्यवादी तत्त्वज्ञानासारखे आहे त्याला धरून आहे मात्र हेगेल हा विज्ञानाचा आग्रह धरतो आणि तत्त्वज्ञानाचाही आग्रह धरतो सावरकर नेमके हेच करतात जर्मन राष्ट्रवाद कळत नकळत ज्यू धर्माला शत्रू स्थानी ठेवतो आणि नेमके हेच सावरकर मुस्लिम धर्माला शत्रुस्थानी ठेवून करतात हीच गोष्ट आपणाला इंग्लंडच्या इतिहासामध्ये हेनरी राजे लोकांनी सोळाव्या शतकात केलेली दिसते त्यामुळेच इंग्लंडचा राजा आणि कॅथोलिक चर्च यांच्यात शत्रुत्व निर्माण झाले आणि परिणामी इंग्लंडने स्वतःचा धर्म पारंपारिक कॅथोलिक ख्रिश्चन धर्मापासून स्वतंत्र केला आणि स्वतःचे स्वतंत्र चर्च उभे केले त्याच्यावर मी इतरत्र अत्यंत दीर्घ लिहिलेले आहे. आपल्याकडे अशाच प्रकारचे बंड करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केला पण त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही याचे कारण ब्राह्मणेतरांना स्वतःचे स्वतंत्र धर्मपीठ उभे करणे मानवले नाही त्यासाठी जो अभ्यास करावा लागतो तो करण्याची कधीही या ब्राह्मणेतरांनी तयारी दाखवली नाही परिणामी समांतर शंकराचार्य उभा करण्याचे हे बंड मुठभर झाले आणि शेवटी वेदोक्त प्रकरणानंतर सुद्धा हळूहळू शाहू महाराजांनी आणि सयाजीराव गायकवाड महाराजांनी टिळकांशी पुन्हा एकदा नीट संबंध निर्माण केले. माझ्या मते या काळात झालेली दुसरी चूक हीच होती की शाहू महाराज यांनी लिंगायत धर्मातला माणूस उभा करायला हवा होता कारण त्यांच्याकडे अशा प्रकारचे स्वतंत्र मत आणि मठ स्थापन करण्याचा आणि त्यांचा विस्तार करण्याचा अनुभव होता पण महाराजांनी स्वतःच्याच शैव धर्माकडे या संदर्भात पाठ फिरवली आणि आर्य समाजाच्या प्रभावाखाली येऊन चळवळ उभी केली ती पसरलीच नाही कारण तिच्याशी मुळात कनेक्शन जोडणे कोल्हापूर संस्थानातल्या अंबाबाईला पुजणाऱ्या बहुजन शैव समाजाला शक्यच नव्हते इंग्लंडमध्ये मात्र राजा अत्यंत ठाम होता आणि त्याने तिथल्या बहुजन समाजाशी आपल्या चर्च ऑफ इंग्लंडचे नाते चांगले जुळवले आणि त्याचा फायदा इंग्लंडला खूप झाला किंबहुना इंग्लंडच्या पुरोगामी वादामध्ये या राजाचा वाटा फार मोठा आहे. त्याने अत्यंत क्रूरपणे आपल्या धर्मविरोधकांना कापले जाळले फाशी दिले हे वाईट झाले. पण कदाचित त्याचमुळे त्याचे बंड यशस्वी झाले. आपल्याकडे अशी हिंसा ब्राह्मण धर्माविरोधात कधी होत नाही उलट ब्राह्मणच राजे लोकांना आपल्या बाजूला करून घेतात आणि अशी हिंसा घडवतात बसवेश्वर यांच्या सर्व अनुयायांची झालेली किंवा घडवून आणलेली हत्या हे याचे उत्तम उदाहरण आहे आपण असे काही करत नाही असा जो सोवळा आव ब्राह्मणांच्याकडून आणला जातो त्यात काही तथ्य नाही उलट क्षत्रिय लोकांचा पद्धतशीरपणे वापर करून त्यांच्याकडून सर्व धार्मिक बंडे चिरडायची अशी ब्राम्हण्याची पॉलिसी आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या कायस्थ क्षत्रिय प्रमुखाचा या अंगाने भाजपने केलेला वापर हे याचे सर्वात अलीकडचे उदाहरण आहे. स्वतःला क्षत्रिय समजणाऱ्या शिंदे आणि पवार यांना व्यवस्थितपणे ठाकरे यांच्याविरुद्ध वापरले गेले आहे आणि हेच ब्राम्हण्याचे धोरण होते आणि आहे .(बिहार यूपीमध्ये तर अनेक कायस्थ स्वतःला ब्राह्मण समजतात)

सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ब्राह्मण इतिहासात आपल्या पूर्वजांनी केलेल्या पापांना सुद्धा नंतर नाकारायला लागतात केलेच नाही असे म्हणतात पुरावे कुठे आहेत असे विचारतात वास्तविक धडधडीत पुरावे असतात पण आपण बोंबा ठोकल्या की ते सत्य होत जाते अशी काहीतरी आता गैरसमज ब्राह्मण लोकांचा झालेला आहे यामुळे आपण आपली उरलीसुरली विश्वासार्हता गमावत चाललो आहोत हे सुद्धा या ब्राह्मण लोकांना कळत नाही . सर्वात उत्तम उपाय हा माझ्या पूर्वजांनी केलेल्या ह्या चुका आहेत पण या चुका मी करणार नाही असे सांगणे हा आहे परंतु युरोप कडून आणि जपानकडून ही गोष्ट घ्यायला मात्र ब्राह्मण विसरले . साहजिकच युरोपमध्ये कॅथोलिक पोप आणि इंग्लंडचा राजा एकत्र बसू शकतात परंतु भारतात शंकराचार्य आणि सत्यशोधक समाज एकत्र बसू शकत नाही . या सगळ्याची मुळे नेमकी कशात आहेत तर याला प्रामुख्याने जबाबदार असलेला तत्त्वज्ञ म्हणजे हेगेल होय.

हेगेलने धर्माला हाफ वे हाऊस म्हटले होते म्हणजे धर्म म्हणजे रहिवासी लोकांचे उपचार करणारे केंद्र होय पण धार्मिक सत्तेला पाठिंबा देणारा राष्ट्रवाद हाच आजार आहे हे सांगायला तो विसरला प्रत्यक्षामध्ये धार्मिक राष्ट्रवाद ज्याला म्हणता येते त्याची सर्वाधिक बीजेही हेगलच्याच लिखाणात होती आणि जर्मन परंपरा ही ज्यू लोकांचा द्वेष करणाऱ्या प्रोटेस्टंट चर्चची परंपरा होती साहजिकच याचा जो परिणाम व्हायचा तो झाला आणि पुढे या सगळ्या विचारातून हिटलर निर्माण झाला आपल्याकडे हिटलर म्हणजे काहीतरी आपोआप निर्माण झालेली घटना आहे असे अनेकांना वाटते पण प्रत्यक्षात धार्मिक राष्ट्रवादाचा विचार हा प्रथम जर्मनीमध्ये इंग्लंडमध्ये सुरू झाला होता आणि त्याचे एक मोठे कारण कॅथोलिक धर्माविरोधात प्रोटिस्टंट धर्माने केलेले बंड हे होते हे प्रामुख्याने इंग्लंड आणि जर्मनी या दोन देशातच अस्तित्वात होते पुढे पुढे ते इतरत्र पसरले पण या दोन राष्ट्रांच्या चर्चेसनी आणि त्यांच्या चर्च प्रमुख असलेल्या राजांनी जेवढे स्पष्ट आणि ठाम बंड केले तेवढे इतरांनी केले नाही अर्थात पुढे फ्रान्स सामील झाला पण दबकत दबकत !

एकदा का राज्य हा धर्माचा भाग झाला की मग जे व्हायचे ते होते आणि याबाबतीतला जो मध्यम मार्ग जर्मनीने काढला तो इस्लामला आणि हिंदूंना काढता आला नाही याचे कारण दोन्ही ठिकाणी असलेले पुरोहित आहेत . आपण युरोपचा इतिहास पाहिला तर अगदी विज्ञानाच्या क्षेत्रात सुद्धा काही धर्मगुरूंनी योगदान दिलेले दिसते उदाहरणार्थ जेनेटिक्सचा पायोनियर मेंडेल धर्मगुरू होता कोपरनिकसचा सिद्धांत सुद्धा प्रथम एका धर्मगुरूंनेच मांडलेला होता आपल्याकडे हे होणे जवळजवळ अशक्यच आहे. सर्वात याहून वाईट गोष्ट म्हणजे या इस्लामिक आणि युरोइंडियन पुरोहितांना (हे त्या काळामध्ये स्वतःला आर्य म्हणवून घेत होते)युरोपियन साम्राज्यवादाने नेहमीच प्रोत्साहन दिले जेणेकरून त्यांच्या विरोधात बंड होऊ नये कारण शैव धर्म पुन्हा एकदा उभा राहण्याचा अर्थ आणखी एका युद्धाची तयारी हाच होता आणि पुढे शाक्तपंथीय नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी त्यांचा हा कयास सार्थ ठरवला खरे तर बोस यांनी गांधीजी यांच्याशी कसे जुळवून घेतले हाच मला प्रश्न पडत असतो कारण दुसरा शाक्तपंथी हा खुद्द सावरकरच होते त्यांना असे गांधी यांच्याशी जुळवून घेता आले नाही कदाचित त्यांनी गांधींचा नववैष्णववाद अधिक चांगल्या रीतीने आधीच ओळखला होता जो बोस यांना उशिरा कळला . दुसरे कारण अगदी स्पष्टच आहे ते म्हणजे सावरकर उजवे होते तर नेताजी बोस हे डावे होते त्यामुळे या लोकांचे कधीही आयुष्यात जमले नसते समाजवाद हा कळत न कळत गांधी नेहरू आणि बोस यांना एकत्र जोडणारा धागा आहे . अर्थात सावरकर पुराणे वगैरे सर्व नाकारतात अंधश्रद्धा नाकारतात याचे कारण त्यांचे हिंदुत्व हे जर्मन परंपरेप्रमाणेच सायन्सला अतोनात महत्व देणारे आहे . देश शक्तिमान व्हायचा असेल राष्ट्र शक्तीमान व्हायचे असेल तर विज्ञानाशिवाय तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही हे सावरकरांना नीट कळले होते आणि सायन्स व तंत्रज्ञान वाढायचे असेल तर जर्मनी प्रमाणेच आपणाला वैज्ञानिक संस्कृती निर्माण करावी लागेल याची जाणीव सावरकरांना जास्त प्रखरपणाने होती याबाबतीत ते आणि पंडित जवाहरलाल नेहरू एका प्लॅटफॉर्मवर दिसतात पण नेहरू यांचे आदर्श इंग्लंड होते तर सावरकर यांचा आदर्श जर्मनी ! त्यामुळे वाटा वेगळ्या होत गेल्या. सावरकर यांच्या मार्गाने गोळवलकर आणि देवरस गेले असते तर हिंदुत्ववाद फार फास्ट वेगाने वाढला असता परंतु हे लोक बावळटासारखे अत्यंत ब्राह्मणी पद्धतीने वाटचाल करत राहिले आणि संघाला सुद्धा यांनी ब्राह्मणी हिंदुत्वाचे बाहुले बनवले आता सुद्धा या लोकांना यांच्या ब्राह्मणी हिंदुत्वाला साईडलाईन करणे गरजेचे आहे हे हिंदुत्ववादी लोकांना कळत नाही उलट ते करण्याऐवजी अलीकडे काही शहाणे पुन्हा एकदा यांना घेऊन येत आहेत त्यामुळे संघाचा पराभव होऊ शकतो . सावरकरांच्या मार्गाने आता भागवत चालले आहेत आणि त्यामुळेच नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकले मला नाही वाटत की गुरुजींनी कधी ओबीसी पंतप्रधान स्वीकारला असता . भागवत हे मात्र या संदर्भात जास्त ओपन होते . आणि त्यांच्या या ओपन असण्याचा फायदा हिंदुत्ववादाला झालेला आहे यातली सर्वात विनोदी गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे भागवत यांच्याशी भांडण करण्याऐवजी आपले पुरोगामी लोक कधीच गाडल्या गेलेल्या गुरुजी आणि देवरसांशी भांडत आहेत तुम्हाला जर का आरएसएस १०० वर्षे झाली म्हणून टीका करायची असेल तर अलीकडे तुमच्या समोर उभ्या ठाकलेल्या मोदी आणि भागवत यांच्या हिंदुत्व विरोधात उभे राहिले पाहिजे लोकांना तुमच्या ऐतिहासिक अन्वेषणात काडीचाही इंटरेस्ट नाही . जर मोदी यांचा पराभव करायचा असेल तर मोदी भागवत नेमके कुठे कुठे आणि कसे कसे चुकत आहेत हे सातत्याने तुम्ही दाखवायला हवे. उदाहरणार्थ गेल्या वीस वर्षांमध्ये कोल्हापूरची जी वाट लागलेली आहे ती कोल्हापुरातल्या पुरोगामी लोकांनी सातत्याने आता मांडायला हवी असे प्रत्येक गावानुसार शहरानुसार महानगरानुसार व्हायला हवे पण पुरोगामी लोकांचा यावर फार भर नाही ते ऐतिहासिक राष्ट्रवाद उभा करणाऱ्या हिंदुत्ववादाला ऐतिहासिक पुरोगामीवाद उभा करून शह देणे योग्य समजतात त्याची आवश्यकता आहे परंतु मुख्य भर वर्तमानावर असला पाहिजे . तो होत नाहीये.

धर्मकेंद्री राष्ट्रवाद हा नेहमीच कुठल्या ना कुठल्यातरी दुसऱ्या धर्माच्या द्वेषावर उभा असतो इस्लामिक राष्ट्रवाद हा स्पष्ट आणि स्वच्छपणाने इस्लामेतर धर्मांच्या विरोधात त्यांनी निर्माण केलेल्या राष्ट्रांच्या विरोधात त्यांना गैरइस्लामिक मानत उभा ठाकतो. आता हिंदुत्ववादी लोक नेमके हेच करत आहेत आणि ते सावरकरांच्या विचाराचा एक धागा पकडत गैर भारतीय धर्मांच्या विरोधात उभे ठाकत आहेत. याचे मूळ आपण जर शोधायला गेलो तर आपणाला याचे मूळ जर्मनी मधल्या प्रोटेस्टंट धार्मिक राष्ट्रवादामध्ये मिळते हा राष्ट्रवाद ज्यू धर्माच्या व लोकांच्या विरोधात उभा राहतो. याचेही मूळ शोधायला गेलो तर आपणाला बौद्ध धर्म हा ब्राह्मण धर्माच्या विरोधात स्पष्ट आणि स्वच्छपणे उभा राहिलेला दिसतो . प्रश्न असा आहे की मग याला समाजवादाची फोडणी नेमकी मिळाली कधी? त्याचे मूळ मार्क्सवादामध्ये आहे .

जर्मनी मध्ये कार्ल मार्क्स झाला आणि त्याने हेगेलं याने निर्माण केलेले सगळे गारुड नाहीस केले त्याने हेगेलचा धर्म नाहीसा करून तिथे कम्युनिजम नावाचा एक नास्तिक धर्म उभा केला .त्याचा परिणाम धर्मासारखाच झाला आणि हा धर्म सगळीकडे पसरला मात्र त्यानेही हेगेलच्या प्रभावाखाली येऊन राष्ट्र म्हणजे ईश्वर आणि ईश्वर म्हणजे राष्ट्र अशा प्रकारचा राष्ट्रवाद स्वीकारला आणि कम्युनिझम म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्र म्हणजे कम्युनिजम असे काहीतरी आंतरराष्ट्रीय पण टोळीय समीकरण नकळतपणे मांडले आणि ते प्रथम रशियाने स्वीकारले आणि नंतर चायनाने! कम्युनिस्ट पक्षाचा प्रमुख हा नवीन मार्क्सवाद नावाच्या चर्चचा प्रमुख झाला. बाकी ज्याप्रमाणे रोमन कॅथोलिक चर्चच्या खाली संपूर्ण युरोप मधली राष्ट्रे नांदत होती तशी कम्युनिजमच्याखाली कम्युनिस्ट देश नांदायला लागले. सर्वात प्रथम मार्क्सवादाची व्हॅटिकन सिटी म्हणून मास्को सिटी चा उदय झाला आणि तिथूनच मग कम्युनिझम नावाचा नवीन धर्म स्पॉन्सर होऊ लागला पुढे ज्याप्रमाणे इंग्लंड आणि जर्मनी यांनी बंड केले त्याचप्रमाणे माओ त्से तुंगने आपल्या नव्या व्हॅटिकन सिटी विरोधात म्हणजेच मास्को सिटी विरोधात बंड करून चीनमध्ये स्वतःचे स्वतंत्र कम्युनिस्ट चर्च उभे केले . 

हिटलर याने नेमके हेच केले त्याने समाजवाद आणि हेगेलियन राज्य या दोन संकल्पनांची सांगड घालत ज्यू नावाचा धर्म दोन पातळींच्यावर शत्रू धर्म बनवला पहिली पातळी ज्या भांडवलशाहीला समाजवादाच्या सहाय्याने त्याला विरोध करायचा होता ती भांडवलशाही जर्मनीमध्ये प्रामुख्याने ज्यू लोकांनी उभी केली होती म्हणजेच ज्यू लोकांना जो विरोध होता तो एका अर्थाने समाजवादी विरोध होता आणि दुसऱ्या अर्थाने ज्यू लोकांना असलेला विरोध हा पारंपारिक धर्मविरोध होता आणि याचे पारंपारिक कारण म्हणजे याच लोकांनी जीजस ख्रिस्त यांना क्रूसावर चढवले होते . अगदी जो सेफ स्टालिन सुद्धा कळत नकळत हिटलरच्या या ज्यूविरोधी असलेल्या समाजवादामध्ये काही काळ का होईना पण अडकला होता त्याने सुद्धा ज्यू लोकांच्या हत्या केल्या किंबहुना रशियामध्ये ज्यू लोकांची झालेली हत्याकांडे ही जर्मनीपेक्षा जास्त होती आणि सर्वाधिक ज्यू लोक रशियामध्ये मारले गेलेले आहेत. कम्युनिस्ट लोक या सत्यावर नेहमी पांघरून घालत असतात आणि हिटलरचा विरोध अंडरलाईन करत असतात पण सुरुवातीला या दोन लोकांची युती होती नंतर दोघांच्यात विरोध निर्माण झाला हीच वस्तुस्थिती आहे. जिथे जोसेफ स्टॅलिन सारखा अत्यंत धूर्त माणूस हिटलरच्या सुरुवातीच्या काळामध्ये हिटलर बाबतीत चकला तिथे इतर जग चकले यात आश्चर्य ते काय?

म्हणजेच धार्मिक राष्ट्रवादाचा वेगळा प्रभाव म्हणून आपणाला कम्युनिझमचा विचार करावा लागतो . कारण शेवटी मार्क्स हा हेगेलचा शिष्य होता .

सावरकर हे या मार्गाने गेले नाहीत याचे कारण त्यांना कळत नकळत मार्क्सवादाचा इहवाद आपले लोक स्वीकारणार नाहीत याची खात्री होती. इथल्या राष्ट्रवादासाठी आवश्यक असलेले सातत्य हे फक्त धर्मामध्ये आहे अशी त्यांची त्यांच्यासाठी परफेक्ट धारणा होती भारतामध्ये धर्माचे सातत्य जास्त आहे त्यामुळे धर्माच्याच आधारे आपण राष्ट्र उभे केले पाहिजे असे काहीतरी जर्मनिक मत त्यांचे तयार झाले. जर इंग्लंड आणि जर्मन स्वतःची स्वतंत्र धार्मिक संरचना उभे करू शकत असतील तर भारतीय लोक ते का करू शकत नाहीत असा हा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तरच सावरकर यांनी हिंदुत्ववाद मांडून दिलेले आहे प्रश्न असा आहे की आता जर का युरोपमधील इंग्लंड आणि जर्मन मधील राजे लोकच पोप यांच्याबरोबर बसणार असतील तर हिंदुत्ववादी काय करणार आहेत कारण अनुकरण करायचे ठरवले तर मग धरून झाला की यापुढे हिंदुत्ववादी लोक आणि इस्लाम वादी लोक एकत्र बसतील . सध्याची तालिबानशी सुरू झालेली शत्रूचा शत्रु तो आपला मित्र या धोरणानुसार समर्थीत केली गेलेली युती ही याची सुरुवात असू शकते. आणि म्हणूनच हिला या घटनेला नव्या प्रकाशात पाहणे खूप आवश्यक आहे ब्राह्मण अनेकदा आंतरराष्ट्रीय राजकारण डोक्यात ठेवून हालचाली करत असतात दुर्दैवाने आपल्या पुरोगामी लोकांना हे लक्षात येत नाही 

युरोपमधील पुरोगामी वादाने जर का धर्म आणि ईश्वर नाकारला असता तर कदाचित बरीचशी समीकरणे बदलली असती परंतु दुर्दैवाने मार्क्सवादाचा आणि काही प्रमाणात समाजवादी लोकांचा अपवाद वगळता इतर पुरोगामीवादी लोकांना हे जमलेले दिसत नाही . भारतामध्ये या लोकांनी कधीही कठोर भूमिका घेतली नाही याचे कारण भारतामधले डावे हे नेहमीच ब्राह्मण्यवादाच्या प्रभावाखाली होते धर्माशी थेट झुंज त्यांना नकोच होती अपवाद फक्त भगतसिंगांचा असेल त्यातच इस्लामची तडजोड करण्याची जी घाणेरडी चूक या लोकांनी केली जी मुळातच मानवेंद्रनाथ राय यांच्या जागतिक युरोपच्या ऐतिहासिक इतिहासाच्या आकलनाच्या मांडणीतून जन्मली होती (या संदर्भात त्यांनी लिहिलेला जगाचा प्रबोधनाचा इतिहास पाहावा)ती यांना प्रचंड महागात पडली असे दिसते त्यामुळेच भारतामध्ये ज्याला मार्क्सवादी राष्ट्रवाद म्हणता येईल असा राष्ट्रवाद उभा राहिलाच नाही अर्थात कळत न कळत याला जबाबदार पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांचा समाजवाद यांचा प्रभावही होता. ज्याप्रमाणे इंग्लंडमधल्या लोकशाही समाजवादाने इंग्लंडमध्ये मार्क्सने भविष्यवाणी केल्याप्रमाणे होऊ घातलेली कम्युनिस्ट क्रांती अडवली त्याचप्रमाणे भारतातल्या समाजवादाने आणि काँग्रेस वादाने कम्युनिझमची वाट रोखून धरली असे म्हणायला हरकत नाही . हे चांगले झाले की वाईट हे ठरवणे फार अवघड आहे कारण मुळातच १९४७ नंतर चीन प्रमाणेच भारतामध्ये नास्तिक तत्त्वज्ञानाची आणि राजवटीची गरज प्रचंड होती जी धर्म नाकारू शकली असती . चीनमध्ये जसा धर्माला ठाम नकार मिळाला तसा ठाम नकार भारतामध्ये मिळणे आवश्यक होते पण हे झाले नाही आणि त्याचे प्रचंड दुष्परिणाम भारतावर झालेले दिसतात. बाकी जाऊ दे, केरळमध्ये ज्या पद्धतीने कम्युनिझमने ख्रिश्चन लोकांशी तडजोड केली ती वाईट होती. कम्युनिस्टांनी सातत्याने भारतातल्या इस्लाम आणि ख्रिश्चन प्रवाहांशी तळजोड केली त्यामुळे हिंदुत्ववादाला प्रोत्साहनच मिळाले . हीच गोष्ट बंगालमध्ये दिसते तिथे कम्युनिझमने आपल्या कार्यकाळात पुढे काँग्रेसने काँग्रेसच्या कार्यकाळात सरळ सरळ अँटी हिंदु भूमिका घेतली आहे. माझा अंदाज चुकला नाही तर ममता बॅनर्जी यांना ही भूमिका येत्या निवडणुकीत चांगलीच महागात पडेल . किंबहुना त्यांना त्याचा अंदाज आलाय म्हणून दुर्गा मंडपांना यावेळी भरघोस मदत दीदीने केलेली आहे . आणि या सगळ्या गोष्टींना शाक्त धर्माचे स्वरूप सायलेंट पणे दिलेले आहे .हे धर्मकारण आहे. आणि त्याचे स्वरूप जर्मन आणि इंग्लंडच्या राजांनी प्रोटेस्टंट चर्च उभे करायला जी आर्थिक आणि लष्करी मदत केली त्याच स्वरूपाचे आहे. किंबहुना भारतामधला सगळा धार्मिक सुधारणा कार्यक्रम हा इंग्लंड मधल्या राजवटींनी केलेल्या धार्मिक सुधारणा कार्यक्रमासारखा आहे . कळत नकळत शाहू महाराजांनी सयाजीराव गायकवाड महाराजांनी याबाबतीत इंग्लंडच्या राजे लोकांचे अनुकरण केलेले आहे. दुर्दैवाने ह्या सुधारणावादी राज्यकर्त्यांच्या लिस्टमध्ये जास्तीत जास्त पाच टक्के राज्यकर्ते येतात बाकी इतर मात्र इतके उदासीन आणि आत्ममग्न होते की बोलता सोय नाही. यांच्या रासलीला आणि एय्याशी या गोष्टी बघायच्या की यांचा क्षत्रिय वर्ण बघायचा असाच प्रश्न पडतो . लोकांनी गांधींच्या आंदोलनाला पाठिंबा दिला त्यामागे अशा नादान राज्यकर्त्यांच्या विषयी असलेला असंतोष सुद्धा होता. क्षत्रियांच्या विरोधात बोलायचे नाही असे आपल्या इतिहासकारांचे धोरण असल्यामुळे या संदर्भात बोलले जात नाही इतकेच. उलट शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्यासारखे जे अभूतपूर्व अफलातून राजे होऊन गेले त्यांच्या कर्तृत्वाच्या ढालीमागे या नादान क्षत्रिय लोकांचे अकर्तृत्व आणि संधीसाधूपण लपवले जाते साहजिकच त्यामुळे एक फायदा झाला तो म्हणजे भारतीय लोकशाहीचा मार्ग मोकळा झाला लोक राजेशाहीच्या मागे उभे राहायला तयार झाले नाहीत याचे कारण या संस्थानिकांचे खरे स्वरूप लोकांना कळून चुकले होते भारतात जी लोकशाही रुजलेली आहे त्याला कारण भारतीय राजेशाहीचे संस्थानिक शाहीचे इंग्रजांच्या मुळे स्पष्ट आणि स्वच्छ झालेले नेमके स्वरूप होय. इंग्रजांच्या विरोधात बंड करण्याऐवजी हे लोक इंग्रजांच्या कडून हप्ते घेत बसले यातच सर्व काही स्पष्ट होते. वास्तविक अगदी वर्णव्यवस्था स्वीकारली तरी आपल्या जनतेच्या आरक्षणाची जबाबदारी यांच्यावर होती ती त्यांनी पार पाडली नाही फक्त क्षत्रिय असण्याचा अभिमान मात्र बाळगला हा अभिमान हे लोक कशासाठी बाळगत होते हा एक प्रश्नच आहे कारण लढण्याची ताकद तर एकातपण नव्हती आपले वर्णकर्तव्य विसरून त्यांनी आपली राज्ये आपल्या जनतेसकट इंग्लंडला घेऊ दिली . कुठल्यातरी दूर असलेल्या इंग्लंडचे मांडलिकत्व पत्करले . आणि या असल्या नादान लोकांच्या कडून सावरकर अपेक्षा करत होते यावरूनच सावरकर खरोखर किती प्रॅक्टिकल होते हा प्रश्न पडतो. 

संघाचे एकचालक धोरण हे सरळ सरळ राजेशाही वादी आहे आणि त्याला सुद्धा जबाबदार कळत नकळत जर्मन आणि ब्रिटिश प्रोटेस्टंट धार्मिक राष्ट्रवादाचा प्रभाव आहे अगदी इंग्लंडमध्ये सुद्धा आजही राजाचा सन्मान धर्म प्रमुख म्हणून ठेवला जातो. किंबहुना ज्या भेटीचा उल्लेख मी केला ती भेट यामुळेच पॉसिबल झालेली आहे.

हे सर्व लिहिण्याचे कारण असे की हिंदुत्वाची जी काही चर्चा सुरू आहे ती आता जर्मनीच्या इतिहासासंदर्भात आणि तत्त्वज्ञानाच्या संदर्भात तुलना करत राहायला हवी. व्हायला हवी सावरकर सुद्धा काही आकाशातून पडलेले नव्हते ते सुद्धा त्यांनी केलेल्या वाचन मनन चिंतनामधूनच उभे राहिले होते आणि त्यांचे हे वाचन,मनन चिंतन स्पष्ट आणि स्वच्छपणाने युरोपियन लोकांशी जोडले गेलेले होते त्याचे आकलन करताना जर्मनीचा धार्मिक राजकीय इतिहास जर्मनीचा सांस्कृतिक आर्थिक इतिहास आणि हेगेल यांचे आकलन आपल्याला अधिक प्रकाश टाकणारे ठरू शकते 

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे