आशुतोष दिवाण यांनी आपल्या वॉल वर एक पोस्ट टाकली आहे तिला मी दिलेले उत्तर श्रीधर तिळवे नाईक
आशुतोष दिवाण यांची मूळ पोस्ट
सरकारी नोकरीत यशस्वी पणे टिकण्यासाठी या पर्यावरणात जी आर्थिक आणि मानसिक लाचखोरी चालते तिच्यात किमान वेगळे (ॲाड)दिसणार नाही इतपत तरी सहभाग घ्यावाच लागतो.ही त्या त्या पातळीवरील किमान आणि अनिवार्य तडजोड आहे असे समजायला हवे आणि त्या व्यक्तीला दोष देता कामा नये.
एक वेळ अशी येते की राजकीय हितसंबंध किंवा संबंधित पैश्यांची राशी इतकी मोठी होते की मग तिथे किमान आणि अनिवार्य तडजोड पुरत नाही.अशा वेळी अशा सरकारी अधिकाऱ्यांना व्यवस्थेतून बाहेर पडण्याचे सन्माननीय मार्ग उपलब्ध असले पाहिजेत.
नाहीतर मग सर्वांगाने व्यवस्थेचा भाग होणे किंवा आता या मुलीने केली तशी आत्महत्या करणे भाग पडते.
एकाच वेळी व्यवस्था आणि नैतिकता हे दोन भार सांभाळणे बय्राच सामान्य व्यक्तींना शक्य नसते.
माझी कॉमेंट
शैक्षणिक भ्रष्टाचारापासून मुक्त राहण्यासाठी म्हणून बाहेरून काम करणाऱ्या लोकांना मी पाहिलेले आहे. पण होते काय मूळ शिक्षण व्यवस्थेतील करप्शन दूर असते का ? काही ठिकाणी मुलांना सर्रास कॉपी करू दिले जाते कारण कोणालाही नापास करायचे नाही असे धोरण असते. दांडा मारणारे तर अनेक स्टुडन्ट असतात पण ते केवळ आपल्या जातीचे आपल्या वर्णाचे म्हणून त्यांची हजेरी पद्धतशीर लावली जाते किंवा हजेरीचा नियम बिनधास्त मोडला जातो . बाहेर राहणारा येणारा या व्यवस्थेत काम करणारा माणूस खरोखर काय परिणाम घडवतो ? उलट त्याच व्यवस्थेतले लोक एकत्र येऊन जगणे हराम करून टाकतात . एक तर तुम्ही आमच्यासारखे बना किंवा मग सर्व काही सोसा असाच पर्याय अनेक ठिकाणी दिसतो . मोक्ष मिळवू इच्छिणाऱ्या माणसाने व्यवस्थेच्या बाहेर असले पाहिजे हा नियम त्यातूनच आलेला आहे कारण एकदा तुम्ही व्यवस्थेमध्ये घुसला कि ती व्यवस्था आपोआप तुमच्यात घुसते आणि राबवायला लागते . अशावेळी हातावरचे पोट सुद्धा भरणे कठीण होते . यावर उपाय एकच असतो वेळप्रसंगी उपाशी राहणे पण न झुकणे . मला याबाबतीत नेहमी ऐकवले जाते की तू हे करू शकतो परंतु आमची उपाशी राहण्याची तयारी नाही आमच्यात ती ताकद नाही. शिवाय तुमचे असणे न झेपणारे अनेक लोक मग तुमचे पाय ओढायला बसलेले असतात . त्यांना तुम्ही सतत धोका वाटत असता. हा माणूस आपल्याला उघडे पाडेल अशी भीती त्यांच्या ठायी असते. हे सर्व अत्यंत करुणेने हाताळावे लागते कारण माणसे स्वतःच्या आसक्ती मध्ये बुडलेली असतात . ही आसक्ती माणसाच्या ठाई इतकी जन्मजात आहे की तुम्ही तिचे काहीच करू शकत नाही आणि ती सर्व म्हणजे सर्व वर्ण जाती धर्मामध्ये असते . यावरचा मोक्ष हा उपाय 99.99999% लोकांना झेपत नाही . अशावेळी जमेल तितके करत राहणे इतकेच आपल्या हातात असते. प्रत्येक मुक्त माणसाला व्यक्तीला हे व्यवस्थित माहित असते की अंतिमतः ती व्यक्ती फेल होणार आहे. विशेषतः आजच्या युगात तर हे स्पष्ट माहीत असतं. अपेक्षा फक्त इतकीच करावी की व्यक्ती संपूर्ण सुधारली नाही तरी निदान आसक्तीबाबत ती थोडी तरी नियंत्रण मिळवेल मात्र आग्रह 100% नियंत्रणाचा धरावा लागतो तेव्हा कुठे दहा टक्के नियंत्रण येते.
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment