मोक्ष बॉलीवूड
शिव्या घालणारे मेसेज येत आहेत भाग एक श्रीधर तिळवे नाईक
१
शिव्या घालणारे मेसेज येत आहेत
एक जागा आहे टच स्क्रीन आणि हात यांच्या दरम्यान
जिच्या जवळ म्यान नाही फक्त तलवार
एक मोकळीक त्या स्क्रीनच्या भोवताली
सवाली
निकाली
डिजिटल हत्तींच्या एवढी डिजिटल डायनासोर इतकी
काहीही उडवू शकते इतकी
काहीही घडवू शकते इतकी
हात आणि टच स्क्रीन
एक फ्लॅट आहे पुण्यात
जो सपाट करतो आत्ताचे जग
आणि मगातून पाणी पितो
एक हात एक टच स्क्रीन आणि एक फ्लॅट
एक जिमची साखळी आहे
जिने मांस घडवले आहे
एक जीन्स मोकळी आहे
जिने हाडे घडवली आहेत
जिने पाढे वाचले आहेत
इंजिनिअरिंगच्या सेल्स गरम
प्रोग्रामिंगची सेल हॉट
ताठ खोटेपणा
खोटा ताठपणा
केस अर्धे कुरकुळीत
हंगाम गणित गाळीत
एक जागा आहे मुंबईत
जागर करणारी
जागरण करणारी
जागी असलेली
एक स्पेस तुझी आहे
एक स्पेस माझी आहे
आणि दरम्यान
मेसेज_- एक्सप्रेस आहे
एक जागा उत्खनन करतीये
माझ्या शरीराचे तुझ्या बॉडीचे
माझ्या शर्टचे तुझ्या साडीचे
तू माझी मुलगी आहेस
पण सलगी संपत आहे
दरम्यान पैसा
अडखळून पडलेला
आणि आता कदाचित निखळून पडत चाललेला
एक जागा आहे
जी प्रत्येक नेटवर्क गिळून आहे
प्रत्येक ॲप पिळून आहे
तुझ्या माझ्या हातांना ढवळून आहे
सर्टन आहे
पॅटर्न आहे
सवाल्टरन आहे
जो तुझा शोषक आहे
तो मी शोषित आहे
ज्याचा कॉमन शोषक आहे
ज्याने दिलेला शॉक आहे
ज्याचा धाक आहे
कारण त्याच्याजवळ करोडोचा बाक आहे
एक जागा जी तरंगती
एक जागा जी मंतरलेली
जागा जी तुझ्या माझ्या मधून जात
तुझ्या माझ्या मध्ये जागा करत
काही समतल आहे
काही विषमतल आहे
काही बस मल आहे
काही फक्त मलमल आहे
पैसे जातील या भयाची गलबल आहे
आणि आतून येणारी कलकल आहे
श्वासातून प्राण येतोय
प्राणातून श्वास जातोय
कोणी हवा घेतोय
कोणी हवा देतोय
ऑक्सीजन उकळला जातोय
ऑक्सिजन उकडला जातोय
ऑक्सीजनचे मोदक बनतायेत
ऑक्सीजन गणपती बनतोय
आणि आता कदाचित ऑक्सिजन विसर्जन होणार आहे
२
आयुष्य खूप कठीण असतं
जेव्हा बँका बुडत असतात
आयुष्य खूप कठीण असतं
जेव्हा अमेरिकेतून तुम्ही हाकलले जाता
एक जागा अमेरिकेतली
भारतामधल्या जागेत शिफ्ट होत
लिफ्ट होण्याऐवजी
खाली कोसळत
एक जागा कोसळ
एक जागा सळसळ
कोसळत चालले आकाश
आणि आपणाला वाटते सावकाश
पण वेगाने निघून गेली नशीबाची गाडी
आणि आपण बसलोय भारताच्या पोटात
जसा बसावा एखादा मजूर पिऊन ताडी
३
फ्लॉवर नही फायर हू
प्रत्यक्षमें शायद कायर हुं
थोडे पैसे गये तो हिलता हु
थोडे पैसे मिले तो डुलता हू
आम्ही मध्यमवर्ग
आमच्यासाठी छोटी रक्कम मोठी
तुला काहीच पडलेले नाही
आमची होतीये बोटी बोटी
फक्त ऐकायचे बॉलीवूडचे मसाले
आणि मसालेभात खायचा पडद्यावरचा
इतकाच तर संबंध
पण मी तो प्रत्यक्षात आणला
आणि एक संपूर्ण घराचा कोपरा ताणला
चित्रपट रिलीज होतात
चित्रपटांच्यात बॉम्बस्फोट असतात
चित्रपट रिलीज होतात
एक सिरीयल किलरच्या हातून 10 मर्डर होतात
चित्रपट रिलीज होतात
आणि काश्मीरचे पंडित पडद्यावर पळून जाताना दाखवले जातात
समाजाला पवित्र होण्याची मस्ती जडलेली
आणि ज्यांना पुढे जायचे आहे त्यांची वस्ती अडलेली
पाठिंब्याचा अभाव
हाच एक भाव
त्यात पुन्हा नैतिकता हाच स्वतःचा स्वभाव
अशा माणसाने या आसमंतात फक्त आत्महत्या करावी का ?
४
शिव्या घालणारे मेसेज येत आहेत
५
तू माझी कम्युनिटी आहेस
आणि मोक्ष माझी आयडेंटिटी आहे
यांच्या दरम्यान काय आहे
फक्त पैसा ?
६
प्रश्न फक्त हा अस्तित्वाचा नाही
प्रश्न सत्वाचा आहे
मी आता अस्तित्वामधून बाहेर पडावे का
शिव्या घालणारे मेसेज येत आहेत
७
मला वाटलं होतं खूप घनदाट आहे
मला वाटलं होतं खूप अफाट आहे
पण आता त्वचेवर तर फक्त सर्व चव्हाट आहे
धमक्या देणाऱ्या माणसाला
धमकी म्हणू नये काय ?
मला त्याच्या विषयी फक्त करुणा आहे
शेवटी कायद्यात न बसणाऱ्या गोष्टी
धमकीपाशीच जातात
८
असं नाही की मला गरज समजत नाही
पण कर्मफळ पाठलाग करतं
प्रत्येक उडणाऱ्या विमानामागे किमान 10 पक्षी मेलेले असतात
९
ते आणि आम्ही
एवढी उरलेली विभागणी
तू ते आहेस काय
प्रेमाला उपमा नाही
शिरा आहे
आपण साजरे केलेले कित्येक गोड क्षण
पुरणपोळी सारखे माझ्या रक्तात स्तब्ध आहेत
१०
माझ्या न दिसणाऱ्या शेपटीत दहा डायनोसॉर लपून आहेत
मी कित्येक युगे आग खाऊन पचवलेली आहेत
पण हा हिमखंड तुटता तुटत नाहीये
कारण तो फिल्मी आहे
कदाचित त्याचा पाया ढिसाळ होता म्हणूनच झाले असेल
११
मी देवाचे फळ नाही
मी देवाचे फुल आहे
याचा अर्थ इतकाच
मी खाण्यास निरुपयोगी आहे
१२
मोक्षात काहीच सार्थक नसते काहीच निरर्थक
पण मोक्षामुळे पैसा मिळत नाही
मी घातलेला पैसा
उगवून येत नाही
कदाचित पैशाचे झाड असत नाही
मग पैशाचा माणूस असतो का
की पैसा फक्त भाषेसारखा आहे
जो मोक्षाला निरक्षर करतो ?
१३
तुला वाटते मी काहीही करावे आणि पैसे कमवावे
मी कुठे आहे याचा अंदाज तुला येत नाही
मी तुला दोष देत नाही
शेवटी काठावर उभे असलेल्या मडक्याला
समुद्रावर खापर फोडताना मी अनेकदा पाहिले आहे
१४
हे प्रचंड आहे
पण तुझ्या पुरती मुंगी
हीच वस्तुस्थिती आहे
त्या मुंगीतली पेशी
त्यामुळे सतत ढवळली जाते
म्हणून तुला राग आहे
आणि म्हणूनच येणाऱ्या शिव्यांच्यात आग आहे
पण मुंगीचे स्वातंत्र्य मला काढून घेण्याचे स्वातंत्र्य नाही
तुला हे कळत नाही कळणार नाही
कारण तुझा खिसा जळतो आहे
आणि म्हणच आहे
ज्याचे जळते त्याला कळते
मग मुंगीचे जळण असेल तर
मी तुझा राग समजू शकतो
पण झालेल्या राखेचे मी काहीच करू शकत नाही
तुझ्यासाठी मी भस्मासुर व्हावे
याहून ट्रॅजेडी ती कोणती ?
१५
तू संसारात अडकून पडली आहेस
मोक्षाविषयी तुला काही कळत नाही
असले युक्तिवाद मी करत नाही
संसारात पडलेली माणसे सार विसरतात
मी त्या विरोधात वाद घालत नाही
बदनशिबी रिपेअर करता येत नाही
किंवा दैव दुरुस्त करता येत नाही
मी टाळायचा खूप प्रयत्न केला
पण घोटाळा टिकटिक करत आत आला
माझ्यासाठी जग वेफर्स सारखे आहे
बटाट्यासारखे फॅट
आणि आवाज करकरीत
खाताना टेस्टी
तारुण्यात बेस्टी
मिठांचे आक्रमण झाले
आणि मी मिठाई होता होता
ठाई ठाई ठीकऱ्या उडवणारा चिल्लर झालो
सिनेमानंतरच मला मा दिसावी
अक्षरानंतरच मला मोक्ष दिसावा
ही एक योजना होती
तू पोळून निघालीस
पण मी पळून गेलो नाही
मोक्षात थांबलो
हा थांबा तुला परवडणार नाही म्हणून जग थोडेच अडणार आहे ?
१६
आरोपांची धुळवड मला नवीन नाही
रक्त उडवणाऱ्या रंगपंचम्या मी पाहिलेल्या आहेत
फिल्म म्हणजे सांडपाण्यापासून पाणी बनवणारी प्रोसेस
आम्ही वेश्यांच्या पासून पतिव्रता तयार करतो
ते
आम्ही पतिव्रतांच्या पासून वेश्या तयार करतो
इथपर्यंत
हे डाव टाकणारे लोक आहेत
त्यांची कितीही भोके सापडली तरी
शेवट ओकाबोका
जो बोका होऊन जगतो
तो चौका मारतो
जो गरीब हरण होतो
त्याचे इथे मरण होते
१७
नेटवर्क सोसायटीत आऊटसाईडर म्हणून जगता येत नाही
तुम्ही जन्मता तेव्हा एका नेटवर्क मध्ये असता
तुम्ही जगता तेव्हा एका नेटवर्कमध्ये असता
तुम्ही मरता तेव्हा एका नेटवर्क मध्ये असता
इथे तुम्ही आईला मारता तेव्हा स्वतःलाही मारत असता
एक माणूस स्वतःचाच मर्डर करून
स्वतःचीच बॉडी सुटकेसमध्ये घालून
तिला सर्वत्र
इन्स्टॉलेशन म्हणून लावतो आहे
आणि लोक म्हणतात
वा ताज ! काय नेटवर्क आहे ?
डेड बॉडी इज द मोस्ट ब्युटीफुल बॉडी
ईस्पेशली ईफ इट इज इन नेटवर्क
माझे इन्स्टॉलेशन तुला फळले नाही एवढाच याचा अर्थ काय ?
श्रीधर तिळवे नाईक
(मोक्ष या सिरीजमधील मोक्ष : बॉलीवूड या काव्यफायलीतून)
Comments
Post a Comment