दया क्षमा का श्रीधर तिळवे नाईक
जंगलच आहे त्यापासून आपण माणसांचे जग बनवतो पण प्राणी म्हणून तुम्ही जंगलीच राहता किंवा मग जगलरी करत बसता . जगण्याचे नियम हे जंगल ठरवते आणि तिथे डार्विन आणि बळी तो कान पिळी हे दोनच सिद्धांत लागू पडतात आहारातून भोग निर्माण होतो संभोगातून भोग निर्माण होतो आणि त्याची लालसा वाढत जाते अन्नासाठी आणि नर मादीसाठी स्पर्धा होतेच कारण जे तुम्हाला हवे आहे ते फक्त तुम्हा एकाला हवे असत नाही हे तुमच्या सोबत अनेकांना हवे असते या अनेकांना हव्या असण्यातून आणि हव्यासातून हेवे दावे येतात .
मला जे हवे होते ते मला मिळाले नाही दुसऱ्याला मिळाले म्हणून ज्याला मिळाले त्याचा हेवा तर जे माझेच होते ते दुसऱ्याने हिसकावले म्हणून त्याच्यावर दावा हाच हेवादेवा ! तो अटळ असतो . माणूस जन्मदत्त संत नाही माणूस जन्मदत्त पशु आहे आणि म्हणूनच मला पाशुपत दर्शन महत्त्वाचे वाटते कारण ते माणूस पशु आहे यापासून सुरुवात करते
माणसाला स्वतःला पशु म्हणून स्वीकारणे फार अवघड जाते आपले जंगली गुण अवगुण आहेत असे त्याला सांगितलेले गेलेले असते साहजिकच मग शिकवण एका बाजूला आणि जंगलामुळे येणारा भोगलालसा , हव्यास , स्पर्धा दुसऱ्या बाजूला यातून मग आपोआपच कृतकपणा यायला लागतो चेहरा सभ्य ठेवत ओरबाडण्याची कला माणूस आत्मसात करायला लागतो.
जग बदलत नाही जग बदलता येत नाही कारण माणसाच्या आत असणारी भूक ,तृष्णा आणि निकड नाहीशी होत नाही मूळात तुमच्या आतीलच असलेली भूक तृष्णा निकड नाहीशी होणार नसेल तर ती इतरांच्या मध्ये नसणार अशी अपेक्षा हा सुद्धा एक कृतकपणा आहे . म्हणजे मोक्ष दुसऱ्याने मिळवावा मी मात्र माझा माझ्या आतला पशु सांभाळेन हे कसे काय होईल ?
तेव्हा सुरुवात स्वतःपासूनच करावी हे उत्तम . त्यामुळे अर्थातच पशु म्हणून व्यवहार करताना होणारा त्रास हा भयंकर त्रासदायक होऊ शकतो मनामध्ये अशांती फैलावू शकतो . पण हे अटळ आहे हे स्वीकारले आणि दुसऱ्यांच्या या सर्व भूक तृष्णा आणि निकडींना करूणेने पाहायला शिकले की मग माणसातल्या त्या पशुला क्षमा करता येते . मोक्षाची आद्य अट आहे ती ! ही दया ही क्षमा जोवर दाखवता येत नाही तोपर्यंत आत शांती पसरत नाही .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment