कुंभमेळा , साधू आणि संत श्रीधर तिळवे नाईक
नाशिक मधील कुंभमेळ्यांच्या संदर्भात सयाजी शिंदे यांनी अनेक स्टेटमेंट दिलेली दिसतात त्यानिमित्ताने साधू आणि संत हे शब्द पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत . सयाजी शिंदे हे केवळ अभिनेते नाहीत तर ते विचार करणाऱ्या अभिनेत्यांच्या पैकी एक आहेत त्यामुळे त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष द्यावे लागते
वृक्षतोडीला माझा विरोध मी वारंवार अगदी सुरुवातीपासूनच नोंदवलेला आहे . त्यामुळे इथे मतभेद असण्याची गरजच नाही पण नेमका मग प्रॉब्लेम झाला कुठे आहे ? सरकार इतके आक्रमक का आहे याविषयीची काही स्पष्टीकरणे यायला हवी होती ती येत नाहीयेत आणि याचे सर्वात मोठे कारण मुळातच कुंभमेळ्याच्या लोकसंख्येबाबतचा अंदाज महाकुंभमेळ्यात चुकल्यामुळे सरकार सावध आहे . खुद्द भाजपाला महाकुंभमेळ्यामध्ये एक ते दीड करोड लोक अपेक्षित होते आणि ते अनपेक्षितपणे हळूहळू तीन करोड आणि नंतर पाच करोड झाले शेवटी शेवटी ही संख्या 10 करोड पर्यंत पोहोचली आणि संपूर्ण व्यवस्थापनाचा बोजवारा उडण्याची शक्यता निर्माण झाली. सुदेवाने मॅनेजमेंट बऱ्यापैकी जमले मात्र तरीही काही जीव हकनाक गेले ही वस्तुस्थिती! . वास्तविक ओबीसी लोकसंख्या माहीत असताना हा अंदाज यायला हवा होता पूर्वीसारखी ओबीसी बीसी आदिवासी लोकसंख्या ही आता झोपलेली नाही ती अचानक पणे आपल्या धार्मिक परंपरांच्या विषयी जागृत झालेली आहे. साहजिकच कुंभमेळा मध्ये अचानकपणे घरटी एक माणूस तरी पाठवावा अशी विनंती आमच्यासारख्या अनेक लोकांनी केली होती कारण शैव ताकद दाखवून देणे आवश्यक वाटत होते . मुळात इतका प्रतिसाद येईल हे कुणालाही माहीत नव्हते . आता नाशिक बाबत सुद्धा नेमके असेच काही घडते की काय अशी शंका काही लोकांना येते आहे . पण खात्री कशाचीच नाही यामुळे सगळे गोल मटोल चाललेले आहे. जागा रिकामी करून देणे आवश्यक आहे आणि जागा अधिक लागेल हा यामागचा अंदाज आहे.
आता प्रश्न आहे समस्या आहे तर त्यासाठी मग उत्तर शोधावे लागते . झाडे तोडणे हा उपायच नाही उलट आरण्यामध्ये व्यवस्थितपणे अशी एक सिस्टीम राबवता येणे शक्य आहे जिथे झाडेही वाचतील आणि साधकांच्या राहण्याची व्यवस्था करता येईल . मी अत्यंत जाणीवपूर्वक इथे साधक हा शब्द वापरत आहे कारण आपल्याकडे मीडियाने साधू आणि संत हे शब्द इतके स्वस्त बनवून टाकले की त्यांचा मूळ अर्थ काय आहे हे सुद्धा मीडिया लक्षात घ्यायला तयार नाही . साहजिकच मीडियाने प्रक्षेपित केलेला अर्थ आता सार्वजनिक होत चाललाय म्हणून पुन्हा एकदा लिहावेसे वाटते
सर्वच शैव तंत्रांच्यामध्ये पाच टप्पे सांगितलेले आहेत
१ मुमुक्षु : या टप्प्यामध्ये मोक्ष विषयी प्रचंड उत्सुकता निर्माण होते आस निर्माण होते आणि मनुष्य मोक्ष हेच माझे ध्येय आहे माझ्या आयुष्याचे उद्दिष्ट आहे हे निश्चित करतो आणि त्याप्रमाणे अध्ययन सुरू करतो
२ विद्यार्थी :या टप्प्यामध्ये विद्या आणि अर्थ या दोन गोष्टी एकत्र येतात . अर्थ हा अक्ष जर का व्यवस्थित मॅनेज करायचा असेल तर मुमुक्षुला प्रथम विधीनियम म्हणजेच कायदे आत्मसात करावे लागतात समजून घ्यावे लागतात प्रत्येक देशाचा प्रत्येक राष्ट्राचा कायदा वेगळा असतो आणि संविधान वेगळे असते संविधानाप्रमाणे वागणे हे विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे कुठलाही विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या शिक्षण संस्थेमध्ये किंवा तत्सम एखाद्या संस्थेमध्ये काम करत असतो तिचे स्वतःचे अधिनियम असतात इथे विद्यार्थी अधिन असतो म्हणजेच अधिनियम पाळणारा असतो त्या त्या शैक्षणिक संस्थांचे आणि जीविका देणाऱ्या संस्थांचे अधिनियम पाळलेच पाहिजेत. यानंतर मग यम म्हणजेच सत्य सुहिंसा सुकाम सुपरिग्रह अचौर्य यासारखे यम पाळणे आवश्यक आहे त्यांना अलीकडे पंचशील वगैरे म्हटले जाते याशिवाय एक व्यवस्थित दैनंदिन नित्यकर्म पाळण्यासाठी आणि स्वतःला स्वयंशिस्त लावण्यासाठी डेली आयुष्याचे काही नियम तयार करावे लागतात त्यामध्ये साधारणपणे रोज आंघोळ करणे वगैरे येते तर हे नियम पाळावे लागतात एकदा का या सर्वावर मास्टरी आली की मग माणूस साधक होण्याकडे वळतो
३ साधक :या टप्प्यामध्ये मनुष्य प्रत्यक्ष मोक्षाची साधना सुरू करतो आसन , प्राणायाम , धारणा , ध्यान यांची साधना सुरू होते ही साधना करणाऱ्या माणसाला साधक असे म्हणतात
४ साधू : साधना करत असतानाच माणसाला सविकल्प समाधी प्राप्त होते ज्याला सविकल्प समाधी प्राप्त होते त्याला साधू म्हणावे असा नियम आहे परंतु दुर्दैवाने भाजपाने आपला राजकीय अजेंडा चालवण्यासाठी साधू हा शब्द कोणासाठीही वापरायला सुरुवात केली याची सुरुवात मला चित्रपट संस्कृतीने केली होती अर्धवट ज्ञान असणारे फिल्मी रायटर कुणासाठीही काहीही शब्द वापरत होते आणि त्यांनी हा सगळा गोंधळ निर्माण केलेला आहे .साधू हा शब्द फक्त त्या व्यक्तीसाठी आहे जिला सविकल्प समाधी मिळालेली आहे त्यामुळे तो शब्द कोणासाठीही वापरू नये
५ सिद्ध: सविकल्प समाधी प्राप्त झाल्यानंतर हळूहळू साधू अचानक निर्विकल्प समाधीला पोहोचतो आणि तो जर भक्ती तंत्रातला असेल तर संत होतो जोग किंवा योगतंत्रातला असेल तर नाथ होतो ज्ञानतंत्रातला असेल तर बुद्ध किंवा केवली होतो. (मूळ बुद्ध परंपरेमध्ये गौतम बुद्धाने स्वतःला तथागत आणि शास्ता हे शब्द वापरलेले आहेत बुद्ध हा शब्द शैव परंपरेतला आहे अशोकाने बुद्धासाठी प्रामुख्याने शाक्यमुनी असा शब्द वापरलेला आहे ) त्यामुळेच ज्याला मोक्ष मिळालेला नाही त्याला संत म्हणू नये परंतु हल्ली हा शब्द जे धड मुमुक्षु सुद्धा नाहीत अशा लोकांच्यासाठी सुद्धा वापरला जात आहे . लोकांच्या डोक्यावर आपला अजेंडा मारण्यासाठी म्हणून अनेकदा बोलता येणाऱ्या कुठल्याही पोपटाला संत म्हटले जात आहे हा खरे तर भारतीय संत परंपरेचा अपमान आहे . संत एकनाथ संत मीराबाई संत जनाबाई संत बहिणाबाई संत तुकाराम संत कबीर यांना संत म्हणावे कारण हे मोक्षाला पोचलेले लोक आहेत . फक्त भक्तीतंत्राच्या मार्गाने मोक्षाला पोहोचणाऱ्या मुमुक्षुलाच संत म्हणावे इतरांना म्हणू नये पण याचे भान लुप्त पावलेले दिसते. सयाजी शिंदे यांचेही भान यासंदर्भात मीडिया शरण झाल्याने लुप्त पावलेले आहे .
कुंभमेळ्याला सर्वसाधारणपणे साधू आणि सिद्ध लोक स्वतःसाठी येत नाहीत कारण ज्याला सविकल्प समाधी मिळालेली आहे त्याला कुंभमेळ्याची गरज असत नाही . आणि ज्याला मोक्ष मिळालेला आहे त्याला तर कुंभमेळ्याची अजिबातच गरज नसते या लोकांना त्यामुळे सन्मान देऊन बोलवावे लागते . शैव धारेमध्ये कुंभमेळ्यामध्ये अनेकदा सिद्ध येतात ते त्यांच्या तंत्राविषयीची माहिती द्यावी म्हणून . अनेक मुमुक्षु लोक असतात ज्यांचे साधने मधले गाडे कुठे ना कुठेतरी अडकलेले असते त्यांचे प्रश्न असतात पूर्वीच्या काळामध्ये तर फारसे प्लॅटफॉर्म उपलब्ध नव्हते त्यामुळे कुंभमेळा हाच एक प्लॅटफॉर्म असायचा आता अशा प्लॅटफॉर्मची खरोखर गरज आहे का हा एक फार मोठा प्रश्न आहे कारण आता आपण इंटरनेट संस्कृतीमध्ये आलेलो आहे कुठल्याही सिद्ध माणसाला तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि तो त्याचे उत्तर अगदी डिजिटल उमटीत स्वरूपात टाईप करून देऊ शकतो . तरीही कुंभमेळे लागतात ते अनेकदा संघटित ताकद दाखवावी म्हणून . विशेषता ओबीसी लोकांना सध्या हे गरजेचे बनत गेलेले आहे कारण त्यांच्या दाबणुकीचा आणि शोषणाचा एक प्रचंड मोठा अजेंडा सध्या राबवला जाण्याची शक्यता आहे . अशा वेळेला आपण संघटित आहोत याची जाणीव करून देणे फार गरजेचे असते . खरे तर हे काम राहुल गांधी वगैरे लोकांनी करायला हवे होते परंतु या लोकांना काय बोलणार ? परिणाम इतकाच झालेला आहे की कुंभमेळा सुद्धा शेवटी भाजपच्या ताब्यात गेला .
आज नेमके सयाजी शिंदे यांच्यामार्फत काय चालले आहे ? तर ते टीका साधूंच्यावर करत आहेत . मुळातच गोष्टी स्पष्ट करत टीका केली पाहिजे . कुठल्याही साधक असणाऱ्या आणि स्वतःला साधुसंत म्हणवनाऱ्या माणसांनी आम्हाला झाडे कापून जागा करून द्या अशी मागणी केलेली नाही . हे सर्व राजकारण चाललेले आहे आणि ते यदा कदाचित आपल्याला आवश्यक असणाऱ्या लोकसंख्येच्या पेक्षा अधिक लोकसंख्या आली तर काय या भयापोटी आलेले आहे . कारण यदाकदाचित माणसांचा मृत्यू झाला तर त्याचे पडसाद मुंबईपर्यंत तीव्र प्रमाणात उठण्याची शक्यता आहे तर असे काही शोकात्म होऊ नये म्हणून ही धडपड चाललेली आहे परंतु मुळातच तिची पद्धत चुकीची आहे. झाडे कापणे हा उपाय नाही तर पद्धतशीरपणे एकही झाड न कापता मॅनेजमेंट उभी करणे हीच योग्य पद्धत आहे . अलीकडच्या काळामध्ये इकोस्पेस मॅनेजमेंट नावाचा एक प्रकार आलेला आहे उपलब्ध असलेल्या जागा जास्तीत जास्त सक्षम पद्धतीने परिसरात कसलाही बदल न करता कशा वापरायच्या ते ह्या इको स्पेस मॅनेजमेंट मध्ये येते त्यामुळे ecoस्पेस मॅनेजमेंट मधले लोक बोलवणे अत्यंत आवश्यक आहे . त्यांच्यावर एकही झाड न कापता सर्व साधक साधुसंत यांची व्यवस्था केली गेली पाहिजे अशी जबाबदारी टाकणे गरजेचे आहे . भाजप अत्यंत काळजीपूर्वक सिद्ध हा शब्द टाळते आहे कारण त्याला भक्तियोगाचाच प्रचार करायचा आहे यामागचे कारण उघड आहे मूळचा अजेंडा वैष्णव आहे आणि वैष्णवांना फक्त भक्ती हवी आहे कारण अंधभक्त तयार करण्याचा कारखाना त्यामुळे सुरू राहू शकतो . त्यामुळे सयाजी शिंदे यांनी सरळ सरळ भाजपवर टीका करायला हवी होती. साधुसंत कशाला मध्ये आणायचे ? पण त्यांचाही अजेंडा बहुतेक सेट झालेला दिसतो . हा पुरोगामी अजेंडा आहे . सत्य दोन्ही बाजूंना नकोच आहे पण दुर्दैवाने सत्य मध्ये आहे . किंबहुना सत्य कधी टोकावर उपस्थित असतच नाही . पण दोन्हीही बाजूंना हे कोण समजावणार ?
दोनो तरफ से तमाशा खडा हैं
मै बडा हुं या तू बडा हैं
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment