कैवल्याचे दिवस : स्वामी दयेंद्र नालिनी शांताराम
१
प्रश्न : आजच्या उत्तराधुनिक काळात कैवल्याचा मृत्यू झाला आहे असे वाटते का?
उत्तर: सर्वात पहिली गोष्ट कैवल्याचा मृत्यू होत नाही तर कैवल्यामुळे मृत्यू होतो जेव्हा कैवल्य तुमच्या अंगाला लागत नाही त्याचे तुमच्या अंगाला लागणे बंद होते तेव्हा तुमचा मृत्यू होतो त्यामुळे कैवल्याचा मृत्यू शक्य नाही. झाले काय आहे की उत्तरआधुनिक तत्त्वज्ञानामुळे अलीकडे अनेकांना अमुकचा मृत्यू तमक्याचा मृत्यू अशी घोषणा द्यावीशी वाटते पण प्रत्यक्षामध्ये कैवल्य या सगळ्या पलीकडे आहे आणि तरीही ते प्रत्येकात आहे ते अलीकडे दिसत नाही कारण आपणच या संसारात थांबलेलो आहोत आणि आपण इतके थांबलेलो आहोत की आपण संपूर्ण होत नाही आहोत आणि आपण संपूर्ण होत नाही म्हणून कैवल्य होत नाही आहोत त्यामुळे उत्तराधुनिकतेने कितीही मृत्यू स्पॉन्सर केले तरी एक गोष्ट लक्षात ठेवा कैवल्याचा कधीही मृत्यू होत नाही होणार नाही आणि झालेला नाही
प्रश्न : आचार्य ओशो रजनीश कैवल्याला पोहोचले होते का ?
उत्तर: आचार्य रजनीश कैवल्याला पोहोचले होते की नाही हा प्रश्नच आता उद्भवत नाही कारण आता आचार्य ओशो रजनीश अस्तित्वात नाहीत ते जिवंत असते तर ते कैवल्याला पोहोचले होते की नाही हे त्यांच्या शरीरा मार्फत कदाचित आपल्याला कळाले असते पण आता शरीरच नाही त्यामुळे कैवल्याला पोहोचले होते की नाही हे कळण्याचा काही मार्ग आपल्याकडे नाही त्यामुळे प्रश्न आपण हा विचारला पाहिजे की आपल्याला कैवल्याला पोहोचायचे आहे की नाही ? तुम्ही स्वतः रजनीश्यांच्या विषयी असा प्रश्न विचारता याचा अर्थ इतकाच की तुम्ही अजूनही आचार्य ओशो रजनीश यांच्यामध्ये थांबलेले आहात आणि मेलेल्या माणसांच्यात थांबलेला माणूस कैवल्याला पोहोचत नाही कारण थांबणे म्हणजे दगड होणे आणि दगड हा संसाराचा भाग असला तरी त्याच्यामध्ये देव कोरला जात असला तरी तो प्रत्यक्षात भागच असतो आणि सगळे भाग देव असतात म्हणून दगड हाही देव असतो रजनीश हे आता असे दगड झालेले आहेत त्यांची देव म्हणून तुम्ही पूजा करणार असाल तर ती मेलेल्या गोष्टीची पूजा होईल तिच्यामुळे कैवल्यप्राप्ती होणार नाही किंबहुना इतिहास म्हणजे दगडाने दगडांच्यावर लिहिलेले मृत शिलालेख ! जो गेला तो गेला त्याच्या आठवणीमध्ये फार तर समारंभ करता येतील पण हे समारंभ तुम्हाला कुठलाही आरंभ देणार नाहीत कुठेही घेऊन जाणार नाहीत तुम्ही जिथे आहात तिथेच असणार आहात तेव्हा यात्रा सुरू करायची असेल तर स्वतः आणि कैवल्य यांचे काय करायचे ते ठरवा आचार्य ओशो रजनीश टाळ्या मिळवण्यासाठी कदाचित तुम्हाला योग्य वाटतीलही कारण भारतातल्या लोकांना एकंदरच मेलेल्या लोकांच्या विषयी आणि मेलेल्या गोष्टींच्या विषयी प्रचंड आदर वाटतो त्यांचे मन भरून येते आणि ते नेहमी मृत्यूनंतर टाळ्या वाजवत असतात परंतु अशा टाळ्या मेलेल्याला जिवंत नाही करू शकत तेव्हा तुम्ही कितीही टाळ्या वाजल्या तरी ओशो रजनीश गेले इतकेच सत्य उरते आणि तुम्ही इथे आहात हे जास्त प्रखर सत्य आहे. जोवर शरीर आहे तोवरच त्या शरीरातील कैवल्यावर चर्चा करता येते एकदा देह कैवल्यधामावर पोचला की तुम्ही जाम होता आपण सगळेच एका अर्थाने वनवे ट्रॅफिक वर आहोत या ट्रॅफिक मध्येच आपला जन्म झालेला आहे आणि हा ट्रॅफिकच आपणाला कैवल्यधामाला किंवा कैवल्याला घेऊन जाणार आहे त्यामुळे कैवल्यधामाला जायचे की कैवल्यालाच उपलब्ध व्हायचे हे तुम्ही ठरवायचे आहे
प्रश्न : किती वेळ लागेल ?
उत्तर : आयुष्याने जेवढा वेळ तुम्हाला दिलेला आहे तेवढा वेळ किंबहुना आयुष्य म्हणजे तुम्हाला दिला गेलेला वेळ आहे हा वेळ म्हणजे एका अर्थाने कैवल्यप्राप्तीसाठी दिलेला वेळ आहे मात्र तुम्ही तो वेळ त्यासाठी वापरावा अशी सक्ती नाही आयुष्य म्हणजे केवळ दिलेला वेळ नाही आयुष्य म्हणजे तुम्हाला दिले गेलेले स्वातंत्र्य पण आहे तुम्ही तुमचे स्वातंत्र्य तुम्हाला दिला गेलेला वेळ वाया घालवण्यासाठी वापरू शकता किंबहुना भारतीय लोकांची ते वैशिष्ट्य आहे त्यामुळे या दिल्या गेलेल्या वेळेचे काय करायचे हे तुम्ही ठरवायचे आहे त्यामुळे किती वेळेला अमुक अमुक दिवस वगैरे असे कैवल्यप्राप्तीसाठी टाईम लिमिट नाही मात्र एक नक्की आहे की तुमचा टाईम मृत्यूनंतर संपणार आहे त्यामुळे मृत्यूपर्यंत प्रयत्न करायला हरकत नाही
प्रश्न : तुम्ही कैवल्यधाम आणि कैवल्य असे दोन शब्द का वापरत आहात ?
उत्तर : कैवल्यधाम हे इथे आत्ता स्मशानभूमी म्हणून असते तिथे तुमचा देह जाळला जाऊ शकतो किंवा दफन ही केला जाऊ शकतो पण कैवल्य ना जाळले जाऊ शकते ना दफन केले जाऊ शकते कारण ते शून्य आहे आणि शून्याला न जाळता येते ना त्याचे दफन करता येते .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment