नांदेड येथील दलितहत्या आणि पुन्हा एकदा जाती- वर्ण श्रीधर तिळवे नाईक
महाराष्ट्रात सध्या नांदेडमध्ये सक्षम ताटे या दलित बॉयफ्रेंड ची हत्या आचल ममदीवार या सवर्ण मुलीच्या भावाने म्हणजे हिमेश ममदीवारने केल्यामुळे खळबळ माजलेली आहे . मुलीचे कुटुंबीय सुरुवातीला ओपन प्रवर्गातले वाटल्याने अनेकांनी ब्राह्मण वळणावर टीका केली पण अलीकडे काही जणांच्या मते ते ओबीसी प्रवर्गातले आहेत. आंबेडकर जयंतीला एकत्र नाचत असणारे हे लोक प्रत्यक्षात नेमके काय घडल्याने हत्याकांडापर्यंत पोहोचले हा एक प्रश्न आहे. हा प्लॅनिंगचाच भाग होता अशीही बाजू पुढे येते आहे .यावर आणखीन एक गुंतागुंत म्हणजे हिमेश बहिणीला घेऊन पोलीस ठाण्यात खोटी तक्रार नोंदवायला गेला असताना खुद्द पोलिसांनीच त्याला तुझे हे घरेलू प्रकरण तू हाताळायला हवे आणि तूच हत्या करायला हवी असे प्रेरित केले अशी बातमी काही मीडिया केंद्रातून आलेली आहे . यात सत्य किती याची चौकशी पोलीस करतीलच पण हत्या झाली असे तरी स्पष्टपणे दिसत आहे. सध्या मीडियाचा कसलाही भरोसा देता येत नसल्याने सत्य असत्य काय ते आपण सांगू शकत नाही. पण यातून काही गोष्टी समाजशास्त्राच्या पातळीवर स्पष्ट होतात.
सध्या प्रवर्गनिष्ठ विचारसरणी रुजत चालल्याने दलितांच्या वर अन्याय करण्याची प्रवृत्ती अधिकच वाढलेली आहे . हे आणखी एक उदाहरण म्हणता येईल. दलित आणि ओबीसी यांच्यामध्ये प्रचंड तणाव आहे ही वस्तुस्थिती आहे. मुख्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये नव बौद्ध लोकांनी शैवधर्मावर ज्या प्रकारची टीका सुरू केलेली आहे ती टीका ही दरी प्रचंड वाढवत आहे कारण श्रद्धेवर टीका करता करता अनेकदा फार चुकीच्या गोष्टी बोलल्या जात आहेत ज्या सहन करण्याच्या मनस्थितीत ओबीसी प्रवर्ग नाही. वास्तविक फुले आणि आंबेडकर हे एकत्र असायला हवेत बाकी मतभेद हे नेहमी अंतर्गत असायला हवेत पण आता स्थिती बदलत चाललेली आहे. साहजिकच पुन्हा एकदा वर्णजाती यांची मुळे तपासली जात आहेत
सर्वसाधारणपणे जेनेटिक्स असं सांगतं की 70 पिढ्यांच्या पूर्वी म्हणजे जर का आपण बालविवाह प्रचलित असल्याने प्रत्येक पिढी २० वर्षाची समजलो तर इसवी सन ८०० ला भारतामध्ये प्रथमच जाती व्यवस्था आणि वर्णव्यवस्था या आंतरजातीय आणि आंतरवर्णीय विवाहाच्या विरोधात गेल्या असे म्हणता येते तोवर मिश्रित आणि संकर चालूच होता आणि मनुस्मृतीचा त्यामुळेच काळ हा साधारणपणे 70 पिढ्यांच्या पूर्वी सुरू झाला असे म्हटले जाते. म्हणजे मग नेमके घडले काय तर मनुस्मृती ही कदाचित शक्य आहे की इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात लिहिली गेली असेल परंतु आठव्या शतकापर्यंत तरी भारतातल्या शैव लोकांनी साधारण बहुजन समाजाने मनुस्मृती स्वीकारलेली नव्हती आणि नाही . म्हणजेच स्मृती वांग्मय लिहिल्या गेल्यानंतर सुद्धा 1000 वर्षे त्याचा कसलाही प्रभाव पडलेला नव्हता . त्यातून आणखी काही वेगळे प्रश्न निर्माण होतात त्यातील एक म्हणजे बुद्ध आणि महावीर हे वर्णजातीव्यवस्थेविरोधात लढत होते असे आपण म्हणतो पण खरोखरच ही वर्णव्यवस्था यांच्या काळात मजबूत होती का? जर 70 पिढ्यांच्या आधी वर्ण संकर अस्तित्वात होता असा निष्कर्ष आपण स्वीकारला तर या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी येते . जर का ऋग्वेद आणि यजुर्वेदाच्या कालखंडात आपण संबंध तपासले तर युरेशियन लोक आणि शैवलोक यांच्यामध्ये कधी संघर्ष कधी मैत्री असेच नाते दिसते. मुळात वर्ण आणि जात ह्या संकल्पनाच शैवधर्मी लोकांना मान्य नसल्याने साहजिकच त्यांच्या बाजूने नाती सतत खुली राहिलेली आहेत आणि शुक्राचार्यांच्या सारखे युरेशियन आचार्य सुद्धा असुरांची जीवनशैली स्वीकारत शिवभक्त झालेले दिसतात. नंतर देवयानी पुन्हा ययाती शी लग्न करते तर शर्मिष्ठा असूर असून सुद्धा तिचेही लग्न ययातीशी झालेले आहे. खुद्द महाभारतामध्ये वर्णसंकराची अनेक उदाहरणे दिसतात. त्यांचा उल्लेख एका लेखात केला होता.
यातून काही प्रश्नही निर्माण होतात म्हणजे राम आणि कृष्ण विशेषता कृष्ण हे दोघेही वर्ण जाती संकराला विरोध करतात . गीतेमध्ये तर स्पष्टपणे भगवान कृष्ण सांगतात की वर्णसंकर होऊ लागलेला आहे आणि त्यामुळे धर्म बुडायला लागलेला आहे आणि म्हणूनच धर्माच्या प्रतिष्ठापणे साठी म्हणजेच वर्णाश्रम व्यवस्थेच्या प्रतिष्ठापनासाठी मी अवतार घेतलेला आहे (भारतात हे मी सांगणारा पहिला न्हवे नरहर कुरुंदकर यांनी अत्यंत सविस्तर याची मांडणी केलेली आहे)यावरून मग आपण असा निष्कर्ष काढायचा का की गीता हा ग्रंथ आठव्या शतकात लिहिला गेला आहे?म्हणजेच गीता ही नंतर महाभारतामध्ये कोणीतरी समाविष्ट केलेली आहे आणि बहुधा आद्य शंकराचार्य यांनीच महाभारतात समाविष्ट केलेली असावी .
याचा अर्थ स्पष्ट आहे की आत्ताचे जे महाभारत आहे ते ७० पिढ्यांपूर्वी म्हणजेच ७० जनरेशनस पूर्वी लिहिले गेलेले आहे जेव्हा वर्णसंकर प्रचंड प्रमाणात होऊ लागला होता आणि तो थांबवण्यासाठी म्हणून महाभारत आणि रामायण यांचा जन्म झाला . मनुस्मृती आताचे रामायण आणि महाभारत यांचा कालखंड हा जवळजवळ एकच असावा असे दिसते . आणि या सर्व ग्रंथांचा मुख्य उद्देश वर्णव्यवस्था प्रस्थापित करणे असा आहे त्यांना आठव्या शतकापर्यंत यश आलेले नाही . रामायण आणि महाभारत यांचे जे मुख्य अवतारी पुरुष आहेत ते राम आणि कृष्ण यांची मंदिरे सुद्धा आठव्या शतकानंतरच आपणाला अस्तित्वात आलेली दिसतात . आयोध्या सारख्या ठिकाणी सुद्धा शैव मंदिरे आधी अस्तित्वात आलेली दिसतात. याचा दुसरा अर्थ असा होतो की राम आणि कृष्ण रामायण आणि महाभारत यांच्यानंतरच भारतामध्ये वर्ण आणि जाती व्यवस्थापवलेली आहे प्रस्थापित झालेली आहे आणि यांनीच ती वाढवलेली आहे . त्यामुळेच वर्ण व्यवस्थेचे अनेक समर्थक हल्ली जय श्रीराम म्हणतात त्याचे आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही . काही वेळा तर जय श्रीराम सुरुवात असते आणि शेवटी हर हर महादेव येते. त्यामुळेच ब्रिटिशांनी वर्ण व्यवस्था आणली या प्रमेयाला आता काहीही अर्थ उरत नाही कारण जेनेटिक पुरावे आता प्राचीन काळातील वर्ण जाती व्यवस्थेच्या बाजूने गेलेले आहेत म्हणजेच ती 70 पिढ्यापूर्वी प्रस्थापित झाली होती असेच सांगत आहे . याबाबतीत काही अति ब्राह्मणी हिंदुत्वाच्या लोकांनी ब्रिटिशांनीच वर्ण व्यवस्था निर्माण केली म्हणून जे सांगितलेले आहे ते सत्य नाही हे आता पूर्णपणे स्पष्ट होते आहे. ती इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासूनच लिखित स्वरूपात यायला लागली . हा कालखंड प्रामुख्याने वैष्णव आणि हिंदू धर्म यांनी गजबजलेला आहे . जेनेटिक्स प्रमाण मानले तर हे दोनच व नंतरचा जैन धर्म हे वर्ण व्यवस्था पाळत होते असे म्हणायचे काय ?
वर्ण जातीव्यवस्थेचा समर्थन करणारा पहिला ग्रंथ हा मनस्मृति नव्हता तर ऐतरेय ब्राह्मण होता. त्याविषयी मी स्वतंत्र लिहिलेले आहे हा ब्राह्मण ग्रंथ महिदास ऐतरेय याने लिहिला जो आईच्या बाजूने दलित होता तर वडिलांच्या बाजूने ब्राह्मण होता आणि त्याला आपल्या वडिलांनी खूपच त्रास दिला होता आता या त्रासाचा परिणाम म्हणून त्याने अंतर्वर्णीय विवाहाला विरोध केला की काय अशी शंका आपण घेऊ शकतो. किंवा मग स्वतःचे ब्राह्मण असणे सिद्ध करायला त्याने हा ग्रंथ लिहिला का अशी ही शंका विचारता येते .एतरेय उपनिषद त्याने लिहिलेले असेल तर मात्र गोष्टी अधिकच गुंतागुंतीच्या बनतात .
आरएसएस प्रमुख भागवत यांनी आंतरजातीय आणि अंतर्वर्णीय विवाहला पाठिंबा द्यायला आणि ही घटना घडायला एकच वेळ लागावी हे बघण्याजोगे आहे . जर मुलींचे घराणे ओबीसी प्रवर्गातील असेल तर हा प्रवर्ग किती सहज रित्या प्रोवोक करता येतो ते या घटनेवरून सिद्ध होते . मी नेहमीच मांडत आलेलो आहे की आंतरजातीय आणि आंतरवर्णीय विवाहाबाबत ब्राह्मण आणि वैश्य हे दोन ओपन वर्गातले वर्ण हे अधिक पुढारलेले दिसतात त्या उलट क्षत्रिय आणि ओबीसी हे अजूनही याबाबतीत कट्टर आहेत का असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो. की दलित आले की सारे च्या सारे सवर्ण असे कट्टर असतात असाही प्रश्न पडतो . मी मागेही एकदा म्हणालो होतो की दलित प्रवर्गामध्ये जास्तीत जास्त आंतरजातीय विवाह होणे अतिशय आवश्यक आहे कारण कळत नकळत एक मोठा समज ओपन आणि ओबीसींच्या मध्ये दृढ होत आहे तो म्हणजे हे लोक आंतरजातीय विवाह करत नाहीत आणि आमच्या ओपनच्या मुली विवाह साठी तयार करायला बघतात . अपवादात्मक वेळा पळवतात . दलित प्रवर्गामध्ये किती अंतर जातीय विवाह होतात हे एकदा सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिक्स या शाखेच्या पद्धतीने तपासली पाहिजे नाहीतर लोकांना सांगे परम समाज ज्ञान आपण कोरडे पाषाण असे म्हणायची वेळ येईल.
भारतात वर्ण जात ही व्यवस्था नष्ट झाली पाहिजे आणि ती नष्ट करण्याचा एक मार्ग म्हणजे वर्णाअंतर्गत व जाती अंतर्गत विवाह कमी करत अंतर्वर्णीय विवाह व आंतरजातीय विवाह वाढवत नेणे हाच आहे. पण बदललेल्या वातावरणामुळे जातीव्यवस्था व वर्णव्यवस्था प्रचंड प्रमाणामध्ये पुन्हा अवतरलेल्या दिसतात . त्यामुळे अशा प्रकारचे पुरोगामी विवाह हे आता अवघड होत जातात की काय अशी शंका यायला लागलेली आहे . माझ्यामते किमान आंतरप्रवर्गीय विवाह होणे फार आवश्यक आहे . त्यासाठी जास्तीत जास्त मुळात प्रवर्गातल्या लोकांनी तरी आपले वर्ण आणि जाती बाजूला करायला हव्यात आणि प्रवर्ग म्हणून एकत्र यायला हवे अन्यथा फक्त आरक्षणाने निर्माण केलेले प्रवर्ग एवढेच प्रवर्गाचे स्वरूप राहील. म्हणूनच मी आधी सूचना दिली होती की आता फक्त कागदपत्रावर प्रवर्ग येऊ द्या दुसऱ्या पिढीपासून वर्ण जात कॅन्सल करा . म्हणजे पहिल्या पिढीसाठी पुरावे सिद्ध करावी लागत असल्याने वर्ण आणि जात लिहिली गेली आणि त्याच्या शेजारीच प्रवर्ग ही कॅटेगरी लिहिली गेली की दुसऱ्या पिढीला फक्त तो प्रवर्ग देण्यात यावा . वर्ण आणि जात ही ओळख पुसून टाकावी. आंतर प्रवर्गीय विवाह होण्यासाठी हे खूप आवश्यक आहे .
खरे तर अशा घटना या नेहमीच सुन्न करणाऱ्या असतात . आपण स्वतःला होमो सेपियन म्हणवून घेतो पण होमो सेपियन काही होत नाही आपल्यापेक्षा जनावरे ज्यादा ऍडव्हान्स आहेत असे म्हणायची पाळी आलेली आहे निदान वाघ सिंह हत्ती वर्ण जात प्रादेशिकता बघत नाहीत वाघ सर्व प्रकारच्या वाघाशी संग करतात . कधी कधी तर सिंह आणि वाघ यांचा संकरसंग घडतो आणि कोणीही त्याला ऑब्जेक्शन घेत नाही . होमो सेपियनलाच असले नखरे सुचतात. माणसाने विवाह करताना फक्त वर्तन शैली , स्वभाव ,प्रतिभा वगैरे वगैरे गुण पहावेत पण असे होत नाही त्यातूनच निर्माण होणाऱ्या या समस्या आहेत .
या प्रकरणातील मुलीने शेवटी मुलाच्या शवाशी लग्न केल्याने ते अधिकच गुंतागुंतीचे नाट्यात्मक झाले . पण तरीही प्रत्यक्ष विवाह झालाच नाही चिन्हात्मक विवाह झाला असे म्हणता येते. वर्ण आणि जात या अमानुष अमानवी कॅटेगरीज आहेत . त्यांना विज्ञानाचा कसलाही आधार नाही हे पुन्हा पुन्हा शिकवले गेले पाहिजे. बरे परंपरेने येणारी कौशल्येसुद्धा आता कालबाह्य होत चाललेली आहेत आणि मुळातच ब्राह्मण आणि इतर लोक आता एकेकाळी फक्त ओबीसी आणि बीसी लोकांच्या मध्येच परंपरेने चालत आलेली स्किल्स सहजरित्या आत्मसात करत पुढे चाललेले दिसतात. अशावेळी त्यांचीही गॅरंटी नाही मग वर्ण आणि जात व्यवस्था नेमकी कशाची गॅरंटी देते असा प्रश्न पडतो. ज्या गोष्टीमुळे काही प्राप्तीच नाही अशी गोष्ट मुळात स्वीकारावीच कशाला ? वर्ण आणि जात हे आता केवळ संस्कार आणि कागदोपत्री उपचार झालेले आहेत आणि कंडिशनिंग चे भाग झालेले आहेत . जोपर्यंत आपण माणसांना डी कंडिशन करत नाही तोपर्यंत हे सातत्याने घडत राहणार. भारतीय माणसांना तुमचे डीकंडिशनिंग लवकरात लवकर होवो अशी शिवइच्छा देतो .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment