उपयुक्ततावाद व्यवहार वाद आणि सत्य ४ श्रीधर तिळवे नाईक
मागील लेखामध्ये आपण संस्काराहारी ही संकल्पना मांडली आणि संस्कारांचा थोडासा विचार केला आता त्या पुढे जाऊन आणखी काही करता येते का ते पाहू .
आपण आधीच पाहिले आहे की आपण सत्य वास्तव आणि तथ्य यांच्या अंगाने पाहावे लागते पण त्याचबरोबर आपण हेही पाहिले की अनेकदा हेतूग्रस्त आणि पूर्वग्रह ग्रस्तता कशी ग्रासून टाकत राहते . प्रश्न असा आहे की मग यांना ओलांडून जाता येते का ? आपल्याकडे त्यातूनच बुद्धिमत्ता विचार किंवा बुद्धी विचार आणि प्रज्ञा विचार हा वेगळा केला जातो म्हणूनच आता आपण त्या अंगाने चर्चा करत आहोत.
पहिला प्रश्न अर्थातच प्रज्ञा म्हणजे काय ? प्रज्ञा आणि बुद्धिमत्ता एक आहे का ?
प्रज्ञा म्हणजे प्राणाशी जोडली गेलेली बुद्धिमत्ता ! त्यामुळेच I Q शी तिचे नाते नसते . आणि ती शक्तीला प्रतिभा बनवते . क्रिएटिव्ह बनवते . जर का शक्ती प्राणाशी जोडली गेली नसेल तर ती अनेकदा स्टिरीओ टाईप जाते . स्मृतीत अडकत जाते .स्मृति ही मेंदूशी निगडित घटना आहे पण तिचे ॲक्सेसीलेरेशन त्वरण हे बुद्धिमत्तेशी आणि प्राणाशी निगडित आहे मोक्ष काय करतो तर सविकल्प समाधीमध्ये तुम्हाला प्राणाशी जोडतो आणि निर्विकल्प समाधीमध्ये महाप्राणाशी जोडतो . आपला सर्वात मोठा प्रॉब्लेम हा असतो की आपण स्वतःला प्राणाशी जोडून घेऊ शकत नाही आणि याला कारण आपला मद असतो त्याचा माज असतो त्याची मते असतात मते म्हणजे दुसरे तिसरे काही नसून काँक्रीट झालेले विचार! सॉलिड झालेले विचार ! ज्ञानतंत्रामध्ये जेव्हा तुम्ही मोक्षाची साधना करायला लागता तेव्हा कळत नकळत वारंवार मताला , माजाला भिडत राहतात आणि ज्यांना आपण पूर्वग्रह ग्रस्तता पूर्वग्रह दूषितता म्हणतो आणि हेतूग्रस्तता हेतू दूषितता म्हणतो त्या नेहमीच या सॉलिडिटी मधून जन्मलेल्या असतात . त्या एक प्रकारची स्टॅबिलिटी देतात आणि त्या शॉर्टकट पुरवत असल्याने त्या आपणाला आपल्या वाटायला लागतात याचे कारण मुळातच आपल्या शरीराची प्रवृत्ती ही कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त प्राप्ती करून घेण्याचे असते. ऊर्जा वाचवणे शक्ति वाचवणे ही शरीराची एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे . यातूनच जडत्व आळस या गोष्टी निर्माण होतात आणि त्याच अनेकदा सवयी बनत जातात आणि मग आपल्या सवयी नेहमी शॉर्टकट शोधायला लागतात आणि त्याच शॉर्टकटला जबाबदार असतात. साहजिकच प्रज्ञा अनेक लोकांच्या ठाई विकास पावत नाही कारण ठाय दिला कि ती स्थायी बनत जाते आणि स्थायित्व स्थावर निर्माण करते सवयी निर्माण करते आणि एकदा का मेंदू स्थावर झाला की तो जंगम पासून सवयी मोडण्यापासून वंचित राहतो आणि मग त्याच त्याच मतांच्या सॉलिडीटीमध्ये अडकून पडतो साहजिकच जेव्हा जीवनाची स्पर्धा सुरू असते तेव्हा ज्यांच्याकडे लिक्विडिटी आणि गॅसीडीटी जास्त असते असे लोक प्रज्ञा जास्त जवळ करत जातात तिचा वापर वाढवत जातात आणि इतरांना मात देत जातात. प्रज्ञा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून प्राणाशी जुळलेले बुद्धिमत्तेचे मेंदूचे नाते तर महाप्रज्ञा म्हणजे थेट महाप्राणाशी जुळलेले नाते होय. परम प्रज्ञा मात्र महाप्राणातूनही मुक्त होते आणि थेट शिवाशी शून्याशी युक्त होते. ही मोक्षाची अवस्था असते मात्र व्यवहारामध्ये कधी कधी अपवादात्मक वेळा महाप्राण ऑपरेट होतो आणि फार क्वचित प्राण ऑपरेट होतो . सर्वसाधारणपणे आपण बुद्धीतूनच ऑपरेट होत असतो आणि त्याहीपेक्षा अधिक बौद्धिक मदामधून ऑपरेट होत असतो आणि त्यामुळेच मेंदूतल्या अनेक गटारगंगा या मदामुळे त्याच्यातून निर्माण झालेल्या मतामुळे आणि माजामुळे तयार होतात. त्यामुळेच नि : संस्कारासाठी नि: संसारासाठी मेंदूला प्रत्यक्ष अनुभव घेऊन प्रत्यक्ष ज्ञान घेऊन प्रत्यक्ष प्रॅक्टिस करून निष्कर्ष काढण्याची सवय लावावी लागते आणि निष्कर्ष हे नेहमीच निरीक्षणातून परीक्षणातून निर्माण होत असतात . मताला अनेकदा निरीक्षण नसते परीक्षण नसते बस ते घडत जाते होत जाते किंवा ९०% बिंबवले जाते . आपण अनेकदा इतके माठ असतो की आपण इतरांचे निष्कर्ष सहजरित्या बिंबवून घेतो . अनेकदा यातूनच संस्कार घडतात . त्या उलट आपण आपल्या प्रॅक्टिकल आयुष्यामधून प्राप्त केलेले जगण्यातून प्राप्त केलेले निष्कर्ष नेहमी ज्ञान निर्माण करतात तर मत नेहमीच माहिती गोळा करत असते . माहितीही ज्ञानाची पहिली पायरी होऊ शकते परंतु दुसरी पायरी ही नेहमीच स्वतःचे निष्कर्ष काढणे स्वतःचे प्रयोग काढणे यापासून सुरू करावी लागते . साधना न करताच मोक्षावर टीका करणारे महाभाग अनेक आहेत असे लोक स्वतःची बिंबवून घेतलेली मते इतरांच्या वर बिंबवत असतात . पण प्रत्यक्षामध्ये हे लोक अडाणी माणसापासून फार वेगळे असत नाहीत. हे त्यांना प्रिय झालेल्या तर्कदृष्टी पद्धतीतून आत्मसात केलेल्या मतांनाच कवटाळून बसलेले असतात . हा ज्ञानातून आलेला अडाणीपणा असतो कधी कधी तर यांच्यापेक्षा अज्ञानातून आलेला अडाणीपणा परवडतो . कारण तो किमान बदलाला तयार असतो परंतु ज्ञानातून आलेला अडाणीपणा बदलणे हे फार अवघड जाते कारण तो अनेकदा पुस्तकी असतो . त्यापेक्षा अज्ञानातून आलेला अडाणीपणा ओपन असतो .
साहजिकच ज्ञान तंत्रामध्ये जेव्हा तुम्ही साधना करायला लागता तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला स्वतःमध्ये अनेक मी सापडायला लागतात त्यांची उगमस्थाने शोधायला गेलात की मग माज सापडतो आणि आपली मते नेमकी कुठून कशी यायला लागतात ती कुठून कोणी स्पॉन्सर केलेली आहेत तेही सापडायला लागते सर्वात प्रथम पूर्वग्रह आणि हेतू नीट न्याहाळण्याची जबाबदारी पडते ज्ञान तंत्रामध्ये सर्वात प्रथम त्यामुळेच सत्य आणि ज्ञान यांच्या संबंधांना व या संदर्भातील प्रोसेसला महत्त्व प्राप्त होते आणि सत्य हे कधीही परम प्रज्ञा प्राप्त झाल्याशिवाय "होत"नाही . आपण सत्य बनत नाही किंबहुना आपण सत्य बनतच नसतो आपण सत्यच असतो पण ते फार शेवटी कळत जाते. तोपर्यंत आपला सारा खेळ हा वास्तव आणि प्रज्ञा तथ्य आणि बुद्धी स्मृति आणि हुशारी व्यवहार आणि चालाखी यांच्यातच खेळला जातो . जगात अनेकदा हुशार माणसे स्ट्रीट स्मार्ट माणसे यशस्वी झालेली दिसतात कारण हुशारी नेहमी आपले हेतू जाणून असते. त्यामुळेच स्वार्थीपणा हा फार उत्तमपणे हुशारीला साधतो . मुख्य म्हणजे हुशारीजवळ अनेकदा नैतिकतेचा अभाव असतो येनकेनप्रकारेण आपला हेतू कसा होईल हेच फक्त हुशारी चाचपत असते ज्या हुशारीला प्रत्यक्षामध्ये चाचपणे परफेक्ट जमते तिला आपण चालाखी म्हणतो जिला जमत नाही ती हुशारी फक्त हुशारीच राहते .
ज्ञानतंत्रात जेव्हा तुम्ही साधना सुरू करता तेव्हा सर्वात प्रथम हा जो तुमच्या आतला चलाख मनुष्य असतो त्याला फेकून द्यावे लागते मग हुशार माणसाला फेकून द्यावे लागते मग बुद्धिमान माणसाला फेकून द्यावे लागते आणि मग प्रज्ञेशी सामना करावा लागतो आणि शेवटी प्रज्ञेलाही फेकून द्यावे लागते. सर्वात अवघड प्रज्ञेला फेकून देणे असते कारण ती इतकी अनमोल असते की तिला फेकणे सहज शक्य होत नाही. अनेकदा तुमच्या आसपासच्या लोकांना तिचा फायदा झालेला असतो आणि त्यामुळे ते लोक सुद्धा नेहमीच अडथळा व्हायला लागतात . जगाला तर तुम्ही 101% यशस्वी होणार याची खात्री पटायला लागते परंतु ही वाटणारी खात्रीच अनेकदा तुम्हाला पुन्हा एकदा हुशारी आणि चालाखी करायला भाग पाडू शकते . तुमचे मित्र अत्यंत पद्धतशीरित्या किंवा न कळत तुमच्यावर प्रेशर टाकत असतात मी नेहमीच प्रेशर चे सुद्धा
१ गुप्त दबाव
२ लुप्त दबाव
३ सुप्त दबाव
४ प्रकट दबाव
५ जागृत दबाव
६ उन्नत दबाव
असे प्रकार सांगत असतो आणि यातला प्रत्येक प्रकार नीट तपासून बघावा लागतो .आपल्या मेंदूमध्ये अनेकदा संस्कार हे गुप्त लुप्त आणि सुप्त असतात आणि ते नेहमीच गुप्त लुप्त सुप्त दबाव निर्माण करत राहतात जे आपणाला ओळखता येत नाहीत. साधनेची सुरुवात करताना नेहमीच आपणाला ते प्रथम ओळखावे लागतात . कुठल्याही संस्काराची सुरुवात ही ठशापासून होते आणि मग ठसे हळूहळू संस्कार बनत जातात . आपण जेव्हा ठसे आणि संस्कार यांच्या बद्दल जागृत व्हायला आणि राहायला लागतो तेव्हा कुठे हळूहळू जागृती निर्माण होते आपल्या अनेक प्रकारच्या बौद्धिक नशा दिसायला लागतात . आपली अनेक बौद्धिक व्यसने दिसायला लागतात .
ज्ञानतंत्रामध्ये भाव किंवा भावना या सुद्धा विचारच असतात त्यांची व्याख्याच मुळी" तीव्र विचार इन्टेन्स थिंकिंग "अशी असते. म्हणजेच भावना म्हणजे काय तर तीव्र विचार ! अनेकदा हे तीव्र विचार शब्द शून्य असतात भाषा शून्य असतात साहजिकच त्यांना विचार मानायला आपली प्रवृत्ती तयार नसते पण प्रत्यक्षात ते विचारच असतात याचे कारण त्यांच्या असण्यामागे असलेली प्रचंड मोठी पूर्वग्रह दूषितता आणि हेतुग्रस्तता ! मुळात आसक्ती इतकी प्रबळ असते कि ती भाषिक व्हायला पण अनेकदा नकार देते. किंवा ती इतकी उतावळी असते की तिला भाषा सापडत नाही . कवी लोक अनेकदा तिला अशी भाषा सापडवून देतात .
साहजिकच कलांच्या मध्ये आणि इमोशनल जीवनामध्ये अनेकांना भावना फार महत्त्वाच्या वाटायला लागतात. त्याच त्यांच्या पिंडनिश्चितीमध्ये येतात आणि भावपिंड तयार होत जातो आणि तोच मुख्य बनून जातो. ज्ञानतंत्र अशा लोकांच्यासाठी नसते . अशा लोकांच्यासाठी भाव तंत्र योग्य ठरते.
ज्ञान तंत्रातला साधक माणूस मात्र या सगळ्याचा नीट अभ्यास करायला लागतो . मेंदूची सेल्फ लॅबोरेटरी बनवणे हे इतके सोपे नसते कारण अनेकदा सेल्फ हाच अडथळा असतो सेल्फ पासून मुक्त झालेला मेंदू ही हळूहळू प्राप्त होणारी गोष्ट आहे . ती एकदा प्राप्त झाली की संपूर्ण मेंदू म्हणजे एंटरटेनमेंट होऊन जाते . आपण माजाला मौज बनवू शकतो . आपण हसायला लागतो अर्थात आपल्या या हसण्यामुळे गैरसमज पसरू शकतात कारण आपण इतरांच्या गोष्टींनाही हसायला लागतो. आणि समोरच्या व्यक्तीला माज आणि अहंकार जास्त असेल तर मग ती गैरसमज करून घेते.
जगामध्ये साधारण applicable हुशारी म्हणजेच व्यवहारिक बुद्धिमत्ता ठरत जाते . प्रॅक्टिकल इंटेलिजन्स ! ज्ञानतंत्रामध्ये तो थोडासा बाजूला ठेवावा लागतो . त्याऐवजी यमनियमाला धरून काय आहे त्याविषयी ठाम व्हावे लागते . लोकांच्या नजरेतून मूर्ख होण्याची रिस्क पत्करावी लागते .
व्यवहार वाद हा आपणाला काही गोष्टी समजून घ्यायला मदत करू शकतो परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की व्यवहार वादाचा प्रत्यक्ष मोक्षासाठी काडीचाही फायदा होत नाही. फक्त आपणाला मेंदूचा व्यवहार मात्र कसा चालतो ते कळू शकते. मात्र सुरुवात व्यवहारवादापासून करता येते मुख्य म्हणजे जग कसे आहे हे समजून घ्यायला व्यवहार वाद खूप उपयोगी पडतो . किंबहुना आधुनिकतेची दोन टोके आहेत. एक अस्तित्व वाद आहे आणि दुसरा व्यवहार वाद आहे . बाकी सर्व इजम हे या दरम्यान आहेत . अस्तित्व वाद हा पर्सनल आहे व्यक्तिगत आहे अस्तित्वगत आहे तर व्यवहारवाद हा लोकगत आहे समाजाभिमुख आहे . संस्कृतीअभिमुख आहे .
मोक्ष साधना म्हणजे अस्तित्व आणि माज यांना ओलांडून व्यवहार आणि विचार यांना ओलांडून जात स्वतःला स्वतःच्या अस्तित्वाला ट्रान्ससेंड करत प्राणाच्या आणि महाप्राणाच्या आणि शेवटी शिवाच्या दिशेने वाटचाल करणे असते . मात्र या वाटचालीला सुरुवात मात्र विचारात आणि व्यवहारातच लाभते . ज्यांची सुरुवात विचारापासून होत नाही त्यांच्यासाठी ज्ञान तंत्र नाही हे त्यांनी समजून घ्यावे.
श्रीधर तिळवे नाईक
उपयुक्ततावाद ,व्यवहार वाद नीतिमत्ता आणि सत्य ५ श्रीधर तिळवे नाईक
सर्वसाधारणपणे जगातील सर्वच भागांमध्ये भूगोलामध्ये समाजामध्ये व्यवहारप्रणाली ही कायमच मानवाच्या आयुष्यामध्ये मानवाच्या जीवन आणि जीव प्रणालीमध्ये उपस्थित असलेली दिसते .
जेव्हा माणसांमध्ये श्रद्धायुग होते तेव्हा ती प्रबंधन म्हणून उदयाला आली तिचा आधार प्रामुख्याने श्रद्धा आणि शहाणपण होते .
त्यानंतर आलेल्या मोक्षयुगात मात्र तिचा उदय आस्थापन म्हणून झाला . करुणा , मोक्ष आणि शहाणपण हा तिचा आधार होता . आजही आहे . अलीकडे अत्यंत जाणीवपूर्वक आस्था हा शब्द श्रद्धा म्हणून वापरला जात आहे जेणेकरून मोक्ष धर्माच्या पुन्हा एकदा ताब्यात जाईल याबाबत वेळीच सावध होणे आवश्यक आहे.
त्यानंतर आलेल्या धर्मयुगात श्रद्धेचे रूपांतर धर्मात केले गेले राजकीय प्रणालीत केले गेले साहजिकच इथे व्यवहार प्रणाली ही कुटीलनीतीवाद म्हणून उदयाला आली . भारतात या अंगाने कौटिल्याचे अर्थशास्त्र फार महत्त्वाचे आहे कारण ते उपलब्ध असलेले यावरचे सर्वात मोठे जुन्या काळातले डॉक्युमेंटेशन आहे . कुटीलनीतिवाद एक व्यवहार प्रणाली म्हणून नेमका कसा काम करत होता हे तिथे स्पष्ट होते . पुढे आपणाला हे युरोपमध्ये मेक्यावलीमध्ये दिसते .
विज्ञान युगामध्ये मात्र व्यवहार प्रणालीचा उदय हा व्यवस्थापन म्हणून झाला मॅनेजमेंट म्हणून झाला . मॅनेजमेंट ला एक विज्ञान म्हणून पाहण्याची सुरुवात झाली याचे कारण तत्कालीन साम्राज्यवादाचे व्यवहार हे नेमके कसे हाताळायचे असा प्रश्न निर्माण झाला होता आणि या साम्राज्यवादात ने आणि साम्राज्यवादी कंपन्यांनी जे काही व्यवहार केले होते त्यांना यश कसे मिळाले याचा सुद्धा विचार केला जाऊ लागला कारण या सर्व साम्राज्यवादी कंपन्या संख्येने अतिशय अल्प असणारे लोक चालवत होते आणि आश्चर्यकारकरीत्या अत्यंत संख्येने कमी असणाऱ्या या लोकांनी भारतासारख्या चीन सारख्या प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या समुदायांच्यावर केवळ मॅनेजमेंट टेक्निक च्या जीवावर मात केली होती आज सुद्धा नेमका हाच प्रश्न ब्राह्मण धर्माच्या संदर्भात उपस्थित करता येतो ब्राह्मण वर्णाच्या बाबतीत उपस्थित करता येतो कारण नेमका हाच प्रश्न हिते सुद्धा आहे की इतके अल्पसंख्या असणारे ब्राह्मण कसे काय संपूर्ण बहुजन समाजाला मॅनेज करतात ? हा प्रश्न आपणाला मुस्लिमांच्या बाबतीत सुद्धा पडतो असे काय आहे की भारतामध्ये अशा प्रकारचे व्यवहार नियोजन अल्पसंख्यांक असणाऱ्या लोकांना पॉसिबल होते आपल्या समाजामध्ये व्यवहार प्रणालीच्या पातळीवर नेमका काय प्रॉब्लेम आहे की आपण सहजरीत्या अल्पसंख्यांक असणाऱ्या समुदायांच्याकडून समाजाच्या कडून पराभूत होतो ? त्याहून आश्चर्यकारक गोष्ट अशी की अल्पसंख्यांक असणाऱ्या ब्राह्मण समुदायाला मुस्लिम समुदाय कसा काय काट शह देतो आणि स्वतःचे साम्राज्य प्रस्थापित करतो ? आज सुद्धा हिंदू म्हणवणाऱ्या लोकांना मॅनेजमेंट जमत नाही काय ? आपण राजकीय मॅनेजमेंट करताना गोते का खातो?
तंत्रज्ञान युगामध्ये मात्र सुरचनापण म्हणून व्यवहार प्रणाली उदयाला आली . याला अलीकडे पोस्ट मॅनेजमेंट सुद्धा म्हटले जाते .
चौथ्या नवतेमध्ये याचे स्वरूप बदलले असून आता ते सुजालपण म्हणून उदयाला आलेले आहे .
व्यवहार म्हणजे समाजात करावयाचा कृतीविचार ,आचार आणि प्रचार होय. त्याचा मुख्य उद्देश नेहमीच अंमलबजावणी असतो . विचार ही सुरुवात होऊ शकते पण शेवटी जर का विचार व्यवहार नाही झाला की तो हळूहळू मृत होत जातो .
भारतीयांनी आपल्या सगळ्या व्यवहार प्रणाली हल्ली पाश्चात्त्य देशातून आयात करायला सुरुवात केलेली आहे तिकडचे सर्व मॅनेजमेंट आणि पोस्ट मॅनेजमेंट आपण अक्षरशः आंधळेपणाने इकडे आणलेले आहे . भारतीय समाज कसा चालतो याचा अभ्यास नसल्यामुळे हा सर्व गोंधळ निर्माण झालेला आहे. साहजिकच साठोत्तरीमध्ये या अंगाने हळूहळू का होईना परंतु भारतीय विचार प्रणालीचा आणि व्यवहार प्रणालीचा विचार सुरू झाला आणि साहजिकच आता शिवाजीचे मॅनेजमेंट कसे होते कौटिल्याचे मॅनेजमेंट कसे होते (हे चाणक्याच्या नावाने सांगितले जाते परंतु चाणक्य होऊन गेला की नाही याबद्दल शंका आहे पण प्रत्यक्षात चाणक्याच्या नावाने सांगितले जाणारे सर्व व्यवहारपण हे कौटिल्याने सांगितलेल्या लिहिलेल्या पुस्तकाच्या आधारे चाललेले असते .कौटिल्य आपली व्यवहार प्रणाली सांगतो हे खरे आहे . चंद्रगुप्ताच्या दरबारात असलेल्या विष्णू गुप्ता चे मूळ लिखाण काय होते हे मात्र अजूनही आपणाला सापडलेले नाही . तो चंद्रगुप्ताचा मार्गदर्शक होता एवढे नक्की आहे. तो वैश्य असल्याने आणि खुद्द नंद - मौर्य घराणे हे वैश्य असल्याने व्यवहार प्रणालीशी त्यांचा जबरदस्त संबंध होता . मुळातच मौर्य घराणे नंद घराण्यापासून अत्यंत जाणीवपूर्वक वेगळे काढण्याचा प्रयत्न युरेशियन लोकांनी केलेला आहे कारण त्यांना इतिहास नंद घराण्यापासून सुरुवात करायचा नव्हता . याला एक पौराणिक कारण आहे ते म्हणजे नंद घराणे हे प्रथम धनगर किंवा न्हावी होते असा असलेला पुराण लेखनाचा दावा ! प्रत्यक्ष शैव समाजामध्ये कोणीही काहीही होऊ शकत असल्याने धनगर किंवा न्हावी समाजात किंवा जन्म झाला तरी कोणीही व्यापारी बनू शकत होता वाणीपणी बनू शकत होता त्यामुळे धनानंद हा वैश्य आहे हे स्पष्ट आहे आणि चंद्रगुप्त ही त्याचीच संतती आहे . )त्यामुळे जेव्हा जेव्हा या संदर्भातले कौटिल्याचे विचार तुम्ही वाचता तेव्हा त्यामध्ये विष्णू गुप्ता चे विचार आहेत मात्र या विष्णू गुप्तच्या विचारांमध्ये स्पष्टपणे आणि स्वच्छपणे मनुस्मृति आणि इतर स्मृती वाङ्मय घुसवून आत्ताचे अर्थशास्त्र तयार झालेले आहे. पहिले अर्थशास्त्र हे शुक्राचार्याने लिहिले का असा एक फार मोठा ऐतिहासिक प्रश्न आहे . हे सर्व सांगण्याचे कारण असे की व्यवहार प्रणालीचा भारतातला विचार हा नेहमीच कौटिल्यापासून सुरू केला जातो तो प्रत्यक्षात शुक्राचार्य विष्णु गुप्त असा सुरू झाला पाहिजे . प्राचीन काळामध्ये सहसा लोक आपला जन्मदत्त व्यवसाय किंवा नोकरी सोडत नसल्याने अनेकदा वर्ग हे वर्णासारखे भासतात पण प्रत्यक्षात ते तसे नव्हते हे लक्षात घेतले पाहिजे . त्यामुळेच इंडिका मध्ये आलेले वर्ग हे अनेकदा जन्मदत्त असल्यासारखे आपणाला भासते परंतु प्रत्यक्षामध्ये लवचिक होते. हेही सांगण्याचे कारण म्हणजे इंडिका मध्ये कळत नकळत भारतातल्या मौर्य साम्राज्यातल्या व्यवहार प्रणालीचे प्रतिबिंब आहे .
व्यवहार प्रणालीच्या दृष्टीने मराठी लोकांच्यासाठी दुसरा महत्त्वाचा मनुष्य अर्थातच शिवाजी महाराज आहेत . त्यांच्या आज्ञापत्रांमध्ये याचे प्रतिबिंब आहे .
याबाबतीत सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर ते म्हणजे मोघल साम्राज्य ! जवळजवळ सर्वच मोघल बादशहांनी व दरबारी काम करणाऱ्या लोकांनी अनेक पत्रे लिहिली आणि ती आता उपलब्ध झाल्यामुळे त्या काळातल्या मोघलांच्या व्यवहार प्रणालीवर फार मोठा प्रकाश पडतो . हीच गोष्ट आपणाला शिवशाही आणि पेशवाई उत्तर पेशवाई यांच्या संदर्भात दिसते. अनेकदा पत्रांची सुरुवात पत्रांचा मायना त्या त्या माणसाच्या धर्माविषयी बोलतो.
प्रश्न असा आहे की आधुनिक जीवनातली आपली भारतीय लोकांची व्यवहार प्रणाली नेमकी काय आहे आणि आत्ताच्या उत्तराधुनिक जीवनातली आपली भारतीय लोकांची व्यवहार प्रणाली काय आहे आणि आता चौथ्या नव्हतेच्या जीवनातील आपल्या भारतीय लोकांच्या जीवनातील विचार प्रणाली विचार प्रणाली व्यवहार प्रणाली काय आहे असे प्रश्न आता नीट विचारणे आवश्यक आहे. म्हणजे भारतीय जेव्हा होय म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ अनेकदा शक्यता असा होतो किंवा शक्यता आहे असे म्हणतात तेव्हा त्यांचा खरा व्यवहारीक अर्थ नाही असा आहे आणि भारतीय सहसा नाही म्हणत नाहीत. प्रश्न असा आहे की संपूर्ण भारतीय लोकांचा व्यवहारच बायकांच्या सारखा आहे का ? (या दृष्टिकोनावर स्त्रीवादी दृष्टिकोनातून टीका होऊ शकते याची मला कल्पना आहे)कारण आपल्याकडे बायका असे करतात अशी ठाम समजूत आहे प्रत्यक्षामध्ये पुरुष पण काही वेगळे करत नाही . ही जी भारतीय आणि एकंदरच मुसलमान जगतातली व्यवहार प्रणाली आहे जी शब्द अजिबात पाळत नाही तिचे काय करायचे हा एक प्रश्न आहे. किंवा मते विकणे आणि मते विकत घेणे असा जर का एक व्यवहार भारतीय लोकांच्या लोकशाहीमध्ये घडत असेल तर त्यामागे असणारी व्यवहार बुद्धी व्यवहार प्रणाली काय आहे आणि माणसे अशी व्यवहार प्रणाली पार पाडायला एकमेकाला का मदत करतात? भारतीयांना शॉर्टकटचे आकर्षण का आहे ? नीतिमत्तेमध्ये ते का ठाम असत नाहीत आणि भ्रष्टाचाराकडे ते सहजरीत्या का वळतात? त्यांना त्यांच्या देवाची, ईश्वराची किंवा धर्माची किंवा कर्मफळाची भीती का वाटत नाही ? की भारतीय माणूस आतून नास्तिक आहे आणि वरून मात्र देव देव करतो ? भारता मधले देव हा फक्त व्यवहाराचा भाग आहे का ? ते नीतिमत्तेचे भाग का बनत नाहीत? की मुळात देवच असे आहेत की जे नैतिक नाहीत आणि त्यामुळेच भारतीयांचा सगळा नैतिक विचार गडबडलेला आहे आणि जर का असे देव निर्माण झाले असतील तर ते कोणी निर्माण केले का निर्माण केले ? भारतीय व्यवहार प्रणाली मधले हे अत्यंत कळीचे प्रश्न आहेत आणि ते सतत विचारले पाहिजे कारण आपण फक्त भ्रष्टाचारावर चर्चा करतो परंतु आपल्या व्यवहार प्रणालीमध्ये कसल्याही प्रकारचा व्यवहारिक फरक झालेला दिसत नाही . याची मुळे मुळात कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये आहे का किंवा भगवद्गीतेत सांगितलेल्या उपदेशामध्ये आहे का याची नीट चौकशी करण्याची आता वेळ आलेली आहे.
श्रीधर तिळवे नाईक
उपयुक्ततावाद ,व्यवहारवाद आणि सत्य ७ आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ का वाढली नाही श्रीधर तिळवे नाईक
भारतामध्ये व्यवहारवादाच्या आधारे आंबेडकर उभे राहिले आणि त्यांनी उत्कृष्ट एप्लीकेशन्स दिली हे मी मागच्या लेखात सांगितले . असं असून सुद्धा आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचे नेमके असे काय झाले की ती चळवळ बारगळली ?
अलीकडेच संदेश शालिनी संभाजी कर्डक याने आव्हान केले की "आंबेडकर ही सांस्कृतिक चळवळ उभी राहावी असं ज्यांना वाटते त्या सर्वांनी पुन्हा एकत्र येऊन चर्चेला बसुया"
यातली शब्द रचना लक्षात घ्या. उभी राहावी असं तो म्हणतो आहे याचा अर्थ सांस्कृतिक चळवळ आता उभी नाही हे तो मान्य करत आहे . वास्तविक आंबेडकर आणि नंतर दलित पॅंथर यांनी एवढे प्रचंड काम करून ठेवले होते की त्या आधारे प्रश्न यायला हवा होता पण एकंदरच ही पिढी साठोत्तरी आणि 90 उत्तरी लोकांनी काहीच केले नाही असे दाखवत असते कदाचित त्याचा हा आविष्कार असावा . आंबेडकरी संस्कृतिक चळवळ वाढत का नाही ? असा प्रश्न विचारण्याऐवजी आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ उभी का नाही असा प्रश्न यावा यामध्येच आपण नेमके कुठे उभे आहोत हे लक्षात आले पाहिजे
मी सतत आंबेडकर यांचे पुन्हा पुन्हा अत्यंत कठोरपणे निरीक्षण करतो कारण आंबेडकर यांना एकविसाव्या शतकात घेऊन जायचे असेल तर आंबेडकरांना ओलांडावे लागेल असे माझे स्पष्ट मत होते आणि आहे. त्या अंगाने मी परिवर्तनवाद का कोसळला नावाचे पुस्तक साईज विवेचन केलेले आहे ते सौष्ठवच्या अंकात आहे . पण आंबेडकरांच्या वर टीका करणारे काहीही वाचायचेच नाही असे जणू काय या सांस्कृतिक चळवळीतल्या लोकांनी ठरवूनच टाकलेले आहे त्यांना काही झाले तरी आंबेडकरांना देव करायचे आहे आणि देव चुकत नाहीत . त्यांना असे भय आहे की आंबेडकरांना देव केले नाही त्यांना जर का माणुस केले आणि जर का क्रिटिसिजमच्या विशेषता कठोर क्रिटिसिजमच्या क्षेत्रात आणले तर चळवळीचा अख्खा बेसच नाहीसा होईल . जणू काय आंबेडकर ही फार लेचीपेची अशी काहीतरी मांडणी आहे अशी त्यांची धारणा असावी आणि किंवा मग जर अशी धारणा नसेल तर घाबरता कशाला ? मुळातच आंबेडकर समजून घ्यायचे असतील तर आपणाला उपयुक्ततावाद आणि व्यवहार वाद या दोन्ही तात्विक विचार प्रणाली व्यवस्थित लक्षात घ्याव्या लागतात दुर्दैवाने आपल्याकडे आंबेडकरांचा विचार करताना उदारमतवादाचाच विचार होतो. आंबेडकरांच्या वर एक प्रभाव उदारमतवादाचा नक्की आहे परंतु त्याचबरोबर त्यांचा जो खरा आधार आहे तो व्यवहारवादाचा प्रागमॅटिझमचा आहे . हे मुळात अमेरिकेचे मुख्य तत्त्वज्ञान आहे आणि आंबेडकरांना अमेरिकेची सर्व ताकद माहिती होती आणि त्याचबरोबर अमेरिकेच्या मर्यादा सुद्धा त्यांना व्यवस्थित कळलेल्या होत्या आणि म्हणूनच भारताच्या संदर्भात त्यांनी स्वतःचा व्यवहार वाद विकसित करायला घेतला होता दुर्दैवाने त्यांना आयुष्य लाभले नाही अन्यथा आपल्याला आंबेडकर वादाचे आधुनिक स्वरूप सुद्धा व्यवस्थित दिसले असते . त्यांना हे व्यवस्थित लक्षात आले होते की आपणाला काही झाले तरी प्रथम आपल्या देशाला पुरोगामी केले पाहिजे आणि त्यांनी संविधानाची रचना करताना संपूर्ण संविधान अत्यंत पुरोगामी केलेले आहे . पण त्याचबरोबर हा देश कधी ना कधीतरी पुरोगामी वादाकडून संपूर्णपणे आधुनिकतिकडे जाणार याची त्यांना पूर्ण पूर्व कल्पना होती त्यामुळे त्या संदर्भात जो एक खुला अवकाश सोडणे गरजेचे होते तो अवकाश त्यांनी आपल्या संविधानामध्ये सोडलेला आहे किंबहुना त्यांचा हा व्यवहारवादी उदारमतवाद संविधान लवचिक बनवण्यामध्ये प्रचंड फंक्शनल आहे . अलीकडे संविधानाचे श्रेय काढून घेण्याची जे काय उद्योग चाललेले आहेत त्याला मी नेहमीच ऑब्जेक्शन घेतलेले आहे याचे कारण आंबेडकरांची एक समग्र दृष्टी आपल्याला संविधानामध्ये दिसते तिचा आधार कुठल्याही पुरोगामी चळवळीला प्रथम घ्यावा लागेल आणि मगच आधुनिकेकडे , उत्तर आधुनिकतेकडे आणि चौथ्या नवतेकडे वाटचाल करावी लागेल बसवेश्वर, नानक, शिवाजी,फुले आणि आंबेडकर हे आपले आरंभबिंदू आहेत याचा विसर कोणीच पडू देऊ नये पण त्याचबरोबर हेही तितकेच खरे की रेषा अनंताकडे जाते आरंभाकडे नाही . ही रेषा पुढे पुढे जाणार हे प्रथम स्वीकारायला हवे . बुद्ध म्हणाला होता की जर का तुम्हाला निर्वाण हवे असेल तर तुम्हाला शेवटी बुद्धाची सुद्धा हत्या करावी लागेल . याचा खरा अर्थ असा आहे की एक वेळ अशी येते की शेवटी तुम्हाला गौतम बुद्धाला सुद्धा ओलांडावे लागते आणि गौतम बुद्धाचे विचार हेच निर्वाणप्राप्ती मधला अडथळा बनून राहतात. गौतम बुद्धाला हे व्यवस्थित माहिती होते . शेवटी प्रत्येक जीव हा अद्वितीय असतो आणि त्याचे बुद्ध बनणेसुद्धा अद्वितीय असते . तुम्ही बुद्धाची कॉपी करून बुद्ध बनू शकत नाही . हीच गोष्ट आंबेडकर वादा बाबत आहे तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांची कॉपी करून नवे बाबासाहेब आंबेडकर बनू शकत नाही. आंबेडकर बनण्याचा अर्थ सतत सर्जनशील असणे असा आहे असा मी तरी घेतो . आंबेडकरांनी कधीच महात्मा फुले बनण्याचा प्रयत्न केला नाही ते फक्त आपल्या वर्तमानात कसे परिवर्तन घडवता येईल ते पाहत होते हीच गोष्ट आंबेडकरांच्या बाबतीत सुद्धा करणे आवश्यक आहे श्रीधर तिळवे नाईकला श्रीधर तिळवे नाईकच बनावे लागेल अन्यथा तो आंबेडकरवादी बनणे शक्य नाही तो फक्त आंबेडकरांची डुप्लिकेट बनेल प्रश्न असा आहे की हे बेसिक गृहीत आंबेडकरवादी चळवळ उभी करू इच्छिणाऱ्या लोकांना मान्य आहे का ?
बाबासाहेब आंबेडकरांची थोरवी यामध्ये आहे की त्यांनी आपला काळ हा महात्मा फुले यांचा काळ नाही आणि महात्मा फुले यांची थोरवी यात आहे की त्यांनी आपला काळ हा बसवेश्वरांचा शिवाजी महाराजांचा नाही हे ओळखलेले होते . या लोकांनी आपला काळ नीट ओळखला त्याप्रमाणे आपल्या समाजाची नवीन मांडणी केली आपला समाज कुठल्या दिशेने जायला पाहिजे हे नीट ओळखले आता सुद्धा आपणाला नवीन आलेल्या चौथ्या नवतेची नीट ओळख राहिली तरच आपण टिकू शकतो अन्यथा बाकीचे ओपन समाज इतक्या पुढे गेलेले आहेत की त्यांनी व्यवस्थित देवघेव सुरू केलेली आहे .
व्यवहार वादामध्ये प्रोसेस ही फार महत्त्वाची असते आणि सत्य म्हणजे वास्तवाशी केलेल्या वाटाघाटी असतात बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या काळात असलेल्या समाजाशी वाटाघाटी करण्यामध्ये अत्यंत एक्सपर्ट होते त्या काळामध्ये गांधी आणि आंबेडकर हे दोघं दोनच नेते असे होते ज्यांना या वाटाघाटी नीट जमत होत्या म्हणूनच त्यांचा समाजावर प्रचंड प्रभाव पडला बाकीचे नेते मात्र आजूबाजूला हिंडत राहिले पण वाटाघाटी करणे त्यांना जमले नाही किंबहुना भारतामध्ये साम्यवाद अंतिमतः अयशस्वी होण्याचे सर्वात मोठे कारण तो इथल्या समाजाशी वाटाघाटी करण्यामध्ये कमी पडला
. आंबेडकरांना साम्यवादी लोकांच्या पेक्षा भारतीय समाज अधिक कळला होता हीच तर त्यांची विशेषता आहे .
पुढच्या काळात ज्या वेळेला रशियातला मार्क्सवाद कोसळत होता त्यावेळेला त्या काळाला समकालीन असणारे आंबेडकरवादी हे चक्क मार्क्सवादाशी लेनिनवादाशी वाटाघाटी करत होते याचा परिणाम व्हायचा तोच झाला मार्क्सवाद तर कोसळलाच पण मार्क्सवादाबरोबर आंबेडकरवाद सुद्धा कोसळला . मी याला तयार नव्हतो पण ऐकतोय कोण ?
रावसाहेब कसबे यांच्यापासून शरद पाटील यांच्यापर्यंत अनेक जण कोसळत गेले याचे सर्वात मोठे कारण त्यांची डाव्या विचाराशी असलेली बांधिलकी होती . प्रत्यक्षात आंबेडकर स्वतः बुद्धाला फॉलो करत भारताचे समाजकारण हे नेहमी सुवर्ण मध्ये साधत असते हे ओळखून मध्य काढत होते तो मध्य आपणाला संविधानामध्ये सुद्धा सापडतो . इंदिरा गांधींच्या काळात हा मध्य पुन्हा डावा झाला तेव्हाच खरे तर दलित चळवळीला आंबेडकरवादी चळवळीला बदलण्याचा चान्स होता परंतु झाले उलटे नामदेव ढसाळ सारख्या लोकांनी इंदिरा गांधींच्या बरोबर युती केली प्रियदर्शनी नावाची कविता सुद्धा लिहिली जेव्हा जाग आली तेव्हा मग हिंदुत्ववादाचा रस्ता पकडला . पण तोपर्यंत उशीर झाला होता . त्यांना समजून घेणे दूर उलट त्यांच्यावरच बहिष्कार टाकला गेला . पण मुळात नामदेव ढसाळ यांच्या लक्षात आले नाही की खुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्येच एक इंदिरा गांधी लपलेली आहे आणि ती उजव्या विचाराची आहे. मुळात आर्थिक धोरण काय असा प्रश्न आपण आज सुद्धा शिवसेनेला विचारला तर उत्तरे सापडत नाहीत . माझे भाऊ कळत नकळत शिवसेना वादी होते पण आर्थिक धोरण काय असा प्रश्न विचारले की त्यांच्याकडे उत्तर नसायचे कारण बाळासाहेब ठाकरे हे आर्थिक धोरणाबाबत कधीच स्पष्ट नव्हते एक प्रकारचा उपयुक्ततावाद त्यांच्या ठायी नांदत होता जो सावरकरांच्या सारखाच होता. सावरकर सुद्धा आर्थिक धोरणाबाबत काहीच भूमिका घ्यायचे नाहीत जर हिंदुत्वाला समाजवादी धोरण पूरक ठरणार असेल तर ते समाजवादी झाले असते. प्रत्यक्षामध्ये हिंदुत्ववादाचा कल कळत नकळत उजवाच राहतो . प्रश्न असा आहे की तो मध्यभागी कसा आणता येईल किंवा मग त्याच्या विरोधात ठाम उभे राहून पर्याय कसा उभा करता येईल ? तुम्ही जर का डावा पर्याय आणणार असाल तर तो आता आऊट डेटेड झालेला आहे आणखी काही वर्षात कदाचित उजवा पर्याय सुद्धा कालबाह्य होईल असा माझा अंदाज आहे . शेवटी सर्वांना सुवर्ण मध्यात यावे लागते तो सुवर्णमध्ये हिंदुत्ववाद काढणार आहे की नाही हा खरा हिंदुत्ववादा पुढचा प्रश्न आहे पण हा प्रश्न केवळ हिंदुत्ववादा पुढचा नाही तो पुढे जाऊन 21 व्या शतकातल्या आंबेडकर वादा बाबत सुद्धा उपस्थित होणार आहे .
आंबेडकरांनी धार्मिक पातळीवर या देशाला ओळखून नव्याने बौद्ध धम्माला निर्माण केले त्यांना वाटले होते की ही दिशा बरोबर आहे आणि म्हणूनच मग संपूर्ण भारत बौद्धमय करण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली होती आज अवस्था अशी आहे की खुद्द पूर्वाश्रमीच्या महार असलेल्या त्यांच्या स्वतःच्या समाजात 100% लोक बौद्ध झालेले नाहीत उलट जवळजवळ 75 टक्के लोक स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायला लागले आहेत हा बदल आहे . यातच आता भर पडणार आहे ती तुम्ही धर्म बदलला असाल तर आम्ही तुम्हाला राखीव जागा देणार नाही या नव्या धोरणाची ! सध्या याबाबतीत काहीशी विचित्र भूमिका आहे कारण महाराष्ट्रामध्ये पूर्वाश्रमीच्या महारांची संख्या प्रचंड आहे आणि मतदानाच्या पातळीवर ती डावलायची की नाही असा भाजपला प्रश्न पडला आहे. ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशामध्ये मुसलमान मते बाजूला केली गेली त्याप्रमाणे पूर्वाश्रमीच्या महारांची मते साईडलाईन केली तर यश मिळेल की नाही असा प्रश्न विचारला जात आहे. एक गोष्ट मात्र आता स्पष्ट दिसते आहे ती म्हणजे पूर्वाश्रमीचे महारेतर समाज बौद्ध व्हायला फारसे तयार नाहीत. किंबहुना मायावतींची जी वाताहात झाली त्याला कारण त्यांचे टोकाचे बौद्ध धोरण जे त्यांच्या स्वतःच्या समाजाने स्वीकारायला नकार दिला . वस्तुस्थिती अशी आहे की धम्मांतराची त्याच्या वेगाची जी कल्पना आंबेडकरांनी केली होती तो वेग अतिशय मंद झालेला आहे. उलट मी सध्या जे पाहतो ते असे की हा समुदाय अधिकाधिक हिंदुत्ववादाच्या जवळ येत चाललेला आहे. अशा वेळेला त्याला युरेशियन स्मृतीमध्ये ढकलायचे की अनार्य शैव श्रुतीमध्ये ढकलायचा असा हा प्रश्न आहे. या प्रश्नांना बगल देऊन पुन्हा आंबेडकरवादी चळवळ उभी करणार असाल तर ती पुन्हा एकदा अपयशीच होईल . मी पुन्हा पुन्हा सांगत आलेलो आहे की बुद्धाच्या केंद्रस्थानी निर्वाण आहे . किंबहुना धम्म हा मुळातच निर्वाण केंद्री असतो आणि तिथेच तो धर्मापेक्षा वेगळा होतो . बुद्धाच्या भाषेत धम्म ही निर्वाणासाठी देण्यात आलेली शिस्त आहे आणि तो शास्ता आहे. शैव धम्माच्या भाषेत हे अनुशासन आहे आणि तेच मोक्षासाठी अत्यंत आवश्यक असते मोक्षासाठी धर्माचा काडीचाही उपयोग नाही . आणि मुख्य विचार हा असला पाहिजे . शैव , जैन आणि बौद्ध हे मुळातच धम्म आहेत शिस्त आहेत अनुशासन आहेत . त्यांचा धर्म बनवण्याचा प्रयत्न वारंवार झालेला दिसतो आणि अनेकदा लोक याला बळी पडताना दिसतात प्रश्न असा आहे की हे वाचवायचे कसे ? धम्म ही जीवनशैली आहे . ती वाचवायची कशी ? मुख्य म्हणजे एकदा का तुम्ही आंबेडकरांचे कर्मकांड केले की मग ही जीवनशैली वाचवण्याचे सर्व चान्सेस नाहीसे होत जातात. कुठलेही कर्मकांड शेवटी धर्मकांड तयार करते आणि एकदा का धर्मकांड तयार झाले की धम्म नाहीसा होत त्याचे धर्मात रूपांतर होते .
आज अवस्था अशी आहे की शैव , जैन आणि बौद्ध हे तीनच्या तीन धम्म वेगवेगळ्या दिशेने फुटलेले आहेत यातला सर्वात शॉकिंग धम्म हा जैन धम्म आहे कारण माहित नाही कसं पण तो आठव्या शतकापासून सातत्याने वैदिक होत चाललेला आहे . एकेकाळी त्यांची व शैव धम्माची स्पर्धा होती आणि नंतर बौद्ध धम्माशी स्पर्धा सुरू झाली होती आणि त्यामुळेच मतभेद झाले ही वस्तुस्थिती! पण याचा फायदा कोणाला मिळाला तर तो ब्राह्मण धर्माला मिळालेला दिसतो. "पेरिय पुराणम '' सारख्या ग्रंथांच्या मध्ये याचे प्रचंड प्रतिबिंब दिसते म्हणजेच आपापसात लढून या सर्व धम्मानी ब्राह्मण धर्माची वाट मोकळी केली यामध्ये बौद्ध तर नाहीसे झाले आणि जैन चक्क वैदिक झाले. कधी कधी तर वर्ण जाती व्यवस्थेचे कट्टर समर्थक झाले . आदीपुराण या जिनसेन यांनी लिहिलेल्या जैनपुराणांमध्ये त्यामुळेच वर्ण व्यवस्थेचे समर्थन आलेले दिसते. कल्पसूत्र सारख्या सतत वाचल्या जाणाऱ्या जैन ग्रंथामध्ये तीर्थंकर कधीही खालच्या जातीत किंवा ब्राह्मण जातीत जन्म घेत नाहीत असा सिद्धांत मांडण्यात आला .ते फक्त क्षत्रिय वर्णांमध्ये जन्म घेतात असाही सिद्धांत आला . पुढे पुढे तर महावीर यांचा जन्म ब्राह्मण घरी होणार होता परंतु नंतर तो क्षत्रिय गर्भामध्ये शिफ्ट झाला अशा प्रकारचा सिद्धांत आला इतका हा ब्राह्मण आणि जैन धर्मा मधला वाद टोकाला गेला याचा उलटा परिणाम पण झाला. मदुराई मध्ये जवळजवळ आठ हजार जैन साधूंना सुळावर चढवले गेले . हिला केवळ स्थानिक प्रतिक्रिया म्हणता येईल का हा एक फार मोठा प्रश्न आहे. प्रथम राजांना वापरून जैन लोकांनी बौद्ध मंदिरे आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली तिथून याची सुरुवात आहे. पुढे मग हळूहळू ब्राह्मण आणि जैन यांची युती होत गेली आणि कर्नाटकामध्ये जैन ब्राह्मण नावाची एक नवीन जातच तयार आहे . आता अवस्था अशी आहे की आज 21 व्या शतकात ही युती स्पष्टपणे प्रबळ झालेली दिसते.
म्हणजेच आपणाला दिसते असे की जैन ब्राह्मणधर्मा विरुद्ध होते हा इतिहास झाला आणि ते आता युतीत आलेत हे वर्तमान आहे
आता दुसरा जो बौद्ध धम्म आहे त्याकडे वळले तर काय दिसते ?बौद्ध धम्मप्रसार जवळजवळ थांबलेला आहे . त्याची गती अतिशय मंद आहे . तुम्ही जर का फक्त चिवट आशावादी असाल तरच आता याबाबतीत पॉझिटिव्ह राहू शकता अन्यथा पॉझिटिव्ह राहणे अवघड आहे .
मग शेवटी शैव धम्म उरतो आणि 2010 नंतर घडलेली सर्वात मोठी घडामोड हीच होती की अचानक शैव धम्म हा हिंदुत्ववादाच्या दिशेने सरकायला सुरुवात झाली . पुरोगामी शैव धम्मा बाबत प्रचंड उदासीन राहिले अपवाद कदाचित गौरी लंकेश वगैरे लोकांची झालेली हत्या पण त्यावेळी सुद्धा प्रतिक्रिया मार्क्सवादी फॉर्म मध्ये दिल्या गेल्या आणि आज त्यांना त्याचीच किंमत मोजावी लागतीये .
तेव्हा आंबेडकरवादी चळवळ उभी करताना जे पूर्वाश्रमीचे महार हळूहळू आता शैव झालेले आहेत आणि ज्यांची नवशैव बनण्याची प्रोसेस सुरू आहे त्यांना सामावून घेणार आहात की ही चळवळ फक्त नवबौद्धांची होणार आहे ? तुमचा व्यवहार काय आहे हे तुम्ही स्पष्ट करणार आहे की नाही ?
आंबेडकरवादी चळवळ अयशस्वी फेल होण्याचे सर्वात मोठे कारण ही चळवळ कळत नकळत फक्त पूर्वाश्रमीच्या महारांची बनून गेली . यावर उपाय एकच आहे तो म्हणजे काही झाले तरी दर वेळेला एक अध्यक्ष शैवधर्मी बीसी वा ओबीसी असावा एक पूर्णपणे अस्पृश्य प्रवर्गाच्या बाहेरचा असावा आणि एक नवबौद्ध असावा म्हणजेच काहीतरी नीट होत राहील अन्यथा नवसंघटन होणे शक्य नाही . आंबेडकर आमच्या समाजात जन्मले म्हणून तुम्ही आमच्या मागे या ह्या लॉजिकला आता अर्थ उरलेला नाही . तुमची स्वतःची वर्तमानकालीन योग्यता आणि पात्रता काय आहे हे तुम्हाला आता सिद्ध करावे लागेल . कारण जे नव बौद्ध झालेले नाहीत ते आता जागृत झालेले आहेत तुम्ही फक्त ते कसे अडाणी आणि अज्ञानी आहेत हे सांगत बसाल तर हे लोक आता हे खपवून घ्यायला तयार नाहीत . केवळ नव बौद्ध झाले नाहीत हे अडाणीपणाचे क्वालिफिकेशन होऊ शकत नाही . तुम्ही तसे ठरवाल पण तसे प्रत्यक्षात नाहीये . जे नव बौद्ध झाले नाहीत त्यांचाही काही विचार आहे . त्यांनाही काही डोके आहे यावर जरा विश्वास ठेवायला हवा . चळवळी ह्या एकमेकांच्या बद्दल विश्वास निर्माण करत वाढत असतात हा विश्वास निर्माण करण्यामध्ये पूर्वीच्या सर्व आंबेडकरवादी नेतृत्वांना अपयश आलेले आहे . वास्तविक ज्या वेगाने आंबेडकरांनी यश मिळवले होते ते दैदीप्यमान होते पण पुढे हा वेग शाबूत ठेवण्यामध्ये अपयश आले त्या अपयशाची अत्यंत कठोर मीमांसा आंबेडकर वादाला आज ना उद्या करावी लागेल . मुख्य म्हणजे आंबेडकर ज्या समाजात जन्मले त्याच समाजाला सगळी अक्कल दिलेली आहे असे समजण्याचे कारण नाही इतर बीसी प्रवर्गातले समाज आणि ओबीसी प्रवर्ग असलेल्या समाजांना आणि लोकांना सुद्धा अक्कल आणि व्यवहारिक अक्कल दिलेली आहे हे स्पष्ट स्वीकारावे लागेल .
कुठल्याही परिवर्तनवादी चळवळीपुढे दोन पर्याय असतात. यांच्यापैकी एक पर्याय निवडावा लागतो पहिला पर्याय हा नेहमीच विरोध करण्याचा असतो आणि दुसरा पर्याय हा प्रत्यक्ष त्या प्रस्थापितेमध्ये जाऊन ती प्रस्थापितता संपूर्ण बदलण्याचा असतो . नामदेव ढसाळ आणि रामदास आठवले यांनी दुसरा पर्याय निवडला कारण सद्यकालीन स्थितीमध्ये त्यांना तो योग्य वाटला या दोघांच्या पैकी कोणीही ओबीसी समाजाशी नाते का जोडू शकला नाही असा प्रश्न नक्की निर्माण करावा पण त्याचबरोबर या लोकांनी जो दुसरा पर्याय निवडला तो जर का तुम्हाला योग्य वाटत नसेल तर तो का योग्य नाही त्याचेही विश्लेषण झाले पाहिजे .
थोडक्यात काय आंबेडकर वादाचा व्यवहार हा १९८० नंतर पूर्णपणे फ्लॉप झालेला व्यवहार आहे आणि त्याची मीमांसा व्यवहारवादाच्या आधारे झाली पाहिजे किंवा मग निदान व्यवहाराच्या आधारे झाली पाहिजे .
अर्थात पुन्हा एकदा नाहीतर भारताच्या सामाजिक वाळवंटामध्ये नवीन काहीच घडत नाहीये कोणी घडवत नाहीये असे गृहीत धरण्याचा आणि शहामृग होण्याचा पर्याय उपलब्ध आहेच
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment