Moksh आफ्टर इफेक्ट्स

 बिबटे श्रीधर तिळवे नाईक 

आत्तापर्यंत बातम्या होत्या 

आणि आज थेट माझ्या घरात 

तू बसलेला 


पिवळ्या प्रकाशाचा ओझर पट्टा 

ब्रिलियंट काळोखात सायलेंट हिंसा 

तू माझा चट्टामट्टा करायला आलायस 

की नुसताच बसायला ?


शेतातली घरे ही शेतीपेक्षा

अधिक डेंजरस झालेत तुझ्यामुळे


एक धूड कधीही तुम्हाला आखूड करून 

बुडवू शकतं 

एकेकाळी पाल चुकचुकायची आमच्या मनात 

आता तू चूकचुकतोस 


तू चुकूनही आमच्या वाट्याला येऊ नयेस म्हणून काय करावे 


पूर्वी व्याघ्रेश्वरीला नवस करून प्रश्न सुटायचा 

आता तर तोही विश्वास राहिलेला नाही 


तू समोर निवांत बसलायस 

तू कोणाला खाऊन आलेला आहेस का ? 

की मला खाण्यासाठी आला आहेस ?



माणसांचा माग काढत हत्ती आले प्रथम 

पण ते माणसांना खात नव्हते 


तुझ्या बाबतीत तसे नाही 

तू आम्हाला खाऊ शकतोस 


तुझ्या कॅट फॅमिलीमुळेच 

आम्हाला अहिंसा ठाऊक आहे 

जग हिंसक आहे याचा 

तुझी फॅमिली साक्षात्कार आहे


हल्ली हल्ली तुझा रंग भगवा दिसायला लागलाय 


तुला भगव्या रंगाने काबीज केले आहे की काय ? 



तुझ्या नंतर सिंह येतील काय ? आणि चित्ते ?


काय आहे ?

जंगलात अन्न मिळेनासे झाले 

की माणसात येण्याचे उद्योग सुचतात 


तुमची कॅट फॅमिली म्हणजे चालती बोलती पॅशन 

सौंदर्याची संपत्ती आणि इच्छांचा डॅश ड्राईव्ह 


तुम्हाला शेअर करावे इतके तुम्ही कधीच हलके नव्हता 

त्यामुळेच तर पशुपालनामध्ये तुम्ही असावे की नसावे 

हा कायमचाच प्रश्न 


माणसे तुम्हाला यज्ञात बळी द्यायला सुद्धा चाचरतात 

ते एक वेळ मनुष्य बळी देतील पण तुम्हाला बळी देण्याचे धाडस करत नाहीत


नेमका शाकाहारीच प्राणी बळी देण्याची आयडिया कोणाला सुचली ?


कदाचित ब्राह्मणांना तुम्ही बळी म्हणून झेपलेच नसते 

स्वतःला वाचवता वाचता कदाचित तुम्ही ब्राह्मणांनाच खाल्ले असते 

आता इतकी रिस्क कोण घेणार? स्वतःच्या रक्षणासाठी खास क्षत्रिय नावाची जमात निर्माण करणारे लोक 

तुम्हाला बळी द्यायचे 

तर त्यांना क्षत्रिय लोकांना पुरोहित करायला लागायचे 

आता हे करणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड पाडून घेणे 

त्यापेक्षा परशुराम परवडला 

काल्पनिक का असेना पण क्षत्रियांचा नाश 

आणि पुढे विचारायचे नाही 

क्षत्रियांच्या सर्व नाशानंतर राम कृष्ण कसे आले ?


तुम्ही दांडगे आहात 

आणि दांडग्यांना पुरोहित सुद्धा घाबरतात 

म्हणूनच कदाचित तुम्ही यज्ञा बाहेर 



अहिंसा तुम्हाला वगळून मांडता येणार नाही 


तुम्ही माणसाच्या मनात मेंदूत सहजरीत्या प्रवेश करू शकता 

आणि त्याला कॅट फॅमिलीत इन्क्लुड करू शकता 


तुमच्या पासून खरा धोका हा असतो 



जीव जीवाला खाऊन जगतो 

जीव जिवंत खाऊन जगतो 

जिवंत राहण्यासाठी जिवंतच खावे लागते 


तुम्हाला झाडे चालले असती 

तर तुम्ही इथे कशाला आला असता 


तुम्हालाही जगायचंय 

आम्हालाही जगायचंय


माणूस मिश्राहारी नसता तर कदाचित त्याने एवढी प्रगती केली नसती 


दोन्ही बाजूने जिवंत राहणे चालणे 

याहून शस्त्र मोठे ते काय ?


६ 


तुम्ही पशुपणाचे परफेक्शन आहात 

त्यामुळेच अल्फा मेल म्हंटले की कॅट फॅमिली डोळ्यापुढे येते 


ना दुबळेपणा ना पश्चाताप 

निसर्ग ग्रेट असला तरी त्याला फाट्यावर मारण्याची तयारी 

भक्षावर प्रभुत्व मिळवण्याची तीव्र इच्छा 


जिथे भक्ष नाही तिथे पारितोषिक घ्यायला सुद्धा तुम्ही जात नाही 



आम्ही निसर्गावर विजय मिळवला म्हणजे नेमके काय केले 

या प्रश्नाचे उत्तर आजही माझ्याकडे नाही 


निसर्गाचे नियम शोधणे म्हणजे विजय?

निसर्गाचे नियम ओलांडणे म्हणजे विजय?

निसर्गाला गुलाम करणे म्हणजे विजय?


अजून पृथ्वी बाहेर आम्हाला ट्रॅफिक सुद्धा सुरू करता आलेला नाही 

आणि निसर्गावर विजय मिळवला हा थाट 

असा पोकळ रुबाब काय कामाचा ?


आम्ही या ब्रह्मांडात धड बच्चे कंपनी सुद्धा नाही 


आणि तरीही आम्ही तुम्हाला शिकार करत करत नाहीसे केले 


तुमचे टिकणे आता आमच्या सनातन दयेवर अवलंबून आहे 


याचा अर्थ तुम्ही आमच्यापेक्षा अधिक बच्चे आहात 


जंगलातून माणसांच्यात आला म्हणून तुमची लायकी थोडीच बदलणार आहे ?



तू बसला आहेस 

याचा मला त्रास नाही 

तू चुपचाप जाणार आहेस की नाही 

या प्रश्नाचा त्रास आहे 


गोळी तर मी तुला आत्ताही घालू शकतो 

पण तुला जिवंत ठेवण्यात मला शौर्य वाटते 


शेवटी भगवा झालास म्हणून काय झाले 

आहेस तर अल्पसंख्य


मुद्दा तुला मारण्याचा नाही 

मुद्दा तुला जंगलात पिटाळण्याचा आहे 


मला अजूनही व्हरायटी टिकवावीशी वाटते 



मी आता तुझ्या पुढे शेळी टाकावी का 

ऑस्ट्रेलियात टाकले तसे ससे आणून तुमच्यापुढे टाकावेत ?


काय आहे शेळ्या फारशा संख्येने वाढत नाहीत 

ससे मात्र संख्येने प्रचंड वाढवता येतात 

प्रश्न फक्त ते किती गवत खातील हा आहे 

शिवाय पुन्हा तुम्हाला ससे किती काळ आवडतील हाही प्रश्न 


भूक लागली की तुम्ही ससे ही खाल माहिती आहे मला 

पण माणसांच्या बदल्यात ससे 

हे काही वाईट डीलिंग नाही 


तुला भोजन मिळाले पाहिजे 

आणि तू वाचलाही पाहिजेस 


जो मला मारायला आलाय 

त्याला मी वाचवायचा विचार करतो 

इथूनच मोक्षाची सुरुवात असते 


तुझे बरे 

तुला काही मोक्षबिक्ष लागत नाही 


भूक लागली शिकार मिळाली 

जिंदगी सार्थक झाली 


शिवाय पुन्हा कॅट फॅमिलीचा म्हणून वर्चस्व आहेच 


मी पडलो हत्तीवादी 

आणि तू पडलास कॅट फॅमिलीवादी 


तुझ्या सत्तापिपासू माजाचे काय करायचे हा एक प्रश्नच आहे 


मी शेळी फेकतोय 

आणि तू झपकन तिच्यावर झेपवतोयस 


म्हणजे मी तुला बळीच दिला तर 

बळी घेणारा देव समजून 


आता मी माझे तोंड मोक्षाला कसे दाखवू ?


श्रीधर तिळवे नाईक 

(मोक्ष सिरीज मधील मोक्ष आफ्टर इफेक्ट्स या काव्यफायलीतून)

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे