जाणीव, ज्ञान ,आत्मा आणि मोक्ष श्रीधर तिळवे नाईक
प्रश्न : जाणीवेला जाणिवेची जाणीव असते का ?
श्रीधर तिळवे नाईक: शैव श्रुतीमध्ये हा प्रश्न अधिक व्यापक पद्धतीने विचारायला हवा म्हणजे शिवाला जीवाची जाणीव असते का ? पण तुम्ही पाश्चात्य परंपरेतून आलेला आहात म्हणून तुम्ही त्या पाश्चात्य परंपरेमधून हा प्रश्न विचारत आहात. हरकत नाही . पाश्चात्त्य देशांमध्ये consciousness हा फार महत्त्वाचा मानला गेलेला आहे. भारतामध्ये या प्रश्नाची उत्तरे तीन अंगाने येतात पहिले अंग अर्थातच शिवाचे आहे शिव हा जिवात कसा असतो तर त्याचे उत्तर आहे प्राणरूपात ! तुम्ही जर का हाच प्रश्न युरेशियन श्रुतीला विचारालात तर ते म्हणतील आत्मा रुपात ! त्या उलट तुम्ही जर का बुद्धाला हा प्रश्न विचारला तर तो म्हणेल आत्मा नाही म्हणजेच तो अनात्मवाद सांगेल आणि तो बौद्ध तत्त्वज्ञानाचा फार मूलभूत नियम आहे . प्रत्यक्षात घडली काय आहे तर शैव श्रुतीचे उत्तर हे पॉझिटिव्ह पद्धतीने आलेले आहे प्राण असतो प्राण जातो. प्राण गेला की देह नि:ष्प्राण होतो स्वर्ग आणि नरकाच्या गोष्टी स्पष्टपणे आधीच नाकारल्या गेल्या होत्या . त्या उलट युरोपियन श्रुती जिथून आली तिथे मात्र आत्मा हा सनातन आणि अमर अक्षर होता . मेल्यानंतर तो शाबूत राहत होता . स्वर्गाला किंवा नरकाला जात होता . पुढे पुढे तर अनेक लोक आले म्हणजे ब्रह्मलोक वगैरे साहजिकच जेव्हा बुद्ध आला तेव्हा त्याला प्रथम आत्मा नाकारावा लागला मात्र प्राण असतो असे ठाम विधान त्याने केले नाही पण प्रत्यक्षात ते केले असते तर बरे झाले असते . पण त्याला पुढचे प्रश्न टाळायचे होते म्हणजे प्राण असेल तर तो अमर असतो का अक्षर असतो का वगैरे तो त्यात शिरतच नाही . अनेकदा तर तुमचं तुम्ही शोधा असे सांगतो जे अलीकडे जे कृष्णमूर्ती यांनी केले होते .
प्रश्न असा आहे की मग प्राण म्हणजे जाणीव का ? माझ्या मते देहाला प्राणाचे जे अंग जाणवते ते जाणीव होय. पण प्राणाचे अंग जे मोक्ष व्याकूळ असते ते अनेकदा जाणिवेच्या पलीकडे असू शकते जिला आपल्याकडे एक फार चांगला शब्द आहे शहाणीव! आणि या दरम्यान जे असते त्याला आपण नेणीव म्हणतो . जाणीव ही नेहमीच देहाची, जगण्याची आणि संसाराची असते त्या उलट शहाणीव ही नेहमी शिवाकडे तोंड करून असते . तीच आपणाला सतत त्या तिथे पलीकडे काही आहे अशी पोकळी टोचवत असते . त्यामुळे जोपर्यंत मोक्ष मिळत नाही तोपर्यंत माणसाची अस्वस्थता कधीही संपत नाही.
आता या जाणिवेला जाणीव असते का ? मुळातच ही देहमुखी असते त्यामुळे सायन्सच्या भाषेत सांगायचे तर ती फिजिकल असते. अनेकदा तर मेंदूचा एक भाग मेंदूच्या दुसऱ्या भागाला पाहतो आहे अशा रूपात ती येते . कधी कधी पेशीचा एक भाग उरलेल्या पेशीला वा अवयवाला वा पेशीच्या एखाद्या भागाला पाहतो आहे अशा रूपात ही ती अस्तित्वात येते . मोक्षाच्या साधनेमध्ये धारणा नावाचा एक प्रकार आहे तो अनेकदा देहातल्या एका जागेची जाणीव दुसरीकडे घेऊन जाणे घडवत असतो. त्यासाठी तुम्हाला विलक्षण फोकस लागतो आणि म्हणूनच मग प्राणायाम आणि आसन या आवश्यकता होतात . पण संपूर्ण जाणीव स्वतःला पाहू शकते का? म्हणजेच जेव्हा अंशात्मक निरीक्षण करायचे असते तेव्हा ती ऑब्जेक्ट म्हणून पाहू शकेल परंतु जेव्हा स्वतःलाच पाहायचे असेल तेव्हा काय ? इथे मग अनेकदा निरीक्षेय आणि निरीक्षक यांच्यातले द्वैत संपवावे लागते पण जे उरते ते निखळ जागरण असते शैव लोकांचा हा एक खास शब्द आहे जागरण ! त्यात जग आणि जगणे नावाच्या आवरणातून मुक्त होणे अभिप्रेत आहे. तर हे जे जागरण आहे ते निरीक्षक आणि निरीक्षेय यांना नाहीसे करते आणि फक्त साक्षात निरीक्षण उरते यासाठी आपल्याकडे साक्षीभाव असाही शब्द आहे. इथे नेमके काय होते तर जो प्राण आहे तो संपूर्ण अवतरतो. त्यामुळे कुठलाही निरीक्षक उरत नाही . म्हणूनच ध्यानाची आणि धारणेची सुरुवात करताना प्राणायाम केला जातो . जगताना आपणाला इतर गोष्टींच्याकडे लक्ष द्यावे लागते . हे लक्ष देणे ऑब्जेक्टिव्ह निरीक्षण करू देत नाही . जगण्याची गरज काय आहे त्याची संदर्भ चौकट अनेकदा आपले निरीक्षण ठरवते . अनेकदा फक्त निखळ ज्ञानासाठी असेल तर ज्ञानाची गरज काय आहे किंवा ज्ञान शाखेची गरज काय आहे ती गरज आपले निरीक्षण ठरवायला लागते आणि अनेकदा भल्या भल्या ज्ञानसंस्थांच्या हे लक्षात येत नाही . जेव्हा ज्ञान संस्था राजकारणाच्या ताब्यात जातात तेव्हा मग सर्व निरीक्षणे राजकीय व्हायला लागतात आणि ज्ञानवाढ थांबते त्या ज्ञान शाखेचा विकास थांबतो . धार्मिक राजवटीमध्ये नेहमीच धार्मिक राजकारण ज्ञानसंस्था ताब्यात घ्यायला बघते आणि मग ज्ञानाची हत्या व्हायला सुरुवात होते. कुठल्याही ज्ञानाचा आधार सुरुवातीच्या संदर्भात नेहमीच ऑब्जेक्टिव्ह निरीक्षण असते . म्हणूनच ज्ञान मुक्त ठेवणे अत्यंत आवश्यक असते .त्यामुळे समाजाचे आरोग्य चांगले राहते . त्यामुळेच अनेक भलेभले धार्मिक नेते जेव्हा त्यांच्यावर ऑपरेशन करायची वेळ येते तेव्हा परदेशात जातात कारण परदेशात त्यांना आपल्या देहाच्या संदर्भात रोगाच्या संदर्भात जास्त ऑब्जेक्टिव्हली निरीक्षण केले जाईल याची जास्त खात्री असते .
मग ज्ञानाची सर्वात मोठी मर्यादा कोणती? तर ज्ञान हे नेहमी भूतकालीन असते . म्हणूनच ज्ञानतंत्रामध्ये सुद्धा ज्ञान आणि ध्यान वेगळे काढले जाते . ध्यान वर्तमानकालीन प्राणाची प्रक्रिया असते जिथे संपूर्ण प्राणाचे जागरण उपस्थित असते . ध्यानामध्ये कायमच ज्ञान हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करते . आणि हे ज्ञान जर का फक्त माहितीयुक्त असेल तर मग ते पूर्वग्रह म्हणून फंक्शन करायला लागते . ज्ञान हे मुळातच माहितीच्या कोडिफिकेशन वर अवलंबून असते . आणि त्यामुळेच कधी कधी ज्ञान डीकोडीफाय करावे लागते . जाणीव सुद्धा डी कोडीफाय व्हावी लागते. अनेकदा तुमचा मी म्हणजे दुसरे तिसरे काही नसून कोडी फिकेशनचा सर्वात मोठा गठ्ठा असतो. त्यातूनच मग सेल्फकॉन्ससनेस आत्मजाणीव नावाचा प्रकार आपल्याला जाणवतो . इथे जागरणाच्या जिवंत प्रक्रियेपेक्षा ज्ञानाचे मेलेले अथवा सेट झालेले कोडिफिकेशन वा सेटिंग जास्त फंक्शनल असते. त्या उलट जेव्हा कोडिफिकेशनपेक्षा आत्म व्याप्तीने मोठा असतो तेव्हा त्याला आपण आत्मभान म्हणतो .अनेकदा आत्मभानामध्ये जाणीव जास्त चांगल्या रीतीने फंक्शन करत असते . मात्र आत्मा शोधायला आत्मभान गेले की काहीच उरत नाही काहीच दिसत नाही काही जाणवत नाही कारण आत काहीही नसते. आत्मभानाचा सर्वोच्च क्षण अनात्मता आहे . अनित्यता आहे . तो जर अतिशय तीव्र झाला तर शून्यात जाण्याची शक्यता निर्माण होते. पण अनेकदा लोक घाबरतात कारण काही नसण्यालाच लोक घाबरत असतात. अनेकांना तर आत्मग्लानी येते. आपणाला मुळातच इतक्या गोष्टींची सवय लागलेली असते की आपण ज्ञानाला सुद्धा ज्ञात असलेल्या गोष्टींचा गठ्ठा आणि कट्टा करून टाकतो . साहजिकच या दोन्हींचा त्याग करायचा या कल्पनेनेच आपली सवय गांगरते . सविकल्प समाधीला अनेक लोक त्यामुळेच पोहोचत नाहीत. मग हळूहळू ध्यानाची सुद्धा सवय होऊन जाते आणि काही जणांना तर नशा चढायला लागते. मेंदू ही अशी गोष्ट आहे जिला तुम्ही स्वतः वाटेल ते बनवू शकता आणि मेंदू ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला त्याला लागलेल्या सवयीच्या जीवावर त्याला हवा तसा शरीराला डान्स करायला लावू शकते.
त्यामुळेच आम्ही नेहमी म्हणतो की मोक्ष म्हणजे केवळ ज्ञाताचा अंत नव्हे तर ज्ञानाचा सुद्धा अंत होय आणि तो जोपर्यंत प्राण ज्यात जाणीवही येते शून्यात म्हणजे शिवात विलीन होत नाही आणि निखळ शून्य तुमच्यात उरत नाही तोपर्यंत घडत नाही .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment