कलाकृतीचा प्रभाव, आशय ,अभिव्यक्ती , अवस्था आणि वेदांत श्रीधर तिळवे नाईक
भारतीय कला शास्त्रामध्ये जे काही प्रश्न असतात त्यामध्ये आशय आणि अभिव्यक्ती यांचा फार विचार केला जातो त्यातील शैव हे कलाशास्त्र आशय प्रधान आहे तर युरेशियन कला शास्त्र हे अभिव्यक्ती प्रधान आहे त्यामुळेच शैव भावांचा विचार अत्यंत खोलात जाऊन करतात आणि सात्विक तात्विक महात्विक या आशयाच्या तिन्ही डायमेन्शन ना अतिशय महत्त्व देतात . याचा अर्थ ते अभिव्यक्तीचा विचार करत नाहीत असे नाही परंतु ही अभिव्यक्ती या तीन गोष्टींना व्यक्त करण्यासाठी आहे याची त्यांना स्पष्टपणे जाणीव आहे याचे कारण ते आशय आणि अभिव्यक्ती यांच्यात शिवशक्ती यांच्याप्रमाणेच युग्म अवस्था असते असे मानतात. याशिवाय मग ते अभेद, भेद, विशिष्ट भेद ,अतिभेद व पूर्ण भेद अशा पाच अवस्था मान्य करतात.
त्या उलट युरेशियन श्रुतीमध्ये मुळातच आशय काय व्यक्त करायचा हे आधीच ठरलेले आहे, वेद ,रामायण ,महाभारत , पुराण अपवादात्मक वेळेला ब्राम्हण ,स्मृती, आरण्यक यांच्यातील कथांचा वापर करून तुम्ही अभिव्यक्ती केली पाहिजे असा युरेशियन काव्यशास्त्राचा आग्रह आहे म्हणजेच इथे एका अर्थाने आशय आधीच निश्चित करण्यात आलेला आहे. नवीन कथा निर्माण करण्याचे स्वातंत्र्य नाही. शैव कला शास्त्रामध्ये तुम्हाला असे नवीन कथा निर्माण करण्याचे नवीन आशय निर्माण करण्याचे पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. त्यामुळेच अनेक नाटककार हे शैव आहेत . त्या उलट भासासारखा युरेशियन परंपरेत सामावला गेलेला नाटककार नेहमीच आधीच्या कथा उचलतो. अगदी तंजावरच्या नाटकामध्ये सुद्धा शैव परंपरेमध्ये जे नाटक निर्माण होते ते नवीन कथा निर्माण करते त्या उलट युरेशियन परंपरेमध्ये मात्र नवीन कथा नवीन आशय निर्माण करण्याचे स्वातंत्र्य नाही. आपल्याकडच्या अनेक संगीत नाटक लिहिणाऱ्या लोकांना युरेशियन लोकांच्या तावडीतून कशी सुटका करून घ्यायची हा प्रश्न त्यामुळेच पडलेला दिसतो आणि त्यामुळेच अनेकदा या लोकांनी पौराणिक कथा महाकाव्यातल्या कथा अशाच निवडलेल्या दिसतात . एरोशियन आशयाचा दहशतवाद किती प्रभावी होता हे त्यामुळे स्पष्ट होते त्यामुळेच ज्ञानदेवांच्या ज्ञानदेवीचा भावार्थ दीपिकेचा ज्ञानेश्वरीचा गाजावाजा होतो कारण ती गीता प्रमाण मानते त्याउलट तुकाराम जोपर्यंत पारंपारिक भाषेत बोलतो तोपर्यंत ऑब्जेक्शन येत नाही परंतु ज्या क्षणी तुकाराम स्वतःचे अनुभव मोठ्या प्रमाणात सांगायला लागतो आणि श्रुती स्मृती प्रमाण नाकारायला लागतो त्या क्षणी त्याला त्याची गाथा बुडवण्याचा आदेश युरेशियन श्रुती देते .आशय आणि अभिव्यक्ती यांच्या संदर्भात या दोन टोकाच्या भूमिका भारतीय संस्कृतीमध्ये कायम नांदत आलेल्या आहेत. शैव इंडियन श्रुतीला कलावंतांचे स्वातंत्र्य मान्य आहे तर युरेशियन श्रुतीला कलावंत स्वतंत्र असतात हे मान्य नाही त्यांनी श्रुतीस्मृती प्रामाण्य स्वीकारले पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. हा आग्रह त्यांनी फक्त भारतातच चालवला असे नाही .जेव्हा हे लोक युरोपमध्ये ग्रीस मध्ये घुसले तेव्हा या लोकांनी तिथे स्वतःचा रोमन कॅथोलिक धर्म निर्माण करून तिथे सुद्धा हे कलावंतांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नष्ट केले आणि बायबल मधील असेच प्रमाण माना आणि त्याप्रमाणे नाटक करा असा आदेश काढला . गोव्यामध्ये या आदेशाचा किती खोल परिणाम झाला होता याची कल्पना गोवेकरांनाच फक्त येऊ शकते . याचे कारण हे लोक पूर्ण पणे कायमच साम्राज्यवादी होते .ही त्यांची प्रवृत्ती आज सुद्धा नष्ट झालेली नाही आणि कला क्षेत्रामध्ये आज सुद्धा ती ऍक्टिव्ह आहे .
भारतामध्ये अभिव्यक्ती आणि आशय यांच्या संबंधांची चर्चा मुळातच तंत्रापासून सुरू होते. भगवान शंकर यांनी जी काही उत्तम तंत्रे दिली आणि ज्यांचा भारतीय जीवनावर प्रचंड प्रभाव पडला त्यातील एक तंत्र म्हणजे अवस्था तंत्र होय . हे तंत्र त्यांनी सुवास यांच्या पूर्वजाला दिले होते ज्याचे नाव स्थवीर होते त्यामुळे ते तंत्र स्थवीर तंत्र म्हणून पाशुपत धारेमध्ये प्रसिद्ध होते आणि आमच्यासारख्यांना शिकवलेही जात होते . या तंत्रातले सर्वात गाजलेले सिद्ध म्हणजे सुवास होत ज्यांना नाईलाजाने मान द्यावा लागतो म्हणून ज्यांना पुढे युरेशियन श्रुतीने सामावून घेतले आणि खलनायकाच्या कामासाठी वापरले आणि ज्यांचे नाव दुर्वास ठेवले गेले पुराणांनी त्यांच्या नावाने भरपूर शंख केलेला आहे . अगदी कुंतीला सुद्धा जो कर्ण नावाचा पुत्र मिळतो तो त्यांच्यामुळे मिळतो. आणि त्यामुळेच पुढे महाभारत घडते . शकुंतलेच्या संदर्भात सुद्धा त्यांची निगेटिव्ह भूमिका आहेच. ते अत्यंत क्रोधिष्ठ दाखवायचे आणि त्यांच्याकडून ही निगेटिव्ह कामे करून घ्यायची अशी युरेशियन लेखकांची स्ट्रॅटेजी दिसते . शिवपुराणांमध्ये सुदर्शन चक्राच्या निर्मितीसाठी म्हणून एक कथा येते तिथे ते साक्षात शिव आहेत त्यामुळे सुदर्शन चक्र त्यांना मारू शकत नाही म्हणजेच ते बलवान आहेत पण अलीकडे ही कथा व्यवस्थित बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे कारण कारण शैव लोकांचा अपमान करणे सुरू झाले आहे . साहजिकच मग आता ब्रह्म आणि शिव सुदर्शन चक्रापासून त्यांना वाचवू शकत नाहीत आणि त्यांना माफी मागावी लागते. एखाद्या प्राचीन शैव सिद्धाचे आशयन युरेशियन श्रुतीमध्ये कसे बदलत जाते ते बघण्याजोगे आहे . या मागचा उद्देश स्पष्ट आहे तो म्हणजे आद्य शंकराचार्यांच्या आधी अवस्था तंत्राची काही परंपरा होती हे सत्य नष्ट करणे.
सिद्ध सुवास यांच्यानंतर पुढे इसवी सन पूर्व पाचव्या शतकात आचार्य शंकर यांनी या अवस्था तंत्राची अतिशय व्यवस्थित मांडणी केली आणि अद्वैत अवस्थेचा प्रचंड पुरस्कार केला . त्यांचे सर्व वांग्मय शैव वाङ्मय होते आणि हे अलीकडे आद्य शंकराचार्य यांच्याशी जोडले जाते. प्रत्यक्षात ही दोन वेगळी व्यक्तिमत्वे आहेत .त्यानंतर साधारणपणे आठव्या शतकामध्ये पुन्हा एकदा आद्य शंकराचार्य यांनी हे अवस्था तंत्र वेदांत म्हणून मांडले आणि त्याची सांगड नंतरच्या शंकराचार्यांनी युरेशियन धर्मांशी विशेषतः वैष्णव धर्माशी घातली आणि वेदांत धर्म निर्माण केला पुढे हा वेदांत आणि पौराणिक धर्म एकत्र येऊन हिंदू धर्म नावाचा धर्म मूर्तिपूजकांचा धर्म म्हणून मुस्लिम लोकांनी प्रतिस्पर्धी पण जनतेचा धर्म म्हणून उभा केला . त्यांना हिंदूही कॅटेगरी निर्माण करणे गरजेचे होते कारण त्यांना जिझिया टॅक्स बसवायचा होता . एका अर्थाने हिंदू ही मुस्लिम जीझिया करनिर्मित धर्मसंस्था आहे . भारतात सर्वप्रथम हिंदू धर्म असा काही धर्म अस्तित्वात आला असेल तर तो प्रामुख्याने मुस्लिम कालखंडातच आला अन्यथा मुस्लिम येण्याआधी भारतामध्ये स्पष्ट पणाने शैव वैष्णव ब्राह्मण बौद्ध जैन असे पाच प्रमुख धर्म होते आणि या पाच धर्मांच्या संदर्भात काय करायचे याचे स्पष्ट उत्तर मुस्लिम लोकांना सुरुवातीला मिळत नव्हते मात्र त्यांना एवढे कळत होते की या लोकांना आपण काफीर म्हणू शकतो आणि त्यांच्यावर कर लादू शकतो . हे पाचही धर्म मूर्ती पूजक होते आणि याचा अर्थ त्यांच्यावर एकत्रीत पणे जिझिया बसवता येण्याजोगा होता त्यामुळेच त्यांना हिंदू म्हणून हा मूर्तीपूजकांचा धर्म आहे असे सांगता येणे आणि ह्या धर्माचे लोक जिझियापात्र असतात असा कायदेशीरपणे घेता येणे शक्य होते त्यामुळेच शैव आणि वैष्णव यांना एकच समजण्याची चूक मुस्लिम लोकांनी केली जी ब्राह्मण लोकांच्या पथ्यावर पडली आणि त्यांना शैवधर्म पूर्णपणे गिळण्यासाठी ही फार चांगली संधी आहे हे लक्षात आहे. मुस्लिम धर्माचा प्रतिकार करण्याऐवजी शैव धर्म कसा गीळता येईल याचाच विचार या काळामध्ये जास्त झालेला दिसतो. पुढे इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा हाच उद्योग ब्राह्मण धर्माने केलेला आहे. म्हणजे परकीय धर्माची चाकरी आणि शैव-धर्माशी शत्रुत्व असा काहीतरी प्रकार चाललेला दिसतो . आणि या दोन्ही गोष्टी अत्यंत शांतपणाने आवाज न करता चाललेल्या होत्या आणि आहेत .
पण या सगळ्याचा एक फार मोठा परिणाम असा झाला की अवस्था विचार हा भारताच्या केंद्रस्थानी आणण्याचा उद्योग आद्य शंकराचार्यांच्या नंतर सुरू झाला . शैव लोक हे अवस्था तंत्र त्यांचे असल्याने स्वीकारत होतेच पण त्यापेक्षा वेगळी गोष्ट अशी झाली की अचानक सर्व युरेशियन लोकांनी हे अवस्था तंत्र स्वीकारले आणि त्यातूनच अद्वैत दर्शन जन्माला आले जे अलीकडे अचानक केंद्रस्थानी आणले गेले . किंबहुना हिंदुधर्म म्हणजे वेदांत असे म्हणणारे खूप लोक आहेत . स्वामी विवेकानंद हे त्यापैकी एक! त्यामुळेच ते तामिळ ही माझी आई असे म्हणतात आणि संस्कृतला बाप म्हणतात . कारण त्यांच्या आधी आद्य शंकराचार्य असे होते त्यांना शह देण्यासाठी म्हणूनच रामानुजाचार्य यांनी वैष्णव वेदांत निर्माण केला आणि तोही प्रचलित झाला कारण तोही अवस्था तंत्राशीच निगडित होता आणि अद्वैत की द्वैत असा प्रश्न होता संपूर्ण अवस्था तंत्र यामुळे अचानक भटकले .
या सगळ्या वेदांतात आचार्य लोकांची नावे लक्षात घेण्या जोगी आहेत पहिले शंकर मग राम मग माधव आणि वल्लभ म्हणजे कृष्ण असा हा क्रम आहे आणि त्यामुळेच हे सर्व योगायोगाने घडून हे सर्व आचार्य खरोखर होऊन गेले की हे काल्पनिक होते असा प्रश्न अलीकडे निर्माण होतो आहे.
खरे तर अवस्था तंत्र हे मोक्ष मिळवण्याचे तंत्र आहे आणि त्याचा धर्माशी काडीचाही संबंध नाही ही गोष्टच विसरली गेली आणि अद्वैत दर्शनाचा वापर स्मृतीला प्रस्थापित करण्यासाठी करण्यात आला .मुख्य म्हणजे आद्य शंकराचार्यांच्या मांडणीमधून शंकराचार्य नावाचा एक मोठा धार्मिक आकारच मूर्तिपूजकांच्या बोकांडी मारण्यात आला.
कलेच्या क्षेत्रामध्ये याचा काही विचार होणे अटळच होते . म्हणजे ज्ञानदेव हे आद्य शंकराचार्यांना जो मान देतात तो कलावंत आणि होऊन गेलेला तत्त्वज्ञ यांच्या संबंधावर प्रकाश टाकणारा आहे . यातला सर्वात मोठा विचार हा आशय आणि अभिव्यक्ती यांच्यामध्ये नेमके काय अवस्था नाते असते हा आहे हा प्रश्न प्रथम तात्विक आहे याचे कारण असे की तत्त्वज्ञानामध्ये आणि मोक्षामध्ये सुद्धा सर्वात मोठा प्रश्न सत्य व्यक्त करता येते का? सत्य अभिव्यक्त करता येते का आणि सत्य आणि सत्याची अभिव्यक्ती यांचे संबंध काय आहेत हा आहे .
माझ्या मते सत्य वेगळे आणि सत्याची अभिव्यक्ती वेगळी . अनेकदा सत्य उपस्थित असते परंतु त्या सत्याची अभिव्यक्ती मात्र ते सत्य न सापडल्याने होत नाही याचा अर्थ ते सत्य अस्तित्वात नसते असे नसते. म्हणजे आपणाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आकाशगंगा आहेत हे सत्य माहित नव्हते त्यामुळे त्याची अभिव्यक्ती कधी झालीच नाही पण याचा अर्थ ते सत्य अस्तित्वात नव्हते किंवा नाही असा होत नाही दुसरी गोष्ट सत्य हे अनेक भाषांच्या मध्ये व्यक्त होत असते म्हणजे न्यूटनचे जे नियम आहेत ते इंग्लिश मधून जसे व्यक्त होतात तसे ते मराठी मधून सुद्धा व्यक्त होतात याचा अर्थ सत्य हे अभिव्यक्तीपासून वेगळे आहे आणि त्याच्या अभिव्यक्तीची भाषा वेगवेगळी असू शकते . किंबहुना सत्य आणि अभिव्यक्ती या दोन गोष्टी वेगळ्या असल्यानेच भाषांतरे होऊ शकतात किंबहुना भाषांतर म्हणजे भाषांच्या तला भेद अभिव्यक्ती मधला भेद मिटवून सत्य आणि अभिव्यक्ती यांच्यात युग्म अथवा अद्वैत प्रस्थापित करणे
प्रश्न असा आहे की आद्यअवस्था कोणती ? या अवस्थेला काय म्हणायचे ? तर आद्य शंकराचार्य यांनी जी अवस्था वगळली तीच अवस्था मुळात आद्य अवस्था आहे ही अवस्था म्हणजे युग्म अवस्था ! आद्य शंकराचार्य यांनी ती का वगळली कारण मुळात सुवासाच्या काळातच ती वगळण्याला आरंभ झाला होता. याचे कारण युरेशियन संस्कृतीचा काम संस्कृती बाबत असलेला सोवळेपणा ! युग्म म्हणजे या लोकांना ताबडतोब सेक्स आठवत होता आणि आज सुद्धा अनेकदा सेक्स आठवतो वास्तविक शैव श्रुतीमध्ये शिव आणि शक्ती हे युग्म रतिक्रीडेमुळे संसार निर्माण करते इथे रति या शब्दाचा अर्थ पूर्णपणे एकमेकात विलीन होणे हा आहे . त्याचा अर्थ सेक्स असा नाही . एकदा संसार निर्माण झाला की मग शक्ती ही पूर्णपणे शिवा पासून वेगळी होते आणि संसाराचा विस्तार सुरू होतो ती शिव आकारांच्या मध्ये शरीरांच्या मध्ये प्राण म्हणून मिरवते परंतु त्याला पूर्णपणे शरीराने झाकून टाकते . साहजिकच अनंत शरीरे निर्माण होतात . कारण शक्ती अनंत असते ती थांबायचे नाव घेत नाही . मोक्ष इच्छा म्हणजे शक्तीला थांबवण्याची झालेली इच्छा होय. तिला अलीकडे मुमुक्षा सुद्धा म्हणतात .
म्हणजेच आद्य अवस्था युग्म आणि अद्वैत अवस्था आहे आणि त्यामुळेच सत्य आणि अभिव्यक्ती असे युग्म आपल्याला नेहमीच प्रत्ययाला येते . त्यातील आशय पुल्लिंगी असे तर अभिव्यक्ती स्त्रीलिंगी होते . आशय स्त्रीलिंगी असेल तर अभिव्यक्ती पुल्लिंगी होते जी कलाकृती निर्माण होते ती द्विलिंगी असते . ती एका अर्थाने संसारच असते हा संसार चिन्ह सृष्टीचा संसार असतो. तिच्यात कलाकाराचा प्राण असतो. आणि जर का असा प्राण नसला तर आपण त्या कलाकृतीला नि:ष्प्राण कलाकृती म्हणतो. कुठलीही कलाकृती चांगली असण्याचा सर्वात पहिला निकष नेहमीच त्या कलाकृतीमध्ये प्राण असणे हा असतो. शिव आणि शक्ती हे नेहमीच अद्वैत साधायला बघत असतात. त्यातूनच संसाराची निर्मिती होते कारण शेवटी अद्वैतानंतर सुद्धा पुन्हा आद्य अवस्था युग्म परतते. त्यामुळे चांगल्या कलाकृतीमध्ये कलावंताचा प्राण आणि त्याने वापरलेल्या साधनातून आणि माध्यमातून साकार झालेली अभिव्यक्ती यांच्यात किमान युग्म अवस्था असावी लागते . जर अद्वैत असेल तर अधिक उत्तम आपल्याकडे कवितेचा जो फार मोठा गवगवा आहे त्याचे सर्वात मोठे कारण कवितेमध्ये अद्वैत अवस्था निर्माण होण्याच्या चान्स सर्वाधिक असतो . कलांच्या संदर्भात अद्वैत निर्माण होण्याचा सर्वात मोठा चान्स हा शुद्ध शास्त्रीय संगीतामध्ये असतो म्हणूनच संगीत एवढे आध्यात्मिक बनत जाते. अपवादात्मक वेळेला चित्रकला अशी बनते बाकी सर्व वांग्मय प्रकारांमध्ये द्वैत भेद विशिष्ट भेद विशिष्ट अद्वैत भेद पूर्ण भेद द्वैत अशा अवस्था निर्माण होत असतात . यातील सर्वात मोठा पूर्ण भेद हा अभिनय कलेत असतो तिथे अभिनयानंतर ताबडतोब अभिनेता आपल्या व्यक्तिमत्त्वात आपल्या प्राणात आणि आपल्या शरीरात परततो .अभिनय ही त्याची अभिव्यक्ती असते. पडद्यावर त्याची फक्त अभिव्यक्ती असते पण दुर्दैवाने ऑडियन्सला कधीही हे कळत नाही ते या दोघांच्यात अभेद कल्पतात आणि त्यामुळेच अभिनेत्यांचा प्रचंड मोठा होतो गवगवा होतो हा एक प्रकारचा ऑडियन्सचा अडाणीपणा असतो पण हा अडाणीपणा सर्व मीडिया स्पॉन्सर करत असल्याने तो शोषण करत राहतो शेवटी कुठल्याही अडाणीपणाची काही ना काही तरी किंमत असते ऑडियन्स ती मोजत असतो पण त्याला हे कळत नाही की तो किंमत मोजतोय तुम्ही ज्या वस्तू खरेदी करत असता त्या मध्ये त्या प्रॉडक्टच्या जाहिराती करताना अभिनेत्यांना दिलेले पैसे सुद्धा असतात हे पैसे अदृश्य असतात त्यामुळे तुम्हाला ते कळत नाहीत. शेवटी कुठलाही उत्पादक जाहिराती करायला लागणारा पैसा शेवटी त्याच्या फायद्यातूनच कमवत असतो आणि हा फायदा त्याला वस्तूंच्या विक्रीतूनच मिळत असतो त्यामुळे साहजिकच वस्तूंच्या विक्रीमध्ये तो करत असलेल्या त्या वस्तूच्या जाहिरातीची प्रोडक्शन व्हॅल्यू सुद्धा इंक्लुड असते .
याशिवाय एखाद्या चित्रपटाचा किंवा तत्सम पटाचा जेव्हा आराखडा तयार होतो तेव्हा अभिनयाला अभिनेत्याला अभिनेत्रीला प्रोडूसर जो पैसा देतो तो पैसा सुद्धा प्रेक्षकांच्या अडाणीपणातूनच दिला जातो कारण त्या प्रोडक्शनची अभिनेता म्हणजे एका अर्थाने जाहिरातच असते तो फक्त आपला अभिनय विकत नसतो तर त्यापेक्षा तो अधिक त्याची लोकप्रियता विकत असतो आणि ही लोकप्रियता ऑडियन्सच्या अडाणीपणातून निर्माण झालेली असते. एकंदरीत जनता ही अडाणीच असते मूर्ख असते. ज्या जनतेला अभिनेता वेगळा आणि अभिनय वेगळा ही बेसिक गोष्ट कळत नाही त्या जनतेला उगाच शहाणपणा वगैरे असतो म्हणण्यात काही अर्थ नसतो . याला मी फेक अवस्था म्हणतो किंवा अवस्थांचा फेकनेस म्हणतो. आणि या फेक अवस्थांचा प्रचंड मोठा फायदा शोषक लोक घेत असतात आणि शोषण करत राहतात. या शोषण यंत्रणेला शोषणाच्या संस्कृतीला अभिनय संस्कृती असे नाव मी दिले होते . ही अभिनय संस्कृती चिन्ह सृष्टीच्या केंद्रस्थानी आहे त्यामुळे आता अवस्था अशी आहे की प्रत्येक जण अभिनय करायला लागलेला आहे प्रत्येक जण इन्फ्लुएंसर बनायचा प्रयत्न करतो आहे .सध्या तुमच्या स्टेटस इतकेच महत्त्वाचे काही असेल तर ते म्हणजे तुमचा इन्फ्लुएंस आहे . स्टेटस ही तुमची व्यक्तिगत अवस्था असेल तर इन्फ्लुएन्स हा तुमची सामाजिक अवस्था असतो . त्यामुळेच मोक्षाची साधना करणाऱ्या माणसाला व्यक्तीला स्टेटस आणि influence या दोन्हींच्या पासून लांब पळावे लागते अन्यथा मोक्ष मिळू शकत नाही. याला मी कधीकधी चिन्हसृष्टीय किंवा डिजिटल संन्यास म्हणतो .
म्हणजेच आशय आणि अभिव्यक्ती यांचा संबंध फक्त कलांशी नाही तर एकंदरच आयुष्याशी आहे , आयुष्यातल्या अनुभवाशी आणि आयुष्याच्या अनुभवाशी आहे
तुमच्या कलेची गुणवत्ता सुद्धा कलाकृतीची गुणवत्ता सुद्धा ही नेहमीच या अवस्था तुम्ही किती साधता त्यावर अवलंबून असते . आशय आणि अभिव्यक्ती यांच्यामध्ये अद्वैत आणि युग्म या दोन अवस्था जर का तुम्हाला साधल्या तर ती कलाकृती अधिक प्रभावी ठरते .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment