पोस्ट ट्रूथ जग सत्योत्तर जग
पोस्ट ट्रूथ जग श्रीधर तिळवे नाईक
प्रश्न : तुम्ही गेली काही वर्षे सातत्याने पोस्ट truth' बद्दल बोलत आहात खरोखर असे जग अस्तित्वात आले आहे काय ?
श्रीधर तिळवे नाईक: माझ्या माहितीप्रमाणे साधारण २०१६ च्या आसपास ही संज्ञा आली पण हा फिनॉमिना आत्ता आला का ? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जग कायमच truth ful होते किंवा पोस्ट truth सत्योत्तर होते आणि मोक्ष शोधणारे लोक अशा या जगामध्ये सत्यापर्यंत पोहोचत होते आणि post truth सत्योत्तर ला शह देत पुन्हा पुन्हा सत्याची स्थापना करत होते . इतिहासात जाल तर आदिम युगात निसर्गसत्य natural truth राज्य करत होते आणि या जगाला छेद देणाऱ्या सत्योत्तर जगाची सुरुवात श्रद्धेच्या काळातच झाली होती .श्रद्धेनेच प्रथम हे जग कसे निर्माण झाले अमुक एक वनस्पती कशी काय निर्माण झाली अमुक एक प्राणी असा कसा यासारख्या किंवा या प्रश्नांना कलात्मक उत्तरे द्यायला सुरुवात केली आणि तिथूनच post truth सत्योत्तर जगाचा आरंभ झाला उदाहरणार्थ बायबलचा आरंभ हे जग सात दिवसात कसे निर्माण केले या कथेने होतो आता ही कथा स्पष्ट आणि स्वच्छपणाने पोस्ट ट्रूथ म्हणजेच सत्योत्तर आहे म्हणजे जग निर्माण झाले होते ते समोर अस्तित्वात होते वावरत होते पण ते जसे आहे तसे स्वीकारण्याची तयारी नसणारे काही खोटारडे लोक होते त्यांना हे सत्य जग जसे आहे तसे झेपत नव्हते आणि म्हणूनच त्या सत्य जगानंतर या लोकांना एक वेगळे जग निर्माण करावेसे वाटले त्यातूनच ही कथा निर्माण झाली . कारण या जगाचा आरंभ दिसत नव्हता
ही कथा जगाला काल्पनिक आरंभ देते .काल्पनिक कथा निर्माण करणे काल्पनिक नॅरेटिव्ह निर्माण करणे हाच या कथेचा उद्देश आहे हे तर उघडच आहे .आपल्याकडे मनुस्मृतीमध्ये अशा प्रकारची निर्माण कथा आहे . नंतर हिंदूधर्माने शैव-धर्मांमध्ये हस्तक्षेप करून काही काल्पनिक पुराणे रचली त्यात सुद्धा शिवाने कशी सृष्टी निर्माण केली याच्या काल्पनिक कथा सांगण्यात आल्या. तेव्हा आपण हे लक्षातच घेतले पाहिजे की श्रद्धेचा कालखंड हा पोस्ट truth सत्योत्तर कालखंड होता त्यालाच मग भगवान शंकर यांनी शह देत मोक्ष युग निर्माण केले जे मोक्ष हे अंतिम सत्य आणि काम अर्थ हे संसारिक सत्य म्हणून सांगितले . याला पुन्हा एकदा शह देण्यासाठी मग ब्राह्मण पुरोहितांनी नवीन पोस्ट ट्रूथ धर्म निर्माण केला ज्याला आपण ब्राह्मण धर्म म्हणतो आणि ज्याचे ब्राह्मण आरण्यक आणि स्मृति ग्रंथ हे धार्मिक ग्रंथ आहेत. त्याला शह देण्यासाठी पुन्हा एकदा नकुलिश्याने पाशुपत, महावीराने जैन आणि गौतम बुद्धाने बौद्ध धर्म निर्माण केला पण याला शह देण्यासाठी पुन्हा एकदा पुरोहितांनी महाभारत रामायण आणि वैष्णव पुराणे यांच्या साह्याने वैष्णव धर्म निर्माण केला. सत्याच्या स्थापनेसाठी मग पुन्हा एकदा भर्तृहरी ने नवशिवयोग, नयनार लोकांनी भावशैव , नवनाथांनी नवनाथ धर्म निर्माण केला काश्मीर पंडित लोकांनी काश्मीर शैवागम निर्माण केला त्याला शह देण्यासाठी पुन्हा एकदा आद्य शंकराचार्य यांच्या साह्याने पुरोहितांनी वेदांत धर्म निर्माण केला जो वेद ब्राह्मण उपनिषदे स्मृती महाकाव्य पुराणोक्त असा धर्म होता . याला शह देण्यासाठी पुन्हा एकदा बसवेश्वर यांनी सत्य स्थापनेसाठी लिंगायत धर्म निर्माण केला . तेव्हा पुन्हा एकदा पुरोहित वर्ग संघटित झाला आणि त्याने त्याला शह देण्यासाठी पुन्हा एकदा हिंदू धर्म निर्माण केला जो वैष्णव धर्माचाच विस्तार होता या हिंदू धर्मामध्ये वेद ब्राह्मण आरण्यके स्मृती रामायण महाभारत वैष्णव पुराणे यांच्याबरोबरच आता शैव पुराणे शाक्त पुराणे आणि सर्व वैष्णव संतांचे लिखाण यांचा समावेश होता वैष्णव धर्म जर का पशुपत धर्म जैन धर्म आणि बौद्ध धर्म यांना गिळंकृत करण्यासाठी निर्माण झाला होता तर हिंदू धर्म हा शैव धर्माला गिळंकृत करण्यासाठी इथल्या आदिवासी लोकांना गिळंकृत करण्यासाठी निर्माण झाला होता वैष्णव आणि हिंदू या दोन्ही धर्मांनी आपले काम प्रामाणिकपणाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि अजूनही हा प्रयत्न चालूच आहे . त्यातील जैन आणि बौद्ध हे दोन धर्म गिळण्यात वैष्णव धर्म यशस्वी झाला परंतु शैव धर्म मात्र त्याला गिळता आला नाही याचे एकमेव कारण बसवेश्वर शिवाजी महाराज होळकर अशी शैव परंपरा पुढे देखील ठाम पणाने चालत राहिली . या परंपरेला गिळंकृत करण्यासाठी म्हणूनच एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय वाढवण्यात आला आणि त्याच्या वतीने जोरदार प्रचार करण्यात आला जेणेकरून खंडोबा , ज्योतिबा आणि तुळजाभवानी चे महत्व नाहीसे होऊन विठ्ठलाचे कृष्णाचे गीतेचे महत्त्व वाढावे . यांच्याबरोबरच वर्ण जात व्यवस्था प्रस्थापित व्हावी प्रत्यक्षामध्ये वारकरी संप्रदायाने हे काम पार पाडलेले आहे आणि वर्ण जात व्यवस्था महाराष्ट्रामध्ये सेटल करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे. हे काम व्यवस्थित व्हावे म्हणूनच ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी केंद्रस्थानी आणली गेली . पुरोगामी लोकांनी कितीही नाही म्हटले तरी ज्ञानेश्वरी मध्ये वर्ण जात व्यवस्थेचे समर्थन आहे तेव्हा पोस्ट ट्रूथ जग हे आत्ता आले आहे असे समजण्याचे काहीही कारण नाही फेक narretive आत्ता आलेली आहेत असे नाही धर्म हा फेक निवेदनांनीच बनलेला असतो . तुकाराम सदेह विमानात बसून वैकुंठाला गेले हे अलीकडच्या काळातले सर्वात लोकप्रिय निवेदन होय आणि ते फेक आहे हे सांगण्याची सुद्धा गरज नाही. पण वारकरी संप्रदाय त्याला सत्य म्हणून स्वीकारतो.
जे धर्म या संस्थेबाबत आहे तेच राज्य या संस्थेबाबत आहे. जगातले सर्वच राज्यकर्ते वारंवार फेक निवेदन सादर करत असतात. याबाबतीत कौटिल्य याचे अर्थशास्त्र वाचण्याजोगे आहे post truth सत्योत्तर जग कसे निर्माण करावे याचे तंत्रच या ग्रंथात सांगितले गेले आहे. महाभारतामध्ये अगदी युधिष्ठर सारखा धार्मिक मनुष्य सुद्धा शेवटी अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला की खरोखर माणूस मेला असे प्रश्नचिन्ह निर्माण करतो . आता हे narretive कोणी स्पॉन्सर केले ते पाहिले म्हणजे सर्व काही लक्षात येते. जर महाभारत प्रमाण मानायचे ठरवले तर महाभारताचे युद्ध कोणी घडवले कोण या युद्धाचा खरा नायक होता आणि त्याने किती लोकांचा मृत्यू घडवून आणला ती संख्या पाहिली तर लक्षात येते की हिंसा ही किती दैवी करता येते . बरे सर्व स्त्रिया सती गेलेल्या आहेत म्हणजे स्त्रियांचीही हिंसा झालेली आहे. आता हे कोणाच्या कर्माचे फळ ? स्त्रियांच्या स्वतःच्या कर्माचे फळ ?
मुळातच वस्तुस्थिती अशी आहे की करुणेचा अभाव आहे आणि करुणा नसलेला हा देव वारकरी संप्रदायाचा मुख्य देव आहे. आता यावर युक्तिवाद असा येऊ शकतो की मूळ देव वेगळा आहे मी म्हणेन की ओके पण मूळ देव मग शैव आहे तो स्वीकारता का ? म्हणजे मूळ देव स्वीकारायचा नाही आणि आयात केलेला देव कसा आहे ते स्पष्ट आहे . खांडव वनात लावलेल्या आगीमध्ये नाग आदिवासी आगीमध्ये जळत असताना शांतपणे बघत बसणे नंतरही युद्धात मरण पावलेल्या वीरांच्या पत्नी सती जात असताना शांतपणे पाहणे हे कोणत्या धर्मात बसते हे त्या देवालाच आणि त्याची पूजा करणाऱ्या भक्तांनाच ठाऊक !
थोडक्यात काय post truth सत्योत्तर जग पूर्वीही सत्याचा पराजय करायला आणले जात होतेच आणि आत्ताही तेच पुन्हा आलेले आहे
त्याची पद्धत सुद्धा एकच आहे १ वैज्ञानिक तर्कनिष्ठ चिकित्सेऐवजी भावनानिष्ठ संभाषिते प्रस्थापित करणे .
२ वैयक्तिक अंधश्रद्धा आणि धार्मिक सामूहिक श्रद्धा प्रचंड वाढवत नेणे त्यांचा प्रचार करणे
३ तज्ञ आणि पंडित लोकांचे सर्व संशोधन जास्तीत जास्त कचऱ्यात फेकणे त्यांना कचरा समजणे त्यासाठी त्यांना कचऱ्याची व्हॅल्यू देणे . याला मी "तज्ञतेचे कचराकरण " म्हणतो .
४ हे सर्व सहजरीत्या सोपे व्हावे म्हणून तज्ञ लोकांनी पुरावे देऊन निर्माण केलेले वैज्ञानिक इतिहास नाहीसे करून भावनेच्या आणि श्रद्धेच्या आधारे नवीन काल्पनिक दंतकथा इतिहास म्हणून रचणे.
५ सातत्याने प्रचार करत नवीन नवीन काल्पनिक शत्रू राज्यसंस्थेसाठी निर्माण करणे आपल्या विरोधकांना राज्यद्रोही म्हणून जाहीर करणे .
६ हे घडवण्यासाठी सातत्याने खोटे बोलणे खोटे मांडणे आणि त्यासाठी कलेचा वापर करणे अशी ही पद्धत आहे.
महाश्रद्धांनी आणि धर्मांनी हे फार पूर्वीपासून केलेले आहे त्यामुळेच हे काही नवीन नाही ज्याला आंबेडकर प्रतिक्रांती म्हणतात ती प्रतिक्रांती नेहमीच पोस्ट ट्रूथ युगाने घडवलेली क्रांती असते . ती सत्याचा विनाश करते सत्यानाश करते आणि खोट्याचा अखंड विजय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये जे विजयी होते ते सत्य असते त्यामुळेच विजयी झालेले खोटे सत्य म्हणून तुमच्या बोकांडी बसते .अर्थातच प्रत्येक वेळी सत्य उमगणारा आणि त्याचा प्रचार करणारा कोणी ना कोणीतरी येतोच आणि तो किंवा ती या खोटेपणाचा या पोस्टट्रूथ युगाचा नाश करते . मुळातच खोटेपणा फार काळ वाढ ,उन्नती,प्रगती ,वाढ ,विकास घडवू शकत नाही त्यामुळेच तो आतून आपोआपच स्वभावताच खिळखिळा व्हायला लागतो . याही पोस्ट ट्रूथयुगाचा शेवट काही वेगळा होईल असे नाही हेही युग आतून खिळखिळे होत जाईल त्यामुळे या युगाला मी घाबरत नाही मी फक्त ते अधिक खिळखिळे व्हावे म्हणून अधिक चार खिळे ठोकतो.
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment